एका बँकेच्या मॅनेजरसमोर एक पंचविशीचा हसतमुख तरूण बसला होता. ५५ वर्षांचा बँकेचा मॅनेजर त्याच्याकडे रोखून बघत होता. मॅनेजरच्या कपाळावर आठ्यांचे जाळे पसरले होते. समोरच्या कागदाची फाईल चार वेळेला उलटसुलट करून झाली. आकड्यात कुठेच गफलत नव्हती. मांडणी स्वच्छ आणि स्पष्ट होती. सध्याची जुनी मशिनरी आणि धंद्याची जागा या दोन्हींमध्ये वाढ करण्याकरता २० लाखाचे लोन मागणारी कागदपत्रे वाचून बाजूला ठेवत मॅनेजर पुन्हा तरुणाकडे पाहू लागला. मॅनेजरच्या रोखून बघण्यामुळे तरुणाच्या चेहर्यावरचे हास्य कमी झालेले नव्हते. किंबहुना आत्मविश्वासाने भरलेला चेहरा आणि खुर्चीवर बसण्याची देहबोली मी होकार घेऊनच जाणार अशी होती. हसतमुखानेच त्या तरुणाने मॅनेजरना विचारले, ‘साहेब तुमची चहाची वेळ झालेली आहे. मी थोडा वेळ बाहेर बसू का?’
मॅनेजरने टेबलावरील बेल दाबून चपराशाला बोलवले व दोघांसाठी चहा घेऊन यायला सांगितला. गरमागरम चहा पिताना मॅनेजरना पुन्हा एक प्रश्न सुचला, ‘तुमचे शिक्षण फक्त मॅट्रिक झाले आहे. आजचे तुमचे वय २५ वर्षे. मग मॅट्रिक झाल्यापासून तुम्ही काय शिकलात? कुठे शिकलात?’
चहाचा एक घोट घेत शांतपणे त्याने उत्तर दिले, ‘मॅट्रिकच्या वर्षातच वडील वारले. मॅट्रिकला ६५ टक्के मार्कही होते. सहजगत्या अभ्यास करून इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला असता. पण कॉलेजची फी द्यायला पैसे नव्हते. आईचे शिक्षण झाले नसल्यामुळे वडिलांच्या प्रॉव्हिडंट फंडावर घर चालवणे शक्य नव्हते. म्हणून एका वर्कशॉपमध्ये मी कामगार म्हणून कामाला सुरुवात केली.
कामगार म्हणून मला घ्यायला ते मालक तयार नव्हते, तेव्हा त्यांच्याकडे हरकाम्या म्हणून मी काम करण्याची तयारी दाखवली. ६५ टक्के मार्कांचे सर्टिफिकेट पाहून त्यांनी नकार दिला. इतका हुशार मुलगा मी हरकाम्या म्हणून कसा काय ठेवून घेऊ, असा त्यांचा प्रश्न होता. शेवटी एक तडजोड झाली. एक महिना मी त्यांच्याकडे रोज सांगितल्यावेळी जायचे. देतील ते काम मन लावून करायचे व महिना अखेरीला त्यांनी मला काम द्यायचे का नाही यावर निर्णय घ्यायचा. पगाराबद्दल ते देतील तो मान्य करायचा. अशी उभयपक्षी तडजोड झाली. सांगितलेल्या वेळेच्या आधी पाच मिनिटे मी कारखान्याच्या दारावर उभा असे. मालक बाहेर पडल्याशिवाय कधीच माझी जागा मी सोडली नाही. जेमतेम सात दिवसांतच दोन मशीनवर चाललेले काम पाहून मी ते करू शकेन असे त्यांना सांगितले. ते ऐकून मालक जरा चकित झाले होते. चार वर्षे त्यावर काम करणार्या कामगाराच्या देखरेखीखाली काम करायला त्यांनी मला परवानगी दिली. सायंकाळपर्यंत त्या कामगाराइतकेच कौशल्यपूर्ण काम मी करून दाखवले म्हटल्यावर त्यांच्या मनात कसलीच शंका राहिली नव्हती. त्यांच्या कारखान्यात एकूण सहा प्रकारची मशीन होती. वेगवेगळे प्रकारचे विविध कारखान्यांना लागणारे छोटे छोटे भाग तांबा, पितळ, स्टील, काही वेळा अल्युमिनियम यांच्या ठोकळ्यातून बनवले जात. दर महिन्याची ऑर्डर ठराविक भागांची असे व ती ठराविक काळात पूर्ण करायची जबाबदारी असे. महिनाभरातच माझा पगार निश्चित झाला. काम सुरू झाले आणि तीन महिन्यानंतर तयार झालेल्या सहाही मशीनवरील भाग टेम्पोमध्ये भरून योग्य ठिकाणी पोचवण्याची जबाबदारीही माझ्यावर पडली. मी दोन वर्षे तेथे काम केले. अर्थातच सर्व प्रकारचे काम करण्याची शिकवण त्यांच्याकडून मला मिळाली. अचानक त्यांना हार्ट अटॅक आला आणि होत्याचे नव्हते झाले.
