माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या लय हुश्शार. त्याला भविष्याची अचूक चाहूल लागते. राज्यात मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्या नेत्यांच्या मुलाखती घेण्यास सांगितल्यावर त्याची टेप आजच त्याने मला पेनड्राइव्हमधून घरी आणून दिली. मोठ्या नेत्यांबरोबर चिल्लर नेत्यांनाही मुख्यमंत्रीपदाची स्वप्नं पडत असतात, हे त्या मुलाखती ऐकून कळलं. त्या तुमच्या करमणुकीसाठी साग्रसंगीत सादर करत आहे.
– फडणवीस साहेब, तुम्हाला पुन्हा मुख्यमंत्री व्हावंसं का वाटतं?
– माझ्यापेक्षा माझ्या प्रिय पत्नीला मी मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं. त्याची कारणं अनेक आहेत. माझ्या गळ्यात उपमुख्यमंत्रीपदाचं लोढणं सीएमसकट आल्यामुळे त्या भाराने मी दिवसेंदिवस वाकत चाललो आहे असं तिला वाटतं. मोदी-शहांनी माझा केलेला हा अपमान तिच्या जिव्हारी लागला आहे. त्याचा परिणाम तिच्या गाण्यावर झाल्यामुळे तिने आता गाणंसुद्धा सोडलंय. त्यामुळे संगीत क्षेत्रावर किती वाईट परिणाम झालाय हे तुम्ही जाणताच. जोपर्यंत मी मुख्यमंत्री होत नाही, तोपर्यंत तिच्या जिवाला सुख लाभणार नाही. म्हणूनच खरं तर मला पुन्हा मुख्यमंत्री व्हायचंय. माझी ही इच्छा म्हणजे काळ्या दाढीवरील पांढरा केस आहे.
– पाटीलसाहेब, विस्मृतीतून बाहेर आलात का?
– कधीच आलो. सध्या मुख्यमंत्रीपदाची रेस आहे ना, मग आमचं घोडं पुढे दामटलंच पाहिजे. माझी तर वयात आल्यापासून मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती. काय तो रूबाब, पुढे मागे किती गाड्या, किती बॉडीगार्ड्स, किती मोटारसायकली, किती सायरन. कोल्हापूरचा पहिला मुख्यमंत्री हा सन्मान मला मिळवायचाय. मी मुख्यमंत्री झालो तर सर्व कोल्हापूरकरांना आठवड्यातून तीनदा तांबड्या आणि पांढर्या रश्श्यासह झणझणीत चमचमीत मटण घरोघरी मोफत पाठविण्याची व्यवस्था करीन. माझी पक्षातली एकंदर धडपड पाहून पक्षश्रेष्ठी माझीच निवड करतील असा सार्थ विश्वास मला आहे. मग पाटील नावाचा डंका महाराष्ट्रभर गाजेल. गुड नाईट. स्वीट हॉट ड्रीम.
– नमस्कार बावनकुळे साहेब. तुमचंही नाव ऐकलं सीएमच्या रेसमध्ये.
– अहो, आम्ही असणारच. सगळ्या पक्षाच्या जणू मुखपत्राची धुरा आमच्या मुखात आहे ना. मग लोकांची इच्छा असणारच मी मुख्यमंत्री व्हावं म्हणून… म्हणूनच आमच्या कुळाचा उद्धार करणार्या मुनगंटीवारांनाही कळून चुकलंय. त्यामुळे ते आता या शर्यतीतून माघार घेण्याच्या बेतात आहेत. त्यामुळे माझा आत्मविश्वास डबल झालाय. बघाच मी कसा डबल गेम करतो ते.
– तावडे साहेब नमस्कार. तुमचा तो येत्या निवडणुकीतील भाजपच्या पिछेहाटीचा गोपनीय अहवाल फुटल्याचं ऐकून वाईट वाटलं.
– अहवाल वगैरे फुटला नाही. आमच्या विरोधकांची ती चाल आहे. माझ्या अहवालाप्रमाणे राज्यात भाजपची निर्विवाद सत्ता येईल आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्यावेळी माझी मुख्यमंत्रीपदासाठी निवड होईल. तुम्ही मात्र माझी पब्लिसिटी व्यवस्थित करा. बाकी आपण फोनवर बोलूच. अच्छा. या तुम्ही.
