घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती।
मुक्ता आत्मस्थिती सांडवीन ।।१।।
ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी।
भाग्य तरी ऋणी देव ऐसा।।२।।
तीर्थभ्रामकासी आणीन आळस।
कडू स्वर्गवास करीन भोग।।३।।
सांडवीन तपोनिधा अभिमान।
यज्ञ आणि दान लाजवीन।।४।।
भक्तीभाग्यप्रेमा साधीन पुरुषार्थ।
ब्रह्मीचा जो अर्थ निजठेवा।।५।।
धन्य म्हणवीन इहलोकी लोका।
भाग्य आम्ही तुका देखियेला।।६।।
वारकरी परंपरा ही आत्मभान असलेली परंपरा आहे. या परंपरेवर तुकोबांनी कळस चढवला. सहाजिकच तुकोबांच्या अभंगात लखलखीत आत्मभान दिसतं. हेच आत्मभान वरच्या अभंगातून सहजपणे कळतं. तुकोबा दरवेळी त्यांचं वेगळेपण ठसठशीतपणे मांडतात. तुकोबांनी अनेक अभंगातून आवर्जून विठ्ठलाचं आणि पंढरपूरचं मोठेपण सांगितलं आहे. हे मोठेपण इर्ष्येतून आलेलं नाही. त्यामागे तुकोबांची तात्विक भूमिका आहे. संतांनी विठ्ठलाचं जे स्वरूप सांगितलेलं आहे तसा दुसरा देव सापडत नाही. संतांचा विठ्ठल सोवळ्या-ओवळ्यातला नाही. तो उच्चनीच भेदभाव करणारा नाही. त्याला सोन्याचांदीचीही गरज नाही. कोंबड्या-बकर्यांच्या बळीचीही गरज नाही. त्याला गरज आहे केवळ भावभक्तीची. निर्मळ प्रेमाची. विठ्ठलाचं इतर देवांपेक्षा असलेलं हे वेगळेपण संतांनी वारंवार मांडलं आहे. ‘ऐसा विटेवर देव कोठे’ असं आव्हान देत विठ्ठलासारखा देव असू शकत नाही हे त्यांनी गर्जून सांगितलं आहे.
जो प्रकार विठ्ठलाच्या बाबतीत आहे, तोच पंढरपूरच्या बाबतीतही आहे. इतर तीर्थांच्या ठिकाणी केवळ पुरोहितांचा बाजार आहे. कर्मकांडाची उठाठेव आहे. दंडण-मुंडणाची खटपट आहे. ब्रह्मज्ञानाचा भडीमार करणारे पंडित आहेत. पंढरपुरात असं काहीच नाही. किमान संतांना तरी ते अपेक्षित नाही. त्यामुळेच संतांनी इतर क्षेत्रांच्या तुलनेने पंढरपूरचं वेगळेपण आणि त्याचा महिमा सांगितला आहे. ‘वाराणसी गया पाहिली द्वारका। परि न ये तुका पंढरीचा।।’ असं तुकोबाराय म्हणतात. काशीची आणि गयेची पंढरपूरशी तुलना होत नाही. पंढरीच श्रेष्ठ ठरते असा निर्णय तुकोबाराय देतात. त्याचं कारण त्याच अभंगाच्या पुढच्या चरणात तुकोबाराय नोंदवतात. ‘पंढरीच्या लोका नाही अभिमान। पाया पडती जन एकमेका।।’ असा पंढरीतला समतेचा भक्तीव्यवहार तुकोबाराय दाखवून देतात.
विठ्ठलाचं आणि पंढरपूरचं वेगळेपण सांगणारे संतांचे हजारो अभंग आहेत. त्याचप्रमाणे तुकोबांनी स्वत:चं आणि त्यानिमित्ताने एकूणच वारकरी संतांचंही मोठेपण सांगितलं आहे. हे मोठेपण म्हणजे आत्मप्रौढी नाही. ते तात्विक आत्मभान आहे. या आत्मभानाचं प्रतिबिंब तुकोबांच्या या वरच्या अभंगात पडलेलं आहे.
