`दुनिया वेड्यांच्या बाजार, झांजिबारऽ झांजिबारऽऽ झांजिबारऽऽ’
मिरज हायस्कूलच्या विद्यार्थी वार्षिक स्नेहसंमेलनात आम्ही इयत्ता ९वीमधले विद्यार्थी वाट्टेल तसे वेडेवाकडे नाचत होतो. वेगवेगळ्या सुरात गात होतो. या सगळ्या धागडधिंग्यात एक विद्यार्थी मात्र कोणतेही हावभाव न करता स्थितप्रज्ञासारखा निश्चल उभा होता. तो म्हणजे भैया दातार. ‘पेडगावचे शहाणे’मधला तो सीन आम्ही उत्कृष्टपणे वठवला होता. त्यामुळे एरव्ही कर्दनकाळ भासणार्या गणपतराव दाते मास्तरांनी आम्हाला नावच ठेवले `झांजिबार आणि मंडळी!’
‘पेडगावचे शहाणे’ राजा परांजपे यांचे चित्रपट, त्यांनी गाजवलेल्या भूमिका, त्यांचे दिग्दर्शनकौशल्य आणि एकूणच त्यांचे बहुरंगी व्यक्तिमत्व यांमुळे मुळातच नाटक, सिनेमा, साहित्य, संगीत याविषयी जन्मजातच आवड असलेल्या माझ्यासारख्या विद्यार्थ्याला राजा परांजपे यांनी भारून टाकले आणि आजही ते गारूड माझ्यावर कायम आहे. मिरजेत त्यावेळी सिनेमाची तिकिटे गिन्नी (एक आणा) तीन आणे आणि पाच आणे अशी होती. `हंसप्रभा टॉकीज’, ‘माधव टॉकीज’मध्ये आम्ही मराठी-हिंदी सिनेमे एका गिन्नीत किती-किती बघितले याची मोजदाद करणे अशक्य! हं.प्र.टॉ.मा.सौ.जा.हे. (हंसप्रभा टॉकीज मालक सौभाग्यवती जानकीबाई हेरवाडकर) असं प्रत्येक खुर्चीच्या मागं लिहिलेले असायचं. एक सिनेमा सोडला नाही. हळूहळू लक्षात येऊ लागलं की `राजा परांजपे’ हे रसायन काही वेगळंच आहे. मग त्यांचे चित्रपट मी अधिक बारकाईने बघू लागलो. ‘त्या शाळकरी वयात मला सर्वच्या सर्व आकलन होत होतं आणि ते आजही झालं आहे’ हे विधान मी आजही करणार नाही, पण चित्रपट बघण्याची `नजर’ राजा परांजपे यांच्या भूमिकांनी, त्यांनी निर्माण केलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांनी नक्कीच दिली, हे मी अत्यंत अभिमानाने आणि आनंदाने सांगू शकतो.
मूकपटाच्या काळापासून राजाभाऊ चित्रपटसृष्टीशी संबंधित राहिले आहेत. शालेय अभ्यासाबाबत फारसा उत्साह नसलेले राजा दत्तात्रय परांजपे आईच्या प्रोत्साहनामुळे उत्तम पेटीवादन करू लागले. गाणेही गाऊ लागले. भावे स्कूलच्या स्नेहसंमेलनात नाटकात भूमिका करू लागले. पुण्यातील गणेशोत्सवात विविध नकला करण्यासाठी मंडळे त्यांना बोलावू लागली. मूक चित्रपट बघण्याची आवडही त्यांच्यात निर्माण झाली. पण तिकिटाचे पैसे नसायचे. मग त्यांनी युक्ती लढवली. पडद्यावरील मुकी चित्रे त्यातल्या त्यात बोलकी करण्यासाठी पडद्यावर ज्या पद्धतीचा सीन सुरू असेल त्या भावनेचे संगीत पेटी आणि तबला वाजवून जिवंत करण्याचा प्रयत्न असायचा. त्यासाठी पेटीवाला आणि तबलेवाला पडद्याजवळ ठाण मांडून वादन करायचे. वाजवून वाजवून त्यांना कंटाळा आला, थोडा आराम करावा असं वाटलं की त्यांच्या वादनात खंड पडू नये, म्हणून त्यांची जागा राजा परांजपे आणि तबला वाजवायला लालजी गोखले (नटवर्य चंद्रकांत गोखले यांचे ज्येष्ठ बंधू आणि तिरखवा खाँ साहेबांचे शिष्य) घ्यायचे. त्याचा मोबदला काय मिळायचा तर त्यांना सिनेमाची तिकिटे फुकट मिळायची.
