यंदाच्या पावसाळ्यात ‘बाईपण भारी देवा’ सिनेमा प्रदर्शित होऊन पावसाइतकाच धो धो चालतोय… या चित्रपटाने अनेक विक्रम मोडले… या वर्षी, ७२ कोटींचा टप्पा पार करत जास्त पैसा कमावणारा दुसरा मराठी सिनेमा ठरला आहे (पहिला वेड : ७५ कोटी). सिनेमा हिट होणे हे हल्ली शहरातील मल्टिप्लेक्सवर अवलंबून आहे, कारण ग्रामीण भागाच्या तुलनेत मल्टिप्लेक्समधील दर अनेक पटींनी जास्त असतात. पण ‘बाईपण भारी देवा’ हा सिनेमा केवळ शहरातच नाही, तर ग्रामीण भागात देखील विक्रमी यश संपादन करतोय. यामुळेच या सिनेमाचे यश निर्भेळ आहे. माहेरची साडी या सिनेमानंतर पहिल्यांदाच महिलांनी एखाद्या चित्रपटाला इतकं उचलून धरल्याचे दिसलं. दर वर्षी शंभरच्या आसपास मराठी चित्रपट प्रदर्शित होतात, यात ऐतिहासिक, सामाजिक, विनोदी, स्त्रियांचे प्रश्न मांडणारेही सिनेमे येतात. पण मग या सिनेमात असं वेगळं काय आहे जे प्रेक्षकांना इतकं भावलं?
दिग्दर्शक भारी देवा… केदार शिंदे
अग्गं बाई अरेच्चा, जत्रा यांसारखे चित्रपट, हसा चकटफु, गंगाधर टिपरे यांच्यासारख्या टेलिव्हिजन मालिका आणि सही रे सही, श्रीमंत दामोदरपंत यांसारख्या नाटकांतून दिग्दर्शक केदार शिंदे यांनी तिन्ही माध्यमांत यश अनुभवलं आहे. वीस वर्षांचा अनुभव गाठीशी असलेला दिग्दर्शक, ही या सिनेमाची जमेची बाजू. शाहीर साबळे यांचे नातू असलेल्या केदार यांचा प्रवास ‘महाराष्ट्राची लोकधारा’ हा लोकप्रिय कलाविष्कार बघत सुरू झाल्याने, प्रेक्षकांना काय आवडेल याचा त्यांना अचूक अंदाज आहे. बायकांचं मन चित्रपटातून अचूक मांडणारे दिग्दर्शक या लौकिकाला ते जागतात. बाईपण…मध्ये सहा मुख्य स्त्री व्यक्तिरेखा आणि सहकलाकार यांच्या भावनांची गोष्ट त्यांनी मोठ्या खुबीने दाखवली आहे. चित्रपटाचा काळ आहे, १९७८ ते २०२१पर्यंतचा, म्हणजे सुमारे चार दशकांतील सहाजणींचा भावनात्मक आलेख सव्वा दोन तासात मांडणं, सर्व भूमिकांना न्याय देणं, कुठलाही सल्ला उपदेश न करता, घरातली साधी गोष्ट दाखवणारा सिनेमा बनवणं हे शिवधनुष्य केदार यांनी यशस्वीरीत्या पेलले आहे.
लेखन भारी देवा… वैशाली नाईक
स्त्री लेखिकेने लिहिलेली ही सहाजणींची गोष्ट आहे. बायकांच्या बोलण्यात असलेल्या छोट्या छोट्या गोष्टी लेखिका वैशाली नाईक यांनी संवादातून उत्तम मांडल्या आहेत. संधी मिळेल तिथे एकमेकींच्या चुका दाखवून कुरघोडी करणार्या पल्लवी आणि केतकी यांच्यातले संवाद असोत अथवा सगळ्या स्त्रियांची व्यथा मांडणारं ‘अर्धं आयुष्य निघून गेलं, पण स्वतःसाठी जगलेच नाही,’ हे वाक्य असो- स्त्रियांच्या भावना लेखिकेने अचूक शब्दबद्ध केल्या आहेत. बराच काळ आपल्याकडे समज होता की स्त्री पोस्टरमधे दिसायला हवी, सिनेमाच्या कथेत तिचं स्थान नगण्य असलं तरी चालून जातं. हळुहळू त्याला अपवाद तयार झालेत, पण ते व्यावसायिकदृष्ट्या प्रत्येक वेळी यशस्वी ठरले नाही. म्हणूनच जर सशक्त कथा संवाद नसतील, तर निर्माते-वितरक अशा चित्रपटांची रिस्क घ्यायला उत्सुक नसतात. पण या चित्रपटातले मोजके संवाद बरंच बोलून जातात. कुठल्याही चित्रपटाप्रमाणे स्त्रीप्रधान चित्रपटात शेवट फार महत्वाचा असतो, बायकांना खूश करणं तसं अवघड, पण जिंकण्यातलं हरणं, हरण्यातलं जिंकणं अशी जगण्यातली संदिग्धता लेखिका वैशाली नाईक यांनी सुरेख लिहिली आहे.
