रावसाहेबांचा मृत्यू विसरून आता गाव हळूहळू सावरत होता. युवराज देखील शहराकडे परतला होता. गावावर हळूहळू निवडणूकीचा रंग चढायला लागला होता. दोन्ही बाजू आपापले डावपेच आखायला लागल्या होत्या. आनंदा आणि त्याचा बाप नाना दोघेही मोठ्या उत्साहाने तयारीला लागले होते. रावसाहेब नाहीत म्हणाल्यावर त्यांच्या गटाला अस्मान दाखवायला ते आतूर झाले होते.
– – –
रावसाहेब पाटलांचे अचानक निधन झाले आणि गावावर एकप्रकारे शोककळा पसरली. पाटलांच्या घराण्याचा गावातच नाही, तर पार तालुक्यापर्यंत दबदबा होता. खुद्द रावसाहेब पाटील गेली १७ वर्ष सलग गावचा कारभार हाकत होते. मात्र गेल्या वर्षी सत्ता राखता राखता रावसाहेबांची चांगलीच तारांबळ उडाली होती. बदलाचे नवे वारे गावात देखील खेळायला लागले होते. विशेषतः तरुण पोरं हिरिरीने राजकारण करायला लागली आणि रावसाहेबांच्या वर्चस्वाला धक्के बसायला लागले. साखर कारखान्याच्या निवडणुकीत कसाबसा विजय मिळाला खरा, पण त्यावेळी जी काही दगदग करावी लागली, तिचा रावसाहेबांच्या तब्येतीवर चांगलाच परिणाम झाला होता. त्याचीच परिणती म्हणजे हा सकाळी सकाळी अचानक आलेला हार्टअटॅक.
पाटलांच्या वाड्याच्या ओसरीत चांगलीच गर्दी जमली होती. अनेक लोक वाड्याबाहेर ताटकळत होते. ’गुरुजी, ओ गुरुजी, अहो काय सुरू आहे आतमध्ये?’ रमणशेठ मारवाड्याने आतला कानोसा घेत विचारले.
’युवराजला निरोप धाडलाय शहरात. तो यायला निघालाय. त्याचीच वाट बघत आहेत सगळे,’ गुरुजींनी हलक्या आवाजात माहिती दिली.
रावसाहेब पाटलांना दोन मुले. मोठा सर्जेराव; तो गावातच त्यांच्यासोबत राहून कारभार सांभाळायचा. सर्जेरावाला राजकारणापेक्षा कुस्ती आणि तालमीचा शौक जास्त. त्याचे ध्यान सगळे तिकडे लागलेले असायचे. रावसाहेब म्हणतील तसा कारभार हाकणे एवढेच काय ते त्याचे काम. या उलट धाकटा युवराज. लहानपणापासून अभ्यासात प्रचंड हुशार. कुशाग्र बुद्धीच्या युवराजने बघता बघता गावातले शिक्षण पूर्ण करून शहराची वाट धरली आणि तिथे तो सध्या उच्च शिक्षण पूर्ण करत होता. सर्जेरावाला तालमीचे आकर्षण; तर युवराजला अमेरिकेचे. ह्या अशा दोन पोरांच्या दोन तर्हा सांभाळत रावसाहेब गावचा कारभार हाकत होते. घरची सगळी जबाबदारी त्यांची बायको मालती समर्थपणे चालवत असल्याने त्या बाबतीत मात्र रावसाहेब निश्चिंत होते.
’युवराज आला… युवराज आला.. बाहेर काहीसा गलका झाला आणि नागनाथ अण्णा घाईघाईने बाहेरच्या दाराकडे धावले. नागनाथ अण्णा म्हणजे रावसाहेबांचा निष्ठावंत माणूस. त्याला लोक रावसाहेबांची सावली म्हणूनच ओळखायचे. त्याचाच वसा आता त्याचा मुलगा सुभान हा सर्जेरावाची सावली बनून चालवत होता. नागनाथ अण्णांनी पुढे होऊन युवराजच्या हातातली छोटी बॅग घेतली आणि एका हाताने त्याला सावरत ते वाड्यात घेऊन गेले. धिप्पाड, रांगडा, नुसत्या आवाजाच्या जोरावर गावचा गाडा हाकणारा आपला बाप असा निष्प्राण होऊन पडलेला पाहून युवराज जागीच गुडघ्यावर कोसळला. सर्जेरावाने पटकन पुढे होत त्याला आधार दिला आणि दोन्ही भावांचा हुंदका एकाचवेळी फुटला.
