कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हे शक्तिशाली साधन आहे, ज्याद्वारे माणसासारखीच क्षमता मशीन्स (यंत्रे) प्राप्त करू शकतील, करतील. खरे तर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर हा साहित्यक्षेत्रात मानवाला त्रासदायकही ठरू शकतो. कारण त्याद्वारे यंत्रे कविता करू शकतील, इतर साहित्य प्रसवू शकतील. भाषांतर पण करू शकतील.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा जनक आहे जॉन मॅकार्थी. त्यानेच एआय हा शब्द दिला, प्रचलित केला. एलन ट्युरिंगने ‘ट्युरिंग टेस्ट’ शोधून काढली. त्याद्वारे हे समजले की यंत्रमानव किती बुद्धिमान आहे. मात्र, त्याची प्रणाली सुरक्षित, संरक्षित, निष्पक्ष, पारदर्शक असायला हवी, नाहीतर त्याचा वापर करून तयार केलेले साहित्य एकांगी होईल. चौथी पास माणूसही याद्वारे साहित्य प्रसवू शकेल. फक्त त्याला यंत्राला कमांड देता आल्या की झाले. आत्ता तरी कृत्रिम बुद्धिमत्ता साहित्यिकांसमोर फार मोठे आव्हान उभे करू शकणार नाही. कारण ती प्राथमिक अवस्थेत आहे, पण जेव्हा ती बाल्यावस्थेतून प्रगत अवस्थेत जाईल तेव्हा खर्या (म्हणजे मानवजातीतील) साहित्यिकांची खैर नाही. त्यामुळे माणूस आळशी बनेल वा बनण्याला मदत होईल हे निश्चित. त्या साहित्यात नीतीमत्तेशी बांधिलकी असेल की नाही हेही सांगणे कठीण आहे.
या तंत्रज्ञानाचा विकास ज्या वेगाने होत आहे त्यामुळे साहित्य क्षेत्रात क्रांती होऊ शकते. या वापरामुळे एखादी वाईट घटनाही घडू शकते. ती नक्की काय, कुठच्या प्रकारची असेल, हे आजच सांगणे कठीण आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणारी प्रणाली सदोषही असू शकते. भारत जगातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान बाजारांपैकी एक आहे. त्या बुद्धिमत्तेच्या विकासातून साहित्यिकांना जशा संधी उपलब्ध होतील, तशीच नवीन आव्हानेही स्पष्ट होत जातील अन त्यांना सामोरे जावे लागेल. आजमितीस कृत्रिम बुद्धिमत्तेचे शिक्षण, त्याचे उपयोग शहरांपुरतेच केंद्रित झाले असले तरी ते लवकरच ग्रामीण भागांपर्यंत पोहोचतील.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्याने जगी कधी, केव्हा, काय होईल हे सांगणे कठीण आहे. श्लील/अश्लील असे काही उरणारच, राहणारच नाही. देशातील सर्वात गरीब, वंचित व्यक्तीचे आयुष्य/ साहित्य खरे तर सुधारायला हवे, पण ते तसे होईलच याची शाश्वती कोण देणार? कल्पकतेने आणि नावीन्याने अचंबित करणार्या अगणित संकल्पना निसर्गात आढळतात. भविष्यात त्यांचा उपयोग साहित्यात कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारा झाला तर साहित्य अधिक समृद्ध होईल. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सकारात्मकतेने केला तर साहित्य गरुडभरारीही घेऊ शकेल.
कृत्रिम न्युरल नेटवर्क्सचे अनेक प्रकार आहेत. उदा. नैसर्गिक भाषा प्रक्रिया, वाक्यातील पुढील शब्दांचा अंदाज करणे, भाषांतर इ. या गोष्टी साहित्याशी संबंधित आहेत. दृष्टतमीकरण (ऑप्टिमायझेशन) म्हणजे कमीतकमी खर्चात वा वेळेत केव्हा, किती आणि कोणत्या प्रकारचे (साहित्याचे) उत्पादन घ्यावे हे ठरविणे. इथे साहित्य हे उत्पादन वा प्रॉडक्ट ठरते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने काही मॉडेल्स आणि सिम्युलेशन उपकरणे यामुळे दुर्घटनांचा सामना करण्यासाठी आधीच सजगता निर्माण करता येते.
1 ऑगस्ट रोजी युरोपीय महासंघाचा कृत्रिम बुद्धिमत्ता कायदा अस्तित्वात आला. भारतात नुकतीच जीपीओएआयची शिखर परिषद पार पडली. त्यात एआय निगडीत अनेक विषयांवर (त्यात साहित्यही होतेच) सखोल चर्चा झाली, पण युरोपीय महासंघासारखा कायदा किंवा त्याबाबतची तरतूद यावर काहीही ठोस निर्णय झालाच नाही. पण एआय वापराबाबत काही संकेत, नियम, कायदे हवेत याबाबत एकमत झाले. युरोपीय महासंघाच्या कायद्यापासून प्रेरणा घेऊन भारतातही याबाबत काहीतरी सकारात्मक पावले उचलली जातील अशी आशा बाळगण्याशिवाय आपण आणखी काय करू शकतो?
एआयचा उपयोग अंतर्दृष्टीचा शोध, लोक, यंत्रे, भौतिक वातावरणाबरोबर सुसंवाद करणे यासाठी केला जाऊ शकतो. या गोष्टींचा साहित्याशी खूप जवळचा संबंध आहे. ज्ञान, कारणमीमांसा, शिक्षण, प्रश्नांची उत्तरे शोधणे या गोष्टीही येतात. याच्यावर पूर्णपणे अवलंबून राहणे तोट्याचे ठरू शकते. एआय मानवी दोष, त्रुटी कमी करू शकते. यात सायबर हल्ले व्हायला खूपच वाव आहे.
एआयमध्येही ३ प्रकार आहेत. १) संकीर्ण किंवा कमजोर एआय २) सामान्य किंवा मजबूत एआय आणि ३) सुपर इंटेलिजन्स एआय. एआयद्वारा संगणक, त्याद्वारा रोबोट, किंवा सॉफ्टवेअरला मानवी मेंदूसारखी बुद्धीने विचार करण्याची क्षमता प्राप्त होते. ती द्यावी का हा प्रश्न उरतोच. एआयचा वापर साहित्यात जपून, विचारपूर्वक, शहाणपणाने अन चातुर्याने करायला हवा.
– मनोहर जोगळेकर