प्रयागराजच्या महा कुंभमेळ्याला चेंगराचेंगरीचे गालबोट लागले. मौनी अमावस्येच्या दिवशी मध्यरात्री दोन ते तीनच्या दरम्यान स्नानासाठी जी झुंबड उडाली त्यातून ही घटना घडली. घाटावर ज्या ठिकाणी स्नान होते तिथे गर्दी आवाक्याच्या बाहेर गेली आणि नंतर तिथे झोपलेल्या लोकांच्या अंगावर हे गर्दीचे लोंढे आदळले. आपल्याकडे कुंभमेळ्याचा इतिहास पाहिला तर या चेंगराचेंगरीच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. अगदी १९५४चा स्वातंत्र्यानंतरचा पहिला कुंभमेळा देखील त्याला अपवाद नाही. पण फरक काय दिसला तर तो सरकारच्या प्रतिसादामध्ये… आणि एकूणच सगळ्या गोष्टी लपवण्याच्या धडपडीमध्ये.
धार्मिक गोष्टींचा राजकीय लाभ घेण्यामध्ये गुंग असलेल्या सरकारला या संपूर्ण सोहळ्याची जबाबदारी घ्यायला देखील जमले नाही. चेंगराचेंगरी झाल्यानंतर कित्येक तास परिस्थिती नियंत्रणात आलेली नव्हती, मदत केंद्रावर लोक टाहो फोडत होते. पोलीस आणि प्रशासन यंत्रणा त्यांच्यापर्यंत पोहोचायला बराच उशीर झाला याबद्दल लोक संतापाने बोलताना दिसले.
कुंभच्या जाहिराती तर अगदी जोरात सुरू होत्या, उत्तर प्रदेशात २०२७ला निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर या कुंभमेळ्याची महती राजकीय सभांमधून गायली जाणार, याची सगळी तयारी केली जात होती. पॉलिटिकल मार्केटिंग जोरदार सुरू होते. अगदी मौनी अमावस्येची ही दु:खद घटना घडेपर्यंत कुंभमेळा बद्दलची प्रत्येक आकडेवारी वेगवेगळ्या माध्यमातून लोकांच्या माथी मारली जात होती. कुंभमेळ्यावर ६९९० कोटी रुपये खर्च झाले आहेत, त्यातून दोन लाख कोटी रुपयांची उलाढाल होणार आहे, इथपासून प्रत्येक आकडेवारी सरकारच्या तोंडपाठ होती. अमुक दिवशी १.७ कोटी लोकांनी संगमावर स्नान केले याचा आकडा देखील सरकारला कळत होता. पण ही चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली त्यानंतर पुढचे काही तास नेमके किती लोक गेले आहेत, याचा आकडा मात्र सरकारला कसा काढता येत नाही? कुंभमेळ्याशी निगडित बाकी प्रत्येक गोष्टीत आकडेवारी सरकारला तोंडपाठ असते. पण इथे किती लोकांचे जीव गेले हे मात्र नेमकेपणाने सांगता आले नाही. माध्यमांमध्ये देखील त्याबद्दल बरीच लपवाछपवी झाली.
ही दुर्घटना घडल्यानंतर सात आठ तास उलटले तरी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सोशल प्लॅटफॉर्मवरून केवळ अफवा पसरवू नका असेच आवाहन केले जात होते. मृत भाविकांप्रती शोकसंदेश येण्यास सुद्धा बराच काळ लागला. पण हे अफवा पसरवू नका म्हणजे नेमकं काय होतं?… आणि कुणासाठी होतं?… कारण जी दुर्घटना घडली त्यानंतर अशी कुठली अफवा पसरल्याचे ऐकिवातही आले नाही किंवा माध्यमात आले नाही. जी दुर्घटना घडली ती प्रत्यक्ष संगमाच्या स्थळावर गर्दी कंट्रोल न झाल्याने घडलीच होती, त्यात अफवा काहीच नव्हती.
