नामा म्हणे धनू आहेच झकास
त्यानेच विकास घडविला
परळीचा वाजे जगभर डंका
राखेतून लंका उभारिली
दादा म्हणे धनू खातो किती माती
‘धस’तात पाती अंगोपांगी
म्हणे पंकूताई मला काय त्याचे?
माझिया भावाचे खरकटे
जळू देत जिल्हा जळू द्यावे राज्य
आकाचाही आका त्याज्य नसे
माणसाचे जिणे कस्पटासमान
ठेचून मेल्याने मिळे मान
तालुक्या तालुक्यात रक्तपात होई
ज्याला त्याला घाई मारण्याची
मरेना का कोणी आपल्याला काय?
ज्याचे हातपाय त्याच्या ठायी
मोडू देत माना मणक्यांची हाडे
गल्लोगल्ली राडे चालू देत
आपला पगार आपली विजार
टिकवून ठेवू फक्त थोडेफार
बाकीचा समाज –ड्यात गेला
काल कोण मेला आज कोण
ज्याचा त्याचा देव त्याचा पाठीराखा
आणि ओकाबोका महाराष्ट्र
महाराष्ट्र मेला राष्ट्र सुद्धा मेले
प्रत्येकाचे ठेले मात्र चालू
आमचा वारसा आमची पुण्याई
संपलेली शाई विवेकाची
तरी नका बोलू कुणालाही काही
लिहाल ते कुणी छापत ना
बोलाल तो शब्द होई मेटाडेटा
व्यवस्थेचा रेटा चेपेल की
गप्प बसा सारे तेच आहे बरे
कशासाठी खरे बोलायचे?
बोललात तरी ऐकणार कोण?
प्रायोजित मौन बहुतेक
उजव्यांची मांडी आहे ऐसपैस
तिथे तुही बैस म्हणे जो तो
नसेल जमत तोंडावर बोट
तुझ्यातच खोट असणार
कानामध्ये बोळे झाकलेले डोळे
बीभत्स सोहळे एंजॉयावे
असेच जातील दिन आणि वर्ष
सारा हर्षामर्ष कोंदटला
घुसमटे श्वास तोही एक भास
आणि आसपास वाळवंट
होईल मोकळे चौखूर वास्तव
तोवर विस्तव पायाखाली
जळू, भाजू देत पापण्यांचे पाश
समूळ विनाश होऊ द्यावा
एकट्या जिवाची किंकाळी अखोल
त्याचे काही मोल राहिले ना
आपले आपण गावे मूक गीत
तेही भीत भीत सदोदित
तोवर धनूला होत नाही काही
दादा सुद्धा राही गपगार
दादाचाही आका आणि महाआका
त्यांच्या आणाभाका सत्तातुर
खुर्ची फक्त खरी आहे तीच बरी
सोडुनिया घरी जाववेना
म्हणून करावी पूर्ण मोडतोड
एकमेव खोड तगण्याची
एकदा का गेले बुडातले सत्त्व
उरले कवित्व कुचकामी
म्हणून ऐकावे संतांचे अभंग
पण त्यांचा संग धरू नये
कोण ज्ञानराया कसला तुकोबा
आपला विठोबा सत्ताधीश
बाकी जीवजंतू असती परंतु
त्यांच्यासाठी किंतू ठेवावा का?
– दीपक पवार