□ संसदेतही मणिपूरचे पडसाद.
■ कोंबडं भले सर्वशक्तिमान सरकारनेही झाकून ठेवलं तरी भयाण वास्तवाचा सूर्य उगवायचा राहात नाही.
□ आत्महत्येशिवाय माझ्याकडे पर्याय नाही – कर्जबाजारी शेतकर्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र.
■ वेगवान आणि गतिमान सरकारची अवस्था समृद्धी महामार्गासाठी झाली आहे… छोट्या प्रवासाला निघालं तरी तो अंतिम प्रवास ठरतो त्या मार्गावर… शेतकर्यांपर्यंत वेगवान आणि गतिमान मदत निघालीही असेल त्या महामार्गावरून, तरी तिचं काय होईल, विचार करा.
□ सत्तेसाठी भाजप आणि संघ देश जाळूनही टाकतील- राहुल गांधी.
■ हुकूमशहांमध्ये सत्तेची लालसा इतकी तीव्र असते की त्यांना जनतेच्या मढ्यांवर राज्य करायलाही आवडते… तेच सोयीचे असले तर.
□ आणखी दीड महिना टोमॅटोचे दर चढेच राहणार.
■ आजच तो २०० रुपये किलो आहे, आता ३००-४०० रुपये पण होईल. सगळे शेतकरी सगळी पिकं काढून
टोमॅटो लावतील आणि मग किलोला पाच रुपये पण भाव मिळत नाही म्हणून तो टोमॅटो रस्त्यात ओतून देण्याची वेळ येईल… कधी संपणार हे दुष्टचक्र, कोण जाणे!
□ भारतात तीन वर्षांत १० लाख महिला बेपत्ता.
■ कुठे गेले ते केरळ फाइल्सचे निर्माते, आता बनवा की ‘न्यू इंडिया फाइल्स’!
□ उद्घाटनानंतरही कलिनातील आंतरराष्ट्रीय वसतिगृह विद्यार्थ्यांसाठी बंदच; युवासेनेचे कुलगुरूंना पत्र.
■ उद्घाटन झालं ना जोरदार, इव्हेंट झाला ना मोठा, मग काम संपलं… आता ते नव्या संसद भवनासारखं जागोजाग गळत असेल कदाचित!
□ मुंबईतही ७४ ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका.
■ अरे बापरे, इथली लोकसंख्या पाहता इर्शाळवाडी, तळिये वगैरे दुर्घटना किरकोळ वाटाव्यात इतकी मोठी दुर्घटना घडेल इथे.
□ केंद्र सरकार अदानींचे तळवे चाटतंय; विरोधक आक्रमक.
■ हे पाहा, मालकांविषयी काही बोलायचे काम नाही!
□ कोरोनात पालक गमावलेली शेकडो मुले सरकारच्या मदतीपासून वंचित.
■ जगात तिसर्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याच्या वाटेवर असलेल्या देशात राहतायत ती मुलं… याचा अभिमान बाळगायला शिकवा त्यांना… सतत कशाला ती रडगाणी!
□ रायगडातील साडेतीन हजार हेक्टर शेती वाहून गेली.
■ चला, तेवढी जमीन ‘विकासा’ला मोकळी झाली!
□ इर्शाळवाडीतील बेपत्ता ५७ जणांना मृत घोषित करणार.
■ माती असशी, मातीत मिळशी… हे अशा प्रकारे खरे व्हावे?
□ सरनाईकांच्या मतदारसंघावर भाजपचा डोळा; भाजप प्रभारींची मेळाव्यात घोषणा.
■ महाशक्तीने मिंध्यांना सोबत घेतलंय तेच खच्ची करून संपवण्यासाठी. आता पर्याय तरी काय?
□ ईडी संचालकांना १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; यापुढे मुदतवाढ नाही, सुप्रीम कोर्टाने ठणकावले.
■ पण मुळात बेकायदा असलेली मुदतवाढ कायम केलीच ना! उपयोग काय त्या कोरड्या ठणकावण्याचा?
□ दिव्यांगांबाबत केंद्र सरकारची अनास्था.
■ धडधाकटांबद्दल आस्था आहे का?
□ मणिपूर हिंसाचारामागे चीनचे कट कारस्थान – गुप्तचर संस्थांचा अहवाल.
■ इंदिरा गांधी प्रत्येक घटनेमागे विदेशी हात शोधायच्या, हे चीनचा हात शोधतायत… चीन भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये इतकी ढवळाढवळ करायला सक्षम झाला असेल, तर गुप्तचर संस्था, गृहखाते, संरक्षण मंत्री वगैरे झोपले होते का इतके दिवस?
□ विरोधक गतिरोधकाचे काम करताहेत – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार.
■ तुमचं सरकार समृद्धी महामार्गावरून दौडत असेल, तर गतिरोधक असलेच पाहिजेत… महाराष्ट्राच्या जनतेचं भवितव्य आहे हो तुमच्या हातात!
□ गांधीजींचे वडील मुसलमान जमीनदार – संभाजी भिडे यांचे वादग्रस्त वक्तव्य.
■ व्हॉट्सअप विद्यापीठाचे गोल्ड मेडलिस्ट आहेत की काय हे? त्यापलीकडे काही वाचत चला!
□ भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्यात १६० कोटींचा गैरव्यवहार करणार्या राहुल कुल यांची ईडी सरकारकडून पाठराखण.
■ वॉशिंग मशीन का चमत्कार!
□ कांजुर कारशेडमुळे जनतेचे साडेदहा हजार कोटी रुपये वाचले असते – आदित्य ठाकरे.
■ पण, ठेकेदारांचं नुकसान झालं असतं, त्याचं काय आदित्यजी!
□ गिरणी कामगारांच्या मुंबईत घराच्या स्वप्नांचा मिंधे सरकारने केला चक्काचूर.
■ एव्हाना त्यांच्या पुढच्या पिढ्या विरार, पालघर, कर्जत, कसार्यापर्यंत दूरवर फेकल्याही गेल्या असतील.
□ मुख्यमंत्र्यांच्या ठाणे, मिरा-भाईंदरमध्ये तयार झालेत भूमाफिया – फडणवीस यांचा दुजोरा.
■ त्यांना पोसणारे कोण आहेत, हेही तिथल्या जनतेला माहिती आहे.
□ नवीन वर्सोवा पुलावर खड्डे; ठेकेदारावर गुन्हा दाखल.
■ उशिराने खड्डे पडले म्हणून दाखल केला असेल गुन्हा
□ मोदी अजूनही झोपेत आहेत; संताप व्यक्त करत भाजप नेत्याची सोडचिठ्ठी.
■ ही झोप नाही, झोपेचं सोंग आहे… ते अधिक घातक!