अभिनेत्री भारी देवा…
चाळीशी पार केलेल्या सहाजणी या सिनेमाच्या नायिका आहेत. रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, दीपा परब, या सहाही जणी आपापल्या भूमिकेत अगदी फिट्ट बसल्या आहेत. अनेक स्त्रियांना झालेला अपमान, खटकलेल्या गोष्टी बोलून दाखवता येत नाहीत. सख्ख्या बहिणीसोबत स्पष्टपणे न बोलल्याने होणारा कोंडमारा रोहिणी हट्टंगडी यांनी देहबोलीतून दर्शवला आहे. संपूर्ण चित्रपटात केवळ १२ ओळींचे त्यांचे संवाद आहेत, पण अभिनयानं त्यांनी जयाचं कॅरेक्टर सशक्त उभं केलं आहे. वंदना गुप्ते यांनी साकारलेली दमदार शशी ही चित्रपटाची जान आहे. सुकन्या ताईंनी साकारलेली सोशिक साधना बर्याचजणींना स्वतःच्या वाटेला आलेल्या सासुरवासाची आठवण करून देते, त्याचबरोबर त्यांचं विनोदाचं टायमिंग मनमुराद हसवून जातं. सुचित्रा बांदेकर यांनी उभी केलेली आधुनिक कमावती हळवी पल्लवी आणि शिल्पा नवलकरांची ‘वैभवाचा दिमाख मिरवणारी’ केतकी, १४ वर्षांनी चित्रपटात आलेल्या दीपा परब यांनी साकारलेली चारू केवळ अप्रतिम. यातली एकही निवड चुकली असती तर चित्रपटाची मौज कमी झाली असती, असं वाटतं राहातं. या निवडीसाठी फुल मार्क्स.
टायटल आणि पोस्टर भारी देवा
या सिनेमाचे नाव मंगळागौर असं असणार होतं. पण नंतर सहनिर्माता अजित भुरेंनी ‘बाईपण भारी देवा’ हे नाव सुचवले, जे अधिक समर्पक वाटतं. या नावामुळे हा चित्रपट केवळ एका पारंपरिक खेळापुरता सीमित न राहता याचा परीघ विस्तारला. या शीर्षकाने हा बायकांचा सिनेमा आहे हे निश्चित होतं, पण या सिनेमाला जावंसं वाटण्याचं अजून एक कारण म्हणजे पारंपारिक वेशभूषेत गॉगल लावून ऐटीत बसलेल्या सहा बायका, ज्या पोस्टरमधून आमंत्रण देताय, ‘प्रत्येकीला सांगा आपल्या मैत्रिणींचा सिनेमा येतोय.’
संगीत भारी देवा…
ठेका धरायला लावणारी, एकदा ऐकल्यावर लगेच मनात रुळणारी चाल हे साई-पियूष यांच्या संगीताचं यश आहे. कोरसचा उत्तम वापर केदार शिंदेच्या चित्रपटाचा अविभाज्य घटक असतो. बाईपण भारी देवा ही एकच ओळ जेव्हा वेगवेगळ्या वेळी चित्रपटात वेगवेगळ्या आवाजात येते, त्यामुळे त्या प्रसंगांची रंगत वाढते. अरे संसार संसार ही बहिणाबाईंची कविता नव्या ढंगात सादर करून मौज आणली आहे. ‘ठिणगीला भिडणारी आग रं’, हे शब्द आणि त्यांना दिलेलं संगीत साजेस आहे. सावनी रवींद्र यांच्या आवाजातल मंगळागौर गाणं उत्तम जमलं आहे. ‘उघड्या पुन्हा जाहल्या जखमा उरातल्या,’ हे सुवर्णा राठोड यांनी गायलेलं गाणं, चित्रपट संपल्यावरही सोबत करतं. उमाकांत काणेकर यांचे शब्द गायिका शोभा गुर्टू आणि श्रीकांत ठाकरे यांनी संगीत दिलेलं हे मूळ गाणं आहे. पण चित्रपटात ते चपखल ठिकाणी येतं, चित्रपटाची गोष्ट या गाण्यासोबत पुढे जाते, तेव्हा गाण्याच्या शब्दांनी ते प्रसंग अधिक परिणामकारक ठरतात. संजय लीला भन्साळी एका गाण्याला जितका वेळ देतो तितक्या वेळात एक मराठी चित्रपट शूट केला जातो, म्हणूनच कमी बजेटमध्ये बाईपणचे उच्च दर्जाचे छायाचित्रण करणार्या छायाचित्रकार वासुदेव राणे यांचं विशेष कौतुक.
