शिक्षक
वाल्या कराडला वाचवण्याला
कोण कोण पुढे आले यांचे
सांगा मुलांनो कोणते नेते
परीक्षेत द्या उत्तर त्याचे
‘त्या’ हत्येचे प्रश्न अपेक्षित
वाचा पुन्हा पुन्हा गाइड
जाणून घ्या तुम्ही गूढ हत्येचे
रक्त ठिबकते जिल्हा तो बीड
क्रूर निर्दयी वाल्या पशू तो
कट हत्येचा रचला त्याने
चालढकल का करती नेते
उत्तर द्या तुम्ही घट्ट मनाने
—– —– —–
धनंजय मुंडे
कराड माझा नाही कुणीही
त्याचे नाते ना माझ्याशी
जबाबदार जो असेल त्याला
बेदिक्कत तुम्ही द्यावी फाशी
माझ्यावर जरी रागही तुमचा
का करता माझी बदनामी
कुटुंबास मम वाटे चिंता
असेन का मी तसा असामी
देशमुख हत्येपेक्षा मोठी
इभ्रत माझ्या कुटुंबाची
आहे मलाच फक्त काळजी
फक्त माझ्या मायलेकीची
—– —– —–
सुरेश धस
हताश होऊनी पाहे जनता
मुंडे प्रेमींचे सपोर्ट-चाळे
सारे जाणून आहेत तरीही
अजून उघडत नाहीत डोळे
सत्तेत असल्यावरती यांची
झाकूनी जाती सगळी पापे
कोण कुणाचे हित जपतो ते
कळल्यावरती मिळतील लाफे
न्यायापुढती सगळे समान
मारती फक्त मोठ्या बाता
नंतर भांडे फुटल्यावरती
जनतेच्या ते खातील लाथा
—– —– —–
किरीट सोमय्या
अ ब ब ब, ब ब ब ब
केवढी प्रचंड ही संपत्ती
डोळे माझे पांढरे झाले
कराडला दिली हिरवी बत्ती?
इडीला मी सांगणार होतो
तेव्हाच माझा बसला घसा
आमचेच वरचे नेते बोलले
आंधळे होऊन गप्पच बसा
नाहीतर त्याला सोडले नसते
केला असता काळा निळा
वॉशिंग मशीनमध्ये घालून
भाजप साबणात चोळामोळा
—– —– —–
फडणवीस, अजितदादा, शिंदे
बघा, तिन्ही पक्षही आमचे
एकमेकांना पाण्यात पाहतो
एकमेकांवर चिखल उडवत
आनंदाने मजेत नाहतो
आम्ही तिघे एकमेकांना
आहोत आधीच चांगले ओळखून
सत्तेचंच खातो लोणी
तेही कसे जिभल्या चाटून
आम्हा तिघांमध्ये कोणी
नाही छोटा नाही मोठा
मागणी फक्त एकच असते
फक्त मिळावा मोठा वाटा