आमच्या घरातल्या लहान मुलाचं खेळण्यातलं रेल्वे इंजीन कुठेही भरकटतं… इकडे सोडलं की तिकडे जातं… तरी मुलगा वेगळ्या खेळण्याशी खेळायला तयार होत नाही. काय करायचं त्याचं?
– पार्थ शेळके, पाथर्डी
कदाचित नुसत्याच भोंग्याशी खेळून ‘तो’ कंटाळला असेल आणि ‘रेल्वे इंजिन’ चालवायला ‘त्याला’ योग्य ट्रॅक सापडत नसेल. त्याच्यावर लक्ष ठेवा. नाहीतर तुमचे विरोधक त्याला चुकीचा ट्रॅक दाखवतील आणि तुमच्या घराण्यात महाभारत घडेल ‘पार्थ’ (तुमच्या नावावरून सुचलं म्हणून सांगतोय, त्या लहान मुलाला, त्याच्या काकांनी त्यांच्या मुलाला दिलेल खेळणं हवंय का? घराण्याची भांडण चुलतभावांमध्येच होतात… हे तुम्हाला सांगतोय कारण तुम्ही पाथर्डीचे असलात तरी पार्थ आहात. म्हणून तुम्हाला सावध करतोय.)
आमच्या गल्लीतला एक दांडगट मुलगा दोन मुलांच्या दप्तरांतून पेन्सिली, कंपास, वह्या आपण चोरून आणल्या म्हणून कौतुकाने सांगत असतो. अशांचे आईवडील कानफटवत का नाहीत वेळीच मुलांना?
– राहुल पोंक्षे, डोंबिवली
तो दांडगट मुलगा ज्या शाळेत शिकतो त्या शाळेचे हेडमास्टर त्या मुलाचे आईवडीलच असतील. ते सांगतील तेच मुलगा करत असेल. मग आईवडील कशाला मरायला कानफटवतील? उलट मुलगा आपल्यापेक्षा तरबेज होऊ नये म्हणून, वही पेन्सिल चोरणार्या आपल्या मुलाला मॉनिटर न करता, चोरी करायला मदत करणार्या मुलांना मॉनिटर आणि उपमॉनिटर बनवत असतील आणि आपले आई-वडील शाळेचे हेडमास्टर असूनही आपण एका वर्गाचे मॉनिटर बनू शकलो नाही, हे दुःख पचवण्यासाठी, आपण वह्या पेन्सिली दोन मुलांच्या दप्तरातून चोरल्या, हे तो बिचारा मनावर दगड ठेवून सांगत असेल. पण ते तो कौतुकाने सांगतोय, असं तुम्हाला उगाच वाटत असेल.
निवडणुकीच्या काळात राजकारणी मंडळींचा अभिनय पाहून तुम्हा रंगभूमीवरच्या अभिनेत्यांना, रंगधर्मींना कधी न्यूनगंड येत नाही काय?
– आरती म्हात्रे, उरण
येतो ना न्यूनगंड… आम्हा अभिनेत्यांना पेमेंट एन्व्हलपमध्ये मिळते… खोक्यामध्ये मिळत नाही… याचा न्यूनगंड येतो.
२०१४चे भ्रष्टाचारी २०२४मध्ये शुभ्र धवल बनून गेले आहेत… याचं रहस्य काय असावं?
– नरेंद्र बंडाळे, इगतपुरी
का? तुम्हाला पण शुभ्रधवल बनायचं आहे का? पण त्याची गरज नाही. तुमच्या रंगाविषयी कोणी शंका घेतली तर फक्त तुम्ही तुमच्या नावाचा जप करा.. नरेंद्र.. नरेंद्र.. नरेंद्र.. (आडनाव चुकूनही बोलू नका.. बंडाळे बोलायला जाल आणि लोकांना फक्त ‘बॉण्ड’ ऐकायला येईल आणि उगाच उघडे पडाल. म्हणतात ना कमावून गेला गाव आणि बंडाळेंचं नाव.. असं होईल.)
तुमच्या लग्नाचा फोटोंचा आल्बम, व्हिडिओ कॅसेट वगैरे आता पाहताना मनात नेमक्या काय भावना येतात? खरं खरं सांगा.
– ऋचा दुसाने, भोकरदन
लग्नाची कॅसेट बघताना असं वाटतं की ते ‘ए आय’ का काय म्हणतात ना. ती टेक्नॉलॉजी शिकावी आणि लग्नाच्या कॅसेटमधील ‘नको ती’ व्यक्ती बदलून तिच्या ऐवजी ‘हवी ती’ व्यक्ती इन्सर्ट करावी.. सासू हो.. दुसरी कोणी नाही (जे शक्य आहे तेवढ्याच भावना मनात येतात. आमच्या मनातल्या भावनाही आमच्या लिमिटच्या बाहेर जात नाहीत.)
अलीकडच्या काळात ऐतिहासिक व्यक्तींवर, घटनांवर एकांगी सिनेमे काढून तोच इतिहास म्हणून खपवण्याची टूम निघाली आहे. माझ्या मुलीच्या शाळेतले वर्गमित्रही हाच बोगस इतिहास खरा मानून मतं बनवू लागले आहेत. ही देशाच्या तरुणाईचे मेंदूच खाऊन टाकणारी कीड रोखायची कशी? सॉरी, जरा गंभीर प्रश्न आहे, पण…
– मुकुंद शिरगावकर, चिपळूण
तुमचा प्रश्न गंभीर आहे.. पण बरीचशी तरुणाई तो सिरियसली घेत नाही (हे असे चित्रपट कसे तोंडावर आपटतात त्यावरून कळतं). उलट आतापर्यंत ‘खोटे’ लोक कसे ‘मोठे’ केले जात होते, पण ते किती ‘छोटे’ होते ते आता लोकांना कळायला लागलंय.
ते तिघे कायम एकत्र असताना एकमेकांविषयी गोड बोलतात आणि पाठ वळली की मात्र एकमेकांची उणीदुणी काढायला लागतात, एकमेकांना खड्ड्यात घालण्याच्या योजना आखायला लागतात… यांना मित्र म्हणायचं की शत्रू?
– नारायण पाटील, इंदापूर
ते तिघे कोण ते आधी क्लिअर करा. (पण तुम्ही म्हणता तसे लोक कधीच कोणाचे शत्रू किंवा मित्र नसतात. ते संधीसाधू असतात.) तुम्ही म्हणतातय ‘त्या’ तिघांचा डीएनए किंवा काय म्हणतात तो ‘एनडीए’च तसा असेल त्याला तुम्ही आम्ही काय करणार?