कॉमेडी नाटकांचे क्रेझ संपून रंगभूमीवर आता हॉरर नाटकांचे वारे घोंगावतायत, असं एकूण चित्र आहे. एके काळी पौराणिक, कौटुंबिक, ऐतिहासिक, व्यक्तिप्रधान अशा नाटकांची चलती होती. आज थरार, सस्पेन्स याकडे सारे रस्ते वळताहेत. मराठी रंगभूमीवर तसा विषयांचा कधीही तोटा नव्हता आणि नाही. बदलत्या परिस्थितीत नवनवीन संकल्पना आकार घेत असतात. आता थरथराटाचे नवे पर्व जणू सुरू झालंय.
नाटककार नीरज शिरवईकर आणि दिग्दर्शक विजय केंकरे या जोडगोळीने ‘परफेक्ट मर्डर’ आणि ‘यू मस्ट डाय’ ही त्याच विषयावरली नाटके दिलीत. त्यांचं रसिकांनी चांगलं स्वागत केलंय. आता त्याच वाटेवर ‘दोन वाजून बावीस मिनिटांनी…’ हे नावापासूनच उत्सुकता वाढविणारं नवं नाटक रंगभूमीवर अवतरलंय. यासोबतच संजय जमखंडी लिखित-दिग्दर्शित ‘मी व्हर्सेस मी’ हे गूढ थरारक नाट्यही सज्ज झालंय. आणखीन चारपाच नाटकेही विंगेत उभी आहेत.
भुता-खेताची, साप-विंचवाची, जादूटोण्याची, जंगलातल्या किर्र अंधाराची, वेगवान वळणाची, कोसळणार्या धबधब्याची, दर्या-खोर्यांची भीती ही अगदी बालपणापासूनच मनात घर करते. त्यात भुतांबद्दलच्या एकेक गोष्टी या तर कळसच! भूत-भुताटकी सर्वांचाच घबराट उडविणारा विषय. भूत म्हणजे मृत व्यक्तीचा अतृप्त आत्मा, असंही म्हणतात. तो कुठलंही रूप धारण करू शकतो आणि इच्छा पूर्ण झाल्यावर मुक्त होतो, असा समज आहे. काही आत्मे सज्जन तर काही दुर्जन. कोकणात तर भुतांचे अनेक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आहेत. अर्थात या नाटकाच्या कथानकातलं भूत हे कोकणातलं मूळ नाही तर ते परकीय कथानकातून घेतलंय. डॅनी रॉबिन्सन यांच्या इंग्रजी कथेवर यातली कथा बेतली आहे.
पडदा उघडतो. महाराष्ट्रातल्या पाचगणी येथील जंगलातला भव्य बंगला. जमिनीवर एक विवाहित तरुणी ऋतिका बसली आहे. घाबरलेली. वरच्या मजल्यावरल्या खोलीत तिची पाळण्यातली मुलगी. समोर असलेल्या डिजिटल घड्याळात ‘दोन वाजून बावीस मिनिटांनी’ काहीतरी होणार असं वातावरण. आणि वेळ पूर्ण होते. थरार उठतो. भयनाट्याची वेळ होते. भुताने झपाटलेली ही वास्तू आहे, असा तिचा पक्का समज. तशा घटना घडत आहेत. तिचा नवरा केतन हादेखील सोबत आहे. केतन खगोलतज्ञ. अभ्यासक. रात्री-अपरात्री अंतराळाच्या हालचालींवर त्याचे लक्ष असते. तो अंधश्रद्धा न मानणारा. भुताचं अस्तित्व त्याला मान्य नाही. विज्ञाननिष्ठ असल्याने ऋतिकाची तो थट्टा उडवितो. अशा प्रकारे दोन टोकांचा विचार करणारे हे दांपत्य.
त्यांनी या पुरातन बंगल्याचे काही प्रमाणात नूतनीकरण केलंय. याचा मूळ मालक असलेल्याची केतन नक्कल करतो. मालकाचाही संदर्भ वारंवार नाटकात येतोय. शहरापासून दूर हे दांपत्य पाचगणीला कायम वास्तव्यास आलंय. नवर्याचं संशोधन होतंय. पण छोट्या मुलीसाठी ऋतिकाने नोकरीला रामराम केलाय. वैचारिक मतभेदामुळे दोघांमध्ये खटकेही उडत आहेत.
