शब्दांचे खेळ समजून घ्या!
धर्मनिरपेक्षता आणि सर्वधर्मसमभाव या वरवर पाहता एकसारख्या वाटणार्या गोष्टी आहेत. प्रत्यक्षात दोन्हींचे अर्थ वेगवेगळे आहेत.
धर्मनिरपेक्ष देश अस आपण म्हणतो त्याचा स्पष्ट अर्थ असा आहे कि या देशातल्या लोकांशी वागताना इथली प्रशासकीय यंत्रणा, इथल्या स्वायत्त संस्था किंवा लोकांनी निवडून दिलेलं सरकार कुठल्याही प्रकारचा भेदभाव करणार नाहीत, इथल्या सरकारचा आणि सगळ्या यंत्रणांचा स्वतःचा असा कुठलाही धर्म असणार नाही.जरी त्या यंत्रणा राबवणार्या माणसांच्या आपापल्या धार्मिक श्रद्धा असल्या तरीही त्या त्यांच्या खाजगी बाबी आहेत त्यांच्या कामाच्या ठिकाणी त्यांच्या खाजगी बाबींचा कुठलाही हस्तक्षेप असणार नाही.हि धर्मनिरपेक्ष असण्याची व्याख्या अर्थातच सार्वजनिक स्तरावर संस्था म्हणून अस्तित्वात असलेल्या प्रत्येक बाबीला लागू होते मग ती बँक असेल, विद्यापीठ असेल किंवा राजकीय पक्ष असेल. धर्मनिरपेक्ष असणे म्हणजे बहुसंख्य समाजाचा असलेला धर्म बाजूला ठेवून अल्पसंख्य लोकांना गोंजारणे किंवा लांगूलचालन करणे असा अजिबात होत नाही. धर्मनिरपेक्षता ठामपणे धर्माला बाजूला ठेवते. सर्वधर्मसमभाव हा शब्दच मुळात धर्माच अस्तित्व मान्य करून भारतातल्या प्रत्येक नागरिकाला आपापला धर्म पाळण्याची आणि त्याच्या श्रद्धा, चालीरीती पाळण्याची मुभा देतो मात्र त्याचवेळी सगळ्या यंत्रणांनी सगळ्या धर्मापासून सारखेच अंतर राखावे आणि सगळ्या धर्मांना सारखीच वागणूक देणे अपेक्षित असते. त्याचवेळी नागरिकांनी आपापला धर्म पाळत असतानाच दुसर्या नागरिकांच्या धर्माचा आदर करणे, किमान अनादर न करणे किंवा द्वेष न करणे अपेक्षित आहे. थोडक्यात धर्मनिरपेक्ष असण्याचा संबंध यंत्रणा अथवा संस्थांचा आहे मात्र सर्वधर्मसमभाव हा गुणविशेष समाजाचा, नागरिकांचा आहे.
समता आणि समरसता
हा निव्वळ शब्दांचा खेळ करण्याचा प्रयत्न वारंवार होतो.
समता या शब्दाचा अर्थ अतिशय स्पष्ट आहे. या भारतातले सगळे नागरिक समान आहेत, त्यांना असणारे हक्क आणि कर्तव्य समान आहेत ज्यामध्ये कुठल्याही मुद्द्यावर भेदाभेद नाही.
मात्र समरसता हा शब्द दोन वेगळ्या समूहांची ओळख करतो, एक मूळ समूह, समाज ज्याची एक संस्कृती आहे, चालीरीती, परंपरा आहेत, उरलेल्यांनी या मुख्य प्रवाहात सामील व्हावे, स्वतःची ओळख मिटवून आमच्या प्रवाहात समरस व्हावे. वरवर पाहता अशी समरसता सोपी वाटली तरीही पिढ्यांचे संस्कार असलेली आपली ओळख कुठल्याही समूहाने का म्हणून सोडावी आणि बहुसंख्य आहेत म्हणून त्या समूहाच्या ओळखीत आपली ओळख का सामावली जावी?