रावसाहेबांचा तेरावा उलटला. रीतीप्रमाणे गावजेवण, कीर्तन समारंभ देखील पार पडला आणि युवराजने शहराकडे परतण्याची तयारी सुरू केली. त्याच्या जाण्याची कुणकुण लागताच नागनाथ अण्णा तातडीने वाड्यावर आले. बैठकीच्या खोलीत अण्णा, सर्जेराव आणि युवराज असे तिघेच बसलेले होते.
‘युवराज, पुढचे काय ठरवले आहे?’
’अण्णा, माझी फायनल दहा दिवसांवर आली आहे. ह्या परीक्षेत मला चांगले यश मिळाले, तर कोणतीही मोठी कंपनी मला हसत हसत नोकरी देईल. कदाचित थेट परदेशात जाण्याची देखील संधी मिळेल.’
’आणि गावच्या कारभाराचे काय मग?’
’अण्णा, अहो तुम्ही आहात, सर्जादादा आहे. मग काळजी कसली? आणि खरे सांगू का, मी कधी गावच्या कारभारात लक्ष घातले नाही आणि मला त्यात रस देखील नाही.’
’म्हणजे मालतीताई, सर्जेराव, गाव सगळ्याला मागे टाकून तू परदेशाला जवळ करणार आहेस का?’
’मी कुठे तसे म्हणतो आहे अण्णा? पण येवढे जे काही मी शिक्षण घेतले आहे, त्याचा उपयोग व्हायला नको का? मला काही वर्षे परदेशात राहायचे आहे. तिथला अनुभव मिळवायचा आहे. नवे जग बघायचे आहे.’
’तुझ्या आनंदात आम्हाला देखील आनंदच आहे युवराज. पण रावसाहेबांनी हे येवढे सगळे उभे करून ठेवले आहे ते कोणासाठी? आपल्या मागे आपल्या मुलांनी हातात हात घालून हा कारभार चालवावा असे त्यांना फार वाटायचे. दोन महिन्यात गावात निवडणुका आहेत. अशावेळी आपल्या लोकांना तुमच्या दोघांच्या आधाराची फार गरज आहे. रावसाहेबांची शेवटची इच्छा म्हणून तरी…’
’अण्णा, इमोशनल ब्लॅकमेल प्लीज करू नका. ज्या विषयातले आपल्याला काही कळत नाही, ज्यात आपल्याला रस नाही त्यात सहभाग घेण्याची माझी खरंच इच्छा नाही. माझे भविष्यासाठी प्लॅन्स वेगळे आहेत. आणि तुमच्या आधारासाठी सर्जादादा भक्कमपणे उभा आहे की इथे.’
’युवराज, हे बघ, सर्जेराव आहेच आणि तो असणारच आहे. पण आजवर त्याने रावसाहेबांच्या सल्ल्याने सर्व कारभार पाहिला. सही करण्यापलीकडे त्याने फारसा कधी रस दाखवला नाही. आता रावसाहेब नाहीत म्हणाल्यावर ह्या सगळ्याचा फायदा आनंदा नक्की उचलायचा प्रयत्न करणार. त्याला खालच्या आळीतल्या पोरांची देखील आता चांगली साथ मिळाली आहे.’
’त्या आनंदाच्या तर…’
’सर्जेराव.. डोक्यात राख घालून गाव चालवता येत नसतो. शांत व्हा.’
’कसे शांत व्हायचे अण्णा? गेली तीन वर्षे हा आनंदा आणि त्याचा बाप रावसाहेबांना सतत आडवे येत होते. त्यांच्या प्रत्येक चांगल्या कामात मोडता घालत होते. गेल्या वर्षी तर साहेबांवर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप लावून किती मानसिक त्रास दिला होता ते विसरलात का?’
