(मंदिराच्या सभामंडपातील तथाकथित प्रतिष्ठित गावकर्यांची बैठक. समोर अजून बांधकामाच्या विटा, सिमेंट नि सळया अस्ताव्यस्त पडलेल्या. काही गावकरी रंगाचे डबे पालथे घालून त्यावर बसलेले, काही लोखंडी खुर्च्यांवर बसलेले, काही विटांवर तर काही धूळ झटकून खाली बसलेले. पैकी तीन लोखंडी खुर्च्यांपुढे एक रंगानं माखलेला खुब्यात ढिला टेबल ठेवलेला. जो थोड्या धक्क्याने कुरकुर आवाज करतोय. पुढल्या तीन खुर्च्यांवर चोरान्ने पंत, भाजंखर राव, शेंदूर्णेचं दिवटं अर्थात चिरंजीव बसलेले. मागं नरपत मेहेत्रेचा दात विचकत टपंजली टूथपेष्टची अॅड करणारा बॅनर! कोपर्यात बारकालं मंदिर छापलेलं!)
शेंदूर्णे : (नाकातून आवाज काढत) तर मी काय म्हणतो…!
तिरसे अण्णा : (लांब उभ्या कोपर्यातून टाचा वर करून बघत) बाबा, तू जो कोणी आहे, तो! असशील तिथं उभं र्हाऊन बोल बाबा! इथून काय दिसना झालाय तू!
घारे : (पालथ्या रंगाच्या डब्यावरून तंबाखू मळत) अरे तो टेबलावर दोन्ही हात वर करून बी उभा राहिला ना, तरी दिसायचा न्हाई! (अख्खी पब्लिक ह्यँ! ह्यँ!! करून हसते.)
मवाळ : (घारेच्या जवळून अगदी बारीक आवाजात पुटपुटतात.) याला बसवलंय कोणी इथं?
घारे : (मवाळचा हात दाबत) अय हळू! त्याचा बाप नरपतशेठचे बूट पॉलिश करायला बंगल्यावर असतोय! त्यामुळं तो कुठंही र्हाऊ शकतो.
चोरान्ने : (सगळ्या गावकर्यांवरून नजर फिरवत) झाले का सर्वांचे? आपण ज्यासाठी जमलो आहोत. ते निमंत्रण देऊ द्यावे का आता?
बायजाबाई : (नुकत्याच येऊन मंदिराच्या भिंतीला टेकत) बाई कसलं बी आवत्नं र्हावू दे! आधी माह्या पिंट्यालाच देवा!
भाजंखर : (तोंडाचा मोठा चंबू करत) का?
बायजाबाई : आता का म्हणजे? रोज सांजच्याला चोरान्ने बाईंना हातभार लावतो ते? ह्या पंतांना तेवढं येतं तरी का? पुढल्या सात पिढ्या अंधारात राहतील ना, नाहीतं!!
भाजंखर : (काही न कळाल्याने तोंडाचा चंबू आणखी वाढतो) नेमकं पंतांना काय येत नाही म्हणता?
बायजाबाई : सांजच्याला आकडा लावता येतो का? पंताला? पंतीन बाई माह्या पोरालाच हात धरून नेती. तवा कुठं पंतांच्या घरात उजेड येतो.
शेंदूर्णे : (नाकाच्या तारा छेडत) बाई, लाईटचा आकडा टाकण्याचा मंदिराच्या आमंत्रणाशी काय संबंध? हा पंतांच्या मुलाच्या मुंजीचा कारेक्रम थोडाच आहे का?
बायजाबाई : (डाफरत) बाई, तसा तर तुमचा गावच्या कुठल्या चांगल्या गोष्टीशी काही संबंध म्हणून असतो का? आम्ही बोलतो व्हय काही?
भाजंखर : (समजावणीच्या सुरात) बाई तुम्ही थोडं शांत बसा! (समोरील गावकर्यांकडे बघत) हे बघा, मुख्य कार्यक्रमाच्या आगत-स्वागत नि व्यवस्थापनाची जबाबदारी आयोजक म्हणून आपलीय!! ही आमंत्रणं म्हणजे मुख्य स्टेजवर पाहुणे म्हणून कोणाला बोलवायचं ब्वॉ? याच्या विचारासाठी आपण जमलोय…
चोरान्ने : (भाजंखर रावांचे बोलणे पुढे पूर्ण करत) म्हणजे मंदिर उभारणीत ज्यांचे भरीव योगदान आहे, मग ते प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कुठल्याही स्वरूपात असू देत! त्यांना आपण बोलवायचे आहे नि…
ठोकळे : (नाकाला लावलेली तपकीर कानातल्या बोळ्यांनी टिपत) मग तर आमच्या मगनला पह्यलं आमंत्रण द्यायला पाहिजे!!
