एकनाथ शिंदे
मोदी साहेबांची भेट घेऊन
मिळेल का हो मला अभय
सांगता येत नाही काही
माझे मोठे नाही वलय
भेट घेऊन कुटुंबासह मी
अजितदादांशी घेतलाय पंगा
फडणवीसांनीच दिला हा सल्ला
थोपवून धरण्या दादांचा दंगा
माझे पुरते झाले सॅण्डवीच
दोघांची तर रेसच भारी
बाजारात आहे तुरी
इथे कोण कुणाला मारी!
—– —– —–
देवेंद्र फडणवीस
आता सगळे सेट झाले
अजितदादांना दिली समज
काही दिवस रेटत नेऊ
नंतर पडेल ‘त्यांना’ उमज
तुडुंब ‘अर्थ’ भरलेले ते
त्यांना दिले अर्थ खाते
तेवढ्यावरच मिटक्या मारा
असतील शिते तर जमतील भुते
सगळे विसरून आम्ही त्यांना
जाळे टाकून केले जवळ
नंतर कळेल नाटक आमचे
हातात राहतील काटे केवळ
—– —– —–
अजितदादा पवार
सत्ता तिथे आहे पॉवर
काकांनाही आहे माहीत
म्हणून घुसलो वार्यासारखा
जाणीव आहे पडलो खाईत
गोड बोलून काटा काढण्यात
भाजप नेते आहेत हुशार
शिंदेंनाही कळेल तेव्हा
सीएम होईल अजित पवार
आत्ता आपण तिघांनीही
जमेल तेवढे घेऊ खाऊन
निवडणुकीत जायचेच आहे
एकमेकांवरती धावून
—– —– —–
किरीट सोमय्या
मी नाही घाबलत कुणालाही
मला नाही लाजलज्जा
पाहिलेत ना तुम्ही डोळे फाडून
कसा उडालाय माझा फज्जा
माझी कसलत होती नामी
मोदी-शहाही बघून हसले
‘ऑल राऊंडर भाजपवाले’
किताब मला देऊन बसले
भलपूल आहेत माझे व्हिडीओ
एकापेक्षा एक सरस
मीच काढेन व्हीसीडी चोरून
पाहण्यासाठी लागेल चुरस
—– —– —–
नीलम गोर्हे
शीऽऽऽ किती ते किळसवाणे
मी तर मुळी पाहिलेच नाही
ऐकीव बातम्या ऐकून सार्या
समजून गेले सारे काही
दिले आदेश चौकशीचे
तुम्हीच पाहून काय ते ठरवा
मी जरी आहे सभापती तरी
मला डिटेल माहिती पुरवा
सारे काही ऐकून वाचून
मी मग घेईन वरचा सल्ला
सभागृहात जाहीर करीन
तेव्हा तिथे होईल कल्ला