बायकोचे व्यसन सोडवायचे कसे?
प्रश्न : हे ताई.. धाव धाव. गेल्या काही महिन्यापासून माझ्या बायकोला सोशल मीडियाचे प्रचंड व्यसन लागले आहे. सतत त्या रील, नाहीतर कंपूतले गॉसिप असे चालू असते. तिचे घरातले लक्ष देखील कमी होऊ लागले आहे. घरात छोटे मोठे खटके उडायला लागले आहेत आणि मुख्य म्हणजे या व्यसनाने तिची प्रकृती खालावत आहे. रात्री उशिरापर्यंत जागायचे, मग सकाळी जाग येत नाही. मग सकाळचा व्यायाम बंद, डोळे सुजलेले, सतत आळस असा प्रकार सुरू आहे. मी करू तरी काय?
उत्तर : भाऊराया, नवर्याने संसारात नीट लक्ष दिले, तर बायकोचे सोशल मीडियावर कमी लक्ष राहते. पण तुझ्या बाबतीत प्रकरण जरा हाताबाहेर निघाल्याचे दिसते. पण काळजी करू नकोस. आजकाल पुरुषांच्या तोडीस तोड सोशल मीडियाचे व्यसन करायचा विडा काही स्त्रियांनी उचलला आहे असा माझा अंदाज होता, तो बरोबर ठरतो की काय अशी भीती वाटायला लागली आहे.
तू सगळ्यात आधी स्वत: सोशल मीडियावर सक्रिय हो. कामाच्या गडबडीत थोडा वेळ काढायला शिक. विशेषत: रात्रीचा वेळ उत्तम. सर्वात आधी बायकोच्या प्रत्येक पोस्टला, प्रतिक्रियेला लाइक करायला सुरुवात कर. त्यानंतर तिच्या फोटोवर ’अगदी फुलराणी, कसली गोडुली दिसते आहेस, एकदम हिरण्याक्षी’ असल्या अत्यंत बालिश प्रतिक्रिया द्यायला सुरुवात कर. तुझी उपस्थिती आणि अशा प्रतिक्रियांमुळे तिला एकदम अवघडल्यासारखे वाटायला लागेल.
पुढची पायरी म्हणजे, आता बायकोच्या भिंतीवर इन्शुरन्स गरजेचा का आहे, फ्रीजमध्ये कोणत्या गोष्टी ठेवू नयेत, पांढरा कांदा वापरावा का लाल, मनुस्मृती स्त्रियांविषयी काय सांगते, भौतिक प्रमेये आणि कोणार्क मंदिर वास्तुशास्त्र, हडळी कायम चिंचेच्या झाडावर का आढळतात, आजच्या काळात मृतांची ममी बनवणे शक्य आहे का, बार्सिलोनाने टीमचा प्रशिक्षक बदलणे का गरजेचे आहे, डाटा सायन्स आणि जगाचे भविष्य अशा या टोकापासून त्या टोकापर्यंतच्या पोस्टी ढकलायला सुरुवात कर. आता आधीच अवघडलेली बायको त्रस्त व्हायला लागेल.
वरचा टप्पा पार पडला की, बायकोला केस नैसर्गिक काळे करण्याचे उपाय, आतड्यातील कृमीवर घरगुती रामबाण औषध, मूळव्याध शस्त्रक्रियेशिवाय बरी होऊ शकते का, अनावश्यक चरबी घरच्या घरी कमी करा, तोंडाचा दुर्गंध कसा घालवावा, दिवसा येणारी झोप हानिकारक कशी आहे अशा पोस्टमध्ये टॅग करायला सुरुवात कर. ’तू तिला असल्या पोस्टमध्ये का टॅग करतो आहेस, तिला काही आरोग्य समस्या आहे का’ ही चौकशी तिच्याकडे कोणी ना कोणी नक्की करणार आणि आता बायकोला सोशल मीडियावरवर वावरताना लाजल्यासारखे वाटायला लागणार.
आता शेवटचा रामबाण. बायकोच्या फोटोवर, पोस्टवर तिच्या मैत्रिणी काही ना काही किलबिलाट करत असतात. आपण देखील त्यात सहभागी व्हायचे. कोण ना कोणी आगाऊ ’काय जिजु काय चाललंय’ वगैरे विचारत येतेच. लगेच गूळ पाडायला सुरुवात करायचे. त्यातून ती कधी घरी वगैरे येऊन गेलेली असेल तर अजून उत्तम. ’या एकदा जोडीने घरी, अहोंना वेळ नसेल तर तुम्ही एकट्या या की गप्पा हाणायला, मागच्या भेटीत काय धमाल आली’ असा कोणताही धागा पकडायचा. एकदा हा टप्पा गाठला, की त्याच रात्री बायको स्वत:हून म्हणेल, ’अहो ठेवा आता तो फोन. झोपू लवकर. सकाळी मला पण वॉकला जायचे आहे.’ ताबडतोब शांत मनाने निद्रादेवीच्या कुशीत शिरून घे. बायको व्यसनमुक्तीच्या दिशेने चालायला नाही तर धावायला लागली आहे याची खात्री बाळग.