जेव्हापासून या वर्षीचा महा कुंभ सुरू झाला तेव्हापासूनच व्हीआयपींसाठीचा कुंभ वेगळा आहे आणि सामान्य लोकांसाठीचा कुंभ वेगळा, अशी दरी स्पष्ट दिसत होती. व्हीआयपी लोकांच्या स्नानासाठी अगदी आजूबाजूला चिटपाखरू दिसणार नाही अशी एकरभर जमीन मोकळी करून दिली जात होती. हेमा मालिनी, कंगना राणावत यांच्यापासून ते अनिल अंबानी यांच्यासारख्या मोदी सरकारने दत्तक घेतलेल्या नादार उद्योगपतीपर्यंत सगळ्यांनी या व्हीआयपी कुंभस्नानाचा आनंद घेतला. त्यांच्यासाठी जे गाड्यांचे ताफे जात होते त्याला रस्ता मोकळा करून दिला जात होता. आणि सामान्य लोक मात्र किड्यामुंग्यांसारखे गर्दीमध्ये मैलोनमैल चालताना दिसत होते.
मौनी अमावस्येच्या दिवशी जी चेंगराचेंगरी घडली त्यात सुरुवातीला मृतांचा आकडा १५ ते १८ इतकाच सांगितला गेला. देशातला बराचसा मीडिया या घटनेबद्दल व्यवस्थेला बेसिक प्रश्न विचारायचं देखील विसरून गेला होता. अर्थात काही माध्यमांनी ही जबाबदारी पार पडली… यात सोशल मीडियाचे काही प्लॅटफॉर्म देखील आघाडीवर होते. त्यांनी घटनास्थळावर जाऊन मृतदेहांचे आकडे समोरासमोर मोजून लोकांना दाखवले… एका माध्यमाच्या पाहणीत हा आकडा पहिल्या प्राथमिक प्रयत्नातच ५८वर पोहोचला होता… गंभीर उपचारासाठी दाखल असलेल्या लोकांची संख्या तर याहून कित्येक पटीने जास्त होती.
ज्या कुंभमेळ्याचा राजकीय लाभ मिळावा यासाठी सगळी धडपड केली जात होती… त्याच कुंभमेळ्यात एक दुर्घटना घडल्यानंतर मात्र अचानकपणे व्यवस्था शांत होते. कुणी काही बोलायला सांगायला तयार होत नाही. पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांशी इतक्या वेळात चर्चा केली याच्या हेडलाइन्स न्यूज चॅनेलवर झळकतात… पण मृतांची नेमकी काय अवस्था आहे, आकडा किती आहे, याकडे लक्ष द्यावे असे वाटले नाही.
सगळ्यात कहर म्हणजे या दुर्घटनेनंतर टाइम्स ऑफ इंडिया या प्रसिद्ध इंग्रजी दैनिकाने जे संपादकीय लिहिले ते बेशरमपणाचा कळस होते. कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी होऊन लोकांचे जीव जाणारच, त्याचे एवढे काय विशेष असा अविर्भाव यात दाखवण्यात आला. याच्यापेक्षा जास्त मृत्यू देशात रोज अल्झायमरने होत असतात, पण म्हणून तो आकडा आपण फ्रंट पेजवर छापतो का असा सवाल करण्याचा असंवेदनशीलपणा येतो कुठून? देशात माध्यमांची स्थिती आणि दर्जा किती खालावला आहे याचेच हे निदर्शक.
देशात कुठलीही वाईट घटना घडली की त्याला नेहरू जबाबदार, असा गेल्या काही वर्षातला पायंडा पडलेला आहे. कमाल म्हणजे या घटनेनंतर सुद्धा अनेकांना नेहरुंची आठवण येत होती. या दुर्घटनेचा बचाव करण्यासाठी १९५४मध्ये स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या कुंभमेळ्यामध्ये कसे ८०० लोकांचे जीव गेले होते याचे दाखले दिले जात होते. ज्या काळात सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते, या काळात अद्ययावत संपर्क यंत्रणा नव्हती, कम्प्युटरद्वारे मॉनिटरिंग नव्हते, त्या काळाची तुलना एकविसाव्या शतकातल्या कुंभमेळ्याशी करून आपलं अपयश कसं झाकता येईल? गंमत म्हणजे पंतप्रधान मोदी यांनी काही वर्षांपूर्वीच कुंभमेळ्यातल्या या दुर्घटनेवरून नेहरूंवर हल्लाबोल केला होता. कर्म कुणाला चुकत नाही म्हणतात तेच खरं. करावे तसे भरावे हा नियतीचा न्याय असतो.. त्यावेळी नेहरूंनी ही दुर्घटना लपवली त्याबद्दलचे प्रश्न उपस्थित होऊ दिले नाहीत, असे म्हणणार्या मोदींना त्यांच्याच पंतप्रधानपदाच्या काळात कुंभमेळ्यातल्या चेंगराचेंगरीची लपवालपवी केल्याच्या आरोपांना सामोरे जावे लागले.