तुकोबाराय त्यात असं आव्हान देतात की मी ब्रह्मज्ञान्याला लाळ घोटायला लावीन. वैदिक परंपरेत ब्रह्मज्ञानाचा महिमा गायला गेला आहे. ब्रह्मज्ञान म्हणजे वेदोपनिषदातलं ज्ञान. मात्र परंपरेनुसार वेदोपनिषदाचा अधिकार स्त्री-शूद्रांना नाही. तो केवळ उच्चवर्णीय पुरुषांना आहे. उच्चवर्णीय पुरुषांना मुंजीचा अधिकार आहे. ज्यांना मुंजीचा अधिकार त्यांना वेदांचा अधिकार. ज्यांना वेदांचा अधिकार त्यांना ब्रह्मज्ञानाचा अधिकार. ज्यांना ब्रह्मज्ञानाची प्राप्ती त्यांनाच मोक्षाचा अधिकार अशी वेदांती मंडळींची मांडणी होती. मुंज-वेदाध्ययन-ब्रह्मज्ञान-जीवनमुक्ती आणि मोक्ष अशी ही साखळी होती. या साखळीची सुरुवात अधिकारभेदापासून होते. सहाजिकच बहुजन समाज या साखळीतल्या पहिल्याच फेरीत बाद ठरत होता. स्त्री-शूद्रांना मुंजीचा अधिकार नसल्यामुळे साखळीतल्या पुढच्या कोणत्याच गोष्टीचा त्यांना अधिकार नव्हता.
संतांना मात्र या ब्रह्मज्ञानाची मातब्बरी वाटली नाही. शुष्क वेदांती ज्ञानापेक्षा त्यांना भावभक्तीचा जिवंत अनुभव अधिक श्रेष्ठ वाटला. जे लोक ब्रह्मज्ञानी आहेत अशा लोकांना लाळ घोटायला लावीन असं तुकोबाराय म्हणतात. एखाद्या माणसाला अधिक चवीचा पदार्थ समोर दिसला की तोंडाला पाणी सुटतं. उन्हाळ्याच्या दिवसात मीठ टाकलेली वैâरी पाहिली की माणसाच्या तोंडाला आपोआप पाणी सुटतं. त्या तोंडाला पाणी सुटण्याला तुकोबांनी दिलेला शब्द म्हणजे ‘लाळ घोटणं’. समोर काही चांगलं दिसलं की माणूस लाळ घोटतो. तुकोबा म्हणतात की अशा ब्रह्मज्ञानी माणसाला मी लाळ घोटायला लावीन. ब्रह्मज्ञानी माणूस वेदांती परंपरेत अधिक श्रेष्ठ मानला जातो. त्यानं ‘पुरुषार्थ’ साधला आहे असं मानलं जातं. तुकोबाराय मात्र म्हणतात की त्या ब्रह्मज्ञान्याला मी लाळ घोटायला लावीन. त्याला त्याचा ब्रह्मज्ञानी असल्याचा अहंकार सोडून द्यायला लावीन. ब्रह्मज्ञानी माणूस जीवनमुक्त अवस्थेला पोचलेला असतो. तुकोबाराय म्हणतात की मी त्याला त्याची जीवनमुक्त अवस्था सोडायला भाग पाडीन.
