मोबाइलची रिंग दुसर्यांदा वाजली आणि सागरची तंद्री भंग पावली. फोनच्या स्क्रीनवर उमेशचे नाव दिसले आणि सागर जरा विचारात पडला. उमेश खरेतर सागरचा जीवश्चकंठश्च मित्र. लोक गंमतीने दोघांचा उल्लेख वेगवेगळ्या आयांच्या पोटी जन्माला आलेले सख्खे भाऊ असा करीत असत. आज त्याच उमेशचा फोन उचलायलाही सागर कचरत होता, त्याचे धाडस त्याला दगा देत होते. शेवटी मनाचा हिय्या करून सागरने फोन रिसीव्ह केला, मात्र घशाला पडलेली कोरड त्याला जाणवत होती. काही प्रसंग असे असतात जेव्हा अगदी जवळच्या माणसाशी कसे बोलावे, कसे वागावे, दु:खद प्रसंगात त्याला कसे सावरावे हे भल्याभल्यांना उमजत नाही. सागर तर अवघा पंचविशीतला तरुण होता आणि त्याच्याच वयाचा उमेश नुकताच आपल्या नवजात बाळाला गमावून बसलेला होता.
`हॅलो उमेश.. कधी आलास?’
`काल रात्रीच आलो.’
`कसा झाला प्रवास? आणि छाया कशी आहे?’
`मला जरा त्याच संदर्भात तुझ्याशी बोलायचे आहे. तू आज रात्री माझ्याकडे येऊ शकशील का? रात्री झोपायच्या तयारीनेच ये प्लीज…’ उमेश म्हणाला आणि सागरच्या हृदयात हलकीशी कळ उमटली. पूर्वी एकमेकांकडे झोपायला जाणे हा एक सोहळा असायचा. दंगा, गाणी, धिंगाणा आणि मस्ती असायची नुसती. कधी एकदा अशी एखादी रात्र येते आणि आपण धमाल उडवतो असे दोघांना झालेले असायचे आणि आज सागरला उमेशकडची रात्र नको झाली होती. काय गंमत असते माणसाच्या आयुष्याची…
सागरला उमेशला टाळायचे होते असे नाही, पण उमेश आणि त्याची बायको छाया समोर आले की, सागरला काय बोलावे तेच कळेनासे होत होते. हसत्या खेळत्या उमेश आणि छायाला अशा अवस्थेत कधी बघू असे त्याला वाटले देखील नव्हते. सगळे असे एकदम अचानक घडले की कोणालाच सावरायला वेळ मिळाला नाही. आयुष्यात फारसे दु:ख वाट्याला न आलेल्या उमेश आणि सागर दोघांनाही या प्रसंगाला कसे सामोरे जावे तेच कळत नव्हते. उमेशची बायको छाया तर पूर्ण कोलमडून गेलेली होती. तिला
हॉस्पिटलमध्ये भेटायला सागर गेला होता, तेव्हा ती आढ्याकडे नजर लावून जी बसली होती, ती सागर जाईपर्यंत हाललेली नव्हती. उमेश देखील पूर्ण कोसळला होता. डिलिव्हरीच्या वेळी काही अडचणी अचानक निर्माण झाल्या आणि बाळाचा श्वास कोंडला गेला. अवघ्या काही मिनिटात होत्याचे नव्हते झाले. स्वप्नांचा मनोरा क्षणात कोसळला.
वेळ कोणासाठी थांबत नसतो म्हणतात. तो सागरसाठी देखील थांबणार नव्हता. घड्याळाने आठचे टोले दिले आणि काहीशा अनिच्छेने सागर खुर्चीतून उठला. तोंडावर गार पाण्याचे सपकारे मारत त्याने पुन्हा एकदा मानसिक तयारी केली आणि घराला कुलूप लावून तो उमेशच्या घराकडे निघाला. खचलेल्या उमेशला पाहणे ही सुद्धा सागरसाठी एक शिक्षा होती. खचलेल्या उमेशला कसे सावरावे हाच विचार सतत सागरच्या मनात येत होता, पण मार्ग मिळत नव्हता. उमेश आणि सागर दोघांचेही नातेवाईक गावाकडे ठणठणीत होते, तर छाया शहरात वाढलेली. मृत्यू हा इतक्या जवळून अनुभवण्याची ही तिघांचीही पहिलीच वेळ होती. त्यामुळे तिघेही गांगरलेले आणि एकमेकांच्या आधारासाठी चाचपडणारे.