’ते बाप बेटे किती नालायक आहेत ते मी चांगला ओळखून आहे सर्जेराव. म्हणूनच मला जास्त काळजी लागून राहिली आहे.’
’अण्णा तुम्ही नका चिंता करू. सर्जादादाच्या जोडीला तुम्ही असताना त्या बापबेट्याची काय बिशाद आहे जिंकण्याची?’
’म्हणजे तू तुझा निर्णय बदलणार नाहीस तर युवराज?’
’नाही सर्जादादा. मला खरंच ह्या सगळ्यात रस नाही. परीक्षा झाल्यावर वाटले तर चार दिवस मी येईन प्रचाराची धुळवड खेळायला. पण सध्या मला मोकळे सोडा.’
—
रावसाहेबांचा मृत्यू विसरून आता गाव हळूहळू सावरत होता. युवराज देखील शहराकडे परतला होता. गावावर हळूहळू निवडणुकीचा रंग चढायला लागला होता. दोन्ही बाजू आपापले डावपेच आखायला लागल्या होत्या. आनंदा आणि त्याचा बाप नाना दोघेही मोठ्या उत्साहाने तयारीला लागले होते. रावसाहेब नाहीत म्हटल्यावर त्यांच्या गटाला अस्मान दाखवायला ते आतूर झाले होते.
’आनंदा, यावेळी मला विजयाची पूर्ण खात्री वाटते आहे. आपला प्रत्येक उमेदवार निवडून येणार आणि सरपंच पण आपलाच बसणार हे नक्की.’
’नाना येवढे बेसावध राहू नका. लोक फार हळवी असतात. बाप गेल्याचा फायदा सहानुभूतीतून मिळवायचा प्रयत्न सर्जेराव नक्की करणार. भीती आहे ती फक्त ह्याच गोष्टीची.’
’सर्जेराव आहे बिनडोक, त्याची काय काळजी करायची?’
’तो बैल आहे हे खरे आहे नाना. पण त्याच्यामागे तो बेरकी अण्णा उभा आहे ना… रावसाहेबांना पण सल्ले देण्यात तोच आघाडीवर असायचा.’
’अण्णाला फोडला तर?’
’म्हणजे?’
’रावसाहेबांनंतर कारभारी म्हणून सगळे सर्जेरावाला पुढे करत आहेत. त्या बेअक्कल सर्जेरावापेक्षा इतकी वर्षे इमाने इतबारे सेवा केलेले, निष्ठावंत आणि गावच्या कारभाराची पूर्ण माहिती असलेले नागनाथ अण्णा योग्य उमेदवार नाहीत का?’ डोळे मिचकावत नाना म्हणाले आणि आनंदा खदखदून हसला.
’नाना तुमचे डोके म्हणजे ना…’
’आता वेळ घालवू नका चिरंजीव. गावात चर्चेची राळ द्या उडवून.. ’सर्जेराव कसा अयोग्य आणि अण्णा कसा योग्य’ हेच ठिकठिकाणी चर्चेत यायला हवे.
—
’अण्णा, आज त्या नानाने चक्क आईसाहेबांवर घाणेरडा आरोप केला आहे मंदिरातील भाषणात. रावसाहेबांनी सांगितले म्हणून केवळ ती पंचायत सदस्य झाली. साधी सही न करता येणारी ती बाई लाखोंचा भ्रष्टाचार काय करणार?’ सर्जेरावाचा आवाज चांगलाच तापला होता.
’सर्जेराव मी तुम्हाला किती वेळा सांगितले आहे की, डोके कायम शांत ठेवत चला. निवडणुका म्हणाले की, आरोप प्रत्यारोप होणारच. आनंदाला आणि त्याच्या बापाला पण आपल्याला मुद्दाम भडकवायचे आहे. अशावेळी सबुरीने वागायला हवे.’
’फक्त येवढेच कारण आहे, की अजून काही अण्णा?’
’सर्जेराव काय म्हणायचे काय आहे तुला? स्पष्ट बोल!’
