लोकसभेची निवडणूक ही जिल्हा परिषदेची, ग्रामपंचायतीची किंवा नगरपरिषद, महापालिकेची निवडणूक असावी असा भ्रम झाल्यामुळे गल्लीबोळातले स्वयंभू नेतेही गुडघ्याला बाशिंग बांधून या निवडणुकीसाठी सिद्ध झाले आहेत. किती विधानसभा मतदारसंघ म्हणजे एक लोकसभा मतदारसंघ होतो याचं गणितही माहीत नसताना ही मंडळी जणू ही गल्लीतली निवडणूक आहे असं समजून केवळ प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी दंड थोपटून अकलेचे तारे तोडत आहेत. माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या याला हे सहन होणं शक्यच नाही. महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या ज्यांच्या हातात आहेत ते अर्थमंत्री की अनर्थमंत्री अजितदादा यांच्या एकंदर बिघडलेल्या मन:स्थितीचं वर्णन करताना त्याच्या रसवंतीला इतका बहर येतो की सांगता सोय नाही. कृतघ्नतेचे कळस म्हणावेत असे या महाराष्ट्रात कित्येक असले तरी त्यांना अजितदादांची सर कधीच येणार नाही असं विधान तो छातीठोकपणे करतो. कुटुंबातल्या माणसांपासून स्वत:च्या पक्षातल्याच नेत्यांकडून, कार्यकर्त्यांकडून इतक्या थपडा खाणारा दुसरा नेता महाराष्ट्रात झाला नाही आणि कधीही होणार नाही, असंही साभिप्राय भविष्यकथन तो करतो. त्याबद्दल अजितदादांची लुटूपुटूची मुलाखतही त्याने या गदारोळात घेतली होती. यावर वाद झाल्यावर त्याने त्याच्या पोतडीतील ही मुलाखत माझ्यासमोर फेकली आणि माझ्या चेहर्यावरचे पालटणारे भाव पाहात तो माझ्यासमोर बसला. तीच ही मुलाखत.
– नमस्कार दादा. बारामती लोकसभेचा गड जिंकण्यासाठी आपण करत असलेली प्रयत्नांची पराकाष्ठा आणि जिवाची बारामती पाहून मी धन्य झालो.
– मुद्द्याचं बोल. नाहीतर आलास तसा चालता हो.
– दादा, तुमच्या सहनशक्तीचं कौतुक वाटतं मला. सगळीकडून एवढ्या थपडा बसत असूनसुद्धा तुमचा दांडगा आत्मविश्वास पाहून खरोखरच अभिनंदन करावंसं वाटतं तुमचं. एवढं अख्खं कुटुंब आणि पक्षातले नेते, कार्यकर्ते तुमचं वाभाडं काढत असताना कसं ऐकून घेता हे तुम्ही?
– मी काही बोलत नाही याचा अर्थ मला बोलता येत नाही असा नाही. पण सध्या मूग गिळून गप्प बसावं लागतंय मला.
– अहो दादा, बारामतीतून निवडणूक लढविण्यावर ठाम असलेले शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी तर तुम्हाला थेट विंचवाची उपमा दिली. तेही कोणी साधे नेते नाहीत. पुरंदर-हवेलीचे ते माजी मंत्रीही होते. तुम्हाला उद्देशून ते म्हणाले की, हा विंचू अनेकांना डसल्यावर आता तर तो मोदीरूपी महादेवाच्या पिंडीवर जाऊन बसलाय. चप्पल मारावी तर महादेवाला सुद्धा लागेल. त्यामुळे या विंचवाला मारताही येत नाही. हे सगळं कसं ऐकून घेता तुम्ही?
– आता वठणीवर आलाच ना तो. त्याला माहीत नाही का हा विंचू एकदा डसला की त्याचं विष त्याच्या अंगात भिनत जाईल ते. असल्या कस्पटांना मी भाव देत नाही.
