आमचा अभय उर्फ अब्या. अब्याने बारकु भाईकडून दहा हजार रुपये घेतले होते. पुढच्या महिन्यात परत करतो, असं त्याने बारकु भाईला सांगितलं होतं. पण अब्याने ते पैसे परत केलेच नाहीत. आज या गोष्टीला सहा महिने उलटून गेले. बारकु भाईचं किराणा मालाचं दुकान ज्या रस्त्यावर आहे, त्या रस्त्याने जाण्याचंही अब्याने बंद केलं. पण आज अचानक रस्त्यात त्याला बारकु भाई दिसला. भाईने त्याला एक सणसणीत शिवी हासडली, म्हणाला, XXXX पैसे घेऊन जातोस आणि तोंड दाखवत नायस. माझा फोन पण उचलत नायस. पुढच्या महिन्यात पैसे देतो बोलला होतास, त्याला सहा महिने होऊन गेले. मला उद्याच्या उद्या पैसे पायजेल. पायजेल म्हंजे पायजेल. मला उद्या रात्री नऊ वाजायच्या आधी पैसे नाय दिलेस, तर उद्या मी काय करतो बघ. अब्याला खुन्नस देत टिचकी वाजवून बारकू भाई म्हणाला, साल्या उद्या दोन्ही तंगड्या तोडून तुझ्या हातात नाय दिल्या तर बारकु नाव नाय लावणार!
अब्या घाबरून गेला. बारकू भाई आपल्याला सोडणार नाही, काहीही करून उद्या रात्री नऊ वाजण्यापूर्वी पैश्याची सोय करायलाच हवी हे अब्याच्या लक्षात आलं. पण आता पैसे कुठून आणावेत? पगार व्हायला अजून वेळ आहे अन् पगारातले दहा हजार त्याला द्यायचे तर मग आपण महिना कसा काढायचा? मालक एवढा अॅडव्हान्सही देणार नाही. पैसे तर उभे करायला लागतीलच. अब्याने एक दोन मित्रांना फोन केला. त्या मित्रांनी नकार दिला. इतर दोन चार मित्रांना जाऊन भेटला. त्यांच्याकडेही पैसे मागितले. त्यांनी त्यांच्या अडचणी सांगितल्या. त्यांनीही नकार दिला. यात रात्र झाली. शेजारपाजारचे कुणी मदत करेल म्हणून प्रयत्न केले, पण कुठेच काही आशेचा किरण दिसेना. अब्याचं डोकं चालेना. त्याला खूप टेन्शन आलं. त्याचे पाय मग आपसुक बारकडे वळले. तो रात्री उशिरापर्यंत दारू पीत बसला, मग झोकांड्या खात घरी जाऊन झोपला.
पैश्याची व्यवस्था झाली नाही म्हणून अब्याला टेन्शन आलं. तो दारू प्याला. रात्री घरी जाऊन शांत झोपला. पण दुसर्या दिवशी सकाळी उठला, तेव्हा प्रश्न सुटलेला नव्हता. प्रश्न तोच अन् तिथेच होता. बारकू भाईला पैसे द्यायचे आहेत.
अब्याने खरं तर सहा महिन्यांत थोडे थोडे करून बारकू भाईचे पैसे फेडून टाकायला हवे होते. पण माणसं पैसे घेतात आणि द्यायचे टाळतात. अब्यानेही तेच केलं. काल मात्र बारकू भाईने त्याला गाठलं. हे कधीतरी होणारच होतं. या समस्येवर ‘टेन्शन घेऊन दारू पिणे’ हा उपाय नाही तर बारकू भाईला सामोरं जाणं, मुदत मागणं अन् त्या मुदतीत थोडे थोडे करून त्याचे पैसे फेडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणं हा उपाय आहे. अब्या बारकू भाईचा फोन घेत नव्हता. त्याला टाळत होता, म्हणून बारकू भाई इतका चिडला आहे.
अब्याने टेन्शन आल्यावर दारूचा आधार घेतला, तसेच काहीसे यश हा तरुण वागतो आहे. यशचा नुकताच जुहीसोबत ब्रेकअप झाला आहे. दोन वर्षे त्यांचं अफेअर सुरू होतं. तिने त्याच्याशी ब्रेकअप केल्यानंतर तो सतत ड्रिंक करू लागला.
यश त्याच्या करीयरच्या दृष्टीने, नोकरी धंद्याच्या दृष्टीने काहीच करत नव्हता. त्याला स्वत:च्या फ्युचरची काही काळजी आहे, असं दिसत नव्हतं. जुही अनेकदा त्याच्याशी बोलायची. त्याला समजवायची. पण यशमध्ये काही सुधारणा होत नव्हती. शेवटी तिने त्याच्याशी संबंध तोडले.
यश आणि जुहीमध्ये जे प्रश्न होते, त्यामुळे जुही त्याला सोडून गेली. तो दिवसरात्र ड्रिंक करत बसला, म्हणून जुही परत येऊन यशचा ‘तो आहे तसा’ स्वीकार करेल असं नाही.
यश देवदास होऊन ‘कौन कम्बख्त बरदाश्त करने के लिये पिता है’ म्हणत राहिला, तर त्याने काही त्याच्यासमोरचा प्रश्न सुटत नाही. अजूनही जुही त्याला चूक सुधारण्याची संधी देऊ शकते का, हे त्याने पाहायला हवं, अन्यथा ती त्याला सोडून गेली आहे, हे सत्य स्वीकारून स्वतःला सावरायला हवं.
