‘वेदर फोरकास्ट बघितले का? आपण जाण्याच्या दुसर्या आणि तिसर्या दिवशी -९ डिग्री सेल्सिअस तापमान आणि सीझनची पहिली बर्फवृष्टी दाखवत आहे. आपल्याला खरंच जायला हवे का?’ मी चिंतातुर स्वरात बायकोला विचारले.
‘अजून पंधरा दिवस आहेत ट्रिपला जायला तोपर्यंत तापमान वाढेल. ट्रिप रद्द करायची असेल तर अजून वाट बघूया,’ बायकोचा ठाम आणि निश्चित स्वर बघूनसुद्धा माझे काही समाधान झाले नाही. तसे बघायला गेले तर नवरा-बायकोचे विचार म्हणजे एकजण असतो उत्तर ध्रुवावर आणि दुसरा दक्षिण ध्रुवावर. यात वावगं काही नाही, पण दोघांना एकत्र पुढे जायचे असेल तर दोघांना विषुववृत्त रेषेवर म्हणजे ठराविक पावले एकमेकांसमोर टाकत एका रेषेवर एकत्र येत एकमत बनवावे लागते. पण इकडे तर बायकोच्या तुफानी इच्छाशक्तीपुढे ट्रॉम्सोच्या हवामानाने सुधारायचे ठरवले (अर्थात मी सुद्धा).
ट्रॉम्सो (नॉर्वे) हे काही नेहमीचे पर्यटनस्थळ नाही. उत्तर ध्रुवाजवळचे चांगली लोकसंख्या असलेले, नॉर्दर्न लाइट्सची (उत्तर ध्रुवीय प्रकाश) राजधानी असा लौकिक असलेले आणि पृथ्वीच्या आर्क्टिक सर्कलमधले शहर (आर्क्टिक सर्कलच्या उत्तरेकडील प्रदेशात विशिष्ट काळात सूर्य उगवत नाही, तर दुसर्या काळात सूर्य पूर्ण २४ तास आकाशात असतो. याला ‘मिडनाइट सन’ आणि ‘पोलर नाइट’ असे म्हणतात. पोलर नाइटमध्ये दिवसाचा प्रकाश फक्त काही आठवडे किंवा महिने असू शकतो). आता ऑक्टोबर/नोव्हेंबरमध्ये तापमान शून्याच्या वर जात नाही. मुसळधार, धुवांधार हे शब्द फिके वाटतील असा बर्फाचा मौसम चालू होण्याचा काळ. रात्रीची निवांत झोप आणि स्पॅनिश उन्हाची सवय असलेल्या माझ्यासारख्याला हे बर्फाळ पर्यटन लहान मुलीबरोबर झेपणार नाही अशी खात्री असल्याने मी बायकोला महिनाभर नॉर्वे ट्रिपसाठी खराब हवामानाचे कारण देत नकार देत राहिलो. पण यावेळी बायकोने पर्यटनस्थळाचा (नॉर्वे) होमवर्क जबरदस्त केल्याने मग मी नेहमीप्रमाणे मान तुकवली. तिने केवळ स्थळांचा (ट्रॉम्सो, ओल्सो आणि बर्गन) अभ्यास नाही तर किफायशीर विमानप्रवासाचा मार्ग, बघायची ठिकाणे, नॉर्दर्न लाइट्ससाठी राहण्याची ठिकाणे, ऑस्लो ते बर्गनचा ट्रेनचा प्रवासमार्ग, बर्फाळ पर्यटनासाठी आवश्यक कपडे, बूट वगैरेचा प्रत्येक गोष्टीचा विचार तिने आधीच करून ठेवला होता. तरीसुद्धा प्रत्यक्षात सगळ्याचे बुकिंग करताना नॉर्वेमधील महागड्या दरामुळे चांगलाच घाम फुटला आणि कधी नव्हे ते हे सगळे बुकिंग करण्यासाठी नार्वेजियन क्रौन करन्सीबरोबरच माझे पंधरा ते वीस दिवससुद्धा खर्ची पडले. महागड्या दरामुळेच नॉर्वे हा देश माझ्या १५ देशांच्या प्रवासामधला सर्वात महागडा देश ठरला. यामुळेच प्रवासाच्या योजनेत आणि वेळापत्रकात बदल करावा लागला, जेणेकरून प्रवासाचे बजेट आटोक्यात राहील आणि आम्हाला मुलीच्या वेळा पाळून व्यवस्थित स्थळदर्शन करता येईल.
