कालच माझा मानलेला परममित्र पोक्या दोन महिन्यांच्या विवाहपूर्व विदेश टूरवरून भावी पत्नीसह परत आला. आल्या आल्या त्याला मुंबईत भाजपच्या चाललेल्या धांगडधिंग्याची खबर मिळाली होतीच. माझ्या आणि त्याच्या आवडत्या व्हिस्कीचे विदेशी ब्रॅण्ड घेऊन तो घरी आला, तेव्हा मी म्हणालो, पोक्या, हे सगळे रात्री करूया. त्याआधी पाकळीला कामाला लाव. जेलमध्ये टाकलेल्या त्या तोंडाळ आणि खोटारड्या नवनीत राणाला भेटायला सांग. तिची मुलाखत घ्यायला सांग. डिलीट सोमय्याकडून आलेय म्हणून सांग म्हणजे तिच्याशी घडघड बोलेल. सोबत तिच्यासाठी चहा, नाश्ता, पाणी आणि पंजाबी डिशेस घेऊन जायला सांग. बिचारी उपाशी होती आठ दिवस. त्यात नवरा दुसर्या जेलमध्ये. रडून रडून डोळ्यांच्या खाचा झाल्यात तिच्या. गाल बसले असे म्हणतात. चेहर्याची रयाच गेलीय तिच्या. तेलुगू पिक्चरमधील तिची भूमिका पाहिलीय मी. काय नाचलीय ती. मॉडेलिंगमध्ये तर अमृतालाही मागे टाकील. तिचे हे हाल बघवत नाहीत. म्हणूनच सांगतो, पाकळीला तिची विचारपूस करायला सांग. कारण मुंबईत तिचे भाजपशिवाय कोणीच नातेवाईक नाहीत…
पोक्याने ताबडतोब पाकळीशी कॉन्टॅक्ट करून तिला माझा निरोप दिला. तिने भावी पतीची आज्ञा प्रमाण मानून तडक जेलमध्ये धाव घेतली. तिथे किरीटचे नाव सांगून आत प्रवेश मिळवला. त्या ऐतिहासिक भेटीचे पोक्याच्या भावी पत्नीने घरी परत आल्यानंतर केलेले वर्णन ऐकून आमची दोघांची खूप करमणूक झाली. ती म्हणाली, जेलरने मला बराकीत नेले तेव्हा नवनीत खिचडीचे बकाणे मारत होती. मी माझी ओळख करून दिली आणि किरीटजींकडून आल्याचे सांगितले. त्यावर तिने किरीटजींच्या गालाची जखम आता कशी आहे याची विचारणा केली. मी तिला सांगितले की तशीच आवश्यकता लागली तर त्या गंभीर जखमेवर शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना अमेरिकेतील हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात येईल. नवनीतचा कंठ दाटून आला. म्हणाली, केवळ मला भेटण्यासाठी बिचारे किरीटजी त्यांच्या नाजूक गालावर एवढी मोठी जखम होऊनसुद्धा खार पोलीस स्टेशनमध्ये धोका पत्करून आले हे माझे केवढे भाग्य. नशीब थोडक्यात बचावले. दुर्दैवाने त्यांचे थोबाड फुटले असते तर मी माझे थोबाड कुणाला दाखवणार होते? पण ते तर तुम्हाला पोलीस स्टेशनात न भेटताच गेले असे म्हणतात.
– तसंच काही नाही. एक तर त्यांचा गाल गंभीर जखमी झालेला. तशा अवस्थेत त्यांनी मला भेटणं योग्य नव्हतं. शेवटी शेलारमामांनी म्हणे त्यांना गाडीत कोंबले आणि गाडी निघाली. मग मी त्यांच्या गालावर हल्ला करणार्यांना माझ्या स्टाईलने माझा स्टॉक संपेपर्यंत जोरदार आवाजात शिव्या दिल्या. झोपलेले कैदीसुद्धा जागे झाले.
– फारच मोठा पराक्रम केलात की हो तुम्ही. बरं, मला सांगा. ही हनुमान चालीसा वाचण्याची प्रेरणा तुम्हाला कशी काय मिळाली?
