नावात काय आहे, असं शेक्सपिअर म्हणून गेला. पण, सिनेमाच्या शीर्षकावरूनच त्यात काय पाहायला मिळणार याचा प्रेक्षकांना अंदाज बांधता येतो. पण ‘टीडीएम’ या नावावरून सिनेमाचा विषय नक्की काय आहे, हे कळत नाही. या नावाची गंमत चित्रपटातच उलगडणार आहे.
या सिनेमाची कथा एका गावात घडते, बाबू (पृथ्वीराज थोरात) हा बेफिकीर आणि फिल्मी तरूण, ट्रॅक्टरवरून रेती पोहोचवणे, विहीर खोदणे अशी कामं तो करतो. वडील मोलमजुरी करणारे, घरची परिस्थिती बेताचीच. गावातील एका सधन माणसाच्या ट्रॅक्टरवर बाबू काम करत असतो. त्यांच्याच मुलीवर, नीलम (कालिंदी निस्ताने) बाबूचं प्रेम जडतं. त्याचं एकतर्फी प्रेम अजय देवगणच्या गाण्यातून टेपरेकॉर्डरवर जाहीर होत राहतं. यातून फुलणार्या लव्ह स्टोरीच्या जोडीला गावच्या सहकारी सोसायट्यांमधील राजकारण, मतदारांना फुग्यातील (प्लास्टिक पिशवीत बांधलेली) दारू, पैसे वाटून होणार्या निवडणुका, गावातील तरुणांचा रोजगाराचा प्रश्न, कर्ज काढून घेतलेला ट्रॅक्टर, खोदकामासाठी वापरलं जाणारं डायनमाईट (बॉम्ब), रेती माफिया, लग्नाचं वर्हाड, मुलीचं लग्न, बस्ता, गावगप्पा असं बरंच काही या सिनेमात पाहायला मिळतं. ‘जब जिंदगी झंड होती है, तब मुंबई पुना की तरफ भागती है’ असे डायलॉग हशा पिकवतात. सिनेमाचा काळ १९९५ ते २००० असा आहे. त्या काळातील वातावरण निर्मिती करणारी नाइंटीजची गाणी या चित्रपटाचा प्रमुख भाग आहे. अनेक प्रसंगात सिनेमातील गाण्यांचा पार्श्वसंगीताच्या स्वरूपात वापर केला आहे. त्यामुळे चाळिशी-पन्नाशीतल्या प्रेक्षकांना नॉस्टॅल्जिया अनुभवायला मिळेल.
ग्रामीण बाजाची कथा तरलपणे मांडण्यात दिग्दर्शक भाऊराव कर्हाडे यांचा हातखंडा आहे. ‘ख्वाडा’, ‘बबन’ सिनेमातून त्यांनी हे सिद्ध केलं आहे. चित्रपटाच्या पहिल्या दृष्यापासून भाऊराव आपल्याला सिनेमातील गावाचा भाग बनवतात. प्रदीर्घ सिंगल शॉटमधे पहाटेच्या वेळी वस्तीत शिवाजी महाराजांचं गुणगान करणारा पिंगळा दिसतो. पिंगळा या बलुतेदारांच्या रचनेवर आधारलेल्या ग्रामसंकृतीचा एक भाग (पिंगळ्यानं रामप्रहरी वर्तविलेलं भविष्य खरंच होतं अशी ग्रामीण भागातील लोकांची समजूत आहे). गावगाडा हाकताना घडणार्या अशा लहानमोठ्या घटना बारकाव्यानिशी चित्रपटात पाहायला मिळतात. झिजलेल्या रबरी स्लीपरचा निघालेला अंगठा पुन्हा लावणे, विहीर खोदकाम, शेतात कांदे काढणी करणारी नायिका असे सहसा पाहायला न मिळणारे प्रसंग इथे पाहायला मिळतात. हल्ली ग्रामीण भागाचे शहरीकरण होत असल्यामुळे पूर्वी खेड्यात लग्न कसं व्हायचं याचं या सिनेमातील चित्रीकरण पुढील काळात दस्तऐवज म्हणून वापरला जाऊ शकेल असा वास्तवदर्शी माहोल पाहायला मिळतो. या सिनेमात ट्रॅक्टर हे फक्त वाहन न राहता एक पात्र कसं बनतं, तेही पाहण्यासारखं आहे.
नायकाच्या भूमिकेत चिखलात लोळणारा, नीलमवर वेड्यासारखं प्रेम करणारा आणि गरिबीतून बाहेर येण्यासाठी काहीतरी मोठं करण्याची उमेद बाळगणारा ग्रामीण रांगडा मर्द गडी पृथ्वीराज थोरात यांनी उत्तम साकारला आहे. कालिंदी निस्ताने यांनी प्रेमात पडल्यावर पृथ्वीराजवर जीव ओवाळून टाकणारी नीलम मनस्वीपणे साकारली आहे. दोघांचाही पहिला सिनेमा असूनसुद्धा त्यांच्या कामात नवखेपणा जाणवत नाही. इतर कलाकारांनीही कामे उत्तम रीतीने पार पाडली आहेत. निसर्गचित्रणापासून ते अगदी विहिरीचा तळ दाखवताना प्रकाशाचा उत्तम ताळमेळ साधणार्या छायाचित्रकार वीरधवल पाटील याचं विशेष कौतुक. नंदेश उमपच्या आवाजातील ‘मावळल्या दिशा दाही, माय हुरूहुरू पाही, लेक चालली सासरा, गाय हंबरत राही…’ हे गाणं पाहताना डोळे पाणावतात. गाणी श्रवणीय आहेत.
या सिनेमाच्या कथेत संघर्ष दिसत नाही. मुख्य कथानकात इतर गोष्टी आल्यामुळे कथा वेगाने पुढे जाते, यामुळे नायकापुढे येणार्या अडचणी किरकोळ वाटतात. वेगळ्या नावावरून उत्सुकता निर्माण होऊन प्रेक्षकांनी सिनेमा पाहायला यावं हे मार्केटिंग गिमिक इथे अंगाशी येत नाही. नागराज मंजुळेचा सैराट येऊन सात वर्ष उलटून गेले तरीही ग्रामीण लव्हस्टोरीच्या नावाखाली ‘सैराट’च्या फोटोकॉपी काढणं अजूनही चालूच आहे. या पार्श्वभूमीवर हा सिनेमा काहीतरी वेगळं पाहिल्याचे समाधान देतो.