आपल्या मोबाईलवर जर एखादा अनोळखी नंबरवरून फोन आला आणि समोरची व्यक्ती गोड बोलून, कसलीही प्रलोभनं देऊन किंवा धमकी देऊन, घाबरवून तुम्हाला आपल्या जाळ्यात फसवत असेल तर तो प्रकार हा विशिंगचा (व्हॉइस फिशिंग- फिशिंग हा सायबर जाळ्यात माणसांना अडकवून त्यांची फसवणूक करण्याला वापरला जाणारा शब्द एव्हाना या सदराच्या वाचकांना परिचयाचा झालेला आहेच) असतो. समोरून बोलणारी व्यक्ती खरंच ती जे सांगते आहे तीच आहे का, याची खातरजमा न करता, त्याबद्दल प्रश्न पाडून न घेता, ती व्यक्ती जे काही बोलते आहे, ते खरे आहे, असं भावनेच्या भरात मानणारे अनेक जण त्यात सहज फसतात. त्यामुळे कोणत्याही अनोळखी नंबरवरून आलेल्या फोनच्या बाबतीत चटकन विश्वास टाकू नये, प्रलोभनांना भुलू नये आणि धमक्यांना घाबरू नये. विशेष म्हणजे अनोळखी व्यक्तीला आपली कोणतीही माहिती देण्याचे धाडस अंगाशी येऊ शकते, हे आपण कायम लक्षात ठेवावं.
मोबाईलचा वापर हा आजकाल प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भागच बनला आहे. शाळकरी मुलांपासून युवक, ज्येष्ठ व्यक्ती अशा सगळ्या मंडळींच्या हातात मोबाईल दिसतोच. याच्या वापरामुळे काम हलके होत असले तरी त्यामुळे फसवणूक देखील होऊ शकते. आज आपण पाहणार आहोत तो फसवणुकीचा प्रकार हा विशिंग (व्हॉइस फिशिंग) या नावाने ओळखला जातो. त्यात अनोळखी व्यक्ती फोनवरून खोटी माहिती देऊन आपल्याला भ्रमित करतात. ते इतक्या वेगाने केलं जातं की गडबडून गेलेला माणूस त्या फसव्या फोनवर सहज विश्वास ठेवतो आणि भावनेच्या भरात स्वतःची फसवणूक करून घेतो. या प्रकाराला बळी पडणार्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण अधिक आहे. व्हॉइस फिशिंगचा प्रकार नेमका घडतो कसा? पुढच्या छोट्याश्या कथेतून जाणून घेऊ या.
मंदाकिनी दाते या नागपूरच्या रहिवासी. त्या बँकेतून सेवानिवृत्त झाल्या होत्या. सुटीचे दिवस घालवण्यासाठी त्या पुण्याला आपल्या मुलीकडे आल्या होत्या. त्यांची मुलगी सुधा एका कॉलेजात प्राध्यापक होती. तिचा मुलगा इंजिनिअरिंगच्या दुसर्या वर्षाला शिकत होता. तिचा पती आयटी कंपनीत काम करत होते. त्यामुळे सुधाच्या घरी दिवसभर कोणी नसायचे.
एक दिवस मंदाकिनी यांच्या मोबाईलवर अनोळखी नंबरवरून फोन आला. नंबर माहितीचा नसूनही त्यांनी तो घेतला. समोरची व्यक्ती उदास, धीरगंभीर सुरात बोलत होती. आजी, मी राजू बोलतोय. जळगावावरून पाचोर्याला गाडीने जात असताना अपघात झाला, त्यामध्ये तुमचा नातू विशाल (हा मंदाकिनी यांच्या मुलाचा मुलगा, ते नागपूरलाच त्यांच्यासोबत राहायचे) आहे, गाडी तोच चालवत होता. त्यामुळे तो आता चांगलाच अडचणीत सापडला आहे. तुमच्या कानावर ही माहिती जावी म्हणून तुम्हाला हा फोन केला आहे.
या तथाकथित राजूचे बोलणे पूर्ण होते ना होते तोच, मंदाकिनी काळजीने त्याला म्हणाल्या, विशाल बरा आहे का? तुला काय मदत करू मी?
या प्रश्नावर राजू म्हणाला, काही प्रमाणात वैद्यकीय मदत आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आता ५० हजार रुपयांची आवश्यकता आहे, तुम्ही ते पैसे मला पाठवा, बाकी काही काळजी करू नका. इतर कुणाला काहीच कल्पना देऊ नका, मी सगळे प्रकरण मिटवतो.