मालकांची पत्नी एका शाळेत शिक्षिका होती. त्यांचा एक मुलगा कॉमर्सला तर दुसरा इंजिनिअरिंगच्या डिप्लोमाला होता. पत्नीने मुलांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत कारखान्याची सगळीच जबाबदारी माझ्यावर टाकली.
कॉमर्सचे शिक्षण संपवून मोठा मुलगा एमबीएला प्रवेश घेत आहे, तर धाकटा डिप्लोमा संपवून आता कारखाना बघायला आला आहे. मालकांशी व त्यांच्या पत्नीशी माझे जसे संबंध होते, तसे आता मुलांबरोबर राहतील असे मला वाटत नाही. दोघांच्या स्वभावातही खूप फरक आहे हे त्यांनी कारखान्यात प्रवेश केल्यापासून मला जाणवत आहे. त्यामुळे आमच्या मूळ गावी पनवेलजवळ असलेल्या छोट्या जागेमध्ये मी जुनी दोन मशीन घेऊन छोटा व्यवसाय सुरू केला. गावातील कामगारांकडून उत्पादन करून घेत होतो आणि सध्याच्या कामातही लक्ष देत होतो. आता सध्याचे काम सोडण्याची वेळ आली आहे. मात्र त्यासाठी बँकेद्वारे आपण मदत कराल यावर माझा विश्वास आहे. माझ्या सध्याच्या छोट्या व्यवसायाच्या आर्थिक ताळेबंदाची आणि गावातील असलेल्या जागेची सारी कागदपत्रे जोडूनच अर्ज केला आहे. माझे शिक्षण याकरता आड येणार आहे याची मला पूर्ण कल्पना आहे, म्हणून मी हे सगळे सविस्तर आपणास सांगितले.’
मैत्रीची आठवण, निर्णायक क्षण
दोघांचा चहा संपला होता. बँक मॅनेजरना विचारण्याजोगे काही राहिले नव्हते. निर्णयातला आणि वरिष्ठांनी विचारले तर त्यांना उत्तर देण्यातला धोका मात्र त्यांना स्पष्ट दिसत होता. मग त्यांनी ठेवणीतला नेहमीचा प्रश्न काढला, ‘तुमच्या गावातील बँक सोडून तुम्ही माझ्या शाखेतच का आलात?’ त्याने पुन्हा हसतच उत्तर दिले, साहेब तुमच्या शाखेतच तर मी नोकरीला लागलो तेव्हा पहिले माझे खाते काढले. त्या आधीपासून माझे वडिल्ाांचेही खाते याच बँकेत होते. विचारलेत म्हणून सांगतो, कॉलेजची चार वर्षे तुमच्याबरोबर असलेला मित्र म्हणजे माझे वडील. चकित होऊन साहेबांनी अर्जावरील पूर्ण नाव वाचले. आनंद सखाराम राऊत. जुन्या कॉलेजमित्राची त्यांना लख्ख आठवण झाली. कॉलेजनंतरचे रस्ते वेगळे झाल्यामुळे आणि बँकेच्या बदल्यांमुळे त्यांचा गावाशी संबंध सुटला होता. तो जुळणारा धागा समोर होता. साहेब पट्दिशी उठले आणि समोर बसलेल्या आनंदचे पाठीवर हात टाकून प्रेमाने म्हणाले, ‘उद्या ये, तुझे लोन मंजूर झाले आहे असे समज.’