छायाची अवस्था बिकट होत चाललेली होती. कधी कधी तर तिला वेड तर लागलेले नसेल ना अशी शंका येण्याइतपत ती हायपर होत होती. शेवटी डॉक्टरांच्या सल्ल्याने उमेश तिला हवापालटासाठी घेऊन गेला आणि सागरचे मन जरा स्थिरावले. अर्थात रोज उमेश समोर दिसत नसला, तरी त्याचे विचार मात्र सागरची पाठ सोडत नव्हते. विचारांच्या नादात आपण उमेशच्या घरापाशी कधी पोहोचलो हे देखील सागरला कळले नाही. व्हरांड्यात आराम खुर्ची टाकून उमेश शांतपणे डोळे मिटून पहुडला होता. त्याच्या चेहर्यावरचे निरागस भाव पाहून सागरच्या घशात आवंढा दाटून आला. जड पावलांनी अंगण ओलांडून तो आत आला आणि त्याचे पाय जागच्या जागी खिळले. दिवाणखान्यातून छायाच्या अंगाई गुणगुणण्याचा आवाज बाहेरपर्यंत येत होता…
सागरने पुढे होत हलकेच उमेशच्या खांद्याला स्पर्श केला आणि उमेश प्रचंड दचकला. खुर्चीतून पडता पडता सागरने त्याला सावरले. काही क्षण गेले आणि उमेश भानावर आला.
`अय्या! सागर तू कधी आलास? अरे, फोन तरी करायचास ना.’ खोट्या खोट्या रागाने छाया म्हणाली आणि सागर तिच्या तोंडाकडे पाहत राहिला. आठवड्याभरापूर्वीची छाया ती हीच का असा त्याला प्रश्न पडला होता. खचलेली, चेहर्याची रया गेलेली आणि अवघ्या एका दिवसात जणू दहा वर्षांनी वयस्क झालेली छाया कुठे आणि आज छानशी नटलेली, चेहर्यावर आनंदाचे रंग पसरलेली ही उत्साही छाया कुठे! त्याला काय बोलावे तेच सुचेना झाले.
`बरं, तुम्ही जय विरू बसा गप्पा मारत. मी स्वयंपाकाचं बघते पटकन. उमेश थोडं आत पण लक्ष ठेव हां! गप्पांमध्ये एकदा गुंतलात की, भान राहत नाही तुम्हा दोघांना,’ डोळे मिचकावत छाया म्हणाली आणि स्वयंपाकघराकडे वळली.
`नाही. आम्ही इथे अंगणातच फिरतो जरा. लक्ष राहील माझं. तू नको काळजी करू,’ चेहर्यावर हास्य आणत उमेश म्हणाला. का कोण जाणे ते हास्य सागरला उगाच ओढून ताणून आणल्यासारखे भासले.
`उमेश, अरे, छायामध्ये अचानक इतका बदल? म्हणजे तशी आनंदाची गोष्ट आहे, पण हे एवढ्या लवकर तू जमवलेस कसे काय?’ सागरने इतक्या वेळ आवरलेला बांध आता मोकळा सोडला.
`आनंदाची नाही, काळजी करण्यासारखी गोष्ट आहे सागर. जर खरी गोष्ट कळली, तर तुझ्या पायाखालची जमीन हादरेल, जशी माझ्या हादरली आहे,’ सागरचे हात घट्ट हातात घेत उमेश म्हणाला. त्याच्या हाताची थरथर सागरला सहज जाणवत होती. उमेशच्या डोळ्यातली भीती काही वेगळेच सूर लावत होती.
`उमा… काय झालंय ते नीट सांगशील का?’
उमेशने एकदा घराच्या दिशेने नजर टाकली आणि थरथरत्या स्वरात बोलायला सुरुवात केली, `डॉक्टरांनी मला छायाला बाहेरगावी नेण्याचा सल्ला दिला होता हे तर तुला माहिती आहे. खूप विचार करून शेवटी मी माझ्या मामांच्या मित्राचे वेळणेश्वरला गेस्ट हाऊस आहे तिथे जाण्याचा निर्णय घेतला. शांत वातावरण आणि अथांग पसरलेला समुद्रकिनारा. कामावर ठेवलेली नवरा बायकोची जोडी सोडली तर माणसांचा फारसा राबता देखील नाही. ते ठिकाण मला अगदी योग्य वाटले. छायासाठी आणि माझ्यासाठी देखील.