मंदाकिनी यांनी त्या राजू असं नाव सांगणार्या माणसाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्याला पैसे पाठवले. त्यानंतर काही वेळाने मंदाकिनी यांनी त्या नंबरवर विशालची चौकशी करण्यासाठी फोन केला. पण तो फोन बंद होता. नातवाचा अपघात झाला असल्यामुळे चिंतेत पडलेल्या मंदाकिनी यांनी नागपूरच्या घरी फोन केला, तेव्हा तो कुणीच उचलत नव्हते. अखेरीस त्यांनी आपल्या मुलाला, संजूला या प्रकाराची कल्पना देण्यासाठी फोन केला. रडत रडत त्यांनी संजूला सगळा प्रकार सांगितला. विशालचा अपघात झाला आहे जळगावजवळ, असे सांगितले.
संजू म्हणाला, आई, तसे काहीच झालेले नाही. १० मिनिटांपूर्वी तो बॅडमिंटन खेळायला गेला, मीच त्याला माझ्या स्कुटरवरून सोडले, तुला हे कुणी सांगितले. विशाल नागपुरातच आहे.
त्यावर मंदाकिनी म्हणाल्या, मला मोबाईलवर एक फोन आला होता, त्याने मला विशालचा अपघात झाला आहे असं सांगून त्याच्यावर उपचार करण्यासाठी आणि कायदेशीर प्रक्रिया करण्यासाठी ५० हजार रुपयांची गरज असल्याचं सांगितलं. ते पैसे तातडीने पाठवायला सांगितलं. मी त्यावर विश्वास ठेवून ते पैसे त्याला ऑनलाइन पाठवून दिले. इतर कुणाला ही गोष्ट सांगू नका, असे त्याने सांगितल्यामुळे मी तुला उशिरा फोन केला, असे मंदाकिनी यांनी संजूला सांगितले तेव्हा त्याने शांतपणे आईला सांगितलं, आई, तुझी फसवणूक झाली आहे.
मंदाकिनी या व्हॉइस फिशिंगच्या बळी ठरल्या होत्या. मुळात अनोळखी नंबरवरून आलेला फोन त्यांनी घ्यायला नको होता. आपल्या जवळचा माणूस अपघातात सापडला तर त्याचीही शहानिशा करायला हवी. अपघातग्रस्त नातू आधी स्वत:च्या आईबाबांना फोन करायला सांगेल की आजीला? अशा प्रकारांमध्ये समोरची व्यक्ती अतिशय बेमालूम अभिनय करून आपण खरं बोलत असल्याचं भासवते. तुम्हाला बोलण्यात गुंगवून ठेवायचं आणि विचार करायला वाव न देता लगेच निर्णय घ्यायला भाग पाडायचं, हेच त्यांचं काम असतं. भावनेच्या भरात कोणतीही शहानिशा न करता कोण असं वागेल याचा त्यांना अंदाज असतो. म्हणून तर आजीला टार्गेट केलं गेलं.
अशी घ्या काळजी…
आर्थिक व्यवहारांबाबत सावधगिरी बाळगा : परिस्थिती आणि कॉलरच्या ओळखीची स्वतंत्रपणे पडताळणी केल्याशिवाय कधीही पैसे पाठवू नका किंवा फोनवरून आर्थिक माहिती देऊ नका. पहिल्या फोनमध्ये तर हे बिल्कुल करू नका. फोन बंद करून इतर कोणाला फोन करून खात्री करून घेणार आहे किंवा याबद्दल इतर कुणाला कळवणार आहे, असं सांगितलं तरी समोरचा गुन्हेगार बिथरतो, तसं न करण्याचा दबाव आणू पाहतो. तेव्हाच लक्षात यायला हवं की दाल में कुछ काला है…
कॉलर ओळख स्पष्ट करा : आपल्याला अशा प्रकारचा फोन अनोळखी नंबरवरून आला आणि समोरची व्यक्ती जर कुटुंबातील सदस्य किंवा कोणी आप्तेष्ट संकटात असल्याचा दावा करत असेल तर त्याला व्यक्तिगत स्वरूपाचे प्रश्न विचारा, ज्यायोगे तो माणूस ज्याचं नाव घेतो आहे, त्याला खरंच ओळखतो का, त्याच्याशी खरंच काही लिंक आहे का, हे स्पष्ट होईल.
तक्रार करा : संशयास्पद फसव्या फोन कॉलची पोलिसात तात्काळ तक्रार करा.
घरातील ज्येष्ठांना शिक्षित करा : सहसा घरातील ज्येष्ठ नागरिकांना अशा घोटाळ्यांचे लक्ष्य केले जाते. वृद्ध कुटुंबातील सदस्यांना अशा मोबाइलवरून केल्या जाणार्या फसवणुकीबद्दल शिक्षित करा आणि त्यांना पैशाची मागणी करणारे अनपेक्षित कॉल आल्यावर कशी सावधगिरी बाळगायची याचे शिक्षण द्या.