भाजंखर : (नव्या प्रश्नाबरोबर तोंडाचा चंबू नव्या अवतारात येतो) पण का?
ठोकळे : आता पंत तर बोलले ना? ज्याचं योगदान आहे ब्वॉ, त्याला स्टेजवर घेणार म्हणून…!
भाजंखर : हां, बरोबर बोललेत की ते!
ठोकळे : मग द्या की मगनला आवत्नं!!
शेंदूर्णे : (नाकातल्या तारा झंकारत) अरे पण त्याचं काय योगदान आहे ते तर सांग! कळू दे सगळ्यांना त्याने काय केलंय ते!
ठोकळे : (फत्कल मारून टेबलपुढं बसत) आता हे एवढा सभामंडप बांधला, याला टाईल्सबिईल्स लावल्या. लावल्या ना? याला पाणीबिनी…
चोरान्ने : (वैतागून) अरे ठोकळे! बांधकाम कसे केले ते विचारले आहे का कोणी? त्यात मगनरावांचे योगदान काय? हा साधा प्रश्न आहे ना? तेच थेट सांगा की!
ठोकळे : (मोठ्या आश्चर्याने) हां मग? तेच सांगतोय ना मी? आता हे, शिमेट आणलं, ते कसं?
भाजंखर : (तोंडाचा चंबू `क’ अडकल्या सारखा करत) कसं? विकत आणलेलं ना ते? त्यात मगनचं योगदान काय?
ठोकळे : मग मी कुठं म्हणलं? फुकट आणलं म्हणून?
चोरान्ने : अरे ठोकळे! जे सांगायचं ते पटपट सांग की! आपल्याला पन्नासेक पाहुणे बोलवायचे आहेत, तू एकावरच अडलाय अजून!
ठोकळे : तर तेच सांगून र्हायलोय ना? आता आपण शिमेट आणलं तेची जाहिरात मगननं पाहिली होती, तेनीच सांगितलं का शिमेटच्या गोणीमागं काही डिस्काउंट आहे म्हणून!
भाजंखर : एवढंच?
ठोकळे : हा, तो परतेक कामात आस्तोच ना? आता हेच बघा, वाळूचे डंपर पोलिसांनी अडवले तर तो पटकन गाडीला किक मारून पळाला अन् शे-पाचशे हातावर ठिऊन लगेच डंपर मोकळे केले, अर्ध्या घंट्यात डंपर गावात!
शेंदूर्णे : कळाले बसा तुम्ही! (मागच्या नरपत मेहेत्रेच्या फोटोकडं बोट दाखवत नाकावाटे सूर काढत) हे बघा, तुम्ही हे लक्षात घ्या! ज्याप्रमाणे नरपतरावांचं गावच्या विकासात योगदान आहे…
तिरसे अण्णा : (इतका येळ गप्प असलेले अण्णा नरपतरावांचा विषय येताच उसळून उभे राहतात.) ये टिंग्या, सांग मला! काय योगदान आहे नरपतचं? काय केलं त्यानं गावासाठी?
शेंदूर्णे : (गडबडतो) हे… हेच! पाणी… पाणी… आलं की घराघरात!
तिरसे अण्णा : हां, त्याच्या आधी तर तुहा बाप पाणी शेंदू शेंदू झिजला अन् अंगठ्याएवढा उरला. आता काल तुझ्या घरात पाण्याची लाईन टाकली तर त्याला डिर फुटलाय, तवा तो निलगिरीवानी वीसतीस फूट उंच वाढंल…
शेंदूर्णे : (रडवेल्या सुरात) अण्णा हे आसं पर्सनलवर येत जाऊ नका! आता नरपतरावांनी काहीच कामं केली नाहीत का?
तिरसे अण्णा : त्येनं एकच केलं, सगळ्यांचे बखटं धरू धरू खांदे उतरवले! लोकांनी आजकाल त्याच्या मयताला यायचा धसका घेतलाय, कवा बोंबलत खांदे भिजवील, नेम नाही! हा बरं आठवलं तू कामाचं बोलला ते! आता मधल्या आळीत उंदरं-घुशी लई झाल्या म्हणून हाफीसात तक्रार दिली तर बहाद्दरानं पाच जोड मांजराचे आणले, तेबी इलायती!!!
शेंदूर्णे : बघा, आहे की नाही त्यांना काळजी लोकांची?