`हो मला कल्पना आहे. तुम्ही दोघांनी एकमेकांना जास्तीत जास्त वेळ द्यावा, आधार द्यावा अशी त्यामागे कल्पना होती. त्यामुळे मी देखील तुमच्या सोबत येणे टाळले. पण तिथे असे घडले तरी काय नेमके?’
`पहिले दोन तीन दिवस छाया इथे होती त्याच अवस्थेत होती. दिवस दिवस शून्य नजरेने कुठेतरी बघत असायची. तहानभुकेची पर्वा नाही, कोण काय बोलतंय त्याकडे लक्ष नाही असे सगळे सुरू होते. मग मी बळजबरीने तिला समुद्रकिनारी न्यायला सुरुवात केली. आधी तिने आढेवेढे घेतले, मात्र, नंतर त्या समुद्राची तिला काय भूल पडली कल्पना नाही. संपूर्ण दिवस अन् दिवस ती किनार्यावर बसून लाटांचा खेळ बघत असायची. कधी कधी तर तिची पापणी देखील लवत नाही असे वाटायचे. मला जरा काळजी वाटत होती, पण दुसर्या बाजूला छाया पुन्हा माणसात येते आहे, असे देखील वाटायला लागले होते. तिने वेळच्या वेळी जेवायला, चार शब्द बोलायला सुरुवात केली होती. मी देखील आता सावरायचा प्रयत्न करू लागलो होतो.
पण एके रात्री मला अचानक जाग आली तर छाया माझ्या शेजारी नव्हती. मी संपूर्ण घर शोधले आणि शेवटी समुद्राकडे धाव घेतली. छाया तिच्या नेहमीच्या आवडत्या खडकावर बसली होती. तिच्या कुशीत काहीतरी आहे असे लांबून जाणवत होते. मी तिच्याकडे धाव घेतली. तिच्या कुशीत तिने बाळाचे अंगडे टोपडे घट्ट धरलेले होते आणि ती त्याच्याशी बाळ समजून खेळत होती…’ हे सांगताना रात्रीच्या गारव्यात देखील उमेशचा चेहरा घामाने ओला झाला होता. जणू तो प्रसंग तो पुन्हा अनुभवत होता.
`उमेश.. अरे असे होते बरेचदा. पण छाया आता किती आनंदात आहेस बघतो आहेस ना? तो एक सुखाचा क्षण तिच्यासाठी किती महत्त्वाचा ठरला बघ.’
`तो एक क्षण नव्हता सागर..’
`म्हणजे?’
`त्या रात्री मी छायाला घेऊन गेस्ट हाऊसला परत आलो. ती रात्रभर त्या कपड्यांना थोपटत होती, कुरवाळत होती तर कधी हलक्या आवाजात अंगाई गात होती.’
`छायाच्या डोक्यावर परिणाम झालाय असे वाटतंय का तुला?’
`तसे झाले असते तरी एकवेळ चालले असते सागरा.’
`म्हणजे?’
`छायाचे हे खूळ अजून एखादा दोन दिवस टिकेल आणि एकदा परत आलो की, ती
नॉर्मल होईल असे मला उगाचच वाटत होते. मी डॉक्टरांशी देखील बोललो. पण…’
`पण काय उमेश?’
`परवा रात्री छाया नेहमीप्रमाणे तिच्या बाळाला थोपटत झोपी गेली. तिच्या काळजीत मी जागाच होतो. हवा काहीशी कोंदटल्यासारखी वाटायला लागली म्हणून मी छायाच्या बाजूची खिडकी उघडायला गेलो आणि..’
`आणि??’
`मला एका लहान मुलाच्या नाजूक आवाजात रडण्याचा आवाज ऐकू आला,’ उमेशने सागरचे दोन्ही हात पुन्हा घट्ट हातात घेतले तेव्हा ते घामाने पूर्ण ओले झाले होते.
– – –
`अद्वैत शंकरपाणी’
नावाची पाटी एकदा मनाशी वाचत उमेशने सागरकडे बघितले.
`सागर, तुला खात्री आहे हा माणूस आपली मदत करू शकेल?’