या काहीशा गूढ बंगल्यात याचे दोस्त असलेले दांपत्य दुर्गेश आणि सोनाली येतात. दुर्गेश हा ग्रामीण वातावरणात वाढलेला. त्याचा ‘प्लंबर’चा धंदा आहे. तर सोनाली ही मानसोपचारतज्ञ आहे. याही दोघांचे काहीसे भिन्न आणि वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व. सोनाली आणि केतन हे दोघेजण कॉलेज मित्र. काही प्रसंगात या दोघांचे प्रेमप्रकरण दिसते. हे चौघेजण या बंगल्यात वावर करताहेत. प्रत्येकाची कथा-व्यथा वेगळी.
ज्या ख्रिश्चन माणसाकडून हा बंगला खरेदी केलाय, त्याचा संशय ऋतिकाच्या मनात पक्का आहे. त्याचं भूत हे दोन वाजून बावीस मिनिटांनी घरात शिरतंय. त्याच्यापासून एका वर्षाच्या मुलीला त्रास होईल, असे तिला वाटते. ती त्यावर ठाम आहे. कायम तणावाखाली असते. मनातील एकाकीपणा काही केल्या कमी होत नाही. उलट तो शेवटच्या प्रसंगापर्यंत वाढतच जातो.
हे चौघेजण ‘प्लॅन्चेट’ आणि प्रश्नोत्तरांचा खेळ खेळतात. त्यात श्रद्धा विरुद्ध अंधश्रद्धा तसेच सत्य विरुद्ध असत्य यात चर्चा रंगते. एकमेकांचे मुद्दे खोडून काढले जातात. या चर्चनाट्याचा शेवट काय? याचा संभ्रम असतानाच अचानक एक धक्कादायक हादरा बसतो. तो या नाट्यातील उत्कर्षबिंदू आहे. नाट्यातील ‘रहस्य’ उघड करुन रसभंग टाळण्यासाठी नाट्यप्रयोग बघणं उत्तम!
चार सशक्त व्यक्तिरेखा ही या नाटकातील जमेची बाजू. त्यामुळे नाट्य ताकदीने पकड घेते आणि त्यातील गूढता वाढविण्यास मदतच होते. खगोलतज्ञ केतनच्या भूमिकेत अनिकेत विश्वासराव या बिझी स्टारने नाटक अक्षरशः अंगावर घेतले आहे. आपले मुद्दे ठामपणे मांडण्याची त्याची शैली विलक्षण प्रभावी होते. अंधश्रद्धा न मानणारा केतनची देहबोली शोभून दिसते. चित्रपट, मालिकेत बिझी असूनही नाटकांसाठी त्याने वेळ राखून ठेवलाय, हे विशेष! आज एकाचवेळी त्याची तीन नाटके रंगभूमीवर आहेत. त्यातली भूमिकेतील विविधता नोंद घेण्याजोगी आहे.
पत्नी ऋतिका ही गौतमी देशपांडे हिने साकार केली असून पूर्णवेळ तणावाखाली असल्याचा अभिनय उत्तम. त्यामुळे वातावरणनिर्मिती चांगली होते. तिला होणारे भास-आभास हे थरार उडविणारे. मालिकेत दिसणारी नायिका रंगमंचावर बघण्यासाठी रसिक पोहचतो. विनोदवीर प्रियदर्शन जाधव याने ग्रामीण ढंगाची ‘दुर्गेश’ची भूमिका केली असून त्यामुळे कथानकातील तणाव जरा हलका होण्यास मदत होते. सोनालीच्या भूमिकेत रसिका सुनिल हिने सहजसुंदर अभिनय केला असून केतनसोबतचा प्रसंग भूतकाळ जिवंत करणारा ठरतो.
