□ अजित पवार गटाच्या प्रचारापासून मिंधे आणि मोदी-शहा दूर.
■ यांचीच आपसात इतकी काटाकाटी होणार आहे की महाविकास आघाडीला वेगळी वाढीव मेहनत घेण्याची गरजच नाही.
□ सुनील तटकरे हे अजितदादांची दुसरी बायको – जयंत पाटलांची बोचरी टीका.
■ अरे देवा, जयंत पाटलांचाही तोल जावा म्हणजे कठीण आहे… फारच डिवचतात डुप्लिकेट घड्याळाचे काटे.
□ नवनीत राणांना तिकीट दिल्याने बच्चू कडू संतापले.
■ मतदारही संतापले आहेत… राणांवर पण आणि सोयीने इकडे तिकडे झुलत, झुलवत फिरणार्या कडूंवर पण. करेक्ट कार्यक्रम दोघांचाही होईल.
□ कंगनाची सटकली; म्हणते, इंग्रजी येत नव्हतं म्हणून पटेलांना पंतप्रधान केलं नाही.
■ ६० वर्षं कुजबुजी करून जे विष पसरवलं गेलं, त्याची ही कटु फळं! नवीन पिढीतल्या मुलांना यांच्या धादांत खोट्या गावगप्पा हाच इतिहास वाटतो, म्हणजे त्यांच्यापुढे केवढा मोठा र्हास वाढून ठेवलेला आहे.
□ भाजपच्या बावनकुळेंकडून आचारसंहितेचा भंग – काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार.
■ कोणी हिंग लावून विचारणार नाही त्या तक्रारीला! आपसातला मामला आहे तो त्यांचा. इंटर्नल मॅटर! आयी बात समझ में?
□ एखादा चालणारा तरी नट घ्यायचा – जयंत पाटलांची मिंधे गटावर टीका.
■ जाऊ द्या हो, तो त्या हिला नव्हता नवरा आणि त्या त्याला नव्हती बायको, ती म्हण माहिती आहे ना… त्याला काय, इथे पडायच्या ऐवजी तिथे जाऊन पडायचं आहे!
□ कमळाबाई हातोहात गंडवतेय, मिंधे गटाची घालमेल वाढली.
■ निवडणूक संपेपर्यंत गट चिखलात विलीन होऊन जाणार आहे… कसली घालमेल वाढतेय यांची!
□ ईडीच खंडणीचे रॅकेट चालवतेय! – केजरीवालांचा भर न्यायालयात हल्ला.
■ आणखी एक सर्वोच्च थोबाडीत खाण्याच्या दिशेने ईडी आणि तिच्या मालकांची वाटचाल सुरू आहे…
□ न्यायव्यवस्था आणि लोकशाही धोक्यात आहे – ६०० नामवंत वकीलांचे सरन्यायाधीशांना पत्र.
■ भयभीत जनता पार्टीचे सतत थोबाडीत खाणारे वकील हरीश साळवे हे या वकिलांचे नेते आहेत, म्हणजे ते कोणत्या लोकशाहीबद्दल बोलतायत ते कळायला हरकत नाही… हा सरन्यायाधीशांना धमकावण्याचाच प्रकार आहे.
□ मोदी की गॅरंटी… प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चिट.
■ बिचारे औरंगजेब, अकबर, बाबर वगैरे वारले अकाली; त्यांनाही क्लीन चिट मिळाली असती, हातात गुलाबाच्या फुलाऐवजी कमळाचं फूल घ्यायचं फक्त! मग भक्तांनी स्वत:च्या दाढ्या जाळून घेतल्या असत्या, ते सोडा!
□ हिंदुस्थानात तब्बल ८३ टक्के बेरोजगार.
■ आणि यांच्या हातात आहेत मोबाइल… त्यावर फुकट डेटा, त्यामुळे रील्स, बोगस बातम्या आणि धादांत खोट्या इतिहासासाठी पर्मनंट गिर्हाईकं आहेत… हेच आहेत मोदींचे मतदार.
□ कल्याणमध्ये शिवजयंतीच्या निष्ठावंतांच्या देखाव्याला पोलिसांचा आक्षेप.
■ पोलिसांच्या निष्ठा सत्ताधीशांच्या चरणी वाहिलेल्या असतात… समजून घ्या!
□ बारामतीत मिंधे-भाजपची धुसफूस विधानसभेच्या सेटिंगसाठी.
■ सगळीकडे पडायचंच तर आहे, कशाला सेटिंग लावताय उगाच!
□ ठाण्यात गद्दार विरुद्ध निष्ठावान लढत होणार.
■ आणि ती निष्ठावान जिंकणार, ही काळ्या दगडावरची रेघ!
□ मिंध्यांचे आमदार महेंद्र थोरवेंचा नगरसेवकांना दम; मतदान कमी झाल्यास पालिका निवडणुकीचे तिकीट विसरा.
■ आणि मतदारांनी गद्दारांना कायमचं घरी बसवल्यावर तुम्ही काय करणार? त्यांना काय विसरायला सांगणार?
□ परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थ्यांना मतदान जनजागृतीसाठी जुंपले.
■ काय करायच्या आहेत परीक्षा? उगाच शिक्षित बेरोजगारांमध्ये भर!
□ विश्वगुरु टेन्शनमध्ये! काँग्रेसला १८०० कोटींची आयकर नोटीस.
■ सगळ्या निवडणुका पैशांच्या बळावर लढल्या जात नाहीत, हे यांना ‘इंडिया शायनिंग’च्या चकचकाटानंतर लोकांनी घरी पाठवल्यानंतरही कळलेलं नाही… आणि हे विश्वाला ग्यान देतायत!
□ सरकार बदलल्यावर एकालाही सोडणार नाही ही माझी गॅरंटी – राहुल गांधी यांचा हल्ला.
■ भारताच्या इतिहासातला सगळ्यात मोठा आर्थिक घोटाळा करणार्या या टोळीला मतदारांनी तडीपार केलं की त्यांची जागा तुरुंगातच असणार आहे.
□ अर्थव्यवस्था आजारी, पण भाजपच्या डॉक्टरांना चिंता नाही – पी. चिदंबरम यांनी तोफ डागली.
■ हे डॉक्टर पदवीधर नाहीत, कंपाऊंडरकी करून करून डॉक्टर म्हणवून घ्यायला लागले आहेत… त्यांनी उपचार न करणं हेच पेशंटसाठी सर्वोत्तम राहील.
□ अनंत अंबानी यांनी १५ कोटी रुपये दिले – माजी राज्यपाल कोश्यारी यांची कबुली.
■ काळ्या टोपीने केलेली ही एवढीच कालाकांडी नसणार! आणखी खोदायला हवे, शोधायला हवे.