लहानपणी मला कोणी विचारले की तू भविष्यात (करिअर, नोकरी) काय करणार आहेस, तर मी बिनदिक्कत क्रिकेटर होणार असे सांगायचो! तुमच्यातही अनेकांचं हेच उत्तर असणार, आय नो. खरं तर मला क्रिकेट खेळण्यामध्ये फारसा रस नव्हता, पण विश्वचषक स्पर्धेचे क्वालिफायर किंवा फायनलसारखे सामना पाहणे यात मजा यायची.
क्रिकेटवर आधारित एक चित्रपट आला होता, ‘चैन कुली की मेन कुली.’ त्यात एका मुलाला जादूची शक्ती असलेली बॅट सापडते आणि तो क्रिकेटर बनतो… हा धमाल सिनेमा या सुट्टीत पाहा, तुम्हाला मजा येईल. नक्कीच आवडेल. मॅचेसमध्ये सेहवागची सलामी, तेंडुलकरची शतके, धोनीचं स्टंपिंग बिहाइंड द विकेट्स, हरभजनची गोलंदाजी आणि कोहलीला आक्रमकपणे खेळताना पाहणे ही एक पर्वणीच होती.
आपण सर्वजण लहानपणी क्रिकेट खेळतो… गल्लीतल्या गल्लीत का होईना, अंडरआर्म का होईना, क्रिकेट खेळतोच. पण, त्याविषयी तुम्हाला किती माहिती आहे? क्रिकेटचे भारतात इतके प्रेमी आणि चाहते आहेत, पण हा भारतीय खेळ नाही, हे माहिती होतं तुम्हाला? क्रिकेटचे मूळ इंग्लंडचे आहे आणि ब्रिटिशांनी त्यांच्या राजवटीत हा खेळ भारतात आणला. नंतर नवीन नियम आले, कौन्सिल बोर्ड तयार झाले, विविध देशांनी संघ तयार केले आणि कसोटी मालिका, वन-डे, टी-२० अशा वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये आता तो खेळला जातो. परंतु २००८मध्ये बीसीसीआयने आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) नावाच्या फ्रँचायझी आधारित टी-२० स्पर्धेची घोषणा केली. त्यामुळे लोकांमध्ये या खेळाविषयी एक नवीनच उत्सुकता निर्माण झाली. भारतातील प्रमुख राज्यांनी त्यांचे संघ तयार केले होते. खेळाडूंचा लिलाव करून फ्रँचायझींनी त्यांना खेळण्यासाठी विकत घेतले होते. आयपीएलमधील माझा आवडता संघ (सीएसके) चेन्नई सुपर किंग्ज आहे. तुम्हाला कोणता संघ आवडतो?
मी आजोबांकडे सुट्टीवर जायचो, तेव्हा त्यांचा टीव्ही फक्त माझा आणि आजोबांचा असतो. माझे आजोबा नेहमीच क्रिकेट पाहतात आणि ब्रेक होईपर्यंत ते कोणालाही रिमोट देत नाहीत. घरातल्या बायकांना डेली सोपच्या सिरियल्स बघायच्या असतात. मात्र क्रिकेट मॅच असल्यावर त्यांना रिमोट मिळतच नाही. नो अपील. त्यांची चिडचिड होते, पण आजोबांच्या क्रिकेटवेडापुढे काय करणार…
ख्रिस गेलसारखी फलंदाजी कशी करायची हे शिकण्यासाठी मी क्रिकेट पाहिलं. तो वेस्ट इंडिजचा खेळाडू आहे, जो रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (आरसीबी) कडून खेळत असे. मी सीएसकेचा समर्थक असून गेलची महती का सांगतोय? शालेय जीवनात मी उंच होतो, आताही उंच आहे आणि गेलही उंच आहे. त्यामुळे मी त्याच्या फलंदाजीचे निरीक्षण करायचो. तो जिथे उभा राहतो, तिथून फलंदाजी करतो, इतर खेळाडूंसारखा चेंडू पडल्यानंतर फुटवर्क करून खेळत नाही. गेलच्या बॅटवर कुक्कबोराचे स्टिकर होते. मी आजोबांकडे कुक्कबोरा स्टिकर असलेली बॅट मागितली. दुसर्याच दिवशी त्यांनी मला बॅट घेऊन दिली. मी लाडका नातू ना त्यांचा!
मग मी आईला संघाची जर्सी आणायला सांगितली. ती आधी नाही म्हणाली, पण नंतर ती मला दुकानात घेऊन गेली. मला सीएसकेची ७ नंबरची जर्सी हवी होती, कारण तो धोनीचा नंबर होता. पण तो स्टोअरमध्ये उपलब्ध नव्हता.
माझ्या मित्रमंडळींनाही क्रिकेट खेळण्याची क्रेझ होती. मला फलंदाजी करायला आवडतं. मी चांगली फलंदाजी करत संघासाठी चांगली धावसंख्या उभारायचो. वर्गणी काढून आम्ही एक चेंडू विकत घ्यायचो आणि जो बॅट आणेल त्याला प्रथम फलंदाजीची संधी मिळायची.
बरं, तुम्ही या सीझनमध्ये आयपीएल पाहता का? तुमचा आवडता संघ/खेळाडू कोणता? नसल्यास, तुमच्या मित्रांना गोळा करा. चिप्स आणि ज्यूसचे पॅकेट उघडा आणि त्यांच्यासोबत मॅचचा आनंद घ्या.