नाटककार नीरज शिरवईकर आणि दिग्दर्शक विजय केंकरे यांनी नाट्यातील गूढता, थरार कुठेही कमी होणार नाही, याची पुरेपूर दक्षता घेतली आहे. दोघांचे ट्युनिंग मस्त जुळलेले असल्याने बेरंग होत नाही. तांत्रिक बाजूंची चांगली जुळवाजुळव आहे. दुसरा अंक हा चर्चानाट्य होण्याचे भय होते, पण ते सफाईदारपणे टाळले आहे. संवाद प्रभावी, पकड घेणारे. त्याच्या सादरीकरणातही कल्पकता आहे. कायम भेडसावणारे मृत्यूचे, भुताचे भय तसेच मनातील एकाकीपणा ठळकपणे अधोरेखित होतो. नाटकाच्या शीर्षकातील वेळ, त्यानंतर उडणारा थरकाप विलक्षणच. नाटककारांनीच नाटकाचे नेपथ्य उभे केलंय. त्यातील बारकावे नोंद घेण्याजोगे आहेत. वर जाणारा जिना, खिडक्या, दरवाजे, आणि दुर्बीण हे सारं काही शोभून दिसतंय. नेपथ्य मांडणी आणि रंगसंगती चांगली आहे. टेडीबेअरची हालचाल, बुटांचा आवाज, यामुळेही ‘कुणीतरी आहे तिथे’ याचा भास होतो. अजित परब यांच्या संगीतासोबत शीतल तळपदे यांची प्रकाशयोजना. दोघांनी आपल्या तंत्राची चमक दाखविली आहे. जितेंद्र जोशी याचे गाणे गूढता वाढविणारे तसेच अर्थपूर्ण. निर्माते अजय विचारे यांनी निर्मितीमूल्यात कुठेही कसूर ठेवलेली नाही. जाहिरातींपासून ते सादरीकरणापर्यंत व्यावसायिकता जपली आहे.
या नाट्याचा शुभारंभी प्रयोग महाराष्ट्राबाहेर इंदूर मुक्कामी करण्यात आला. हे देखील वैशिष्ट्य आहे. याची निर्मिती सिनेनिर्माते, अभिनेते महेश कोठारे करणार होते. मुहूर्तही झाला होता. केतनच्या मध्यवर्ती भूमिकेत आदिनाथ कोठारे यांच्या नावाचीही घोषणा झाली, पण हा योग जुळून आला नाही.
भूत-भुताटकी, आत्मा परमात्मा यावर वेगळ्या प्रकारे भाष्य करणारे अभिराम भडकमकर यांचे ‘ज्याचा त्याचा प्रश्न’ हे नाटक स्मरणात आले. त्यात भूत मानसिक, काल्पनिक की सत्य यावर विचारमंथन होते. दुसर्या अंकातील चर्चेत हाच विषय अप्रत्यक्षपणे मांडण्यात आलाय. अर्थात दोन्ही नाटकांचा विषय, शैली, कथानके भिन्न होती. सुरेश खरे यांच्या ‘कुणीतरी आहे तिथे’ नाटकात जशी भिंतीतून येणार्या हाताची दहशत होती, तशीच याही नाटकात बाहुलीची दहशत आहे. ‘ट्रिकसीन’चा काही प्रसंगात चांगला वापर आहे.
रंगभूमीवर काही जुन्या दर्जेदार नाटकांचे जसे पुनरुज्जीवन होत आहे, तसेच हॉरर नाटकांनीही आपले दालन तिकीट विंडोवर सताड उघडले आहे. नव्या पिढीचे नाटककार व्यावसायिक रंगभूमीवरल्या गणितात उत्तीर्ण होत आहेत. या प्रयोगातील अॅक्शनमय कल्पकतेमुळे संहितेचं रुपडं बदलण्याची किमया साधली गेलीय. कविवर्य ग्रेस यांच्या शब्दात सांगायचं, तर या नाट्यातील ‘भय इथले संपत नाही!’ त्या शब्दातली असलेली भयग्रस्त, हताश केविलवाणी भावना यात आहे दिसते.
माणसाचं जगणं आणि मरणानंतरचं अस्तित्व हे विषय चिरंतन चिंतनाचे आहेत. त्याबद्दल सार्यांच्याच मनात कुतूहल असते. नकारात्मक जाणीवेतून शून्यता येते. कल्पनांचे मुखवटे चढवून अंधश्रद्धेच्या दुनियेत भटकंती करणार्या शोकांतिका जगभरात चर्चेत आहेत. हे नाट्य रसिकांना दोन घटका अस्वस्थ करेलच, शिवाय जादुगारांच्या खेळाप्रमाणे थक्कही करून सोडेल. यातील थरथराट म्हणजे नाटकातला हॉरर चित्रपटच! त्यासाठी हे नाट्य आवर्जून अनुभवावं!
दोन वाजून बावीस मिनिटांनी…
लेखक/ नेपथ्य – नीरज शिरवईकर
दिग्दर्शक – विजय केंकरे
संगीत – अजित परब
वेशभूषा – मंगल केंकरे
प्रकाश – शीतल तळपदे
गीते – जितेंद्र जोशी
सूत्रधार – श्रीकांत तटकरे
निर्माता – अजय विचारे