नवी घडी नवा उद्योग
यथावकाश नोकरी सोडून आनंदचा छोटा कारखाना अद्ययावत मशीन घेऊन प्रगती करू लागला. हातात चार पैसे खेळू लागले. पण वयाची तिशी आली तरी लग्नाचा मात्र पत्ता नव्हता. जसा बँक मॅनेजरना प्रश्न पडला होता की केवळ मॅट्रिक मुलाला कर्ज कसे द्यायचे? तोच प्रश्न येणार्या मुलीच्या बापांना पडत होता. देखणा आनंद मुलीला पसंत पडला तरी मुलीचे आईबाप मुलीची समजूत घालून तिला त्या घरी द्यायला नकार देत. मुलगा पदवीधर तरी हवा ही एक मानसिकता अजूनही बदललेली नाही. तशीच मानसिकता काही व्यवसायांच्या बाबतीतही आढळते. महिन्याला लाखभर रुपये मिळवणार्याच हॉटेल मालकाला गावाकडची मुलगी शोधावी लागते. ट्रान्सपोर्टेशनचा व्यवसाय करणार्या दोन-तीन टेम्पोचा मालकापुढे हीच अडचण येते. छोटे छोटे दुकानदार किंवा अन्य व्यवसायिकांची काय कथा सांगावी? धंद्याचे काय सांगावे आज जोरात आहे उद्या नाही. मग रुटुखुटू पगाराची का होईना, नोकरीच हवी. त्यातही सरकारी असली तर फारच उत्तम. १९६० सालपासूनची ही मानसिकता दोन हजार तेवीसमध्ये अजिबात बदललेली नाही. अशांची तिशी ओलांडते आणि सामान्य दिसणार्या मुलींची पस्तिशी आली तरी लग्न होत नाही. हुंडा, सोने, नाणे यांची देवाणघेवाण यातही अजून फार फरक पडलेला नाही. थेट मागणी करण्याऐवजी जरा वेगळे शब्द वापरले जातात एवढेच. उलटी गंगा वाहते असाही एक प्रकार या लग्नाच्या बाजारात सापडतो. कायम नोकरी असणार्या मुलीला मागणी घालून हल्ली घरी आणली जाते. मात्र आजच्या करिअर कथेमध्ये लग्नाची चर्चा नाही. छान कारखाना चालवून उत्तम मिळवणार्या आनंदची नजर वयाच्या तिशीमध्ये कारखान्याच्या जवळच असलेल्या एका शाळेत शिकवणार्या देखण्या शिक्षिकेकडे गेली.
शाळा सुटल्यानंतर ती रोज एसटीने परत जात असे हेही त्याच्या लक्षात आले. एव्हाना एक सेकंडहँड कार त्याने विकत घेतलेली होती. शाळा सुटण्याची वेळ व मॅडम बाहेर कधी येतात याकडे त्याचे अलीकडे नेहमीच लक्ष असे. एके दिवशी मॅडमना बाहेर पडायला बराच उशीर झाला व त्या कावर्याबावर्या झालेल्या दिसल्या. धाडसाने पुढे येऊन विचारले, ‘काहो काही मदत पाहिजे का?’ हा देखणा तरूण रोजच समोर दिसत असल्यामुळे नकळत त्यांनी सांगितले, ‘बहुतेक माझी एसटी चुकली. आता सगळीच पंचाईत’. सहजच सांगितले काळजी करू नका मी आनंद राऊत, कारने त्या बाजूलाच चाललो आहे’. मुंबईच्या एका उपनगरात दूरवर त्यांचे घर होते. अशा प्रकारे अखेर दोघांची ओळख झाली. मात्र पुढचा प्रवास तसा सोपा नव्हता. ओळखीनंतर काही दिवसांतच त्याच्या लक्षात आले की या उच्चशिक्षित एमए, एमएड झालेल्या आहेत. एवढेच नव्हे तर त्यांचे वय ३६ पूर्ण आहे. अडचणीतून मार्ग काढत आयुष्याची वाटचाल करायचे हे या तरुणाचे भागधेय असल्यामुळे त्याने प्रथम झालेल्या ओळखीचा धागा चिकाटीने सोडला नाही. जेमतेम वर्षभरातच बाईंच्या घरी जाऊन घरच्यांची ओळख करून घेण्यापर्यंत त्याने मजल मारण्याचे धाडस दाखवले. त्यापूर्वी मॅडमना स्वत:च्या घरी चहाला घेऊन जायला तो विसरला नव्हता.
