पानिपतच्या पराभवानंतर बलुचिस्तानतील गुलामगिरीत होरपळलेल्या मराठ्यांची आणि तिथल्या भयाण वास्तवाचे दर्शन घडवणारा ‘बलोच’ चित्रपट येत्या ५ मे रोजी प्रदर्शित होतोय. सीमेपार लढलेल्या मराठ्यांची विजयगाथा सांगणार्या या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश पवार यांनी केले असून विश्वगुंज पिक्चर्स आणि कीर्ती वराडकर प्रस्तुत या चित्रपटात प्रवीण तरडे आणि अशोक समर्थ प्रमुख भूमिकेत आहेत. नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित झाले.
पानिपतचा पराभव मराठ्यांसाठी महाप्रलयच ठरला. या पराभवानंतर बलुचिस्तानात मराठ्यांना गुलामगिरी पत्करावी लागली. मोशन पोस्टरमध्ये प्रवीण तरडे यांच्या नजरेत मराठ्यांना मिळणार्या वागणुकीविरोधात धगधगणारी आग आणि सूड भावना दिसत आहे तर मराठ्यांवर अत्याचार करणारा अफगाणी आहे. पानिपतची लढाई आणि पराभव ही मराठेशाहीसाठी जरी काळा दिवस असला तरी मराठी ही मराठ्यांच्या असीम शौर्याची गाथा आहे, जी ‘बलोच’च्या माध्यमातून आपल्यासमोर येणार आहे.
चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक प्रकाश पवार म्हणाले, ‘बलोच’ ही एक सकारात्मक गोष्ट आहे. यापूर्वी आपण पानिपतबद्दल ऐकले आहे, ते केवळ पराभवाबद्दलच आहे. मात्र पानिपतच्या युद्धानंतर जेव्हा गुलामीच्या अवस्थेत असताना पुन्हा एकत्र येणे, संघर्ष करणे, ही गोष्ट प्रामुख्याने दाखवण्यात आली आहे. पानिपतचे युद्ध हे पराभव नसून शौर्य होते. हा चित्रपट पाहिल्यावर हा अभिमान प्रेक्षकांना जाणवेल आणि पानिपतकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल, अशी मला आशा आहे.
कथा, पटकथा प्रकाश पवार यांचीच असून महेश करवंदे (निकम), जीवन जाधव, गणेश शिंदे, दत्ता काळे (डी.के.), जितेश मोरे, संतोष बळी भोंगळे, नेमाराम चौधरी, बबलू झेंडे, गणेश खरपुडे, ज्ञानेश गायकवाड चित्रपटाचे निर्माते आहेत. तर पल्लवी बंडगर, सुधीर वाघोले, विजय अल्दार सहनिर्माते आहेत.