’नाही, गावात सध्या जी काही चर्चा सुरू आहे, ती बघता तुम्हाला खरंच रावसाहेबांच्या खुर्चीची स्वप्नं पडायला लागलेली नाहीत ना?’
’सर्जेराव…’ आज कधी नाही ते अण्णांचा आवाज प्रचंड चढला होता. त्याचे शरीर संतापाने थरथरत होते. सुभानने पुढे होऊन पटकत त्यांना सावरले.
’सर्जेराव, असली बेइमानी ह्या अण्णाच्या रक्तात नाही. तुम्हाला माझ्यावर विश्वास उरला नसेल तर हा मी निघालो. या पुढे तुम्ही आणि तुमचे नशीब…’
रागारागाने बाहेर पडणार्या अण्णांकडे सर्जेराव जळजळीत नजरेने पाहत राहिला. त्याची ती नजर सुभानला फार खटकून गेली होती. बापाच्या काळजीने त्याच्या हृदयाची धडधड वाढली होती.
—
’अरे, युवराज तू कसा काय अचानक?’
’अण्णा, एवढे सगळे घडले आणि मला कोणी एका शब्दाने देखील बोलले नाही?’
’विशेष काही नाही. थोडे लागले आहे इतकेच.’
’तुम्हाला कोणावर संशय आहे?’
’संशय नाही तर खात्री आहे!’ सुभान धारदार आवाजात म्हणाला. मात्र अण्णांनी त्याला नजरेच्या इशार्याने गप्प केले.
’युवराज, अरे भुरटे चोर असतील. माझे कुठे कोण शत्रू आहेत गावात?’
’अण्णा, भुरटे चोर चोरी करायला अडवतात, मारहाण करायला नाही. तीन टाके पडलेत तुमच्या डोक्याला, हाता पायांना मुका मार लागलाय. आणि मला खरं सांगा, काय काय चोरीला गेले हो तुमचे?’
युवराजच्या सडेतोड प्रश्नाने अण्णांना मुके केले आणि ते उगाचच छताच्या पंख्याकडे गंभीर नजरेने पाहत राहिले. रावसाहेबांच्या गटातल्या इतरांकडून युवराजला गावात चालू असलेली चर्चा, मालतीबाईवर झालेले आरोप, सर्जेराव आणि अण्णांचे झालेले वाद सगळे काही सविस्तर कानावर पडले होते. झालेला प्रकार त्याच्या लक्षात आला होता. त्यावर शांतपणे विचार करून तो तालमीकडे निघाला.
’सर्जादादा, चल आपल्याला जायचे आहे.’
’कुठे?’ अंगावर माती ओतून घेत सर्जेराव गरजला.
’अण्णांची माफी मागायला.’
’कशाबद्दल?’
’तू काय केले आहेस ते तुला चांगले माहिती आहे दादा. वाद न घालता चल आणि माफी माग.’
’काही केलेच नाही तर माफी कसली मागायची? गावात लोक काही पण बरळतात.. त्यांचे ऐकून तू मला जाब विचारणार आहेस का? मोठ्या भावाला?’
’प्रश्न वयाचा नाही तर बुद्धीचा आहे दादा.’
’युवराज तोंड सांभाळून बोल. नाहीतर तू माझा भाऊ आहेस हे मी विसरून जाईन.’
’आपली माणसे तू कधीच विसरला आहेस दादा.’
’इथून चालता हो युवराज. स्वत:च्या भावापेक्षा तो थेरडा जवळचा झाला काय तुला?’
’तोंड सांभाळून बोल दादा. नाहीतर तू माझा भाऊ आहेस हे मला देखील विसरायला लागेल.’
’नीघ युवराज… जा त्या अण्णाच्या पायापाशी बस जा..’ तावातावाने सर्जेराव ओरडला.
घडलेल्या घटनेने सगळेच अवाक झाले होते. त्यातल्या त्यात आधी भानावर आला तो संजा. तो लगबगीने ही नवी माहिती पुरवायला आनंदाकडे धावला.
