लाकडी खेळणी तयार करण्याचा व्यवसाय सुरु करण्याचे ठरवले तेव्हा, सुरवातीला साडेपाच हजार रुपयांचे भागभांडवल टाकले. नंतर त्यामध्ये वाढ होत गेली आणि हा आकडा १० लाख रुपयांपर्यंत जाऊन पोहचला आहे. व्यवसाय सुरु केल्यानंतर एक वेळ अशी आली होती कि पैसे खूप कमी पडत होते, तेव्हा मी माझ्याकडे असणारी कार त्यासाठी एक लाख ६५ हजार रुपयांना विकून व्यवसायासाठी भाग भांडवल उभे केले. तसेच नातेवाइकाकडून काही मदत घेतली, थोडे कर्ज काढले. त्यामधून हा व्यवसाय चांगल्या प्रकारे उभा राहत गेला.
– – –
आपण एखादा व्यवसाय करावा, असं अनेकांना वाटतं. ते सतत त्या वाटेचा शोध घेत असतात. काहींचा शोध सुफळ संपूर्ण होतो, काहींचा होत नाही. काही माणसं मात्र असं काहीच ठरवत नाहीत. अपघातानेच व्यवसायात येतात आणि तो व्यवसाय चक्क यशस्वीही होतो. विश्वास बसत नसेल, तर माझ्याकडे पाहा. मी अजिबात मनी ध्यानी नसताना या व्यवसायाच्या घोड्यावर बसलो आहे आणि तो घोडा आता सुसाट सुटला आहे.
माझे जीडी आर्टचे शिक्षण पूर्ण झाल्याबरोबर लगेच मला चांगल्या पगाराची नोकरी मिळालीr. तिथे पगार पाणी उत्तम होत. सगळे कसे मस्त चालले होते. नोकरदार माणूस. उगाच आपणहून चालती गाडी बंद करून व्यवसायाच्या अनिश्चिततेत कशाला उतरेल? पण तुमच्या नशिबात योग असला की तुम्ही या घोड्यावर बसताच… बसवलेच जाता…
एक दिवस मुलींसाठी लाकडाचा घोडा खरेदी करण्यासाठी बाहेर पडलो… खेळण्यातला लाकडी घोडा. पण मला काही मनासारखा घोडा मिळेना. लाकडाच्या खेळण्यांची सगळी दुकाने पालथी घालून झाली. कुठेच चांगला घोडा मिळेना म्हणून एक दिवस सुटी काढून लाकडी खेळण्यांसाठी प्रसिद्ध असलेली सावंतवाडी गाठली, ती पालथी घातली. पण तिथेही निराशाच पदरी पडली. आपल्या माहितीतला, कधीकाळी ज्याच्यावर खेळलो तो लाकडी घोडा मला हवा होत आणि तो मिळत नसल्यामुळे मी पुरता अस्वस्थ झालो होतो. एका टप्यावर ही शोधमोहीम थांबवली आणि आपणच लाकडाचा घोडा तयार करण्याचा निर्णय घेतला.
सुरुवातीला छंद म्हणून सुरु केलेलं काम कधी व्यवसायात बदललं हे मला समजले नाही आणि अगदी थोड्याच अवधीत नावारूपाला आला ‘वुडन खटोला’ हा माझा लाकडी खेळण्याचा ब्रँड…आज हा लाकडी खेळण्याचा ब्रँड पुण्यापुरता मर्यादित ना राहता अगदी अमेरिका, कॅनडापर्यंत जाऊन पोहोचला आहे. हे यश आनंद देणारे असले तरी त्याने माझ्यावरची जबाबदारी वाढली आहे… लाकडी खेळणी तयार करण्याच्या या उद्योगाचे सगळीकडे कौतुक होत आहे, ते असेच टिकून ठेवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत राहणार आहे…
२००७ साली पुण्यातल्या अभिनव कला महाविद्यालयातून मी जीडी आर्टचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण होताच बंगळुरूच्या एका कंपनीत नोकरी मिळाली… तिथे टूडी अॅनिमेशनचे काम करायचो. कालांतराने त्या क्षेत्रातला स्कोप कमी होत गेला. कोणत्याही शाखेचे लोक अॅनिमेशनच्या क्षेत्रात काम करू लागले. आपण याच ठिकाणी काम करत राहिलो तर आपली प्रगती होणार नाही, हे वेळीच लक्षात आल्यामुळे मी युजर डिझाईनमध्ये काम करायला सुरुवात केली. बंगळुरूच्या कंपनीत काम करत असताना मला नव्या नोकरीची ऑफर आली. ती होती टीसीएस कंपनीची… तिथे मला यूआय डिझाइनमध्ये कामाची संधी मिळाली. २०११ ते २०१७ या काळात तिथे मी नोकरी केली.