आईला आता व्यवसायात यशस्वी झालेल्या आनंदची काळजी खर्या अर्थाने वाटू लागली होती. सार्या बाजूने यशस्वी झालेल्या मुलाला या मुलीकडून ठोकर बसू नये, तिच्या घरच्यांकडून नकार येऊ नये, अशी आईच्या मनातली काळजी. दोन-तीन वेळेला मुलीच्या घरी चक्कर मारल्यानंतर त्याच्या असे लक्षात आले की तिच्या घरच्यांकडून डायरेक्ट परवानगी मिळेल असं शक्य नाही. मग त्याने एक धाडसी निर्णय घेतला आणि थेट मुलीला म्हणजेच मॅडमना त्याने प्रपोज केले. थेट सांगितले की आता यानंतर येथे गावातच राहायचे. आपले घर व शाळा. मला लागेल ती मदत तू कर. स्वत:च्या लग्नाच्या संदर्भात सर्व आशा सोडून दिलेल्या मॅडमना गेल्या काही महिन्यातील हा बदल सुखावणारा होता व आश्वासकही. घरचा विरोध मावळेल असेही वाटत होते. एक दिवस शाळेतील दोन मैत्रिणी व याच्या घरातील काही मंडळी यांचे उपस्थितीत दोघांचे लग्न पार पडले. बाईंनी घरी बातमी कळवली त्यावर थंड प्रतिसाद होता. मात्र संतापाचे शब्द नव्हते. तेच चांगले लक्षण म्हणून आठ दिवसांनी आईला घेऊन नवदांपत्य जोडपे मॅडमच्या माहेरी दाखल झाले. थोडाफार अबोला, थोडीफार रडारड झाल्यानंतर मायलेकीत समेट झाला. माझं नाव आता सीमा ठेवलंय हे तिने वडिलांना लाजत सांगितले. सासर्यानेही जावयाला समोर बसवून चार गोष्टी ऐकवल्या. सासरे एका मोठ्या फॅब्रिकेशन कंपनीत अकाउंट्सचे काम करत होते. ती कंपनी काय काय करते असे उत्सुकतेने जावयाने विचारले. कंपनीला भेट देऊन कामकाज कसे चालते ते पाहायला मिळेल का यावर सासरेबुवाने होकारही दिला. दोन खोल्यांचे घर असलेली तीन मजली चाळ, असा त्या काळातील मुंबईचा चेहरा मोहरा होता. घरात डोक्यावर सिलिंग फॅन, कोपर्यात छानसा मर्फी रेडिओ व एक गोदरेजचे कपाट या तीन गोष्टी असल्या की ते घर सुबत्तापूर्ण मानले जाई. मध्यम वर्गाची ती एक परिपूर्ण कल्पना होती.
