कांचनमृगाचा मोह अगदी सीतेलाही आवरता आला नाही आणि रामायण घडले. भारतात सोन्याचा धूर निघायचा असेही म्हटले जाते. कारण अजूनही भारतातली हिंदू मंदिरे सोन्याने खचाखच भरलेली आहेत. ते सोनं एकत्र केलं तर कदाचित अमेरिकेच्या सोन्यापेक्षा जास्त भरू शकते. त्यातून अनेक योजना मार्गी लागू शकतात. अनेक पुढार्यांची मंत्र्यांची खोकी भरूनसुद्धा.
गरीब स्त्रीला सुद्धा मंगळसूत्रात, दोन का होईना, सोन्याचेच मणी लागतात आणि अडीनडीला तेच सोनाराकडे विकावे लागतात. सोनारसुद्धा त्यात घट पकडून त्या मण्यांची कवडी किंमत देतात. महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातले सोनार अत्यंत श्रीमंत आहेत. त्यातले एक कारण, ते चोरीमारीचे दागिने गुपचूप विकत घेतात, हे आहे. बेकायदा गहाणाचे व्यवहार करून ते व्याज इतकं ओरबाडतात की शेवटी सोनं घ्यायला गरीब गिर्हाईक परत येतच नाही. म्हणजे ते सोनंही सोनाराच्या बापाचंच.
गेल्या दहा बारा वर्षात सोन्याचे भाव खूपच कडाडलेत. पेपरात रोज भाव येतात गिर्हाईक घासाघीस करतं. या बहाद्दरांनी मजुर्या भरमसाठ वाढवल्या. ‘दस की कोंबडी रुपये का मसाला’. विशेष म्हणजे यांची मुले अगदी परदेशात शिकून आली तरी ते गल्ल्यावर, काउंटरवरच बसतात, कारण भरमसाठ कमाई. आमच्या जिल्ह्याचेच एक मंत्री होते. उपरोधाने त्यांना ‘सोन्याबाई’ म्हणत. दहा-पंधरा टक्के कमिशन ते रोख न घेता त्या बदल्यात सोन्याच्या बांगड्या मागत. मध्यंतरी अनेक गुंड नेत्यांच्या, नगरसेवकांच्या गळ्यात किलोने सोन्याचे दागिने अंगावर घालायची फॅशन आली होती. त्यांना पोलिसांनी, सरकारने वा ईडीने कधीच जाब विचारला नाही.
एका नवरदेवाच्या बापाने हुंड्यात शंभर तोळे सोने मागितले. पोरीच्या बापाने ते कबूल केले. मुलाचा बाप खुशीत २०० मैलांवरच्या घरी गेला. त्याच्या बायकोने विचारले, ‘जुना तोळा की नवा तोळा?’ (जुना तोळा अंदाजे १२ ग्रॅमचा असे, तर नवा तोळा दहा ग्रॅमचा असतो.) त्या काळात फोन कमी होते. एसटीने धक्के खात खात तो पुन्हा मुलीच्या बापाकडे आला व त्यास विचारले, आपण कबूल केलेले सोने नव्या तोळ्यात की जुन्या? पोरीचा बाप समजूतदार होता. तो व्याह्यास म्हणाला, अहो, ताटात सांडले काय किंवा वाटीत सांडले काय… माझ्या मुलीलाच मिळणार आहे ना… झाले तर!
संतती नसलेल्या एका वृद्ध जोडप्यापैकी बायको अचानकच वारली. त्याने प्रथम तिच्या कपाटाची किल्ली ताब्यात घेतली. नात्यातल्या बायका डोळ्याला पदर लावत प्रेताजवळ बसल्या. धाय मोकलून रडू लागल्या. त्यांच्यापैकी कोणीही दोन पाच वर्षांत म्हातारीला भेटायला वा चौकशीही आलेली नव्हती. मात्र रडताना एकेकीने सूर धरला. म्हातारीच्या छातीवर डोकं आपटत एक म्हणाली, मावशी नेहमी म्हणायची की मी मेल्यावर माझ्या बांगड्या तुला देईन. दुसरीने म्हटले, ‘मला गळ्यातली मोहनमाळ देणार होती काकू! एकीने गळा काढत म्हटले, आत्याबाई मला नेहमी म्हणायच्या, ‘मला मेलीला कशाला हवीत आता चांदीची भांडी. मेल्यावर सगळे तू आठवणीने घेऊन जा बरं!’ अशी छान चढाओढ लागली होती. दोघीतिघी नजर चुकून म्हातारीच्या कपाटाच्या आजूबाजूला पलंगाखाली धुंडाळात होत्या ते वेगळेच. म्हातारबुवा कपाटाच्या किल्ल्या कोपरीत लपवून शांत बसले होते.
