लाख गाव. गावातलं अमृत चौकातील खटल्याचं मोठं घर. तिथं गावचा दर तिसरा माणूस राहतोय. इतकं ते संख्येने मोठं. घरचा कारभारी गावात त्यामुळं उगाच तोर्यानं फिरणार. गावगुरू म्हणून! त्याला गल्लीत सुद्धा कुणी भाव देत नाही ही वेगळी बात. आज सकाळीच घरातून जिलबीचं घमघमाट सुटलाय. पण मागोमाग हुंदके आणि फुंदत फुंदत रडल्याचा आवाज येतोय. त्यात मधूनच एखादा ढेकराचा आवाज मिसळतोय. त्या चमत्कारी आवाजांनी रस्त्याने चालणारी वर्दळ थबकत, हसत वा भयचकित नजरेने बघत पुढे सरकतेय.
चिन्या भल्या सकाळीच सायकलला पॅडल मारत तिथून गेला होता. पण तवर फक्त घमघमाटचं सुटला होता. आता मात्र रडण्याचा आवाज येतोय. आणि तोही एक बाईचा म्हंटल्यावर चिन्या हळहळतो. त्याचं काळीज पाझरतं. त्याला तसेही बाईमाणसावर झालेले अत्याचार बघवत नाहीत. मागे एक कपलच्या झगड्यात चिन्या असाच पडला आणि त्यांचं ब्रेकअप झालं. तेव्हा त्यानं सामाजिक जबाबदारी म्हणून त्या गर्भवती प्रेयसीसोबत लग्नं करून घेतलं. मागं रस्त्यानं जाताना कुणा बाईला कुठल्या अज्ञात मोटरसायकलने उडवलं, तेव्हा भरपाई म्हणून त्यानं त्याची स्वतःची नवी मोटारसायकल देऊन टाकली होती. त्याच्या ह्या स्त्रीदाक्षिण्याच्या स्टोर्या अख्ख्या गावात प्रसिद्ध. दु:खातली बाई म्हंटल्यावर हक्काचा खांदा हा चिन्याचाच राहील हे समीकरण पक्कं बनलेलं. आताही हुंदक्यांचा आवाज येतोय म्हंटल्यावर त्यानं दारातच सायकल टाकून पळत घरात एंट्री घेतली.
ही वेळ तशीही लोकांची आपापल्या कामात व्यग्र असण्याची. त्यामुळे घरात तर कुणीही दिसत नाही. पण घराच्या कोपर्यातल्या खोलीतून आवाज येतोय. ही त्याची पक्की खात्री झाल्यावर तो आत जातो तो काय पहातो? एक मध्यमवयीन काकू जिलबीच्या मोठ्या टोपामागं बसलेली दिसतेय. ती फुंदता फुंदता एक एक जिलबीचं वेटोळं सगट तोंडात भरत, न भरून आलेले डोळे पदराने पुसतेय. ते बघून चिन्या जाम चक्रावतो. ही जिलबी तिखट असायला कुळदाची तर नाही ना? तो जवळ जाऊन खात्री करतो तर ती डाळीच्या पिठाचीच दिसते आणि खाली टपकणारा पाक बघून त्याची सगळी शंका दूर होते. मग ह्या काकू का फुंदतायत, याची त्याला टोटल लागत नाही. की यांना आधीच शुगर आहे नि यांना ही टोपभर जिलबी खायची शिक्षा झालीय म्हणून ह्या रडतायत की काय? त्याला दुसरी शंका येते. पण आता विचारायचं कसं? कारण जिलबी तोंडात भरल्यावर काकूने डोळ्याला पदराचा बोळा लावलाय. आता काय करावं? त्या भरल्या तोंडाने हुंदके देतायत. अख्ख्या घरात त्या एकट्याच आहेत. आणि चिन्या दुसरा!
‘काकूऽ…!!’ चिन्या धीर करून आवाज देतोच! आता आणखी किती वेळ भरल्या टोपाम्होरं बाईमाणूस रडत ठेवायची ना? पण हाय! त्याच्या पहिल्या आवाजावर काकू काहीच प्रतिसाद देत नाही!