बरं थोडा रिसर्च केल्यानंतर समजले की या दुर्घटनेनंतर देशाच्या संसदेमध्ये नेहरू सगळ्या प्रश्नांना स्वत: सामोरे गेले होते. विरोधक त्यांना वाटेल ते प्रश्न विचारत होते… तुम्हाला दुर्घटनेची माहिती किती वाजता कळाली, चौकशी समितीमधले सदस्य कोण आहेत हे तुम्हाला माहिती नव्हते का इथपासून ते हा केवळ राज्याचा विषय नाही, तर संसदेत चर्चा झाली पाहिजे, असं म्हणत पंतप्रधानांना सभागृहात टोकत होते. आता ही घटना १९५४ची आहे… देशाच्या पहिल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे प्रचंड बहुमत होते. त्यामुळे विरोधकांचा आवाज नगण्य असणार हे लक्षात घेतले तर पंतप्रधान नेहरू संसदेत या सगळ्याला स्वत:हून सामोरे जातात, हीच गोष्ट विलक्षण म्हणावी लागेल.
प्रयागराजच्या या घटनेनंतर मोदी संसदेत उत्तर द्यायला तयार होतील का?… आणि जसे टोकदार प्रश्न नेहरूंनी झेलले तसे सभागृहामध्ये धाडस दाखवणार आहेत का?… मणिपूरबद्दल इतका प्रचंड गदारोळ होऊनही मोदी यांनी याबद्दलच्या चर्चेला उत्तर दिले नाही. त्यामुळे प्रयागराजबद्दल ते बोलतील ही अपेक्षा करणं खरं तर चुकीचे ठरेल.
ज्यावेळी प्रयागराजमधे हा कुंभमेळा भरला आहे त्याच वेळी दिल्लीत विधानसभेची निवडणूक होते आहे. त्यामुळे राजकीय फायदा तोट्याची गणितं ठेवून त्याबद्दल जोरदार प्रचार भाजपकडून केला जात होता. पण एका घटनेमुळे त्या सगळ्यावर पाणी फिरले.
या दुर्घटनेला दोन दिवस उलटल्यानंतर लक्षात येते की अशी चेंगराचेंगरी केवळ एका ठिकाणी नव्हे तर दोन ठिकाणी घडलेली होती. ज्यावेळी लोक संतापून माध्यमांच्या कॅमेरासमोर बोलू लागले, तेव्हा या सगळ्या घटनांचा पर्दाफाश होऊ लागला.
२०१३च्या प्रयागराजच्याच कुंभमेळ्यामध्ये चेंगराचेंगरीची दुर्घटना घडलेली होती. त्यावेळी अखिलेश यादव हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. अर्थात ती दुर्घटना त्यावेळी संगमाच्या स्थळावर घडली नव्हती, तर रेल्वे स्टेशनवर घडलेली होती. आधी घोषित केलेली एक्सप्रेस दुसर्या प्लॅटफॉर्मवर लागल्याचे रेल्वेने जाहीर केले आणि त्यानंतर ही पळापळ झालेली होती. म्हणजे दोष तसा रेल्वेचा होता, पण त्याबद्दल माध्यमांनी होते नव्हते तेवढे सगळे प्रश्न अखिलेश यादव यांना विचारले होते. यावेळी मात्र योगी आदित्यनाथ यांना जबाबदार धरताना, हे प्रश्न विचारताना कुठले माध्यम दिसले नाही.
कुंभमेळ्याच्या या निमित्ताने पापक्षालनाची संधी मिळत असेल तर व्यवस्थेचे हे पाप कुठल्या डुबकीने धुऊन निघणार बरं?