– अहो पत्रकार, मला प्रश्न विचारा ना! मी नवनीत राणा. हनुमान चालीसा हाच माझा बाणा. माझा राजकारण आणि समाजकारणातील अनुभव किती दांडगा आहे हे तुम्ही माझे लाडके नेते किरीटजी सोमय्याजी साहेब यांनाच विचारा. मी मुख्यमंत्री झाले तर राज्याला पहिली स्त्री मुख्यमंत्री मिळेल. सांस्कृतिक खातेही मीच सांभाळीन. कारण नाचण्याची आणि नाचवण्याची कला आहे ना माझ्या अंगात. शाळा-कॉलेजात मी दरदिवशी हनुमान चालीसा पठण कंपल्सरी करीन. त्याच्यावरील खास प्रश्नपत्रिका प्रत्येक इयत्तेच्या वार्षिक परीक्षेत असेल.
– पण तुमचे आदर्श आणि गुरू किरीटजी सोमय्याजी यांचीही मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. मग त्यांच्यासाठी तुम्ही त्याग करू शकाल? त्यांच्याकडे घोटाळ्यांच्या इतक्या फाईल्स आहेत की त्यांना चार टर्म मुख्यमंत्री केलं तरी घोटाळ्यांची सुनावणी अपुरी राहील.
– मी त्यांच्यासाठी नव्हे, तर ते माझ्यासाठी मुख्यमंत्रीपदाच्या मोहाचा त्याग करतील. कारण त्यांच्यासाठी दिल्लीत खास उपपंतप्रधानपद निर्माण केलं जाणार आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा सांगा. जय बजरंग बली. गुड डे.
– मी शीतल म्हात्रे. माझीही मुलाखत घ्या ना… कुणाचीही मुख्यमंत्री होण्याची इच्छा असू शकते असं आमचे नेते फडणवीसजी म्हणतात ते खोटं नाही. आणि हल्ली मी इतकी उजेडात आली आहे की मुख्यमंत्रीपदासाठीही माझ्या नावाची चर्चा होऊ शकते. मला फक्त बोरीवली-मागठाणे इथेच पाठिंबा नाही, तर होल महाराष्ट्रात पाठिंबा आहे. कारण जनतेचे माझ्या कार्यावर प्रेम आहे. ‘प्रेम घ्यावे, प्रेम द्यावे’ हाच माझा संदेश माझी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी निवड झाली तर मी व्हायरल करणार आहे. तुमच्यासारख्यांचे आशीर्वाद पाठीशी राहू द्या. ती बघा चित्रा वाघ येतेय. सध्या फ्लॉप शो आहे. बघा विचारून.
– नमस्ते चित्राताई. सध्या तुमचा कुठे आवाज दिसत नाही. टीव्हीवरही तुमचा तो वाघिणीसारख्या त्वेषाने भांडणारा चेहराही दिसत नाही. त्यामुळे चुकल्या चुकल्यासारखं वाटतं.
– नाही हो. पक्षकार्यात फार बिझी होते आणि आहे. आता निवडणुका जवळ आल्यामुळे पक्षश्रेष्ठीबरोबर गुप्त बैठका, काही डावपेच वगैरे आखण्याचं काम सुरू आहे. त्यातून माझा सल्ला सारेच नेते मानतात. त्या नटवीचा पाणउतारा केल्यापासून तर सर्व स्त्री वर्ग माझा पाठिराखा झालाय.
– तुमची मुख्यमंत्रीपदासाठी निवड झाली तर कसं वाटेल?
– छे बाई! अशी मोठाली स्वप्नं मी नाही बघत. तरीही आग्रह झालाच तर मी नाही कशी म्हणू?
– करणार काय तुम्ही मुख्यमंत्री झाल्यावर?
– संपूर्ण महाराष्ट्रातील स्त्री-पुरुषांचा, तरुण-तरुणींचा, बालक-बालिकांचा ड्रेस कोड मी निश्चित करणार आहे. कोणीही अंगप्रदर्शन करत फिरू नये यासाठी मी कडक कायदे करणार आहे. तुमच्या काही सूचना असल्या तर जरूर कळवा.
– चित्राबाई, चांगल्या जीन्स फाडून त्या घालणार्यांवर कडक कारवाई करणारा कायदा करा.
– तुमची जीन्स पण फाटलीय गुडघ्यावर!