सहलीचे व्यवस्थापन : विमानप्रवास
सर्वप्रथम विमानप्रवास बुक करताना लंडन-ट्रॉम्सो-ऑस्लो-लंडन असा एकमार्गी विमान प्रवास न करता लंडन-ऑस्लो (परतीच्या प्रवासासकट) ऑस्लो-ट्रॉम्सो (परतीच्या प्रवासासकट) असे दोन वेगवेगळे प्रवासमार्ग निवडावे लागले. एकतर्फी विमान प्रवास खूप वेळा महाग ठरतो. ऑस्लो ते बर्गन व्हाया फ्लॅमच्या रोडप्रवासाला पण चाप लागली. सुरुवातीला ट्रॉम्सोमध्ये तेथील सार्वजनिक व्यवस्था (बस) आणि ऑस्लो ते बर्गेन प्रवासासाठी ट्रेन वापरण्याचा विचार होता. हा ट्रेन प्रवासमार्ग जगातील सर्वोत्तम नेत्रसुखद मार्ग आहे. पण ट्रेन तिकिटाचे दर बघून आपली चारचाकी गाडी बरी म्हणून दोन्ही ठिकाणी इलेक्ट्रिक गाडीचा (फोल्क्सवॅगन आयडी-३) पर्याय निवडला (मुसळधार पावसाच्या पुराच्या वॉर्निंगमुळे ओल्सो ते बर्गेन ट्रेनचे टाइमटेबल विस्कळीत झाले आणि रोड ट्रिपचा निर्णय पुढे अचूक ठरला). ट्रॉम्सो ट्रिपचा मुख्य उद्देश फक्त नॉर्दर्न लाइट्स आणि त्यामध्ये रेनडियर सफारी करायचा होता. त्यामुळे ट्रॉम्सोसाठी पाच दिवस पुरेसे होते आणि उरलेल्या पाच दिवसांसाठी, ट्रॉम्सो ते ऑस्लो (उत्तरेकडून दक्षिणेकडे) विमानप्रवास करून ऑस्लोला रात्री हॉटेलला थांबण्याचा बेत केला. मग दुसर्या दिवशी सकाळी, ऑस्लो ते बर्गेन असा पूर्ण प्रवास (४८१ किमी = ७.५ तास) न करता मध्यवर्ती ठिकाण असलेल्या फ्लॅमला (३१३ किमी = ५ तास ) जाऊन परत ऑस्लो जाण्याचा रोड मार्ग निवडला.
अरबीएनबी घर
ट्रॉम्सोमध्ये राहण्याच्या ठिकाणासाठी बायकोने एक चेकलिस्ट बनवली होती. प्रथम राहण्याची जागा शहराच्या बाहेर आणि आजूबाजूला स्ट्रीट लाइट किंवा रात्रीचा मानवनिर्मित प्रकाश तेथे कमी असला पाहिजे, जेणेकरून घराशेजारून नॉर्दर्न लाइट्स दिसल्या पाहिजे. (माझ्या पूर्वग्रहदूषित अनुमानानुसार ट्रॉम्सो हे तर गाव असणार होते, तेथे आड जागी स्ट्रीट लाइट्सचा संबंध कोठे येणार हे सांगून बायकोला सांगून थकलो. पण वुमन इज ऑल्वेज राइट या उक्तीनुसार माझा अंदाज चुकला, कसा ते सांगतो नंतर). दुसरी गोष्ट म्हणजे घराजवळ लहान दुकान असले पाहिजे. कारण आम्ही एअरबीएनबीचा पर्याय (जिथे तुम्ही हॉटेलमध्ये नाही तर सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज घरात राहता) निवडत असल्याने सकाळी आणि कदाचित रात्रीचे खाणे घरीच बनवणे आवश्यक होते. आणि तिसरी म्हणजे तिथे स्थानिक बसचा स्टॉप असेल तर उत्तम. धुवांधार बर्फ पडत असेल तर लोकल बसचा पर्याय सर्वोत्तम असेल हा विचार त्यामागे होता. आमचे विमान ऑस्लोवरून ट्रॉम्सोला रात्री ८ वाजता पोहोचणार होते म्हणून कारने ३० मिनिटांच्या अंतर असलेल्या परिघातले ठिकाण राहण्यासाठी बायकोला सुचवले. सुदैवाने जसे पहिजे होते तसे घर मिळाले आणि सगळे चेकलिस्टचे पर्याय टिक झाले. निवडलेल्या घरापासून एक किमी अंतरावर बस स्टॉप कम बस स्टेशन होते (जे आम्हाला तेथे पोहचल्यावर कळले आणि सिटी सेंटर किंवा एअरपोर्टला जाण्यासाठी हा सर्वात पहिला स्टॉप होता) आणि बाजूलाच सुपरमार्केट होते. दुसरा आणि तिसरापण ऑप्शन टिक. मालकाने एअरबीएनबीच्या साइटवर नॉर्दर्न लाइट्सचे भरपूर फोटो टाकून जाहिरात केली होती आणि या घराचे (आमच्याआधी ते घर वापरलेल्या लोकांनी दिलेले) रिव्ह्यूजसुद्धा पाच स्टार असलेले होते.