‘ओ काकूऽ!!’ तो दुसर्यांदा आवाज देतो. पण काकू पुन्हा काहीच प्रतिसाद देत नाही. फक्त यावेळी त्या फुंदता फुंदता जिलबीचे हाती येतील तेवढी वेटोळी तोंडात कोंबतात. डोळ्यांपुढला पदराचा बोळा अजिबात न हटवता.
आता काय करायचं? ह्या बाईला ऐकू येत नसेल काय? तो डोकं खाजवतो. का हा जिलबीचा टोप घेऊन पळून जावं? म्हणजे ह्या काकूचा त्रास दूर होईल? का सोबतीला काही तिखट करून द्यावं?
‘ओ काकू..!!’ आता तो मोठ्याने आवाज देतो. आता जर का त्यांनी प्रतिसाद दिला नाही तर डायरेक त्यांना हलवून विचारायचं, हे ठरवूनच! बाई मुकी बहिरी असली तर मर्फी पिच्चरात पाहिलेल्या साइन लँग्वेजच्या काही खाणाखुणा उपयोगात येतील म्हणून आठवत तो बघतो. तर काकू हळूच पदर खाली घेत किलकिल्या नजरेनं त्याच्याकडं बघतात. पण काही क्षणच! पुन्हा त्या जमेल तितक्या जिलब्यांची वेटोळी तोंडात भरत मोठमोठ्याने फुंदू लागतात.
आता याला काय म्हणावं? बाईला थोडंथिडकं का होईना ऐकू येतंय, हे त्याला कन्फर्म होतं. पण बाई काही बोलत नाही. म्हणजे ही काकू फक्त मुकी तर नसंल ना? तो काय करावं म्हणून जागच्या जागीच एक फेर घेतो.
‘ओ काकू! नेमकं झालं काऽय्येऽ?’ तो पुन्हा काकूसमोर गुढघ्यावर बसत विचारतो.
पण ह्यावेळी काकू त्याच्याकडं रोखून बघतात आणि एकाएकी वेटोळ्यांचा बचका भरत तोंडात कोंबत वरून पदराचा बोळा नाकाला लावत हुंदके देत आत दुसर्या खोलीत पळतात.
आता त्या आत का गेल्यात? चिन्याला प्रश्न पडतो. आपुन काही चुकलो तर नाही ना? तो मनातल्या मनात प्रश्न करतो. का त्यांना आपल्या येण्यानं आणखी त्रास झाला? त्याला काही कळत नाही.
दुसरं मन म्हणतं, त्या ताटली आणायला गेल्या असतील. एकदोन वेटोळी आपल्याला द्यायला. पण काय खरं? आणि काय खोटं? हे त्या बाहेर आल्यावरच कळेल. पण त्या पुन्हा ह्या खोलीत येतील काय? की फोन करून त्या दुसरं कुणाला बोलावून घेतील? त्याचं विचार करकरून डोकं भणाणतं!
पण… पण… काकू काही क्षणांतच बाहेर येतात. पण येताना त्यांच्या हातात तांब्या दिसतोय. काय असेल त्याच्यात? चिन्याला पुन्हा प्रश्न! पाणी आणलं असेल का? पाहुणचाराची औपचारिकता म्हणून? पण तो तांब्या त्याच अधूनमधून तोंडाला लावत येतायत. मग आता?
त्या पुन्हा आधीच्या जागेवर बसतात. टोपाच्या दुसर्या बाजूला तांब्या ठेवतात. त्या तांब्यात केशर दूध िदसतंय तर..! एकदाचा त्याला खुलासा होतो. ह्या गोडावर ते गोड खपत असेल? त्याला पुढला प्रश्न पडतो. नक्की ही शिक्षाच असणार, तो स्वतःची समजूत घालतो. काकू पुन्हा जिलब्या खात फुंदू लागतात, पूर्वीप्रमाणे! फक्त ह्यावेळी तोटरा बसल्यावर मधूनच केशर दुधाचे घोट घेतात.
‘काकू ओ काकू! का रडताय तुम्ही? काही तर बोला! तुमच्या अडचणी, त्रास मला कळाला तर आपण त्याच्यावर काही तोडगा काढू ना? बोलल्यावरच मला काही कळंल ना?’ तो भाबडेपणाने काकूला चुचकारतो.
‘काऽय सांगूऽ बाऽबा तुलाऽऽऽ?’ आणखी वेटोळी तोंडात भरत काकू मोठ्याने भोकाड पसरतात. किमान काकूचं रडणं तर मोकळं झालं ना? त्याला एक दिलासा मिळतो.