—
’युवराज, माझ्यासाठी रक्ताची माणसे तोडू नको बाळा, मी पिकलेले पान आहे. आज न उद्या गळणारच.’
’अण्णा, मला जसे रावसाहेब होते तसे तुम्ही आहात. चार मूर्खांच्या नादाला लागून दादा जे काही वागत आहे, त्याचा धडा त्याला मिळायलाच हवा आहे.’
’पण तू करणार तरी काय आहेस?’
’असे काही करून दाखवणार आहे, जे रावसाहेबांनी, तुम्ही कधी विचारात देखील आणले नसेल,’ गूढपणे हसत युवराज म्हणाला. अण्णा आणि सुभान त्याच्या चेहर्याकडे बघत राहिले.
—
’नमस्कार सर्जेराव…’ बाजूच्या खुर्चीवरून आवाज आला आणि तारवटलेल्या डोळ्यांनी सर्जेरावाने शेजारी पाहिले.
’आनंद साहेब.. आज आम्हाला चक्क नमस्कार?’ लडखडत्या आवाजात सर्जेराव म्हणाला आणि आनंदा हसायला लागला.
’शत्रू संकटात असेल तर मदत करू नये म्हणतात सर्जेराव. पण तुम्ही आमचे शत्रू नाही. आमचे शत्रू होते रावसाहेब, जे आता हयात नाहीत. पण अण्णा मात्र अजून जिवंत आहे आणि त्याला एकदा तरी पराभवाची माती चारायची आहे,’ त्वेषाने आनंदा म्हणाला. अण्णाचे नाव ऐकले आणि सर्जेरावाच्या कपाळाची शीर चांगलीच फुलली.
’नुसती माती नाही, तर तोंड काळे करायचे आहे मला पण त्या अण्णाचे.’
’अरे वा! अहो मग तुमचा आणि माझा रस्ता एकच आहे की,’ हात पुढे करत आनंदा म्हणाला आणि काही क्षण विचार करून सर्जेरावानी तो आपल्या हातात मिळवला.
—
ह्या वर्षीच्या निवडणुका म्हणजे गावची परीक्षाच होती म्हणायला हरकत नाही. संपूर्ण गावात एक प्रकारची दबकी शांतता तर गावातल्या लोकांच्या मनावर तणाव जाणवत होता. सातत्याने रावसाहेबांचा विरोध करणार्या आनंदाची ताकद गेल्या काही वर्षांत चांगली वाढली होती. जाती-पातीच्या राजकारणाला खतपाणी घालत त्याने तरुणाईला देखील नादावले होते. त्यातच आता त्याच्या साथीला सर्जेराव येऊन मिळाल्याने त्याची ताकद दहा पटीने वाढली होती. सख्ख्या लहान भावाने खुर्चीसाठी अण्णाला हाताशी धरून आपल्याला कसे एकटे पाडले, ह्याचे अगदी काळीज पिळवटणारे वर्णन सर्जेराव प्रत्येक सभेत करत होता. त्याच्या सभांचा चांगला प्रभाव देखील पडत होता. लोकांची त्याच्या बाजूने सहानुभूती आधीपासून होतीच, त्यात आता अधिक भर पडत चालली होती. मात्र ऐनवेळी ’मला सत्तेचा मोह नाही. आम्ही निवडून आल्यानंतर खुर्चीत नागनाथ अण्णाच असतील,’ अशी घोषणा युवराजने केली आणि चित्र एकदम पालटले. सगळीकडे युवराजचे नाव चर्चेत आले. अशातच, ’मी किंवा माझी आई कुठल्याही पदासाठी उमेदवार नसू आणि सत्तेत देखील आमचा काही वाटा नसेल’ अशी दुसरी घोषणा युवराजने केली आणि सर्वत्र त्याच्या कौतुकाची लाट उसळली.
