इंग्लिश भाषाव्यवहारात ‘बॉइलिंग फ्रॉग सिंड्रोम’ अशी एक कल्पना फार प्रसिद्ध आहे. हे एक रूपक आहे. एखाद्या बेडकाला गरम पाण्याच्या भांड्यात टाकले तर तो तात्काळ चटका बसून त्या भांड्यातून उडी घेतो आणि सुरक्षित जागेकडे पलायन करतो. मात्र, त्या बेडकाला पाण्याच्या भांड्यात बसवून अगदी मंदगतीने त्या भांड्याचे तापमान वाढवत नेले तर ते बेडकाच्या लक्षात येत नाही. तो किरकोळ तापमान बदल समजून भांड्यात बसून राहतो आणि आपले शरीर या बदलांना सरावत जाईल, अशा कल्पनेत मश्गुल राहतो. कालांतराने हा बेडूक जिवंतपणी त्या भांड्यात उकडून निघतो, पण वेळेत उडी मारून बाहेर पडण्याचा विचार काही त्याच्या मनात येत नाही. कारण, परिस्थिती झपाट्याने बदलत नसते, हळुवारपणे बदलत असते, हेच न्यू नॉर्मल, हीच नवी सहजस्थिती असे मानत राहिल्याने तो अखेर जीव गमावतो. हा सिद्धांत प्रयोगसिद्ध आहे की नाही, याबद्दल वाद आहेत. १९व्या शतकात पाणी अगदी मंदगतीने तापवल्यानंतर बेडूक बसून राहिल्याचे आढळून आले होते. मात्र, २०व्या शतकात हे फक्त रूपक आहे, असे मानले जाऊ लागले आहे, पण ते तरीही महत्त्वाचे आहेच.
‘मार्मिक’च्या या अंकाच्या मुखपृष्ठामध्ये हाच संदर्भ घेतलेला आहे. मात्र, तिथे बेडकालाही पाणी तापते आहे हे कळून तो बाहेर उडी घेतो आहे आणि माणूस मात्र मोबाइलमग्न आहे… हा भारतीय माणूस आहे. त्याच्या आसपास काय घडते आहे किंवा पद्धतशीरपणे पटकथा लिहून घडवले जाते आहे, ते त्याच्यापर्यंत पोहोचते आहे. मोबाइल किंवा न्यूज चॅनेल आणि टीव्ही कार्यक्रमांच्या, आयपीएलच्या क्रिकेट सर्कशीच्या जाळ्यात तो पुरता गुरफटला आहे. त्यात आपल्या बुडाखाली नेमके काय जळते आहे, याचे त्याला भान राहिलेले नाही.
देशात १२२ वर्षांतली उच्चांकी उष्णतेची लाट आलेली आहे. संपूर्ण भारतीय उपखंडच कमालीचा तापला आहे. ज्या भागांमध्ये ३० अंशाच्या वर पारा चढला तर केवढा हा उकाडा, असे वाटत होते, त्या भागांमध्ये आज सकाळी सात वाजता पारा ४० अंश सेल्सियसचा पल्ला पार करून पुढे जायला लागला आहे. भारतभरातले, खासकरून, दिल्ली-पंजाब-हरयाणातले लोक उन्हाळ्याच्या सुटीत हिमाचल प्रदेशात जातात. तिथल्या थंड हवेत मौजमस्ती करून उन्हाळा सुसह्य करतात. या वर्षी उन्हाचा तडाखा बसलेल्या देशातल्या १५ प्रमुख राज्यांमध्ये हिमाचल प्रदेशाचा समावेश आहे. स्कॉट डंकन या स्कॉटिश हवामानतज्ज्ञाने भारत आणि पाकिस्तानात याहून तीव्र उन्हाळा जाणवेल आणि त्याचे भयकारी परिणाम होतील, असा इशारा दिला आहे.