‘काही पण बोला काकू! नेमकं रडायचं कारण सांगितलं तर मात्र बरं होईल फक्त!’ चिन्या विषयाला हात घालतो.
‘बाबा, आता तू तर पाहतोच… मी घरातली कर्ती बाई..!’ काकू डायरेक चिन्याला साक्षीदार बनवतात.
‘हां मग?’ त्याचा रडण्याशी काय संबंध? हेच विचारायचंय चिन्याला पण विषय आणि काकू मोकळ्या व्हायला पाहिजे ना?
‘माझ्याकडं भाऊंनी अख्ख्या घराचे व्यवहार दिलेत. का तर बाबा मला हिशेब-टिशेब नीट जमात्या म्हणून…’ काकू काही घरातल्या बाता सांगू लागतात.
‘हा मंग त्याचा रडण्याशी काय संबंध?’ शेवट चिन्या अधीरतेने प्रश्न विचारतोच! कवर वाट पहायची ना?
पण तश्या काकू भोकाड पसरीत्या! मोठ्यानं रडू लागात्या! ‘सम्दे अशेच वागत्याऽऽऽ. बाऽईऽ माह्याऽशी! कुणी पुरं ऐकूनच घेत नाऽहीऽऽ माऽझं….! भगवंताऽऽऽ..!!’ काकूचा आवाज वाढतो!
‘नाही नाही ऐकतो ना मी! ह्या बगा मांडी घालूनच बसलो मी! बोला आता!’ चिन्या घाईघाईने मांडी घालतो. तश्या काकू शांत होतात. पुन्हा दोनेक घोट केशर दूध पितात.
‘तर आता मी पाहतेय ना हिशेब? सगळ्यांकडून पैशे गोळा करते. सांगून, न सांगता! पाहिजे तशे, पाहिजे तव्हा! पण पैशे कशेबी घेतले तरी घरखर्चालाच वापरते ना मी?’ काकूंचा सवाल चिन्याला!
‘तुम्ही म्हणता म्हणजे वापरत असालच…’ चिन्या चाचरतो.
‘वापरतेच मी! कार्ट्यांना वह्या-पुस्तकांना पैशे लागत्या, पोरांना धंद्यापाण्याला पैशे लागत्या. म्हातार्यांना औषधपाण्याला तर लेकीसुनांना घरखर्चाला. काही जण शेती कसत्या, त्यांना बी-बियाणं, खतं, औषधं, गुरं-ढोरं, अवजारं यांना पैशे लागत्या. ते कोण देतं? मीच! पण तरी घरातले सगळे म्हणत्या, ठरवल्याप्रमाणं पैशे देत नाही मी! त्या दोघांचेच कर्ज माफ करते, त्यांनाच पैशे देते. त्यांचीच काळजी घेते. बरं आठ वर्षांपासून हीच बोंब मारत्या घरातले…’ हुंदके देत काकू सांगतात.
‘मग आठ वर्षांपासून ही बोंब मारत्या तव्हा नाही तुम्ही लोड घेतला. मग आज का रडत्या?’ चिन्याचे सवाल!
‘आज ते म्हणत्या बेमारुला जास्त पैशे काहून दिले?’ जिलब्या तोडत काकू सांगतात.
‘मग सांगून टाकायचं! काय ते खरं! त्याला काय?’ चिन्या फुकटचा सल्ला देतो.
‘आयोऽऽव, हा कोण कुठला बी मला तेच विचारतोऽ. मी गरिबाला पैशे दिले तर का दुखतं यांच्या पोटाऽऽतऽ!’ काकू मोठ्यानं टाहो फोडतात.
‘रोज कडेवर असूनबी बेमारु अजून गरीब कसं काय? हे विचारायचं असेल त्यांना! निदान त्या जिलब्या तरी सगळ्यांना ठेव म्हणावं!’ खिडकीच्या बाहेरून कुणी तरी बोलतो.
‘आता ह्या जिलब्या अख्ख्या घरासाठीच केल्या ना मी? का एकटीच खाणारे का? का बेमारुलाच देणारे?’ म्हणत काकू पुन्हा मोठ्यानं टाहो फोडतात, तर चिन्या खिडकीकडे धावतो.