तिरसे अण्णा : अय बेण्या, ऐकतर पुढं! ते इलायती मांजरं आयत्या भाकरीवर पोसलेले, त्यांना शिकारीची माहिती नाही. काही नुस्ते बिळात नाक खुपसायला गेले तर उंदरांनी त्यांच्या मिश्या कतरल्या, महिनाभर ते उंदराच्या धाकानं घराघरातून पळायचे. त्या लोळ घुशी तर त्यांच्या नाकाला नाक लावून झोपायच्या. शेवट ती मांजरं उपाशी मेली…
चोरान्ने : (विषय थांबवत) ती मरूदेत हो अण्णा! आमंत्रण कुणाला द्यायचे हे ठरवूया आपण! बोला तुम्हाला काय वाटते?
तिरसे अण्णा : (जरा शांत होत) आता कमिटी म्हणून तुम्ही काही ठरवलं असंलच ना? एकदा तुम्ही सांगा, तुम्ही कुणाला…
शेंदूर्णे : (नाकातल्या तारांवर वरचा `सा’ लावत) आता मंदिरासाठीच्या भरीव योगदानाबद्दल पह्यलं आमंत्रण नरपतरावांना…
तिरसे अण्णा : (उसळून) तेचं काय डोंबलं योगदान आहे? सगळं पंचांच्या `कौला’मुळंच झालं की!
भाजंखर : पण ते नरपतरावांच्याच इशार्यावर माना डोलवतात ना? आता कालचाच निर्णय बघा…!
चोरान्ने : (डोळे मोठे करून रावांना गप्प करत एक यादी पटकन अण्णांकडे देत) अण्णा ही बघा यादी! ही लोकं बोलवायची ठरवलीत आम्ही!
तिरसे अण्णा : (यादी बारकाईने बघत) यात तर बव्हंशी नावं पळपुट्यांचीच दिसताय! पोलिसांनी लाठीमार चालू केला होता तवा ह्या मंडळींना धोतर्याच्या सूदा र्हायल्या नव्हत्या. अन् मी हे कोणाला सांगतोय पंत तुम्हाला? तुम्ही तर असले प्रसंग आल्यावर मागं धूळ दिसू देती नाही!!!
चोरान्ने : ह्या बाबतीत आमच्या बेचाळीस पिढ्या प्रसिद्ध आहेत, खैबरखिंडीच्या पलीकडे चंगेज खानाच्या नुसत्या फौजा धडकल्याचे कळल्यावर आमच्या पूर्वजाने जी धूम ठोकली ती सरळ ह्या गावात! इंग्रजांच्या काळात तर…
तिरसे अण्णा : माहित्ये, माहित्ये मला! आता ह्या यादीतली मंडळी तीच भुरटी आहे, जी दरवर्षी मंदिर फंडाच्या नावानं पैशे उकळायची नि घरं भरायची. लोकंबी भुकेपेक्षा श्रद्धा मोठी म्हणून एकवेळ उपाशी राहात यांना पै-पैका द्यायची अन् आता मंदिर बांधलं पंचायत निधीतून!
चोरान्ने : पण अण्णा आपले मंदिर झाले ना?
तिरसे अण्णा : (भक्तीभावानं) हां, आता खंडोबापुढं जसा दरसाली बोकुड कापीतो तसा ह्या साली इथंबी कापीतो मी…!!
चोरान्ने : (एकदम उसळून) ओ अण्णा, आमच्या देवाला असले काही चालत नाही!
तिरसे अण्णा : (आवेशात) बेण्यांनो, मंदिरं बांधायच्या आधी पब्लिकला सांगत चला, तुमचा देव माणसानं, खाण्यानं, पेहरावानं वा आणखी कश्यानं बाटणार आहे ते!
चोरान्ने : ओ अण्णा, अगदी तसेच काही म्हणायचे नाही मला, तुम्ही वेगळा अर्थ काढताय.
तिरसे अण्णा : मी अर्थ काय काढतोय यापेक्षा तुम्ही जाती-धर्माचे नि देवादिकांचे निराळेच अर्थ काढून समाजात दुहीचं जे विष पेरताय, जो तिरस्कार, घृणा निर्माण करताय ते थांबवा. देव आणि धर्म शोषित-वंचित समाजाने मानावा असं वाटत असेल तर त्याच्या चालीरीती त्यांना बोचनार-टोचनार नाही हे बघा! प्रार्थनास्थळं माणसं सर्व भेद विसरून एकत्र यायची ठिकाणं बनली पाहिजेत. असो!