यंदा जरा जास्तच उकडते आहे, असे सगळ्यांनाच दरवर्षीच वाटते. यावेळी मात्र ही निव्वळ भावना नाही, सगळीकडची आकडेवारी भेसूर चित्र उभे करते आहे आणि देशात अनेक भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. ही परिस्थिती येण्याची तात्कालिक कारणे आहेतच; पश्चिमेकडून येणार्या वार्यांमुळे देशाच्या काही भागात उन्हाळा सुसह्य होतो, अवकाळी पावसाचा शिडकावा होतो, तो दिलासा यावेळी मिळालेला नाही, हे उष्णतेच्या लाटेमागचे एक तात्कालिक कारण आहे. मात्र, ही आपदा हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ यांच्याशी संबंधित आहे, हे आता नाकारता येणार नाही. देशाचे वेगाने होत असलेले शहरीकरण, त्यात डांबर आणि काँक्रीटचा वापर आणि कार्बन उत्सर्जनाची मानके धुडकावून सुरू असलेला अथक ‘विकास’ यांची ही फळे आहेत. याचा पुरावा गेल्या दोन वर्षांनी दिला आहे. कोरोनाकाळात लागू असलेल्या निर्बंधांमुळे अनेक व्यवसाय-उद्योग, विकासकामे बंद होती, वाहनांचे, प्रदूषणाचे प्रमाण कमी होते. त्या काळातला उन्हाळा एवढ्या तीव्रतेचा नव्हता. कोरोनाकाळ संपताच आपण मूळपदावर आलो आहोत आणि उष्णतेची तीव्रता आपल्याच बेजबाबदारपणामधून वाढवतो आहोत. विकसित देशांनी एवढे कर्बउत्सर्जन केले, आता त्यांनी स्वनियंत्रण करावे, कार्बन फुटप्रिंट कमी करावा, आम्ही मात्र अजून विकसनशीलच आहोत, आम्ही कर्बउत्सर्जनाला आळा घालणार नाही, ही राणा भीमदेवी छापाची उथळ गर्जना सभेत टाळ्या मिळवू शकते. पण तुम्ही निर्बंध घातले नाहीत, नियम पाळले नाहीत, कर्बउत्सर्जनाला आळा घातला नाही, तर तुमच्याच भूभागावर उष्णतेच्या लाटा येणार आहेत, त्या अमेरिकेत, युरोपात किंवा प्रगत देशांमध्ये येणार नाहीत, हे विसरून चालणार नाही.
पण खरा प्रश्न वेगळाच आहे. ज्यांच्यातून आपल्याला तथाकथित माहिती किंवा ज्ञान मिळते, अशा कोणत्याही माध्यमातून उष्णतेच्या लाटेबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न होताना दिसतो आहे का? सगळ्या माध्यमांमध्ये कशाची चर्चा आहे? विद्वेषाच्या आगीची होरपळ अधिकाधिक वाढवण्याचे प्रयत्न भोंदुत्ववादी ‘बाटगा फोर्स’चे काही भोंगे करत आहेत आणि त्या आगीत माध्यमे तेल ओतताना दिसत आहेत. देशापुढचे, जगापुढचे खरे प्रश्न कोणते आहेत, याचे भानच नष्ट करण्याची ही पद्धतशीर नेपथ्यरचना आहे.
अशावेळी ‘स्टॉकहोम सिंड्रोम’ हा प्रसिद्ध सिंड्रोम आठवतो. एखाद्या ठिकाणी दहशतवादी आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी सर्वसामान्यांना ओलीस ठेवतात, तेव्हा अपहृतांना दहशतवाद्यांविषयी, त्यांच्या तथाकथित ‘कार्या’विषयी सहानुभूती वाटू लागते, ते किती चांगले आहेत, असे ओलीसांनाच वाटू लागते. आपण आपला मेंदू अशा देशविघातक शक्तींकडे ओलीस ठेवला असेल तर आपल्यापेक्षा वेळेत उडी मारून बाहेर पडणारा बेडूक परवडला असे म्हणण्याची पाळी येईल.