– आणि तुमच्या वहिनी शर्मिला पवार यांनी तुमची चांगलीच कानउघडणी केलीय. त्या तर म्हणाल्या, तू काहीही हो, तू सरपंच हो, पंतप्रधान हो, प्रेसिडेंट हो, पण शेवटी वडील ते वडील आणि चुलता तो चुलता. त्यांना योग्य सन्मान आपण प्रत्येकाने दिलाच पाहिजे. सुप्रिया यांच्या पाठीशी वडिलांची पुण्याई आहे. परंतु त्यांनी कधीच पवार नावाचा वापर केला नाही. संसदेतील त्यांची कारकीर्द अभिमानास्पद आहे. पवार साहेबांनी आपल्याला कधीच त्रास दिलाय का? त्यांनी इतकी वर्षं आपल्यावर प्रेमच केलं. ते एकही निवडणूक हरलेले नाहीत. आता त्यांना हरवण्याचं पाप तुम्ही कसं करू शकता, असा जाब विचारलाय शर्मिला वहिनींनी.
– हे बघ, त्यांची वकिली तू करू नकोस.
– मी वकिली नाही करत. त्या बोलल्या तेच सांगतोय. तुमच्या सख्ख्या भावानेही तुमच्या कृतघ्नतेचा पाढा वाचलाय. त्यामुळे बेईमानी तुझं नाव अजितदादा हे चित्र बारामतीत आहे.
– मला त्याची पर्वा नाही.
– पवार साहेबांची सख्खी बहीण सरोज पाटील यांनी तर तुमच्या कृतघ्नतेच्या कळसाची पुरेपूर हजेरी घेतलीय. त्याशिवाय रोहित पवार तर तुमच्यामागे हात धुवून लागलाय. ही एवढी सगळी कुटुंबातील मंडळी तुम्हाला वेड्यात काढताहेत आणि तुम्ही तुमच्या पत्नीचं काडीचंही समाजकार्य नसताना त्यांच्या उमेदवारीचा टेंभा मिरवताय?
– तिने कशाला समाजकार्य करायला हवं. लोक काय तिला मत देणार नाहीत, तर मीच उभा आहे असं समजून मलाच मतं देणार आहेत. नाही दिलं तर त्यांची कशी हालत करतो ते बघालच तुम्ही.
– अशा धमक्या देऊन मतं मिळवणार आहात तुम्ही?
– दुसरा पर्याय नाही माझ्यापुढे. उद्या कुठलं काम घेऊन येऊं देत माझ्याकडे. कसे हाकलून देतो ते पाहा.
– ज्या पवार साहेबांच्या जिवावर तुम्ही मोठे झालात, लोक त्यांच्यामुळे तुम्हाला ओळखू लागले, ज्यांच्या आशीर्वादामुळेच राजकारणात तुमचा प्रवेश झाला आणि तुम्हाला मोठमोठी पदं मिळाली त्यांनाच संपवायला निघालात तुम्ही? आज एवढं वय असूनही महाआघाडीच्या प्रचारासाठी स्वत:च्या जिवाची, उन्हातान्हाची पर्वा न करता सार्या भारतभर भटकंती करणार्या या नेत्याविषयीच्या आदराने तुमची मान झुकायला हवी. ते सोडून त्यांच्यावरच मात करण्याची दुर्बुद्धी कुठून झाली तुम्हाला? करोडो रुपयांचा घोटाळा लपविण्यासाठी मोदींच्या वॉशिंग मशीनमध्ये घुसलात तुम्ही? तुमच्या कुटुंबाचेच नव्हे, सार्या महाराष्ट्राचे आणि देशाचे शाप लागतील तुम्हाला.
– मी काय भोगलंय ते माझं मला माहीत. राजकारणात नुसती विद्वत्ता आणि संसदेतील भाषणं महत्त्वाची नसतात. त्यापलिकडचा मी गावरान नेता आहे. माझ्याही काही महत्त्वाकांक्षा आहेत. पण सतत त्या सुप्रियाला आपल्या राजकारणाची वारसदार बनविणार्या काकांना मी काका मानायलाच तयार नाही. त्यांनी तिच्यापेक्षा मला राजकीय वारसदार बनवायला हवं होतं. पण वय झालं तरी राजकारणाचा हव्यास सोडवत नाही त्यांना.
– त्याचं कौतुकच वाटायला हवं होतं तुम्हाला. माणूस आपल्या कर्तृत्त्वाने पुढे येतो. त्याला लांड्यालबाड्या करण्याची गरज लागत नाही. तुमच्यासारखी. शेवटी, पितळ उघडं पडणारच.