– सोमी धुरंधर
मेंदूगहाणांच्या चलतीचा काळ
प्रश्न : बाळ सोमी, मी ६० वर्षाचा एक निवृत्त मनुष्य आहे. ६० वर्षात मी आजूबाजूला घडत असलेल्या अनेक उलथापालथी बघितल्या, राजकारण पाहिले, समाजकारण पाहिले. पण आजकाल या सोशल मीडियाच्या मंचावर जो काही अनिर्बंध उन्माद, टोकाचा विचार बघायला मिळतो आहे, तो मनात भीती उत्पन्न करतो. आपण नक्की कोणत्या दिशेला निघालो आहोत?
उत्तर : आदरणीय काकाश्री, आपण अराजकाच्या दिशेला निघालेलो आहोत. नुसते निघालेलो नाही तर आपण अर्धा प्रवास पूर्ण देखील केला आहे. तुम्हाला ज्याची भीती वाटते, तो उन्माद, टोकाचे विचार हे काही नैसर्गिक नाहीत तर अत्यंत बेमालूमपणे पेरलेल्या विषवृक्षाच्या बियांना फुटलेले अंकुर आहेत. प्रगल्भ, धाडसी, देशभक्तीने भारलेले, धर्मरक्षक असे जे विचार आपण मांडत आहोत असे लोकांना वाटते, ते विचार मुळात त्यांचे नसतात हेच त्यांना अजून कळलेले नाही हे खरे दुर्दैव आहे.
सर्च इंजिनवर स्वस्तातला टीव्ही शोधला, की ताबडतोब तुम्ही इंटरनेटवर जिथे जाल तिथे तुम्हाला टीव्हीच्या जाहिराती दिसू लागतात. हा जादूचा प्रयोग घडवणारा जादूगार म्हणजे ’अल्गोरिदम’. हा अल्गोरिदम फक्त जाहिरातींवर काम करतो असे नाही बरे, याचे मूळ काम आहे, तुम्हाला जे आवडेल ते तुमच्यासमोर हजर करणे. एखादी दुर्घटना घडलेली असते आणि तुम्ही सोशल मीडियावर त्या संदर्भात माहिती घेत असता. लोक आजकाल न्यूज चॅनेल्स बघत नाहीत. खरी माहिती फक्त सोशल मीडियावर मिळते असे त्यांना यशस्वीपणे पटवून देण्यात आलेले आहे.
या दुर्घटनेची माहिती घेता घेता, तुम्हाला ’ही दुर्घटना नसून मुद्दाम घडवलेला अपघात असू शकतो’ असा दावा करणारी पोस्ट दिसते. तुम्ही पोस्ट वाचता, तिच्या खालचे रिप्लाय वाचता आणि तिथे या दाव्याला समर्थन देणार्यांचे प्रोफाइल चेक करून येता. तिथेच कोणीतरी ’ही दुर्घटना घडण्यामागे दुर्घटनाग्रस्तांचीच चूक कशी आहे’ यावर मी चार शब्द लिहिलं आहेत असे सांगून स्वत:च्या लिखाणाची लिंक दिलेली असते. तुम्ही मग त्या लिंकवर वाचनाला जाता. आता तुमच्या भिंतीवर तुम्हाला या दुर्घटनेच्या संदर्भातल्या सात आठ पोस्ट दिसायला लागतात. यातल्या पाच पोस्टमध्ये ’छोट्याशा गोष्टीचे कसे भांडवल केले जात आहे, सरकारच्या विरुद्ध रचलेले हे कुभांड कसे आहे, अशी घटना मागच्या सरकारच्या काळात पण कशी घडली होती’ यावर आणि फक्त यावर लिहिलेले दिसेल. एका पोस्टमध्ये घटना किती गंभीर आहे आणि तिच्याकडे दुर्लक्ष कसे केले जात आहे हे लिहिलेले असते आणि एकाने काय लिहिले आहे ते त्याला स्वत:ला देखील कळलेले नसते.
