□ राजकारणाला कंटाळलोय!- नितीन गडकरी यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण.
■ हे वाक्य ‘ते दोघे’ उच्चारतील, तर गडकरी साहेबांचा कंटाळा पळून जाईल कुठल्या कुठे!
□ देशाला काँग्रेसची गरज आहे, तसेच पंडित नेहरूंवर मी टीका करू शकत नाही – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह.
■ चला, तुमच्यात एकाला तरी थोडं भान आहे तर.
□ न्यूज चॅनल्सना जबाबदारीचे भान नाही- सरन्यायाधीश रमणा यांचे परखड मत.
■ त्यांच्यावर काही जबाबदारी आहे, असं ते सोडून बाकीच्यांनाच वाटतं, हा प्रॉब्लेम आहे.
□ राज्यपालनियुक्त बारा आमदारांसाठी बाराशे जणांचे बायोडाटा माझ्याकडे आले आहेत. त्यामुळे आमदारकीसाठी आग्रह धरू नका. सर्वांसाठी मंत्र्यांच्या सीट नाहीत – देवेंद्र फडणवीस.
■ चला, झुंबड करू नका, खाली उतरा… गाडी फुल्ल झाली, टिंग टिंग!
□ मुंबई कोणाच्या बापाची नाही – देवेंद्र फडणवीस.
■ जो बाप सख्ख्या मुलापासून पळवू पाहताय, त्याची निश्चितच आहे… तो सगळ्या मुंबईकरांसाठी पित्यासमान होता… निवडणुकीत कळेल तुम्हाला.
□ देशहितासाठी पक्षीय राजकारण बाजूला ठेवा – मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे लोकप्रतिनिधींना आवाहन.
■ अरे, यांना बोलता येतं? फारच लवकर कळलं!
□ सर्व कैद्यांना खाट, गादी, उशी देता येणे शक्य नाही!- माजी आमदार रमेश कदमांचा अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला.
■ मग एक हॉटेल रूम बुक करण्याची परवानगी तरी द्या जज्जसाहेब!
□ सब का प्रयास, सब का कर्तव्य!- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा पहिला संदेश. राष्ट्रपतीपदाची सूत्रे स्वीकारली.
■ या संदेशाच्यापुढे ‘सिर्फ दो का विकास’ अशी एक ओळ न उच्चारताच ऐकू येते, ती का?
□ राज्यपालपदासाठी शंभर कोटींचे प्रलोभन. आंतरराज्य रॅकेटचा पर्दाफाश; चौघे अटकेत, राज्यातील एकाचा समावेश.
■ लोकांची राज्यपाल होण्यासाठी १०० कोटी रुपये देण्याची तयारी आहे हे सध्याच्या राज्यपालांचं चारित्र्यहननच आहे.
□ सत्याचा आवाज क्षीण होत असला तरी सातत्याने येतच राहातो- ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे.
■ बहिर्यांपुढे तोही हतबल ठरतो सासणे साहेब!
□ ‘हर घर तिरंगा’साठी जम्मू-कश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात प्रत्येक विद्यार्थ्याकडून २० रुपयांची मागणी.
■ हर घर तिरंगा, हर नगर पीएम केअर फंड!
□ हे सरकार सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेले नाही- अजित पवार
■ नुसतीच ढवळ्या पवळ्याची जोडी आहे हो, सरकार आहे कुठे?
□ उत्तर प्रदेशात सरकारकडून मोठ्या माशांना वाचवण्याचा प्रयत्न- मायावती.
■ यांच्या तोंडात जीभ आहे, याची आठवण यांना बर्याच दिवसांनी आलेली दिसते.
□ आरे बचाव आंदोलन चिरडण्याची तयारी.
■ डबल बुलडोझर सरकारकडून वेगळे काय अपेक्षिणार?
□ वडील आणि पक्ष चोरायला निघाले; तुम्ही मर्द नव्हे, तर दरोडेखोर! – उद्धव ठाकरे यांचा गद्दारांवर हल्लाबोल.
■ असले भुरटे दरोडेखोर गावकर्यांच्या तावडीत सापडले की काय होतं ते निवडणुकीत कळेल त्यांना.
□ पाकिस्तानला भिकेचे डोहाळे; राष्ट्रीय संपत्ती विकायला काढली!
■ त्यांच्याकडे पाहून आपण हसावे अशी आपली परिस्थिती आहे का?
□ राज्यात दलित, आदिवासींची १२०० कोटींची विकासकामे ठप्प- शिंदे-फडणवीस सरकारच्या ‘स्थगिती धोरणा’चा परिणाम.
■ महाविकास आघाडीचं तेल बिचार्या दलित-आदिवासींवर का काढता?
□ मनावर दगड ठेवून शिंदेंना मुख्यमंत्री केले- चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचे पडसाद.
■ आता त्या दगडावर डोकं आपटून घ्या!
□ अग्निवीर योजनेमुळे तरुणांचे भवितव्य धोक्यात- राहुल गांधी.
■ ते धोक्यात आले तरच यांना राजकीय पोळ्या भाजण्यासाठी पेटवापेटवी करायला रिकामे हात मिळतील ना!
□ नाटक हेच अभिनेत्याचे माध्यम, चित्रपट नव्हे- डॉ. मोहन आगाशे.
■ चित्रपट हे दिग्दर्शकाचेच माध्यम आहे, पडद्यावरची प्रतिमा मोठी दिसते म्हणून नटांचे स्तोम माजते.
□ राष्ट्रध्वज संध्याकाळीही फडकवता येणार – अमित शहा.
■ तिरंग्याला राष्ट्रध्वजच न मानणारे कुठवर आले पाहा!
□ भारताइतकी स्वतंत्र न्याययंत्रणा कुठेही नाही- केंद्रीय कायदा खात्याचे मंत्री किरण रिजिजू यांचे मत.
■ तुमच्या सोयीचे निर्णय देताच कसलं ना कसलं घबाड पदरात पडलेल्या माजी न्यायमूर्तींकडे पाहिल्यावर ते लक्षात येतंच.
□ स्वा. सावरकरांची दहशत वाढली पाहिजे- अभिनेते शरद पोंक्षे.
■ महापुरुषांची विटंबना त्यांच्या विरोधकांपेक्षा त्यांचे समर्थकच अधिक करतात, हे काही खोटे नाही.
□ दु:ख झाले; पण पचवावे लागेल! – मुख्यमंत्रीपदाबाबत चंद्रकांत दादा पाटील यांचे वक्तव्य.
■ आवरा दादा, आवरा! लोकांना वाटायचं या पदासाठी तुमचाच विचार चालला होता!