अशा वातावरणात एकदाच्या निवडणुका पार पडल्या आणि मतमोजणीचा दिवस उजाडला. एकेका सीटचा निकाल जाहीर होत होता आणि त्या त्याप्रमाणे कधी ह्या तर कधी त्या गटाचा जल्लोष सुरू होता. २९ जागांपैकी २६ जागांचे निकाल लागले होते आणि त्यात युवराज आणि अण्णा जोडीने १४ जागा जिंकत आनंद आणि सर्जेरावाचे टेन्शन चांगलेच वाढवले होते. शेवटच्या तीन सीटवर अनुक्रमे आनंदा, अण्णा आणि सर्जेरावाचे निकाल बाकी होते. अपेक्षेप्रमाणे सर्जेराव सहजपणे जिंकून आला आणि अण्णा देखील जिंकले. धक्कादायक म्हणजे आनंदा चक्क पराभूत झाला. १६ जागा जिंकत युवराज अन अण्णांच्या जोडीने बहुमत मिळवले आणि पुन्हा एकदा गावाचा कारभार हातात घेतला. विरोधी गटात चक्क वादविवाद होऊन, त्यांनी आनंदाऐवजी सर्जेरावाला आपला नेते म्हणून निवडले आणि आनंदा अन नाना जोडीला आणखी एक धक्का बसला.
’आनंदा गेली पाच-सात वर्षे तुम्हाला साथ देतोय. पण सत्तेची चव काय चाखायला मिळाली नाही आणि पदरात देखील काही पडले नाही. आता निदान सर्जेरावांची साथ दिली, तर साखर कारखान्याच्या निवडणुकीत काहीतरी पदरात पडेल हे नक्की, जिल्हा बँकेचे अडसूळ म्हणाले आणि उपस्थित प्रत्येकाने होकाराची मान डोलवली. सुन्न झालेल्या आनंदा अन त्याच्या बापाला सगळे सभासद कधी निघून गेले हे कळले देखील नाही. दोघेही रिकाम्या खुर्च्यांकडे पाहत बसले होते…
—
’अभिनंदन.. अभिनंदन अण्णा…’ युवराजने अण्णांच्या पाया पडत अभिनंदन केले.
’युवराज, अरे अभिनंदनाचा खरा हक्कदार तू आहेस बाबा. ज्या हुशारीने तू हे सगळे पार पाडलेस त्याला तोड नाही. आज रावसाहेब असते…’ बोलता बोलता अण्णांचे डोळे पाणावले.
’तुमच्या रूपाने ते सदा आमच्यासोबत आहेतच अण्णा. आता तुम्हाला मात्र नेटाने कारभार सांभाळायचा आहे. मला अमेरिकेतून नोकरीसाठी कॉल आला आहे.’
’अरे पण मी एकटा ह्या विरोधकांना कसा तोंड देणार?’
‘अण्णा काळजी करू नका. मी तुम्हाला शब्द दिला होता ना, की तुम्ही आणि रावसाहेबांनी विचार देखील केला नसेल असे काहीतरी करून दाखवेन.’
’हो मग?’
’आज सत्ताधारी गट आपला आहे..’
’आणि विरोधी गट देखील आपलाच आहे…’ युवराजचे वाक्य अर्धवट तोडत सर्जेराव आत येत म्हणाला आणि अण्णा थक्क होऊन दोघांच्या तोंडाकडे पाहतच राहिले.
‘माफ करा अण्णा, हे तुमच्या तत्त्वात कधीच बसले नसते म्हणून तुमच्यापासून लपवून ठेवले. पण आता काळ बदलतो आहे, माणसे बदलत आहेत आणि डावपेच देखील. ज्या दिवशी आईसाहेबांवर आरोप झाला, तेव्हाच मी ठरवले होते की ह्या बापबेट्याला चांगलाच धडा शिकवायचा.’
‘माफ करा अण्णा, मी तुम्हाला नाही नाही ते बोललो. पण तो सगळा डावपेचाच एक भाग होता,’ अण्णाची माफी मागत सर्जेराव म्हणाला.
‘आणि हो अण्णा, अंधारात पायाखाली अचानक दगड आला आणि माझ्या काठीचा फटका जरा जास्तीच जोरात तुमच्या डोक्यात बसला म्हणून मी पण माफी मागतो…’ हात जोडत सुभान म्हणाला आणि अण्णा कपाळाला हात लावत मटकन खुर्चीत बसले.