□ बोरिवलीतील महिलेला भुताची भीती दाखवून साडेआठ लाखाचे दागिने भोंदूबाबाने लांबवले
■ भुताला महिलेची भीती दाखवली असती तर?
□ उत्तर प्रदेशाचे पोलीस भित्रे आहेत. ते तुमची सुरक्षा करतील या भरवशावर राहू नका. स्वत:ची सुरक्षा करायची असल्यास घरात कोल्ड्रिंक्सच्या बाटल्या आणि धनुष्यबाणही ठेवा- भाजपचे खासदार साक्षी महाराज यांचे वादग्रस्त वक्तव्य.
■ कोल्ड्रिंकचा एक घोट घ्या, मग बाण लावा, प्रत्यंचा खेचा, तोवर समोरचा गोळी घालून जाईल किंवा मुंडी छाटून जाईल… तुमच्या राज्यात पोलीस भित्रे असतील तर पायउतार व्हा की सत्तेवरून.
□ लतादीदींच्या सुरांनी देशाला एका सूत्रात बांधले : पंतप्रधान नरेंद्र मोदी
■ बरोब्बर! आता तुम्ही ते एकतेचं सूत्र तोडून देशाचे तुकडे करू नका.
□ तब्बल १४३ वस्तूंवर `जीएसटी’ वाढ शक्य! गूळ, पापडावर पाच टक्के कर लावणार?
■ हवेवर लावा जीएसटी, तेवढीच राहिली आहे आता फुकट.
□ हनुमान चालिसा म्हणणे हा सेनेच्या राज्यात राजद्रोह : चंद्रकांत पाटील यांची टीका
■ किती खोटे बोलाल? मुख्यमंत्र्यांच्या घरासमोरच तो म्हणणार, हा हट्ट कशाला? इतकी भक्ती ऊतू चालली आहे तर घरात म्हणा की आपापल्या.
□ राज्यात बेबंदशाही; सत्तेत असणार्यांचा धिंगाणा : नारायण राणे
■ ईडीच्या भयाने काय अवस्था करून घेतात लोक स्वत:ची.
□ मला ठार मारण्याचा कट- किरीट सोमय्या
■ टोमॅटो सॉसमध्ये बुडवून की काय?
□ `संस्कृतीच्या धाग्याने देश एकसंघ’- अमित शहा
■ एवढं कळतं तर तो उसवण्याचे धंदे कशाला करत आहात?
□ नागराज मंजुळे म्हणाले, प्रेम करणे हाच विद्रोह…
■ सगळे हिंदी सिनेमे विद्रोहीच म्हणायला हवेत मग.
□ लालूंच्या मोठ्या मुलाने उगारला नेत्यांवर हात, तेजप्रताप पुन्हा चर्चेत
■ चर्चेत राहावं, पण अशा कारणांसाठी?
□ नवनीत राणा यांची पोलिसांना धक्काबुक्की, राणा दाम्पत्याविरोधात आणखी एक गुन्हा
■ आधी बुडत्याचा पाय खोलात, तिथे कमळाचे देठही वाचवू शकत नाहीत आणि पाकळ्यांचाही काही उपयोग नाही.
□ राणा दाम्पत्याला कोर्टाने फटकारले; लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने वागावे दुसर्याच्या घरात किंवा सार्वजनिक ठिकाणी श्लोकांचे पठण हा व्यक्तिस्वातंत्र्याचा भंग
■ इतकं कळलं असतं तर भाजपच्या नादी लागले असते का?
□ बुलढाणा तालुक्यात मलकापूर पांग्रा येथे डीजे तालावर नाचत बसला नवरा, तिने निवडला `दुसरा’
■ त्याला कळलंय का पण? नाहीतर तो अजून नाचतच असायचा…
□ कारागृहांचा गुदमरतोय श्वास, कुठे क्षमतेपेक्षा दुप्पट, कुठे चौपट वैâदी, जेल प्रशासनावर ताण
■ तुरुंग आहे, कैदी आहेत, म्हणून इतका श्वास कोंडायचा?
□ धार्मिक भावनांचे प्रदर्शन बाहेर कशाला? त्या घरातच ठेवा- शरद पवार
■ मग यांची दुकानं कशी चालतील पवारसाहेब? फक्त तेवढाच माल आहे यांच्या दुकानात.
□ नेत्यांनो आता महागाईवर बोला : रेल्वे प्रवाशांमध्ये चर्चा
■ त्यावर बोलायचं नाही, म्हणून तर भोंगा, नकाब, हिजाबचा चालिसा वाचतात ना ते!
□ `मी पुन्हा येईन’ची घोषणा प्रत्यक्षात न आल्याची अस्वस्थता : शरद पवार यांचा फडणवीस यांना टोला
■ तरी ‘मी’पणा जात नाहीच.
□ भोंगेप्रकरणी आठवले यांची भाजपविरोधी भूमिका
■ त्यांना अचानक काहीतरी आठवले असणार…
□ आम्ही हिंदुत्व सोडून दिले म्हणता हिंदुत्व म्हणजे धोतर नाही, घालावे आणि सोडावे. बाबरी पाडली त्यावेळी बिळात लपून होतात, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भाजपवर प्रतिहल्ला
■ आताही बिळात लपून आयात उंदीर नाचवतायत वाघासमोर.