आजकाल काही लोकांचा पद हा श्वास वाटू लागला आहे. पद नसलेला कार्यकर्ता पाण्यातून बाहेर काढलेल्या माशासारखा तडफडत असतो. कारण पदामुळे जी (खोटी) प्रतिष्ठा लाभते व जी अनिवार्य प्रसिद्धी मिळते त्यामुळे दीडफुटी व्यक्तीही आकाशाला हात लागल्यासारखी वावरते. महत्वाकांक्षेच्या आकाशाला गवसणी घालू लागते. काही रिकामटेकडी मंडळी सोबत घेऊन त्यांना अंधभक्त बनवायचे व स्वत:ची टिमकी वाजवून घ्यायची. आपला स्वतंत्र गट निर्माण करून स्वत:वर सम्राट म्हणून अभिषेक करवून घ्यायचा. ठिकठिकाणी बॅनर्स होर्डिंगवर स्वत:च्या पैशाने स्वत:ची छबी मोठी व इतरांची मुंडकी (कालीमातेच्या गळ्यातील मुंडक्यांप्रमाणे) बॅनरच्या चौफेर लटकवायची. प्रसंग कोणाच्याही जयंती, पुण्यतिथीचा असो, हे साहेब बॅनरवर अवतरतातच. हे पैसे कुठून येतात? हा प्रश्न विचारणार्यांना मूर्खात काढणारे त्यांचे क्वार्टरबाज ट्रोलर चेले तुटून पडतात व आपल्या ‘सम्राट’ नेत्याची लालेलाल करतात.
या तथाकथित नेत्यांनी आपल्या जन्मदात्या माता-पित्याचा असा वाढदिवस साजरा केलेला दिसत नाही; मात्र दरवेळी बाप बदलणारे आपल्या मानलेल्या बापाची जयंती पुण्यतिथी मात्र इमाने इतबारे साजरा करतात.
जसा एखादा पुरस्कार मिळाल्याने पुरस्कारार्थींची शान वाढते तसेच एखादे पद मिळाल्यावरही यांची मान ताठ होते. जसे पुरस्कार विकत वा मॅनेज करून मिळवले जाण्याची अनेक उदाहरणं आढळून येतात, कोणालाही पीएचडी वा समाजरत्न, समाजभूषण पैशाच्या मोबदल्यात मिळतात, तसेच पदंही विकत घेता येतात. सध्या तर इतर पक्षातून ऐनवेळी एखाद्या पक्षात घुसखोरी करताच क्लीन चिटबरोबर निवडणुकीचे तिकिटही बहाल केले जाते. त्या पक्षातील निष्ठावंत व कर्तृत्ववान कार्यकर्त्यांच्या महत्वाकांक्षा कबरीत गाडून त्या थडग्यावर असे आयतोबा, आयाराम उभे राहून त्यांना हिणवत असतात.
एखाद्याला पद बहाल केलं जाणं हा त्याच्या कर्तृत्वाचा तसेच निष्ठेचा सन्मान असतो. त्याचप्रमाणे त्याच्या कार्यक्षमतेवर पक्ष नेतृत्वाने दाखवलेला विश्वास असतो. कोणत्याही पक्ष संघटनेत पदाची रचना चढत्या क्रमाने असते. आपल्या पदास उचित न्याय देणार्यास पदोन्नती मिळत जाते. उदा. कार्यालयप्रमुख, उपशाखाप्रमुख, शाखाप्रमुख, विभागप्रमुख, उप शहर संघटक, शहर संघटक, उप जिल्हाप्रमुख व जिल्हाप्रमुख व मग पुढे उपविभागीय नेता, उपनेते, नेते अशी चढती श्रेणी असते. कोणत्याही पक्ष संघनेत असे टप्पे पार करून वरच्या पदापर्यंत मजल मारणारे नेते परिपक्व असतात व पक्षनिष्ठा त्यांच्या रोमारोमात भिनते. ते कितीही प्रतिकूल परिस्थिती आली तरी पक्ष संघटनेशी एकनिष्ठ राहतात. आज शिवसेना एका संक्रमण काळातून जात असली तरी ती कमकुवत का झाली नाही, याचे उत्तर या संरचनेत दडलेले आहे.