हवामान आणि इतर बस सहली
घराचे आणि विमानाचे बुकिंग करून दोन महिने झाले होते. परंतु जाण्याच्या चार दिवस आधी हवामानाच्या अॅपवर ट्रॉम्सोचे हवामान उणे ९ अंशावरून उणे २ अंश सेल्सियस असे सुधारलेले दाखवत असले तरी दुसर्या दिवशीपासून ते पाचव्या दिवशीपर्यंत बर्फवृष्टीची शक्यता ७० टक्के ते ८० टक्के दाखवत होती. येथील वेधशाळेचा हवामानाचा अंदाज सहसा चुकत नाही. त्यामुळेच ‘घराशेजारून नॉर्दर्न लाइट्स दिसणार का?’ हा मोठा प्रश्न होता. खराब हवामानामुळे या लाइट्स दिसणार नाहीच ही शक्यता धरूनच आम्हाला नॉर्दर्न लाइटची टूर बस ट्रॉम्सोला जाण्याच्या आधी दोन दिवस आधी बुक करावी लागली (ह्या टूर खूपच महागड्या असतात). बायकोने रेनडिअरची सफर आधीच बुक केली होती आणि ती अजून वेगवेगळ्या साहसी सहली बुक करण्याची मनीषा बाळगून होती. मग मात्र नॉर्वेच्या प्रवासामुळे आम्हा दोघांचे वाढलेले खर्चाचे आकडे, बर्फासाठी भान हरपलेली लहान मुलगी आणि खराब होत चाललेले हवामान याकडे तिचे लक्ष वेधले, तेव्हा कुठे मॅडम थांबल्या. आधुनिक जगातल्या ‘बिचार्या’ पुरुषाचा जन्म म्हणजे किती त्या यातना, किती तो आरोग्य आणि सुरक्षेचा विचार, कुठे कुठे, कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायचे, हुश्श. परत रेंटल कारमुळे एअरपोर्टपासून घरापर्यंचा रस्ता आणि घरापासून ते सिटी सेंटरचा रस्ता गुगल मॅपमधून बघून घेण्यात जास्त दिवस आणि वेळ खर्ची पडला.
नॉर्वेमध्ये रेस्टॉरंट महाग असल्याने आम्ही काही रेडी-टू-ईट फूड पॅकेट्स आणली होती. एअरबीएनबी असल्यामुळे आम्ही घरी जेवण बनवू शकत होतो. नाहीतर आम्हाला बजेट फ्रेंडली कॅफेचा पर्याय होता.
मागच्या पोर्तुगालच्या प्रवासात मी युकेचे सिम कार्ड इंटरनेट आणि डेटासाठी वापरले होते. परंतु प्रवासाच्या शेवटच्या दिवशी डेटा पॅक संपला आणि मला तो रिफिलही करता येईना. ती चूक टाळण्यासाठी मी आधीच स्थानिक ई-कार्ड घेऊन ठेवले होते. त्याचा फायदा खूप झाला. नॉर्वे हे जबरदस्त इंटरनेट स्पीड आणि कनेटिव्हिटीसाठी ओळखले जाते आणि याचा प्रत्यय आम्हाला ठिकठिकाणी आला, तो अनुभव मी सांगत जाईनच.