हे चित्रपटाचे वेड पुढे वाढतच गेले आणि राजाभाऊ, मा. विनायक आणि भालजी पेंढारकर यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रपटसृष्टीतही `श्रीगणेशा’ गिरवू लागले. `थोरातांची कमळा’ आणि `सरकारी पाहुणे’ या बोलपटांतून त्यांनी अगदी छोट्या भूमिका केल्याचे मला उत्तम प्रकारे आठवते. त्याआधी ‘सावकारी पाश’ (१९२५) या कलातपस्वी बाबूराव पेंटर यांच्या चित्रपटातही त्यांची भूमिका होती. ‘प्रतिभा’ (१९२७), ‘गोरखनाथ’ (१९४०) अशी छोटी छोटी कामे मिळत गेली.
नटवर्य केशवराव दाते यांनी राजाभाऊ अंगातील बहुरूपी कलाकार हेरला आणि ‘नाट्यमन्वंतर’ या संस्थेने सादर `आंधळ्याची शाळा’ या आधुनिक रंगभूमीचा पाया रचणार्या नाटकात राजाभाऊंचा पेटीवादनाची आणि भूमिका करण्याची संधी दिली. नवीन-नवीन शिकण्याची ओढ या उपजतच वृत्तीमुळे जिथून मिळेल तेथून शिकण्याची राजाभाऊंची अखंड धडपड सुरूच होती. चित्रपटसृष्टीतील मान्यवर आणि हिंदी चित्रपटक्षेत्रातील नजम नक्वी, शौरी, वेदी या दिग्दर्शकांसमवेत त्यांना सहाय्यक दिग्दर्शकाचे काम मिळाले. याचीच परिणती म्हणजे ‘बलिदान’ (१९४७) मराठी, आणि त्याचेच हिंदी नाव `दो कलियाँ’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची संधी त्यांना मिळाली. पाठोपाठ रूपेरी पडद्यावर आला मंगल पिक्चर्सचा ‘जिवाचा सखा’. या चित्रपटाने त्यांना यशाचे दरवाजे किलकिले केले. त्याहीपेक्षा आनंदाची गोष्ट म्हणजे राजा परांजपे, ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके हे सुवर्णाचे बिल्वपत्र मराठी चित्रसृष्टीला गवसले.
राजाभाऊंनी स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी चित्रसृष्टीचे शिल्पकार अशी कीर्ती मिळविली. सुमारे चाळीस वर्षांची चित्रपट कारकीर्द अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, लेखक, काही प्रसंगी गायक लेखकही, अशा वेगवेगळ्या भूमिकेत राजाभाऊंचा ऐंशी चित्रपटांशी संबंध आला. त्यांच्या विनोदाची चार्ली चॅप्लीनच्या शैलीची अधिक जवळीक वाटते. रहस्य, उपहास, मनोविश्लेषण अशा अनेक कथाविषयांवर त्यांनी अनेक चित्रपट केले.
त्यांनी साकारलेल्या काही खास भूमिकांचा आणि दिग्दर्शनाचा माझ्या व्यक्तिगत जीवनावर खोल खोल ठसा आहे. भूमिका गंभीर असो, विनोदी असो, तरूणाची असो, वृद्धाची असो, राजाभाऊ जिवंत आणि सहज अभिनयाने सादर करतात. कृत्रिमतेचा लेशही नाही. `पेडगावचे शहाणे’मधील त्यांची दुहेरी भूमिकाच बघा. `शहाण्या’ परिवाराला सरळ करणारा, त्यांना नकळत शिस्त लावणारा आणि तरूण जोडप्यांचे मनोमीलन घडवून आणणारा, घरातील छोटा धडपड्या मुलगा हा उद्याचा `एडिसन’ आहे असं कौतुक करणारा काका शहाणे आणि त्याचवेळी आफ्रिकेमधून नुकताच परतलेला, अदलाबदली झाल्यामुळे वेड्याच्या इस्पितळात डांबला गेलेला, वैतागलेला त्याचा जुळा भाऊ; किती वेगवेगळ्या छटा! डॉक्टरांनी कात्रीची पाती उघडताच अस्वस्थ झालेला, पुन्हा एकवार वेडाचा झटका आलेला आणि `मालती’ अशी आर्त किंकाळी मारत कोचावर कोसळणारा काका शहाणे! किती ही एकाच माणसाच्या प्रकृतीमधील विविधता.
`जशास तसे’ या चित्रपटातील राजाभाऊंची पिठाची गिरणी चालविणार्या माणसाची भूमिका! अत्यंत बावळा वेश आणि डोळ्यांची सतत उघडझाप करण्याची लकब! राजाभाऊंनी कुठून हा माणूस निरखला असेल, त्यांचे तेच जाणोत, शिवाय ‘पक पक पक पक पकागे पगे, आज नाही कामात उरक’ हे गिरणीच्या तालावरचे गाणे! माझ्या शाळकरी वयात हे गाणे मी साभिनय म्हणत असे आणि हमखास टाळी घेत असे.