`प्रोफेसर अनिरुद्धांनी रेफरन्स दिलाय म्हटल्यावर खात्री बाळगायलाच हवी!’ दोघांनी दाराची बेल वाजवली आणि एका प्रसन्न चेहर्याच्या तरुणाने दार उघडले.
`शंकरपाणी सर आहेत का?’ सागरने विनम्रपणे विचारले.
`आहेत ना. तुमच्या समोर उभे आहेत,’ मिश्किलपणे तो तरुण म्हणाला आणि दोघे भांबावले.
या बसा. मी अद्वैत शंकरपाणी. तुम्ही एखाद्या पांढरीशुभ्र दाढी वाढलेल्या, कफनी घातलेल्या माणसाचे चित्र मनात रंगवले होते का?’ अद्वैतने विचारले आणि उमेश अन् सागर काहीसे लाजले. अगदी अद्वैत म्हणतो तसेच्या तसे चित्र त्यांनी रंगवले होते असे नाही, पण समोरचा माणूस अद्वैत शंकरपाणी असेल हे त्यांच्या कल्पनेत देखील आले नव्हते.
`मला प्रोफेसर अनिरुद्धांनी थोडी कल्पना दिली आहे. पण तुमच्या तोंडून मला सर्व काही पुन्हा ऐकायचे आहे,’ अद्वैतच्या शब्दांमध्ये एक प्रकारचे चैतन्य होते, संमोहन होते. भारावल्यासारखा उमेश बोलायला लागला.
`सागर?’ प्रश्नार्थक चेहर्याने उमेशचे बोलणे संपल्यावर अद्वैतने सागरकडे पाहिले.
`काल रात्री मी स्वत:च्या कानाने बाळाचा आवाज ऐकला,’ कोरड्या पडलेल्या ओठांवर जीभ फिरवत सागर म्हणाला आणि काहीशी खेदाने मान हालवत अद्वैतने डोळे मिटले आणि मान मागे टेकवली.
`अद्वैत… हा सामूहिक भास तर नसेल?’ सागरने चाचरत विचारले.
`नाही. मला तसे वाटत नाही. हा मला जरा वेगळा प्रकार वाटतो आहे. प्रत्यक्ष भेट देऊन खात्री करावी लागणार आहे.’
`वेगळा प्रकार म्हणजे? भूत, आत्मा असे काही?’ उमेशने काळजीच्या सुरात विचारले.
`भूत, आत्मा, पिशाच्च, यक्ष, गंधर्व ही आपण माणसांनी आपल्या सोयीसाठी दिलेली नावे आहेत उमेश. सद्शक्ती आणि वाईट शक्ती हे त्याचे मूळ रूप. आपण त्याला प्रकाश आणि अंधार असे देखील म्हणू शकतो. या शक्ती मानवी रूपातच समोर येतील असे नाही. त्या कधी आकार घेतात तर कधी निराकार असतात. आपण आपल्या बुद्धीने, भयाने त्यांना एक रूप देत असतो.’
`छायासोबत नक्की काय घडते आहे अद्वैत?’
`मनाची ताकद अफाट असते सागर. इच्छाशक्तीच्या जोरावर माणूस पर्वत हलवू शकतो असे म्हणतात ते उगाच नाही. एखादा अपंग व्यक्ती इच्छाशक्तीच्या जोरावर भला मोठा पर्वत देखील सर करतो. पण ही इच्छाशक्ती, ध्यास प्रत्येकवेळी सुयोग्य ठिकाणी जाईल असे नाही आणि तिला प्रत्येक वेळी प्रकाशाचीच साथ मिळेल असेही नाही. छायाने देखील तिच्या गेलेल्या मुलाचा असाच ध्यास घेतलेला होता आणि त्या माऊलीच्या आर्त सादाला बहुदा अंधाराचा प्रतिसाद मिळाला आहे. समुद्र अनेक गोष्टी पोटात सामावत असतो आणि काही वेळा बाहेर देखील फेकत असतो. छायासोबत जे आले आहे, ते बहुदा या समुद्राचीच भेट आहे. मी प्रत्यक्ष बघेन तेव्हा खात्री करेन.’
`छायाला या सगळ्यात काही धोका नाही ना? या सगळ्यातून तिची सुटका होईल ना?’ उमेशने अगतिकपणे विचारले.