दिवस पहिला- लंडन ते ट्रॉम्सो व्हाया ऑस्लो
लंडन ते ट्रॉम्सोचा थेट विमानप्रवास केवळ तीन तासाचा, पण बजेट सांभाळण्याच्या नादात लंडन ते ट्रॉम्सो व्हाया ऑस्लो प्रवास जवळजवळ पूर्ण दिवसाचा झाला. जसे लहानपणी व्हिडिओ गेम खेळताना एक एक लेव्हल वर जाताना गेम खूप कठीण होत जातो, तसतसा आमची मुलगी दीड वर्षांची असल्यापासून सुरू केलेला विविध देशांचा आमचा हा स्वनियोजित प्रवास खूपच साहसी होतो आहे, असे मी बायकोला सांगितले. शून्याच्या खालील तापमानामध्ये मुलीबरोबरचा प्रवास खूपच कठीण असल्याची जाणीव आम्हा दोघांना होती. ट्रॉम्सोच्या विमान प्रवासात, आपण एकमेव असू फॅमिलीवाले, ही माझी भविष्यवाणी ऐकून बायकोची धाकधूक खूप वाढली. पण या विमानप्रवासासाठी बोर्डिंग डेस्कच्या बाजूला आल्यावर लंडन ते ऑस्लोच्या प्रवासातील काही कुटुंबाना तिकडे बघितल्याबरोबर मी चकित झालो. म्हणजे ही केवळ आमचीच गोष्ट नव्हती, आमच्याबरोबर तीन-चार लहान मुलांसकट आलेल्या फॅमिलींनी पण तोच बजेटचा विचार केला होता आणि तेही एवढा साहसी प्रवास करत होते. नवरा चुकला की त्याची भविष्यवाणी क्रिस गेलच्या षटकाराने भिरकावलेल्या चेंडूसारखी स्टेडियमपार जाते आणि प्रत्येक बायकांच्या चेहर्यावर विजयी, विराट (की विकट?) हास्य येते. इथे पण तीच स्थिती होती आणि मी चेहरा लपवत होतो. ही तर केवळ सुरुवात होती, माझे अंदाज (पूर्वग्रह म्हणा किंवा अनुमान म्हणा) चुकण्याची, हे तर मान्य करायला हवे. (होते असे कधीतरी, न्यूटनचा सुद्धा त्याच्या मांजरीच्या पिल्लाबाबतचा अंदाज असाच चुकला होता ना). तोपर्यंत माझी मुलगी बोर्डिंग डेस्कच्या बाजूला असलेल्या छोट्या दहा बाय दहाच्या विमानाच्या मॉडेलवर इतर मुलांबरोबर मस्तपैकी खेळत होती. ऑस्लो एअरपोर्टवर मुलांसाठी खेळण्यासाठी विविध गोष्टी ठेवल्या आहेत, ज्या मी आजपर्यंत केलेल्या विमानप्रवासात खूपच कमी वेळा बघितल्या आहेत. त्यांच्यासाठी एअरपोर्ट व्यवस्थापनाला १० पैकी १० गुण.
सकाळी सात वाजता घर सोडले होते, ट्रॉम्सोच्या एअरपोर्टला बॅग घेईपर्यंत रात्रीचे सव्वाआठ झाले. ‘एकदा भाड्याची कार घेतली की साडे नऊपर्यंत घरी जाऊ’ असा परत मी (चुकीचा) अंदाज बांधला. पण माझा नंबर येईपर्यंत पावणेनऊ झाले आणि मला प्रश्न पडला की एवढे लोक ट्रॉम्सोला हिवाळ्यात येऊन काय करणार आहेत? (त्याचे उत्तर मला लगेच एअरपोर्ट बाहेर पडल्यावर मिळाले.) तोच प्रश्न मी कार भाड्याने देणार्या ऑपरेटरला विचारला. ‘हिवाळा हा नॉर्वेसाठी ऑफ-पीक सीझन असेल पण ट्रॉम्सोसाठी गर्दीचा सीझन आहे, आता ट्रेंड बदलतो आहे,’ तो हसत हसत बोलला आणि त्याने आडून आडून मला ‘मी ट्रेंडच्या मागे पडलो आहे’ याची जाणीव करून दिली. हाय रे मेरी किस्मत, इकडे बायको हसते आहे आणि आता हा. ‘जिंदगी ना मिलेगी दुबारा’मधल्या हृतिकची प्रवासाच्या सुरुवातीची जी स्थिती असते तशीच काहीशी माझी अवस्था. जी इलेक्ट्रिक गाडी बुक केली होती ती काही मिळाली नाही आणि सुझुकीची एस क्रॉस पेट्रोल कार मिळाली.
ट्रॉम्सोच्या एअरपोर्टबाहेर पडताना, भाड्याची कारचे पार्किंग शोधताना एक मोठा ग्रुप आकाशाकडे दिशेने मोबाईल लावून नॉर्दर्न लाइट्स शोधत होता. त्या दिवशी दिसायची शक्यता खूप जास्त होती. मग काय, आम्ही पण त्यात सामील झालो पण दर्शन स्पष्टपणे झाले नाही. मग जास्त वेळ न दडवता पार्किंगमधली गाडी शोधली, अंधारातच मोबाईल टॉर्च लावून गाडीचा बाहेरून सगळीकडून वीडियो बनवला आणि कारची कंडिशन चेक केली. (जेव्हा तुम्ही भाड्याची गाडी घेता तेव्हा कारवर ओरखडे किंवा डेंट आहेत का ते बघावे लागते. ते असतील आणि कागदपत्रात नमूद केले नसतील तर त्या ऑपरेटरला आधीच सांगावे लागते. अन्यथा ट्रिप पूर्ण झाल्यावर कार परत करताना तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो.)