`पुढचं पाऊल’मधला मामा चिपळूणकर खास कोकणी. `अरे सखाराम, समोरच्या तमाशा, थिएटरात पन्नास कप चहा, दूध कमी’ असं सानुनासिक सांगणारा आणि खेड्यातून नाव कमवायला आलेला, कृष्णाला धीर देणारा मामा! `फणसाअंगी बहू काटे, आत अमृताचे गोटे’ हे वर्णन या राजाभाऊंनी रंगविलेलल्या मामाला अगदी तंतोतंत लागू पडते.‘लाखाची गोष्ट’ मधील राजाभाऊंच्या अभिनयाची तारीफ मी पामरानं काय करावी? लक्षाधीश बापाची मुलगी दरिद्री चित्रकार प्रियकराला भेटण्यासाठी त्याच्या खोलीवर आली आहे. सर्वत्र गबाळेपणा साठलेला. त्यात या चित्रकाराला तिला चहा करून देण्याची `तलफ’ येते आणि जो गोंधळ सुरू होतो तो प्रत्यक्ष पडद्यावरच बघितला पाहिजे. त्या संबंध सीनमध्ये केवळ दोन किंवा तीन संवाद आहेत. पण राजा परांजपे आणि चित्रा काय धमाल उडवून देतात, पूछो मत! राजाभाऊंचा उडालेला गोंधळ आणि त्याला चित्राची गोड, मधुर, तलम हसण्याची प्रेमळ साथ! `लाखाची गोष्ट’मधील ते स्वप्नदृश्य आजही अंगावर काटा उभा करते. पैसाच पैसा… रुपयांच्या खळखळाट करणार्या राशीच्या राशी… अभिनय, चित्रीकरण, वेशभूषा, रंगभूषा, पार्श्वसंगीत, लेखन, दिग्दर्शन या सर्वच चित्रपटाच्या अंगांनी हे दृश्य म्हणजे वस्तुपाठच आहे.
`ऊन पाऊस’मधील बापू मास्तर काळजाचा ठाव घेतो. बापू मास्तर (राजा परांजपे) आणि त्यांची पत्नी काशी (सुमती गुप्ते-जोगळेकर) यांनी या वृद्ध दांपत्याची छाया-प्रकाश असं अतूट नातं उभी करणारी भूमिका अशी वठवली आहे की त्यांची तगमग पाहून डोळे भरून न येणारा प्रेक्षक विरळाच. फुटलेल्या चष्माच्या काचेतून पत्नीचे पत्र वाचताना केलेली धडपड आणि फोनवर बोलत असताना आलेली खोकल्याची उबळ अशी काही उत्कटतेने राजाभाऊंनी अभिनित केली आहे की वास्तव अभिनयाचे जिते जागते उदाहरण!
`जगाच्या पाठीवर’ आणि `सुहासिनी’ यामधील राजाभाऊंच्या अगदी भिन्न-भिन्न प्रकृतीच्या भूमिका. `जगाच्या पाठीवर’चा दीन, अनाम, अनाथ, भणंग भिकारी आणि ‘सुहासिनी’मधला इतिहास संशोधक गोखले शास्त्री! घरंदाज, सुसंस्कृत कुटुंबातला. ‘धक्का लागला गं मघाशी कुणाचा’ हे गीत गाताना आणि नाचताना आंधळ्या मुलीवर पब्लिक चार-आठ आणे उधळताना पाहून नाराज झालेला पेटीवाला. `कुणा न दिसले, त्रिखंडात या हात विणकर्याचे’ हे गाताना अलवारपणे कापडाच्या तयार झालेल्या गल्ल्यावर हात फिरवणारा वैâदी, ‘उद्धवा अजब तुझं सरकार’ म्हणताना ‘पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणीहार’ ही दुनियेची अजब रीत सांगणारा तो भणंग… आणि आपला एकुलता एक मुलगा रणांगणावर धारातीर्थी पडला आहे हे अतिशय दु:खद वृत ऐकून मुलाच्या बापाची अत्यंत धीरोदात्त शब्दात समजूत घालणारे गोखले शास्त्री!
राजाभाऊंनी अनेक नव्या कलावंताना या रूपेरी पडद्याचे दर्शन घडवलं, त्यांना अभिनय समजावला. नवी पिढी उभारली. अनेक उत्तमोत्तम चित्रपट रसिकांना दिले आणि त्यांची सांस्कृतिक बौद्धिक आणि कलात्मक उंची वाढविली.
गुरुवर्य राजाभाऊ! आपले अनंत उपकार. मी तुमचा `एकलव्य शिष्य’ कधीही विसरू शकणार नाही. आपणांस साष्टांग प्रणिपात!