सोसायटीतून सीसीटीव्ही लागल्यापासून चोर्यामार्या कमी झाल्यात. पण, जिवावर उदार होऊन काही बेरोजगार तरुण मंडळी दिवसाढवळ्या ज्वेलर्सची दुकाने फोडीत आहेत. त्यामानाने मंगळसूत्र खेचण्याचा कार्यक्रम जोरात चालू आहे… मोटारसायकलवर दोघेजण असतात. घरचे लोक नको नको म्हटले तरी जाडजूड मंगळसूत्र घालून बायका बाजारात फिरतात. हातात दहा दहा पिशव्या, नजर साड्यांच्या दुकानावर, डिस्काउंट सेलवर भिरभिरतेय. अशा शेकडो बायका हमरस्त्यावर वेंधळेपणाने वावरत असतात. अशी चार दोन मंगळसूत्र जरी दिवसाला चोरट्यांच्या हाती लागली, तरी दीड दोन लाखांची कमाई!
चित्रमाला काढताना अशा सामाजिक विषयांवर खोलवर आपण डुबकी मारतो, तेव्हा आपल्या हातीही माल लागतो. अनेक अंगानी असे विषय खुलवता येतात. त्यासाठी खूप बैठक लागते. ती चित्रमाला पूर्ण होईपर्यंत इतर काही सुचत नाही. सभोवती काय चालले आहे याचे वा खाण्यापिण्याचेही भान नसते. तासन्तास चाललेला हा एक प्रकारचा रियाजच आहे.
पूर्वी सासू-सासरे सुनेला म्हणायचे, ‘बाई, बाहेर जाते आहेसच तर अंगभर खांद्यावर पदर घेऊन जा…’ ती सूचना सुनांना कधीच आवडली नाही. दाराबाहेर पडताच बाई सौष्ठव दाखवायला मोकळी. सासू-सासर्यांना अपेक्षित सवय चेनखेच्यांनी बरोबर लावली. चेनखेच्यांचे आणि पोलिसांचे संबंध असतात की नाही याचे उत्तर सुद्धा या चित्रमालेमध्ये मिळेल. मोठमोठ्या चोर्या करायला शिकवण्याऐवजी आपल्या बाळूला जरा ‘साधी चेन खेचायची कामे प्रथम शिकवा!’ असे दरोडेखोराची बायको सांगायला विसरत नाही. खोटे दागिने वापरणार्या गरीब बाईला झापणारा व तिचे खोटे मंगळसूत्र परत देणारा चोर-माणूसही आपल्याला दिसतो. चित्रात लबाड सोनार तर आहेच आहे.
बाकी काहीही असो सोन्यामधील इन्व्हेस्टमेंट ही खरी उत्तम इन्वेस्टमेंट. कारण गरजेच्या वेळेला सोन्याइतके झटपट पैसे देणारी एकही वस्तू नाही. अगदी घरदार, फ्लॅट, गाडी सुद्धा. कारण या वस्तू विकताना लोक पडेल भावात मागतात. सोन्याचे तसे नाही.
एका लग्नाची बैठक चालू होती. दोन्ही पार्ट्या श्रीमंत होत्या. मुलीचे वडील पोलीस इन्स्पेक्टर होते. देणे घेणे ठरले. याद्या तयार झाल्या. अर्धा किलो सोने मुलीच्या अंगावर घालायची अट त्यात होतीच. चार दिवसांनी अचानक वरपित्याने मुलीला सोन्याचा कमरपट्टा घाला, अशी मागणी केली. मुलीकडचे गोंधळले. त्यासाठी बरेच सोने लागणार होते. शेवटी मुलीकडच्यांनी होकार दिला. लग्नात वधू नखशिखांत सोन्यात मढवलेली होती. मात्र कमरेला चामड्याचा पट्टा होता. वरपिता-वरमाय चिडली. मुलीचे वडील इन्स्पेक्टर शांतपणे म्हणाले, लग्नाला जमलेल्या सर्व वर्हाडी मंडळींनो, वरपक्षाने घातलेल्या सर्व अटी आम्ही मान्य केल्या होत्या. पण दोन दिवसांपूर्वी ऐनवेळी त्यांनी सोन्याचा पट्टा मागितला. लग्न मोडायची धमकी सुद्धा दिली. वर्हाडाचा, मुलीचा, मुलाचा हिरमोड होऊ नये म्हणून आम्ही सोन्याचा पट्टा कबूल केला. बांधलेल्या एका अक्राळ विक्राळ कुत्र्याकडे बोट दाखवून ते म्हणाले, हा माझा पोलिसी कुत्रा सोन्या, त्याचाच पट्टा वधूला घातलाय आणि हे म्हणतात ‘हा सोन्याचा पट्टा नाही!’ आता बोला?