मशाल
कितीही निशाण्या चोरा तुम्ही
अमर आहे सेनेचा आत्मा
करून टाकील त्या तेजाने
कायमचा तो तुमचा खात्मा
अंधेरीची पोटनिवडणूक
आठवते ना मशालीची धग
कशी जाहली शिंदेगटाची
अभूतपूर्व ती भागंभाग
उसने अवसान टिकतच नाही
शेवटी चोरांचाच बाजार
धनुष्य-वजनाने कोसळती
बाण लागूनी ते लाचार
—– —– —–
घड्याळ
दादा तुमचे घड्याळापरी
वाजले कायमचे ना बारा
धा धा विसरा, हातपाय पसरा
पक्षाचे झाले तीन-तेरा
कशी चोरता पक्षासह ती
काकांची ती अमर निशाणी
कुचकामी ना घेईल बदला
मार खाऊनी मागाल पाणी
बेइमानी; जनतेला कळते
चोर-साव ती पुरी ओळखते
तुतारीचा त्या घोष ऐकूनी
घड्याळ तुमचे का थरथरते
—– —– —–
तुतारी
घड्याळ-चोरी झाली तेव्हा
मला मिळाला मोठा मान
आता फुंका प्राणपणाने
पुतण्याचे त्या बसतील कान
कसे भोवती हे काकांना
उपकाराची नाही जाण
कृतघ्नतेचा कळस गाठूनी
करती फितुरीवरती ताण
स्वार्थ आंधळा नडेल त्यांना
असंगांशी तो करूनी संग
विकली नाती स्वार्थापायी
रंगाचा होईल बेरंग
—– —– —–
धनुष्यबाण
लेचेपेचे चोर भ्रष्ट हे
नाही कोणी येथे अर्जुन
कसे पेलतील बाणासह ते
माझे विस्मयकारी वजन
उचलण्यास जातील जेव्हा ते
पडेन त्यांच्या छाताडावर
आठवेल तेव्हा ती गद्दारी
आणिक पापांचे ते डोंगर
हावरट झाले सत्तेपायी
विकले आपले सर्व इमान
मला समजले कोणा हाती
खरा शोभतो धनुष्यबाण
—– —– —–
कमळ
भ्रष्टाचाराच्या चिखलातच
भिजल्या माझ्या रम्य पाकळ्या
भरून टाकल्या त्या उपर्यांनी
खुडून अपुल्या भ्रष्ट पोकळ्या
नाही उरली पवित्रता ती
आठवती ना जुने दिवस ते
आता देठासकट उपटती
भ्रष्टाचारी चोर निकट ते
विटंबना माझ्या देहाची
टपले त्यावर भ्रष्टाचारी
कसे किती मी साहू त्यांना
आमच्या नेत्यांचीच लाचारी