तुकोबारायांना हा आत्मविश्वास आहे त्याचं कारण त्यांनी पुढच्या चरणात नोंदवलं आहे. ते म्हणतात की कीर्तनात माणूस ब्रह्मीभूत होऊन जातो. तुकोबांचं कीर्तन म्हणजे भावभक्तीची उधळण. विठ्ठलाच्या भक्तीप्रेमात रंगलेल्या अक्षरांचा अभंग वर्षाव. भक्तीचा हा ताजा रस तुकोबांच्या अभंगातून पाझरत होता. तो भक्तीरस पाहिला की भलेभले पंडितही जिभल्या चाटत तुकोबांच्या कीर्तनात येत असत. शुष्क वेदांतात जिवाला कोणताच सुखाचा अनुभव नाही. वेदमंत्रांची केवळ पोपटपंचीच आहे. घटापटाचा वेदांत शिकून पोपटपंची करणार्या या पंडितांनाही भक्तीरसाची गोडी लावण्याचं सामर्थ्य फक्त तुकोबांच्या वाणीत होतं. त्यांची वाणी मोहक होती. त्यात जिवंत अनुभव होता. त्यामुळेच अनेक ब्राह्मण पंडित तुकोबांचे शिष्य झाले. त्याचाच राग सनातनी ब्राह्मणांना येत होता. वेदाचा अधिकार नसलेल्या तुकोबांना हे वेदज्ञ ब्राह्मण नमस्कार करतात याची चीड या सनातनी पंडितांना येत होती. हे पंडित त्यामुळेच तुकोबांच्या विरोधात धर्मपीठाकडे तक्रारी करत असत. तुकोबांना आणि तुकोबांच्या अभंगाना लालचावलेल्या वारकरी ब्राह्मणांनाही त्याची पर्वा नव्हतीच.
पुढे तुकोबाराय सांगतात की तीर्थयात्रा करणार्या भ्रामकांनाही त्यातला फोलपणा पटवून देईन. त्यांना तीर्थयात्रेचा आळस येईल असं सकस कीर्तन मी करीन. तीर्थाच्या ठिकाणी केवळ मंत्रोच्चार होत असतात. त्यात ना भाव ना भक्ती. तीर्थाच्या ठिकाणी कर्मकांडाचा बाजार भरलेला असतो. त्या ठिकाणी फक्त दुकानदारी चालते. मंत्रोच्चाराचा व्यवसाय तेजीत चालतो. तीर्थभ्रामकांना या तीर्थातून मिळणार्या पुण्याच्या भ्रामक कल्पनेतून बाहेर काढीन, असा तुकोबांचा निर्धार आहे. कीर्तन ऐकणार्या माणसाला स्वर्गभोगही कडू वाटतील असं तुकोबाराय म्हणतात.
तापसी लोकांना त्यांच्या तपाचा अभिमान असतो. तपश्चर्येची वर्षे अभिमानाने सांगितली जातात. तुकोबाराय म्हणतात अशा तापसी लोकांचा अभिमान गळून पाडायला लावीन. यज्ञ आणि दान हे श्रीमंत माणसांचे उपद्व्याप असतात. आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन करण्यासाठीच यज्ञाचा आणि दानाचा थाटमाट यजमान करतात. त्यातून बाजूला काढून यज्ञ आणि दान लाजवून सोडीन असं तुकोबाराय म्हणतात. केवळ प्रेमभक्तीच्या बळावर विठ्ठल आपलासा करता येतो हा तुकोबांचा स्वानुभव आहे. त्यामुळेच तुकोबाराय म्हणतात मला पाहिलेले लोक ‘आम्ही तुकोबांना पाहिलं’ म्हणून धन्यता मानतील. खरोखरच तुकोबारायांचा हा आत्मविश्वास आज खरा ठरलाय. तुकोबांना पाहिल्याची धन्यता मिरवावी असं तुकोबांचं मोठेपण टिकलं आहे. आपल्याला म्हणजे तुकोबानंतरच्या लोकांना तुकोबांना त्यांच्या देहरुपात पाहता आलं नाही. पण आपल्याला त्यांना त्यांच्या अभंगाच्या अक्षररूपात पाहता येतं. तुकोबांचा गाथा वाचूनच तुकोबारायांना पाहिल्याची धन्यताही मिरवता येते.
– ह.भ.प. ज्ञानेश्वर बंडगर