२०१७ मध्ये माझ्या मुलीला लाकडाचा घोडा घ्यायचा होता. त्यासाठी शोध सुरू झाला. मला त्या घोड्याचे प्रमाण हे अगदी परफेक्ट हवे होते. तो सगळ्या बाजूंनी दिसायला अगदी एकसारखा हवा होता. असा घोडा कुठे मिळतो का, म्हणून मी जंग जंग पछाडले. त्यासाठी मोठ्या आशेने सावंतवाडीला गेलो. पण तिथे पारंपरिक पद्धतीची खेळणी तयार करण्याचा व्यवसाय लुप्तच झाल्याचे दिसले… एका पॉइंटला मी घोड्याचा शोध घेण्याचे थांबवले आणि आपणच घोडा तयार करण्याचे ठरवले. आपणच ड्रॉईंग तयार करायचे आणि हा घोडा तयार करायचा हे पक्के केले. लाकूड कापण्यासाठी काय वापरतात, ते कसे कापतात, याचे शिक्षण यूट्यूबच्या माध्यमातून मिळवले. लाकूड आणले आणि त्यामधून अडीच फूट उंचीचा एक लाकडी घोडा तयार केला. माझ्या मुलीलाच नाही तर तो सगळ्यांना आवडला… झालं, तिथेच फायनल केलं आपण वेगवेगळी लाकडाची खेळणी तयार करायची….
वुडन खटोलाचा प्रवास…
हळुहळू लाकडी कुत्रा, लाकडी ट्रक, कार अशी खेळणी बनवायची सुरुवात झाली. एकदा लाकडी खेळणी तयार करण्यासाठी उत्तम लाकूड कोणते असते, याचा शोध घेण्यासाठी फिरत होतो. तेव्हा रघुवंशी टिम्बर या दुकानात जाऊन पोहोचलो. तिथे लाकूड पाहत होतो. मालकाने विचारले, तुला कशासाठी लाकूड हवे आहे? त्याला सांगितले की मला खेळणी तयार करायची आहेत. त्याने मला पाच लाकडाच्या फळ्या दिल्या. तू याचे काय बनवणार आहेस, त्याला कोणता रंग देणार आहेस, ते कसे बनवणार आहेस, अशी सगळी माहिती विचारून त्याने मला ते कसे करायचे याबद्दल मार्गदर्शन केले. त्याने दिलेली प्रत्येक टीप माझ्यासाठी लाख मोलाचीच होती. त्या सगळ्या सूचना मी कागदावर टिपून घेतल्या होत्या. प्रत्येक खेळणे तयार करताना मला त्याचा चांगला उपयोग होत गेला.
घरातून विरोध…
घरातील मंडळींना माहिती होते, याला जर एखाद्या गोष्टीचे वेड लागले की तो बाकी सगळे विसरतो आणि त्यामध्ये घुसतो. त्यामुळे हातातली नोकरी सोडायची नाही आणि हा छंद फक्त वेळ घालवण्यासाठी करायचा, त्याचा अतिरेक होऊ द्यायचा नाही, अशी ताकीद मला घरातल्या मंडळींनी दिली होती. मी ती हद्द न ओलांडता सरळपणे काम करत होतो.
एकदा अशीच गम्मत झाली… माझे वडील मला त्यांच्या भोसरीमधील मित्राकडे घेऊन गेले होते. बोलता बोलता विषय व्यवसायावर आला. मी एका क्षणाचा विलंब न करता, त्या काकांना म्हणालो, मी लाकडाची खेळणी तयार करण्याचा व्यवसाय सुरु केला आहे. पण घरातल्या मंडळींच्या दबावामुळे मला तो मुक्तपणे करता येत नाही. त्यानंतर काकांनी वडिलांना समजावले आणि बिझनेस करण्यासाठी मला फ्री हॅन्ड देण्याचा सल्ला दिला… झाले.. तिथून माझी गाडी सुटली.. लाकडाची खेळणी तयार करण्याचे काम सुरु झाले होते. या कामात स्वारस्य असणारा पार्थ नावाचा एक सहकारी मला मिळाला होता. त्याच्या जोडीने खेळणी तयार करायला सुरुवात झाली होती. लाकडाचे खेळणे तयार केले की ते मित्रमंडळीना दाखवायचे, त्यात काही कमी आहे का, याची विचारणा करायची. त्यांनी दिलेल्या सजेशननुसार त्यात सुधारणा करायची. मार्केटमध्ये काय हवे आहे, त्याचा अभ्यास करून खेळणी तयार करायची, अशी वेगवेगळ्या ३० ते ४० प्रकारची खेळणी तयार केली. सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे खेळणी तयार करताना त्यामध्ये कुठेही स्क्रू, खिळा याचा वापर करत नाही तर छोट्या लाकडी काठ्यांचा वापर करतो. त्यामुळे ही खेळणी मुलांसाठी अधिक सुरक्षित बनतात.