माणसं फक्त टेन्शन आल्यावर व्यसन करतात, दुःख विसरण्यासाठी व्यसन करतात; निराशा येते, अपयश येतं तेव्हाच व्यसनांच्या आहारी जातात असं नाही. कुतूहल म्हणून, कुणाच्या तरी आग्रहाला बळी पडून, आजच्या जगात घ्यावीच लागते, अशा विचारातून किंवा इतर कोणत्याही कारणाने व्यसन सुरू होते अन् मग त्याची शरीराला सवय लागते. एकदा व्यसन लागलं की ते सुटणं कठीण असतं. शिवाय व्यसन करून टेन्शन जातं, निराशा उरत नाही, असं नाही. उलट माणूस नशेत अधिक भावनिक होऊन अधिक निराश होऊ शकतो. प्रसंगी अविवेकी, आक्रमक, हिंसक होऊन काही गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. स्वतःबद्दल, इतरांबद्दल काही घातक विचार करू शकतो.
आपण स्वतःला कितीही सांगितलं की मी लिमिटमध्ये घेतो, मी फक्त रात्री दोन पेग घेतो, दोन पेग म्हणजे काही जास्त नाही, त्याने माझा थकवा जातो, मला चांगली झोप येते किंवा सिगरेट ओढल्यावर माझं पोट चांगलं साफ होतं, सिगरेट ओढल्याने डोकं चालतं… पण ते काही खरं नसतं. आपण आपल्या शरीराला, मनाला ती सवय लावलेली असते. आपण व्यसनाचं वेगवेगळ्या प्रकारे समर्थन करत राहतो फक्त.
व्यसन म्हणजे काय, तर अशी एखादी सवय की जिचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो. मानसिक त्रास होतो, आर्थिक नुकसान होतं अन् हे सारे कळत असूनही ही सवय सोडणं कठीण होतं, मन पुन्हा पुन्हा त्या सवयीकडे ओढलं जातं. अशा सवयीला व्यसन असे म्हणतात.
माणसांना व्यसनातून बाहेर काढणारे तज्ज्ञ असं मानतात की जो एकदा व्यसनी होतो, तो कायमचा व्यसनी असतो. त्याने व्यसन करणं थांबवलं असलं तरी ते पुन्हा सुरू होऊ शकतं. म्हणून तज्ज्ञ लोक, डॉक्टर्स व्यसनी माणूस व्यसन करणं थांबवतो तेव्हा त्याला ‘व्यसनमुक्त’ न म्हणता ‘बरा होत जाणारा रुग्ण’ अशा स्वरूपाचा उल्लेख करतात. कारण एकदा व्यसन केलं की तो अनुभव व्यसनी माणसांच्या मेंदूत कायम ठाण मांडून बसतो. पुढे व्यसनी माणूस कधी तरी पुन्हा तो अनुभव घेण्याकडे आकर्षित होऊ शकतो. म्हणून अद्याप आपण कोणतंच व्यसन करत नसू तर ती खूप चांगली गोष्ट आहे. भले कुणी म्हणू दे, ‘कंबख्त तूने पी ही नहीं!’
आपण व्यसनाकडे जाण्याचे धोक्याचे क्षण जसे आजवर टाळले आहेत, तसे पुढेही कटाक्षाने टाळायला हवे. कोणतंही व्यसन लावून घेणे म्हणजे स्वतःहून स्वतःसाठी समस्या निर्माण करणे होय. व्यसन लागणं सोपं आहे पण ते सुटणं कठीण आहे.
आपण व्यसन करत असू, तर आपण आता व्यसन सोडू शकत नाही. आपल्या शरीराला त्याची खूप सवय झाली आहे, असं स्वतःला सतत सांगत राहू नका. सोडणे शक्य आहे हे लक्षात घेऊन त्यासाठी निग्रह, निश्चय करणे आवश्यक आहे. मोहाचे क्षण कटाक्षाने टाळायला हवेत. त्यासाठी आपणच आपले उपाय शोधायला हवेत. आपल्या सवयीत, वेळापत्रकात काही बदल करता येतील. व्यसनांचा शास्त्रीय, मानसशास्त्रीय विचार करणार्या संस्थांची, व्यक्तींची मदत घ्या. मुक्तांगण, इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ, अल्कोहोलिक अनॉनिमस अशा अनेक संस्था या विषयावर काम करत असतात. त्यांची मदत घ्यावी, त्यांच्याबद्दल माहिती घ्यावी.
टेन्शन येतं. निराश वाटतं, झोप येत नाही, मानसिक त्रास होतो, यावर व्यसन करणे हा उपाय असू शकत नाही. मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेणे, समुपदेशन (काऊन्सिलिंग) घेणे, तज्ञांच्या सल्याने मेडिटेशन करणे, रिलॅक्सेशन करणे, सकारात्मक विचारांचे ऑडियो ऐकणे, व्हिडिओ पाहणे, संगीत ऐकणे, विनोदी कार्यक्रम पाहून मनोरंजन करून घेणे यासारखे अनेक उपाय असू शकतात. खूप ड्रिंक, खूप स्मोकिंग याने आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होतात. यापुढे ड्रिंक करणं, स्मोकिंग करणं जिवावर बेतेल, असं डॉक्टर सांगतात. तेव्हा उशिरा आलेलं शहाणपण आपले प्राण वाचवू शकेल, याची खात्री देता येत नसते. त्याने/तिने शेवटी शेवटी सोडली होती, पण तोवर उशीर झाला होता, अशी ‘देर न हो जाये’ची अवस्था आपण अनेकांबाबत ऐकली आहे. ती आपल्या बाबतीत होऊ नये म्हणून आपण वेळीच व्यसनाला वेसण घातली पाहिजे!