म्हणूनच आग्रह समतेचा असावा, समरसतेचा नाही.
आदिवासी आणि वनवासी
हाही असाच एक शब्दछल.
वनवासीचा या शब्दाचा अर्थ वनात राहणारे, जंगलात राहणारे.जंगलातून त्यांना हुसकावून लावले की त्यांची ओळख संपली.नव्हे वनवासी शब्दाने आपण त्यांच्या इथल्या निसर्गावर असलेला हक्कच नाकारतो. म्हणूनच त्यांना विस्थापित करायला, त्यांचे हक्क नाकारायला वनवासी शब्द वापरला जातो.
वनवासी शब्द चुकीचा असेल तर योग्य काय? योग्य शब्द आहे आदिवासी, आदीकाळापासून जंगलात राहणारे, जंगलाला जपणारे, जंगलाशी निगडीत असणारी संस्कृती जपणारे या भूमीतले सगळ्यात प्राचीन रहिवासी ते आदिवासी. त्यांचा धर्म निसर्ग आणि त्यांच्या प्रथा, चालीरीती सगळ्या जंगलाशी निगडीत. आदिवासींना वनवासी म्हणून संबोधने म्हणजे त्यांना जंगलातून बेदखल करायला उचललेलं पहिलं पाऊल. वरवर पाहता आपल्याला या गोष्टी किरकोळ वाटतात. मात्र हे संबोधन आणि त्यामागचा अर्थ समजला की मग विषय किती गंभीर आहे हे समजतं. हे शब्दांचे खेळ कोण करतं आणि नेमके घोळ कुठे होतात हे समजून घ्यायचा हा प्रयत्न.
– आनंद शितोळे
केंद्राने केले त्याचे काय?
नवीन विद्यापीठ कायदा चुकीचा किंवा बरोबर याबद्दल चर्चा झाली पाहिजे. मला स्वतःला हा कायदा अनावश्यक आहे असे प्रथमदर्शनी वाटतेय. संपूर्ण वाचून याबद्दल विचार नक्की करता येईल.
पण विधानसभेत चर्चा न करता हा नवीन कायदा संमत करण्यात आलेला आहे व असे कधी बघितले नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
केंद्र सरकारने ज्याप्रमाणे अनेक कायदे संसदेत एकतर्फी पारित करून घेतलेत. कुणाचेही न ऐकता कायदे पास करण्याची केंद्र सरकारची वाईट सवय राज्य सरकारने सुद्धा वापरणे सुरू केले असल्याचे दिसते.
केंद्र सरकारचा वाईट गुण शिकलेल्या राज्य सरकारचा निषेध.
– अॅड असीम सरोदे
इंग्रजी नव्हे, ग्रेगोरी कॅलेंडर
एक जानेवारीला अनेकांनी ‘इंग्रजी’ नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत, त्यांच्या माहितीसाठी…
आपण सध्या ज्या कॅलेंडरनुसार नववर्ष सुरू झाल्याचं मानतो आहोत, ते इंग्रजांनी नाही, तर ग्रेगोरी (तेरावा) नावाच्या पोपने आणलं, तो इटालियन होता. पृथ्वी सूर्याभोवती फिरायला (म्हणजे वर्षं पूर्ण करायला) स्वतःभोवती किती गिरक्या घेते (म्हणजे दिवस काढते) याचा हिशोब करणारा ख्रिस्तोफर क्लाव्हिएस हा गणितज्ञ जर्मन होता.
आणि हो, यात धर्माचाही संबंध नाही. या सुधारणा आल्या १५८२ साली. तेव्हा इंग्लंड प्रोटेस्टंट झालेलं होतं आणि त्यामुळे रोमने त्या अख्ख्या देशाला धर्मबहिष्कृत केलेलं होतं.
असो, तर ग्रेगोरीयन नववर्षाच्या सर्वांना मनःपूर्वक आणि हार्दिक शुभेच्छा…
– अजित जोशी