नवपरिणीत पत्नीच्या घराचे निरीक्षण तासाभरात केल्यावर घरात फक्त गोदरेजचे कपाट नाही असे आनंदच्या लक्षात आले होते. घरी परतताना त्याने सासरेबुवांना गोदरेजचे कपाट परतभेट म्हणून द्यायचे असा प्रस्ताव सीमाकडे मांडला. सीमाने त्याला तात्काळ नकार दिला, कारण घरातील एकही कोपरा मोठे कपाट ठेवता येईल असा मोकळा नाही हे माहिती असल्यामुळेच आम्ही गोदरेज कपाट घेतले नाही, हे वाक्य त्याच्या डोक्यात रुतून बसले. पुढच्याच आठवड्यात सासरेबुवांबरोबर फॅब्रिकेशनचा कारखाना बघायला तो गेला. तेथील कामाचे स्वरूप बघता बघता त्याच्या नजरेतून मेंदूत घट्ट शिरले की चौकोनी गोदरेजच्या कपाटाऐवजी त्रिकोणी आकाराचे पण कोपर्यात व्यवस्थित बसेल असे लोखंडी कपाट कसे बनवायचे? कागदावरचे डिझाईन आनंदनी फॅब्रिकेशन कारखान्याच्या तंत्रज्ञाला दाखवले. असे शक्य आहे पण आम्ही ते बनवत नाही. कारण ते खपणार नाही. असे उत्तर त्याला लगेच मिळाले. मात्र चिकाटी न सोडता त्याने स्वतःच्या कारखान्यामध्ये फॅब्रिकेशनची उपकरणे आणून पहिले कपाट बनवले आणि ते सीमाच्या माहेरी नेऊन जागेवर ठेवले. ही अनोखी भेट पाहून सासू-सासरे दोघेही जण जावयाच्या कौतुकाने भरून पावले. त्यांच्या नातेवाईकात, येणार्या, जाणार्यांकडे व त्या चाळीतील निदान पन्नास कुटुंबामध्ये हे अनोखे कपाट कसे दिसते हे पाहण्यासाठी पुढचे दहा दिवस रीघ लागली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कपाटासाठीच्या सहा ऑर्डर्स या सासरेबुवांकडूनच त्याला मिळाल्या. विविध कारखान्यांसाठीचे सुटे भाग पुरवण्याच्या धंद्यातून एक नवीन वेगळीच वाट त्याला दिसू लागली. जुना स्वयंपाकाचा दगडी ओटा काढून तिथे लोखंडी टेबलवजा मांडणी व खाली ट्रॉलीज याकडेही तो नंतर वर्षभरातच वळला. चाके लावलेला सहज हलवता येणारा टीपॉय हीसुद्धा त्याची नवीन आवृत्ती. आश्चर्य म्हणजे कोणतेही मार्केटिंग न करता पुढचे तब्बल पंधरा वर्षे या तीन प्रोडक्ट्सवर याचे फॅब्रिकेशन शॉप जोरात चालू होते. त्याचवेळी छोट्या रुग्णालयांसाठी विविध हॉस्पिटल फर्निचर तयार करण्याच्या कल्पनेने त्याला झपाटले. रुग्णाच्या खाटे शेजारचे बेडसाईड कप्बर्ड, रुग्णाची खाट, तपासायचे टेबल, ऑपरेशनचे टेबल, फोल्डिंग खुर्च्या, पेशंट ट्रॉलीज, अशा विविध गोष्टीतून कारखाना अजूनच भरभराटीला आला. यथावकाश सीमा मॅडम शाळेतून निवृत्त झाल्या आणि इंजीनियर मुलाच्या हाती कारखाना सोपवून आनंदबरोबर प्रथम भारत व नंतर जोडीने जग बघण्यासाठी दोन वर्षे आनंदात घालवली.
तात्पर्य : अंगभूत हुशारी असली तर तांत्रिक ज्ञान न घेता सुद्धा एखाद्या कारखान्याचा, तांत्रिक व्यवसायाचा श्रीगणेशा करत विविध उत्पादनातून भरभराट कशी करता येते, आयुष्यातील विपरीत परिस्थितीवर मात करून यशस्वी व सुखाचे आयुष्य कसे जगता येते याचे हे एक छोटेसे उदाहरण. खरे तर अशी अनेक उदाहरणे छोट्या शहरातील तांत्रिक कारखान्यात सापडतात. कारागिरी आणि कुशलता याचेच नाव.