जायंट्स इंटरनॅशनल व लायन्स क्लब या सेवाभावी संस्थांमध्येही चढत्या श्रेणीची पद संरचना असते. स्थानिक शहर शाखेच्या सदस्यापासून सुरू झालेला प्रवास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील पदांपर्यंत जाता येते. मात्र त्यासाठी निष्ठा, चिकाटी, समर्पण भावना व कार्य कौशल्य या गुणांची आवश्यकता असते. येथे निवडणूक न होता सर्वानुमते निवड होते. वर्षाचा कालबद्ध कार्यकाळ असतो. येथे हार-जीत, स्पर्धा हा प्रकार नसतो. उगवता अध्यक्ष व कार्यकारी मंडळास मावळते अध्यक्ष व कार्यकारिणीचे सदस्य हसतमुखाने पदभार सोपवतात. त्यांचा सन्मानाने शपथविधी होऊन खुर्चीवर विराजमान केले जाते. येथे पदाचा मोह नसतो तर पदमुक्ती व पदग्रहणाचा आनंद दोन्ही बाजूच्या सदस्य, पदाधिकार्यांच्या चेहर्यावर विलसत असतो व हा समारंभ आनंदात साजरा केला जातो. इतके सौहार्दपूर्ण वातावरण राजकारणात आले पाहिजे. ठराविक काळानंतर पद त्याग करून नव्या जोमाच्या लोकांना पदं दिली गेली पाहिजेत. परंतु राजकारण्यांचा पदांचा मोह अखेरपर्यंत सुटत नाही.
पद याचा अर्थ प्रतिष्ठा. पद याचा अर्थ जबाबदारी, पद याचा अर्थ नेतृत्व, पद याचा अर्थ सर्वांना सोबत घेऊन पक्षाचं वा संस्थेचं नेतृत्व करून त्यांना प्रगती पथावर नेणे. परंतु सध्या पद म्हणजे कॉलर टाईट करून समाजात व व्यासपीठावर वावरण्याचे साधन/माध्यम. पद म्हणजे आडमार्गाने पैसे कमावण्याचे साधन. अनेक शेळपट व कर्तृत्वहीन लोक व्यासपीठावर खुर्ची अडवून ठोंब्यासारखे बसतात. चकार शब्दही न उच्चारता फक्त फोटोपुरते व समाजमाध्यमांवर दिसण्याच्या आशेने आशाळभूतपणे बसलेले असतात. काही लोकांना तर न येण्याचे व बोलण्याचे आदेश अदृश्य शक्तीने दिलेले असतात व त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणारे लोक निर्लज्जपणे पदं अडवून ठेवतात व स्वत:ला निष्ठावंत म्हणवून घेतात.
ज्यांच्यात प्रतिपक्षाशी थेट भिडण्याची, आव्हानांना प्रतिआव्हान देण्याची धमक असेल त्यांनाच पद शोभून दिसते अन्यथा ते नुसते कुंकवाचे धनी ठरतात. कर्तृत्वात व वक्तृत्वात धमक असेल त्यांनी पद घ्यावे व त्यांना ते शोभते. अन्यथा एखाद्या विधवा महिलेच्या कपाळावरील कुंकू व यांच्यात काही फरक नसतो. पद वा पुरस्कार हा सन्मानपूर्व व चालत आला पाहिजे. विकत तर स्मशानातील लाकडंही मिळतात. पदामुळे त्या पक्षाची शान वाढली पाहिजे, पदामुळे कार्यकर्त्यात उत्साह संचारला पाहिजे, एक लढाऊ व आदर्श नेता लाभल्याची भावना निर्माण झाली पाहिजे. दोन दगडांवर पाय ठेवणारे व गद्दारीची पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीस पद देणं ही विषाची परीक्षा तर ठरतेच तसेच निष्ठावंतांचा अवमानही ठरतो.
ही व्याधी कोणत्याही एका पक्षात नाही तर ती सर्वच पक्षांना लागलेली आहे. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, अशोक चव्हाण, नवनीत राणा, रवींद्र वायकर, कंगना राणावत, गोविंदा, यासारख्यांना पदं उमेदवारी देऊन निष्ठाशून्य लोकांना आपण प्रतिष्ठा मिळवून देत आहोत व निष्ठावंतांना डावलत आहोत, त्यांचे खच्चीकरण करीत आहोत, याचे भान राजकीय पक्षांना जेव्हा येईल तोच लोकशाहीसाठी सुदिन ठरेल.