टायमिंग भारी देवा…
चित्रपट २०२१ साली तयार झाला होता, पण प्रदर्शित करण्यासाठी वितरक नव्हता. निखिल साने यांनी (जियो स्टुडिओ) मंगळागौर येण्याआधी हा सिनेमा प्रदर्शित करून करेक्ट टायमिंग साधलं आहे. एरवी परीक्षा, आयपीएल, मोठ्या सणांना रिलीज होणारे हिंदी सिनेमे या वेळा सोडून, मराठी सिनेमा प्रदर्शित होतात, तेव्हाही त्यांना आपसातल्या स्पर्धेला सामोर जावं लागतं. या सगळ्यातून योग्य स्लॉट शोधल्यामुळे चित्रपटाला स्थिर होण्यास लागणारा दोन ते तीन आठवड्यांचा अवधी मिळाला.
प्रेक्षक भारी देवा…
प्रेक्षकांना गृहीत धरू नका. त्यांना चांगलं वाईट काय हे कळतं. तुमचा चित्रपट ग्रेट आहे हे तुम्ही बोलून उपयोग नाही, ते प्रेक्षकांनी म्हणायला हवं, असा एक साधा नियम आहे सिनेमाच्या प्रसिद्धीचा. बाईपण.. पाहायला खेडेगावातील स्त्रिया ट्रॅक्टर, टेम्पोतून तालुक्याला जात आहेत. कारण या सहाजणींत त्यांना कधी त्या स्वतः दिसतात, तर कधी आजूबाजूची नाती. जेव्हा मनाविरुद्ध वागावं-बोलावं लागतं, तेव्हा जो राग शब्दांतून सांगता येत नाही, तो राग बायका हावभाव हातवारे, उपहास, मान डोळे निरनिराळ्या प्रकारांनी फिरवून अनेकार्थांनी व्यक्त करतात. पुरुषवर्गाला संभ्रमित करणार्या या गोष्टी प्रेक्षक बायकांचं मात्र निखळ मनोरंजन करून करतात, कारण प्रत्येक स्त्री कधी ना कधी या प्रकारे व्यक्त झालेली असते. मनातले हेवेदावे विसरून एकत्र यावं असं खूप वाटतं असूनही रोजची काम, पैशाचं वेळेचं गाडं, मानापमान यामुळे ते शक्य होतं नाही, पण या चित्रपटात जेव्हा दुरावलेल्या बहिणी हळूहळू एकत्र येतात, तो प्रवास बघणं हा एक आशेचा किरण ठरतो. प्रेक्षागृहात सहज एकमेकींचे हात हातात घेतले जातात, अश्रू मुक्त वाहतात, टाळ्या शिट्ट्या आणि बसल्या जागी नाच करत बायका त्यांचं बाईपण एन्जॉय करतायेत. ऑफिस ग्रुप, ट्रेन ग्रुप एवढच नव्हे तर मदतनीस तायाही ग्रुपने हा सिनेमा बघण्यासाठी अर्धा दिवस सुटी मागून घेतात आणि ताईसाहेबही ती आनंदाने देतात. चित्रपट संपल्यावर दूर असलेल्या बहिणींना तू पण बघ नक्की असं आवर्जून फोनाफोनी मेसेज करून कळवल जातंय. मी तयार आहे गं मागचं सगळं विसरायला, पण तूही ये की जरा जवळ, असं आडून आडून सांगितलं जाणं… चित्रपटाचं ‘भारीपण’ इथे आहे.