एअरबीएनबीच्या घरी जाण्यासाठी कारमध्ये बसल्यावर बायकोने नेहमीच्या सवयीने दोन कामे करण्यासाठी बजावले. पहिले म्हणजे डिनरसाठी कॅफे किंवा रेस्टॉरंटचा ऑप्शन आणि सकाळच्या ब्रेकफास्टसाठी ब्रेड, दूध, चीज, सलाडच्या भाज्यासाठी सुपरमार्केट बघणे. सुदैवाने एक सुपरमार्केट चालू होते आणि गुगल कॅमेरा लेन्स भाषांतर अॅपमुळे झटपट सामान शोधून घेता आले. खरंच गुगलचे मानवजातीवर खूप उपकार आहेत. २०१८च्या हिवाळाच्या सुरुवातीला आम्ही स्वतंत्रपणे पर्यटनाला जायची सुरुवात ऑस्ट्रियाच्या साल्झबर्ग या छोट्या शहरातून केली होती आणि तिथे सुपरमार्केटमध्ये असलेल्या विविध दूध प्रकारांमधून तेव्हा दीड वर्षाच्या मुलीसाठीचे दूध शोधण्यात आमची तारांबळ उडाली होती. कारण सगळीकडे असलेली जर्मन/फ्रेंच/हंगेरियन भाषा. कोणालाच इंग्रजीचा गंध नाही. पण सुदैवाने एका वयस्कर स्त्रीने इंग्रजी येत नसताना केवळ हातवारे करून, शारीरिक भाषेने आमची सुटका केली होती. असे म्हणतात की भाषेचा उपयोग केवळ शब्दांद्वारे संवाद साधण्यासाठी केला जातो, परंतु मानवी शरीराची भाषा (ज्याला ‘शारीरिक भाषा’ किंवा ‘बॉडी लँग्वेज’ म्हणतात) हे सुद्धा संवादाचे एक महत्त्वाचे साधन आहे. हे अनेक वेळा शब्दांच्या आधी किंवा त्याआधी आपले विचार, आणि भावना व्यक्त करते.
दोन्ही गोष्टी साध्य झाल्यावर घरासाठी मार्गस्थ झालो. सुरुवातीला ही कार चालवताना मला रणगाडाच वाटली, जिचे टायर जणू रस्त्यावर चिकटवले आहेत असा जड फील मला चालवताना आला. एअरपोर्टपासून एका गावात जाण्यासाठी सुद्धा विद्युतदिव्यांचे (स्ट्रीट लाइट) जाळे कसे आहे याचा प्रश्न पडल्यापासून राहत नाही. याचे उत्तर नॉर्वेच्या स्वयंपूर्ण ऊर्जा उत्पादनात आहे. नॉर्वेतील ऊर्जा उत्पादन विविध आणि पर्यावरणास अनुकूल स्रोतांवर आधारित आहे. नॉर्वे हा एक असा देश आहे जो मोठ्या प्रमाणावर नवीन व पुनर्नवीनीकरण ऊर्जा स्रोतांचा (रिन्युएबल एनर्जी) वापर करतो.
नॉर्वेचे ९० टक्क्यांपेक्षा अधिक ऊर्जा उत्पादन हायड्रोपॉवर (जलविद्युत) आधारित आहे. नॉर्वे हा हायड्रोपॉवर जनरेटरचा एक मोठा उत्पादक आहे. नॉर्वेतील अनेक जलाशय आणि नदींवर बांधलेले धरणे विद्युतनिर्मितीसाठी वापरले जातात. त्यामुळे नॉर्वे खूपच स्वच्छ ऊर्जेचे (क्लीन एनर्जी) उत्पादन करत आहे. सरकारी प्रोत्साहन धोरण आणि ऊर्जा उत्पादनासाठी आवश्यक पायाभूत विकास यामुळे हा जगातील इलेक्ट्रिक कार वापरणारा सर्वात मोठा देश बनला आहे. आपले सरकार पेट्रोल डिझेलच्या कमी वापरासाठी इलेक्ट्रिक कारला प्रोत्साहन देते, पण त्याला लागणारी ऊर्जा आपण कोळसा जाळून निर्माण करतो (जो खूप जास्त प्रदूषित आहे) असा आपला उलटा सरकारी खाक्या! असो.
आता मुक्कामी तर पोहोचलो. पुढे कुठे कुठे गेलो आणि काय काय पाहिलं, ते पुढच्या भागात. (क्रमश:)
– स्वप्नील राणे