– मी धर्माने शीख असले तरी मुंबईची कन्या आणि विदर्भाची सून आहे. माझे मूळ राज्य पंजाब असले तरी मी सिनेमे केले तेलुगू. कारण तिथेच माझ्या अभिनयाच्या अंगाला वाव मिळाला. खरे तर मी हॉलीवुडमध्ये टॉपची नटी हवी होते. मला तशा ऑफरही होत्या. पण माझ्या देशावर माझे इतके प्रेम आहे की हा देश मला सोडवत नव्हता. या देशाची संस्कृती आणि त्यातही हिंदू संस्कृतीवर माझी तुमच्यापेक्षा जास्त श्रद्धा आहे. माझ्या ‘हनुमान चालिसा’ पठणाचे मूळ त्यात आहे. हनुमान ही रामायणातील माझी सर्वात आवडती व्यक्तिरेखा आहे. त्याच्या हृदयात श्रीराम होते तर माझ्या हृदयात आता नरेंद्रजी मोदी, फडणवीसजी आणि किरीटजी आहेत. त्यांच्यासाठी मी काय वाटेल ते करीन.
– बापरे!
– पण हनुमान कधी कुणाला अपशब्द बोलत नव्हता. तुम्ही तर त्या दिवशी मुंबई पोलिसांवर, मुख्यमंत्र्यांवर, शिवसैनिकांवर आगपाखड करण्यासाठी घाणेरडी आणि असभ्य भाषा वापरलीत. तुम्हाला ही हंगामा करण्याची सुपारी कोणी दिली?
– हे बघा, तुम्ही वाट्टेल ते आरोप करत आहात. मी काय सुपारी घेणारी बाई वाटली काय? मी खासदार आहे. तीही अपक्ष.
– पण तेव्हा तुम्ही भाजप आणि मोदींबद्दल काय वाट्टेल ते बोलत होता. २०१७मध्ये मोदींबद्दल तुम्ही म्हणाला होता… मोदी असा करनार हाय… मोदी तसा करणार हाय… मोदीच्या सभामदी एवढे लोकं हायत… लोकं फक्त दाखवले. काम पण दाखवा ना. जेव्हा आमच्या महाराष्ट्रात आदरणीय पवारसायबांबद्दल बोललात, बच्चा बच्चा है और बाप बाप ही है. तेव्हा तुम्ही मोदींची तुलना बच्चे लोकांबरोबर केली आणि पवारांना बापमाणूस म्हटले होते. आता मोदी काय, हनुमान काय… तुमचे डोके ठिकाणावर आहे ना? आताच तुम्हाला भाजपचा, त्यांच्या माणसांचा आणि मोदींचा पुळका कशासाठी आला? की या भाजपवाल्यांनी महाराष्ट्रातल्या सत्ताधार्यांच्या अंगावर भुंकण्यासाठी तुम्हाला मुंबईत पाठवलेय. कशाही प्रकारे सरकारला, शिवसेनेला आणि मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी सरकार पाडण्याच्या षडयंत्राचा भाग म्हणून पाठवलंय? शिवसैनिकांना भडकवण्यासाठी, चिथावणी देण्यासाठी तुमचा वापर करून घेत आहेत ते. आणि हे न समजण्याइतकी महाराष्ट्रातली जनता काही खुळी नाही. तुमचा खोटारडेपणा तिने पाहिला आहे. पोलीस स्टेशनात मला पाणी दिले नाही, प्रसाधनगृहात जाऊ दिले नाही असे आरोप पोलिसांवर व्ाâरताना तुम्हाला काहीच कसे वाटले नाही हो? तुमच्या अशा खोट्या बोलण्याने आम्हा स्त्रियांना काय वाटले असेल! नको त्या लोकांच्या नादाला लागून काय मिळणार आहे तुम्हाला?
– काय मिळणार आहे ते कळेलच तुम्हाला.
– ते सर्वांनाच माहीत आहे. येत्या निवडणुकीत भाजपची खासदारकीची उमेदवारी मिळेल म्हणून खुशीत गाजरं खात असाल तुम्ही. पण हे भाजपवाले स्वार्थासाठी वापर करून घेतील आणि नंतर वार्यावर सोडून देतील. कारण तो त्यांचा स्वभाव आहे. त्यात आता तुमच्या खोटेपणामुळे तुमचे पाय अधिकाधिक गाळात रुतत जातील आणि त्यातून बाहेर पडणे मुश्कील होईल. तेव्हा ‘मोदी चालीसा’ म्हणूनही काही उपयोग होणार नाही. निघते मी. बसा आता भजन करत. किरीटजी बसलेत नवनीत चालीसा म्हणत…