१० लाख रुपयांची गुंतवणूक
व्यवसाय सुरु करण्याचे ठरवले तेव्हा, सुरवातीला साडेपाच हजार रुपयांचे भागभांडवल टाकले. नंतर त्यात वाढ होत गेली आणि हा आकडा १० लाख रुपयांपर्यंत जाऊन पोहचला आहे. व्यवसाय सुरु केल्यानंतर एक वेळ अशी आली होती की पैसे खूप कमी पडत होत. तेव्हा माझी कार एक लाख ६५ हजार रुपयांना विकून व्यवसायासाठी भागभांडवल उभे केले. तसेच नातेवाईकांकडून काही मदत घेतली, थोडे कर्ज काढले. त्यातून हा व्यवसाय चांगल्या प्रकारे उभा राहत गेला.
लाकडी खेळण्याच्या प्रेमात अनेकजण लाकडी खेळणी तयार करण्याचा उद्योग सुरु केल्यानंतर त्याची माहिती सर्वत्र पसरत गेली. काही दिवसांपूर्वी कॅनडात राहणार्या एका व्यक्तीने माझ्याशी संपर्क साधला आणि माझ्याकडे काही डिझाइनची खेळणी आहेत, ती लाकडात बनवून दे, अशी फर्माईश केली आहे, येत्या महिन्यात ते भारतात येणार आहेत. इथे आल्यावर त्याचा पहिला कार्यक्रम हा माझी भेट घेऊन ती खेळणी तयार करून घेणे हा आहे.
काही दिवसांपूर्वी विशाखापट्टणम इथे राहणार्या लष्करातील एका अधिकार्याला मुलासाठी लाकडी घोडा तयार करून हवा होता. त्यांनी माझ्याशी संपर्क साधला, मी त्यांना तो घोडा तयार करून दिला, त्याची किंमत झाली होती ४००० रुपये. ते गृहस्थ मला म्हणाले तो घोडा मला कुरियरने पाठवून द्या. त्याला किती खर्च येतो, याची चौकशी मी केली, तेव्हा तो येत होता ३८०० रुपये. त्यांना मी तो कळवला. तेव्हा मला असे वाटले होते की कुरियरचा खर्च घोड्याच्या किंमतीएवढाच असल्याने ते नाराज होतील. पण त्यांनी कोणतीही कटकट केली नाही.
चीनमध्ये ज्या प्रकारची खेळणी तयार करण्यात येतात, तशा प्रकारची खेळणी आपल्याला लाकडामध्ये करून द्या, अशी मागणी मला ओरिसामधल्या एका व्यक्तीने केली होती, ती खेळणी मी त्याला बनवून दिली. एक मनोचिकित्सक काही दिवसांपूर्वी भेटायला आले होत्. त्यांना देखील त्याच्या मागणीनुसार लाकडाची खेळणी तयार करून दिली. एका शाळेसाठी देखील अनोख्या प्रकारची लाकडी खेळणी तयार करण्याचं काम जोरात सुरु आहे.
लॉकडाऊनचा असाही फटका
कोरोना येण्याचा आधीचा हा किस्सा आहे. दिल्लीमध्ये इव्हेंट मॅनॅजमेन्टचे काम करणार्या एका कंपनीला लाकडाचे जेसीबी आणि ट्रॅक्टर तयार करून हवे होते. त्यांची संख्या होती, प्रत्येकी एक हजार इतकी… मी एक लाकडाचे मॉडेल तयार करून त्यांना पाठवले होते, त्यावर ते बेहद खूष झाले होते. पण लगेचच लॉकडाऊन लागला आणि सगळे बंद झाले, त्यामुळे ते काम हातातून गेले.
मागणी चांगली पण जोखीमही तेवढीच लाकडी खेळण्यांना सध्या चांगली मागणी आहे. अन्य खेळांच्या तुलनेत या खेळण्याची किंमत थोडी जास्त आहे. पण भारतीय बनावटीची ही खेळणी खरेदी करण्याचा कल दिवसागणिक वाढत चाललेला दिसत आहे. खेळणी तयार करण्यासाठी भरपूर कष्ट करावे लागतात. एक उदाहरण सांगतो, लाकडाचे बदक तयार केले आणि त्याला रंगवताना त्याच्या डोळ्याजवळची लाईन सरकली तर ते खेळणे स्क्रॅप करावे लागते. एखाद्या खेळण्याचा कुठे तुकडा उडाला, तरी ते टाकून द्यावे लागते. त्यामुळे काम करत असताना खूप बारीक लक्ष द्यावे लागते.
आपण कधीतरी लाकडाची खेळणी तयार करण्याचा व्यवसाय करू, असा विचार कधी माझ्या मनात देखील आला नव्हता. आणि आता मी काही दिवसांपूर्वी ५०० स्क्वेअर फुटाच्या जागेत एक दुकान सुरु केलंय. तिथे नव्या खेळण्याचं संशोधन सुरु असते, तिथे खेळणी देखील बनवतो. भविष्यात हा व्यवसाय वाढवायचा आहे, परदेशात अधिकाधिक खेळणी कशी पोहचतील, यासाठी प्रयत्न करायचे आहेत. नव्या डिझाइनची खेळणी तयार करायचे ध्येय ठेवलेले आहे, बघू या आता हा घोडा कुठवर दौडवत नेतो ते…