माझे गेल्या सुमारे पंचावन्न वर्षांचे ज्येष्ठ मार्गदर्शक, पत्रकार, सहकारी विजय वैद्य, दैनिक ‘सामना’चे प्रारंभापासूनचे सहकारी आणि ज्येष्ठ नाट्यसमीक्षक संजय डहाळे, शिवसेना उपनेते मित्रवर्य विनोद घोसाळकर असे आम्ही चौघेजण चहापाण्यासाठी एका हॉटेलमध्ये बसलो होतो. त्या ठिकाणी चर्चा करताना केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘आठवणीतले प्रबोधनकार’ अशी छोटेखानी पुस्तिका काढण्यात यावी असे ठरले. अर्थातच विजय वैद्य हे प्रबोधनकारांच्या आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सहवासात आकंठ न्हाऊन निघालेले असल्याने तेच अधिकारवाणीने ही पुस्तिका तयार करु शकतील हे नि:संशय होते. त्याप्रमाणे ती पुस्तिका निघाली. बाळासाहेब ठाकरे यांना ती अतिशय आवडल्यामुळे वैद्य आणि घोसाळकर यांनी बाळासाहेबांच्या सूचनेनुसार दुसरी आवृत्ती प्रकाशित केली.
दिवसामागून दिवस आणि महिन्यांमागून महिने पुढे सरकत गेले. राज्यातील राजकीय समीकरणे बदलली. अचानक माजी मंत्री आणि शिवसेनेचे चिपळूणचे झुंझार आमदार मित्रवर्य भास्करराव जाधव आणि विजय वैद्य यांची भेट झाली. या भेटीत प्रबोधनकार ठाकरे यांचे जीवनचरित्र, त्यांचे विचार महाराष्ट्रात घराघरात पोहोचणे आवश्यक आहे असे सांगून ‘आठवणीतले प्रबोधनकार’ची तिसरी आवृत्ती काढण्याचा निर्णय घेण्यात आला. या अनुषंगाने भेटी होत गेल्या. अशातच मुंबई द्विभाषिक राज्य आणि संयुक्त महाराष्ट्राच्या विधानसभेचे पहिले अध्यक्ष सयाजीराव सिलम यांचे नातू प्रकाश रामचंद्र सिलम यांच्या भेटीचा योग आला. एकाहत्तरीतही तरुणांना लाजविणारा खळाळता उत्साह प्रकाश सिलम यांच्यात पहायला मिळाला. प्रकाश सिलम हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेठ आणि सयाजीराव सिलम यांच्या संदर्भात अत्यंत चांगले काम करीत आहेत. मरीन लाईन्स स्थानकासमोरच्या जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेठ वैकुंठ स्मशानभूमीत पहिल्या मजल्यावर प्रकाश सिलम यांना कार्यालय उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या कार्यालयात सुमारे तासभर गप्पा झाल्या. बर्याच जुन्या आठवणींना उजळा मिळाला. जुने संदर्भ ऐकायला मिळाले. या गप्पांमधूनच या लेखाचा जन्म झाला, असे म्हणायला हरकत नाही.
सयाजीराव सिलम हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे मोठे नाव. मुंबई द्विभाषिक राज्याच्या आणि नंतर संयुक्त महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्षपद भूषविल्यानंतर त्यांची पाँडिचरीचे नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. आधी तीन वर्षे आणि नंतर दोन वर्षे असा पाच वर्षांचा कार्यकाळ सयाजीरावांना मिळाला. दादर येथील शिवतीर्थाजवळ सयाजीरावांचे नातलग रहात असत. त्याच्या मागच्या बाजूला बाळासाहेब ठाकरे यांचे बिर्हातड रहात होते. सयाजीराव शनिवार-रविवारी तिकडे येत असत. ही माहिती काढून घेऊन बाळासाहेब आणि श्रीकांत ठाकरे हे बंधू त्यांना भेटायला जायचे. बाळासाहेब व्यंगचित्रकार असल्याचे सयाजीरावांना माहीत होते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात प्रबोधनकार ठाकरे यांचे योगदान काय आणि किती याची बित्तंबातमी सयाजीरावांना होती. त्यामुळे त्यांच्याबद्दल आदरभावही होताच. बाळासाहेब ठाकरे यांनी ‘मार्मिक’ सुरू केला होता. याच सुमारास बाळासाहेबांनी सयाजीरावांकडे जागेचा विषय काढला. वांद्रे येथे पत्रकार सहनिवास, साहित्य सहवास होता. पण कलानगर येथे एक भूखंड सयाजीराव सिलम यांनी मधुकरराव चौधरी यांना सांगून मिळवून दिला. मधुकरराव हे शिक्षण मंत्री होते. भूखंड तर मिळाला पण आर्थिक चणचण असल्याने तो ताब्यात कसा मिळणार? हा प्रश्न बाळासाहेबांसमोर होता. तोही सयाजीरावांनी सोडविला. प्रबोधनकार ठाकरे यांचे सुपुत्र असल्याने त्यांनी आवर्जून हा भूखंड मिळवून दिला. या गोष्टीची जाणीव बाळासाहेबांनी आजन्म ठेवली आणि सिलम परिवारासोबत बाळासाहेब, उद्धव ठाकरे यांनी संबंध चांगल्या प्रकारे निभावले. सयाजीराव सिलम यांचा दिल्लीपासून महाराष्ट्र काँग्रेसमध्ये चांगला दबदबा होता, म्हणून हे शक्य झाले, हे प्रकाश सिलम यांनी जाणीवपूर्वक सांगतानाच ‘गजानना श्री गणराया’साठी बाळासाहेब ठाकरे यांनी उत्तम प्रकारे मुलाखत दिल्याची आठवणही सांगितली.
पंढरपूर येथील काँग्रेसचे कार्यकर्ते हरीभाऊ पुली हे मुंबईत असताना सयाजीरावांच्या संपर्कात असत. त्यांच्याबरोबर पत्रकार नागेश पुणेकरही असत. सयाजीरावांच्या बर्याच आठवणी ते सांगत. त्यांनी ‘मी राजकारणात यावे यासाठी बराच प्रयत्न केला होता’ अशी आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्याबद्दलच्या आठवणी प्रकाश सिलम यांनी सांगितल्या. महाराष्ट्राच्या जडणघडणीत प्रबोधनकार ठाकरे, सयाजीराव सिलम आणि बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान सुवर्णाक्षरांनी निश्चितच लिहावे लागेल. या त्रिमूर्तींना मानाचा मुजरा!