`माझे ज्ञान, माझा अभ्यास परिपूर्ण आहे असे मी म्हणणार नाही. पण माझ्याकडून शक्य ते सर्व प्रयत्न मी नक्की करेन उमेश. आधी मला एकदा छायाला भेटू दे.’
– – –
व्यवसायातील मित्र अशी अद्वैतची ओळख उमेशने छायाला करून दिली. अगदी जुजबी बोलणी झाली दोघांच्यात आणि अद्वैतने निरोप घेतला. अद्वैतला संभाषणात कमी आणि निरीक्षणात जास्त रस होता.
`उमेश, तुम्हाला कळेल अशा सोप्या भाषेत सांगायचे, तर आपण वावरतो ते फक्त एक विश्व नाही. या विश्वामध्ये अनेक विश्वं सामावलेली आहेत. हे विश्व स्वतः कुठल्या एका विश्वात सामावलेले आहे. पण या प्रत्येक विश्वाला एक सीमारेषा आहे आणि तिचे उल्लंघन करण्याची कोणालाही परवानगी नाही. विश्वाच्या प्रत्येक मितीला स्वतःचे असे नियम आणि कायदे आहेत. आपल्या विश्वाचा भाग नसलेले परंतु ज्या विश्वात आपल्याला प्रवेश नाही, अशा विश्वातले कोणीतरी छायाच्या हाकेला प्रतिसाद देत इथे प्रकटले आहे. त्याला या विश्वात थारा नाही. त्याला परत पाठवण्यासाठी मला काही उपाययोजना कराव्या लागतील आणि त्यासाठी तुला छायाला इथे माझ्या संरक्षित वास्तूत आणावे लागेल.’
– – –
कुठलेही पंचकोन, त्रिकोण नाहीत, हळदी कुंकवाच्या रेषा नाहीत. एक साधा चौरंग आणि त्यावर अंथरलेले नक्षीदार कापड. सहज घरगुती बैठक असल्यासारखे आम्ही गप्पा मारत बसलो होतो. अद्वैतने आग्रहाने छायाला त्या चौरंगावर बसवले होते. तिच्या कुशीत तिचे बाळ अर्थातच होतेच. आनंदी चेहर्याच्या छायासाठी सागर आणि उमेशच्या हृदयात मात्र करुणा दाटलेली होती. बोलता बोलता अद्वैतने काय मोहिनी घातली कळली नाही, पण छाया एकदम स्थिर झाली होती. कुठल्याशा अनामिक भीतीने तिने ते अंगडे-टोपड्याचे बाळ छातीशी घट्ट धरून ठेवले होते. काही एका मंत्रोच्चारानंतर अद्वैतने दोन्ही हात छायाच्या समोर धरले आणि क्षणात तिच्या कुशीतले ते कपडे जोरदार फडफडायला लागले. काही क्षणात त्यांचे एका धुराच्या लोटात रूपांतर झाले आणि ते छताकडे खेचले जाऊ लागले. छाया जिवाच्या आकांताने तो धूर कवेत घेण्याचा प्रयत्न करत होती, पण ते शक्य होत नव्हते. बघता बघता धुराचे लोट नाहीसे झाले आणि छाया भान हरपून जमिनीवर कोसळली.
अवघ्या काही काळात एका मागे एक दोन धक्के पचवणे छायासाठी सोपे नव्हते. मात्र या धक्क्यानंतर तिच्यासोबत उमेशच्या जोडीने अद्वैत भक्कमपणे उभा होता. छायाची समजूत काढण्यासाठी, तिला वास्तवाचे भान करून देण्यासाठी दोघांना प्रचंड कष्ट घ्यावे लागले, पण ते त्यांनी आनंदाने घेतले. अद्वैतच्या संयमी आणि शांत वृत्तीने, उचित ज्ञानाने आपले काम चोख पार पाडले आणि छाया पुन्हा एकदा माणसात आली. पुढे दीड वर्षात उमेश आणि छायाच्या घरात पाळणा हालला आणि दोघांनी एकमताने बाळाचे नाव अद्वैत ठेवले. सागरची गाडी देखील सुरळीत चालू झाली. फक्त कधी कोण्या बाळाच्या रडण्याचा आवाज कानावर पडला, तर मात्र त्याच्या शरीरावर उठणारा काटा आजही कायम आहे.