शालिनीताई पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर टाकलेल्या जबरदस्त बॉम्बगोळ्यामुळे माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या याला मोठा उत्साहाचा झटका आला. राजकारणात काही सनसनाटी घडलं की पोक्याच्या अंगात उत्साह संचारतो आणि तो मुलाखतींच्या मोहिमेवर निघतो. महाराष्ट्र राज्य सहकारी शिखर बँकेच्या २५ हजार कोटींच्या घोटाळ्याचे खरे सूत्रधार अजितदादाच असून ते या प्रकरणात येत्या चार महिन्यात तुरूंगात जातील, असं भाकीत शालिनीताईंनी केल्यानंतर पोक्या या भविष्याचे काय पडसाद उमटतील याचा अंदाज घेण्यासाठी राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी निघाला. त्याच या प्रतिक्रिया…
– नमस्कार शरदराव पवारजीसाहेब. शालिनीताईंनी अजितदादांवर…
– त्याचं नाव घेऊ नका. तो तुरूंगात जाऊं दे नाहीतर म्हशीच्या गोठ्यात जाऊं दे. त्याच्याबद्दल मला काहीही विचारू नका.
– तरीही…
– माणसाला जसं कर्म तसं फळ मिळतं. या तुम्ही.
– नमस्कार आव्हाडसाहेब. शालिनीताईंनी…
– समजलं.
– त्यांना कुठल्या तुरूंगात ठेवतील?
– मी काय तुरूंग अधिकारी वाटलो तुला? जो थोरल्या पवारसाहेबांशी गद्दारी करतो, तो बाराच्या भावात जातो, एवढंच मी तुला सांगतो. ते आर्थर रोडच्या तुरूंगात गेले काय, तिहार तुरूंगात गेले काय, नाही तर येरवड्याच्या तुरूंगात गेले काय, मला काहीही फरक पडत नाही. शेवटी खोट्याच्या कपाळी गोटाच येतो. या तुम्ही.
– नमस्ते भुजबळसाहेब. अलीकडेच शालिनीताईंनी…
– शेवटी ते आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्याविषयी कोणीही वाटेल ती विधाने करू नयेत.
– तुम्हीही तेलगी प्रकरणात बराच काळ जेलमध्ये होता. तिथे राजकीय नेत्यांना सन्मानाने वागवलं जातं का?
– उगाच माझ्या जखमांवर मीठ चोळू नकोस. मला त्या प्रकरणात गोवण्यात आलं होतं. अजितदादांबाबतही तसं म्हणता येऊ शकतं.
– अहो, तसं कसं म्हणता, सज्जड पुरावे मांडलेत कोर्टात. अटक होईल म्हणून भाजपाच्या आश्रयाला आले असं भाजपवालेच म्हणतात. तुमच्याबाबतही तेच म्हणतात.
– खोटं आहे ते. मी थोरल्या पवारसाहेबांबरोबर मनाने कधीच नव्हतो, मी अजितदादांबरोबरच होतो. त्यांचं म्हणणं पटलं म्हणून आम्ही कळप करून भाजप मंत्रिमंडळात गेलो. थोरल्या राष्ट्रवादीत राहून जे मिळालं नाही ते धाकल्यांच्या कृपेनं मिळालं.
– पण आता ही ढकलगाडी फार दिवस टिकणार नाही ना?
– अजिबात नाही. मोदीसाहेबांची कृपा आहे तोवर आमचा गड अभेद्य आहे. त्याला कोणीही भोकं पाडू शकणार नाही.
– नमो नम: फडणवीस साहेब…
– नमो नम: का आलात हे लक्षात आलं.
– तुम्हाला खूपच आनंद झाला असेल ना?
– कशाबद्दल?
– शालिनीताईंच्या त्या वक्तव्याबद्दल.
– मुळीच नाही. कसंही झालं तरी आम्ही दोघे या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहोत. त्यातील एकजण संकटात असेल तर दुसर्याला कसा आनंद होईल? अजितदादांची राष्ट्रवादी हे आमचंही अर्धांग आहे.
– साहेब असं काहीतरी म्हणू नका. झटका वाईट असतो. मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत ते.
– साफ चूक. आमची त्रिमूर्ती आहे. तिला मीच काय कोणीही धक्का लावू शकणार नाही.
– पण शालिनीताईंनी ते तुरूंगात जातील, असं म्हटलंय.
– ही लोकशाही आहे. कुणाला कुणाबद्दल काहीही बोलण्याचं विचारस्वातंत्र्य आहे. त्याचा मी आदर करतो.
– म्हणजे ते जर आत गेले तर तुम्हाला बरंच वाटणार ना मनातून.
– या जर-तरच्या गोष्टीवर माझा विश्वास नाही. माझ्या स्वप्नातही नसताना मला जपानची डॉक्टरेट मिळाली, अजितदादांच्या मनात मुख्यमंत्रीपद असताना त्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळालं ही सारी दैवाची किमया आहे. उद्या अजितदादांवरील संकटाचे ढग विरून जातील आणि भाजपचे आभाळ मोकळं होईल, असा मला विश्वास आहे.
– नमस्कार माननीय मुख्यमंत्री साहेब.
– नमस्कार. काय खाऊन बिऊन आलायस ना? ब्रेड बटर मागवू का? की सॅण्डवीच खाणार?
– साहेब, त्या अजितदादांचं सॅण्डवीच झालंय ते बघा आधी. शालिनीताईंनी अगदी मोक्याच्या वेळी बॉम्ब टाकलाय.
– असं काहीतरी अभद्र बोलू नको. सहकारी आहेत ते आमचे. मी मुख्यमंत्री असूनही त्यांना कधी दुय्यम लेखलं नाही. उलट मनात आलं तेव्हा तर ते माझ्यासाठी असलेल्या खुर्चीवरसुद्धा बसलेले आहेत.
– पण त्या बँक घोटाळा प्रकरणात ते अंदर जातील का?
– मी बोलतो शालिनीताईंशी. मिटवून टाकू आपण. आम्ही कितीतरी मांडवल्या केल्यात अशा. शालिनीताई मोठ्या आहेत तसे अजितदादाही आमच्यासाठी मोठेच आहेत. त्यांचा उत्साह, त्यांचा धडाकेबाजपणा, त्यांचं ‘अर्थ’शास्त्राचं नॉलेज, त्यांचे वक्तृत्त्व, हिशेबीपणा सारं काही माझ्यापेक्षा कितीतरी पट आहे. अशा माणसाला वाचवायला हवा. तर तो उद्या आम्हाला वाचवेल. तू काळजी करू नकोस. मोदीसाहेब आहेत तिथे मार्ग आहे.
– नमस्कार केसरकर साहेब. त्या शालिनीताई…
– एक लक्षात ठेवा, ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या.
– मला शाळेत संस्कृत नव्हतं. फ्रेंच होतं.
– याचा अर्थ तुला सांगूनही कळणार नाही. जोपर्यंत अंड्यातून पिल्लू बाहेर येत नाही तोपर्यंत ती कोंबडा आहे की कोंबडी हे जसं समजत नाही, तसंच आरोप-प्रत्यारोपांचं आहे.
– मी विचारतो काय आणि तुम्ही बोलता काय?
– असंबद्ध बोलण्याच्या स्पर्धेत पहिले आलेत अस्मादिक. तू फुकट जगाची चिंता करू नकोस. तो बसलाय ना डोक्यावरती, तो सगळं पाहील. पळा आता.