आता मोठ्या संख्येने तुम्हाला दिसत असलेली विरोधी मते बघता तुम्हाला देखील घडलेल्या घटनेत काहीतरी काळेबेरे आहे असे वाटायला लागते. मग तुम्ही अजून शोध घेता आणि तुमच्यासारखाच विचार करणारी शेकडो माणसे तुम्हाला दिसायला लागतात. विविध वयोगटातील, प्रदेशातील माणसे अगदी आपल्यासारखाच विचार करत आहेत हे बघून तुम्हाला मनस्वी आनंद होतो आणि एका क्षुल्लक घटनेचे उगाच अवडंबर माजवले जात आहे हे आपले मत किती योग्य आहे याचा अभिमान वाटायला लागतो. हे मत धडाडीने मांडण्याची खुमखुमी दाटायला लागते. सतत डोळ्यासमोर नाचलेले विखारी शब्द लेखणीतून उतरायला गर्दी करत असतात. पण ’आपले’ वाटणारे हे मत कोणीतरी आपल्या मेंदूत घुसवले आहे याचे भान देखील नसते. सध्या या अशा मेंदू गहाण ठेवलेल्यांच्या झुंडींची चलती आहे आणि त्यांचा विचार हा सर्वसामान्यांचा विचार म्हणून समोर आणला जात आहे हे जास्त धोकादायक आहे.
– खिन्न सोमी
विचारी की विकिचारी?
प्रश्न : सोमीताई, जर सोशल मीडिया नसती तर आपल्या आजूबाजूला इतकी ज्ञानसंपन्न विचारी लोक आहेत हे आपल्याला कळले असते का? आपल्या जीवनात इतका आनंद आला असता का? आपले आयुष्य सुखी झाले असते का?
उत्तर : या ज्ञानसंपन्न विचारी लोकांपैकी अनेक जण विकिचारी आहेत ही खरी अडचण आहे. विकिचारी म्हणजे विकिपीडिया वाचून ज्ञानाचे प्रदर्शन मांडणारे. या लोकांना प्रत्येक गोष्टीत स्वत:चे मत द्यायचे असते. कोणी विचारत नसते, तरी देखील द्यायचे असते. पिकाला हमीभाव किती ते क्रिप्टो कसे धोकादायक आहे इथपर्यंत त्यांची मजल पोहोचलेली असते. फावल्या वेळात ते ट्रम्प, पुतिन यांना सल्ले देत असतात. कोहली कसा चुकतोय हे कळकळीने सांगत असतात आणि यांची बायका पोरं यांच्या प्रोफाइलपासून लांब पळत असतात. भाजीवाली यांचा हिशेबाचा घोळ दूर करत असते अन् हे इकडे वर्ल्ड बँकेला सल्ले देत असतात. अर्धवट ज्ञान हे कधीही वाईट. त्यामुळे ज्यांचे विचार वाचायला, ऐकायला जातो आहोत ते मुळात त्यांचे स्वत:चे आहेत का, ते परिपूर्ण आहेत का याची आधी नक्की खात्री करा. गणपती आणि व्यास यामधला फरक कायम लक्षात ठेवावा.
बाकी, आनंदाचे म्हणाल, तर सोशल मीडियाच्या आगमनापूर्वी आपले आयुष्य कसे होते हे कधी आठवते का? संध्याकाळी छानसा मित्रांचा अड्डा रमलेला असायचा. एखाद्या विषयावर गहन चर्चा चालू असायची. अचानक कोणीतरी काहीतरी वेगळा बाष्कळ विषय काढायचा आणि मग त्याला सगळे मिळून ’ते दे सोडून. त्यावर काय बोलायचे?’ असे दटावून परत मूळ विषयाकडे यायचो. आता मात्र आपण त्याच बाष्कळ विषयाला धरतो आणि चाव चाव चोथा करतो, मूळचा गंभीर विषय बाजूला राहतो. त्या काळी मित्राने केलेला विरोध हा वाद घालायला अजून स्फूर्ती द्यायचा. आता मित्राने फक्त ’हे विचार पटले नाहीत’ अशी प्रतिक्रिया दिली तर आपण दुखावतो. त्याच्या लेखनावर वचपा काढायचे मनसुबे रचायला लागतो.
जुन्या काळात प्रत्येक गोष्टीवर आपण मत द्यायला हवे असे कधी वाटायचे का? अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी पाण्याचे धोरण काय आखावे या विषयात आपण रस घेत होतो का? कोणत्या अभिनेत्याने/ अभिनेत्रीने राजकारणावर व्यक्त व्हावे हे आपण ठरवत होतो का? देशप्रेमाची आपली व्याख्या काय होती? फोटो बघताना बाईने कुंकू लावले आहे का, साडी नीट अंगभर नेसली आहे का, मंगळसूत्र घातले आहे का हे निरखून बघायला जात होतो का, आपल्या मायबापाची विचारसरणी अन अमेरिकेतल्या मायबापाची विचारसरणी याची तुलना करत होतो का? आणि कितीही वाद विवाद झाले, मतभिन्नता आली तरी मनात कधी ब्लॉक लिस्ट निर्माण झाली होती का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे स्वत:ला विचारा आणि खरा आनंद कुठे आहे तुम्हीच शोधा.
– नॉस्टॅल्जिक सोमी