ऐंशी नव्वदच्या दशकात पत्रव्यवहार तगून होता. पोस्टकार्ड, आंतरदेशीय पत्रे यांचा मुबलक वापर व्हायचा. तातडीच्या निरोपासाठी तार जिवंत होती. मनीऑर्डर देखील वापरात होती. तेव्हा ठराविक पद्धतीचा पत्रव्यवहार जास्ती चाले. कुटुंबातल्या परगावी गेलेल्या सदस्याने पाठवलेली प्रेमपत्रे, मित्रांची-प्रेमाची पत्रे, ख्याली खुशालीची पत्रे, कामकाजाची, शासनाची पत्रे असा सगळा मामला होता. यात काही आगंतुक पत्रे देखील असत. आपल्या घरच्या लोकांनी कुठं कपडेखरेदी केली असेल तर त्या दुकानदाराने आपली आणि आपल्या खिशाची आठवण काढलेली पत्रे असत, नानाविध ऑफर्सची पत्रे असतं. अगदी ‘फाडफाड इंग्लिश बोला’पासून ते ‘घरबसल्या ज्ञान आणि पैसे कमवा’ अशीही आवतने त्यात असत. पैकीच एक पत्र संतोषी मातेच्या भक्ती परीक्षेचं असे! ज्यांना हा प्रकार ठाऊक नाही त्यांना त्यातली मजा कळणार नाही. आपल्यावर अधिकचा जीव असणार्या कुणी तरी एका आपल्याच हितचिंतक व्यक्तीने वा परिचिताने ते पाठवलेलं असे. संतोषी मातेचा कृपाप्रसाद हवा असेल तर अशाच मजकुराचे पत्र आपल्या परिचयाच्या एकवीस व्यक्तींना पाठवावे अशी विनंती त्यात असे, असं न करता पत्र फाडून फेकून दिल्यास मातेचा प्रकोप होईल अशी धमकी देखील त्यात असे. पत्राच्या सुरुवातीसच ‘जय संतोषी माँ’ असे लिहिलेलं असल्याने नंतर नंतर ही पत्रे लगेच ओळखता येऊ लागली आणि पूर्ण न वाचता फेकून दिल्याचं, फाडल्याचं समाधान लोक मिळवू लागले. ही जय संतोषी माँ पत्रे महिन्यातून किमान एकदोन तरी येत असत, इतका त्यांचा पगडा होता. हे खूळ कुणी काढलं हे सांगता येणार नाही, मात्र संतोषी मातेला देशभर कुणी आणि कधी प्रकाशझोतात आणलं हे निश्चित सांगता येईल. त्यासाठी चार दशके मागं जावं लागेल.
ते साल एकोणीसशे पंच्याहत्तरचं असावं. मुंबईत सिनेमा रिलीज झाला तेव्हा त्याला कुणी गांभीर्याने घेतले नव्हते. पहिल्या काही दिवसांचे कलेक्शन चक्क दोन अंकी होते. मात्र अकस्मात जादूची कांडी फिरवावी तसे काहीसे घडले. स्त्रियांचे लोंढेच्या लोंढे ‘जय संतोषी माँ’च्या दर्शनाला जाऊ लागले. पाहता पाहता देशभरात हेच चित्र दिसू लागले. चलाख थिएटरचालकांनी त्यात भर टाकली. ‘ओन्ली लेडीज शो’चे पेव फुटले. काही ठिकाणी ‘माता की चौकी’ तर काही ठिकाणी ‘माता का जागर’ होऊ घातला. सिनेमा थिएटरचा माहौल बदलून गेला. वेगवेगळ्या वदंता पसरल्या, थापेबाजीला ऊत आला! वाहत्या गंगेत अनेकांनी हात धुवून घेतले! सिनेमाचं रुपडे बदलून भक्तीचे मार्केटिंग उदयास आले.
मला चांगले आठवतेय की आमच्या सोलापूरमधील प्रभात चित्रपटगृहात ‘जय संतोषी माँ’ चित्रपट झळकला होता. बहुधा वर्षअखेरचा डिसेंबर महिना होता. तेव्हा आतासारखे चित्रपट रिलीज होण्याआधी गाणी हिट झालेली नसत. माऊथ पब्लिसिटी आणि रिपीट व्हॅल्यूवर सगळी भिस्त असे. स्टारकास्टला खूप महत्व होतं. संगीत आणि गाणी भाव खात. कथांचे काही साचेबद्ध पॅटर्न तेव्हा अस्तित्वात होते. देश स्वतंत्र होण्याआधी काही मोजके जॉनर अस्तित्वात होते. उदा. पौराणिक, आदर्शवाद, रोमँटिसिझम, देशभक्ती, मेलोड्रामा यांचाच बोलबाला होता. सत्तरच्या दशकानंतर पौराणिक सिनेमांचे अस्तित्व जवळपास नावाला उरलं होतं. जे काही पौराणिक सिनेमे बनत ते तिकीटबारीवर चालत नसत. त्याउलट सूडकथा, देमार हाणामारीच्या कथा, नवीन दृष्टिकोन असणार्या. प्रेमकथा यांच्या जोडीलाच कलात्मक सिनेमाची सशक्त भर पडली. या नव्या बदलाचं फिल्म इंडस्ट्रीने आणि रसिक प्रेक्षकानेही मनापासून स्वागत केलं. दरवर्षी एकाहून एक भारी चित्रपटांची निर्मिती होऊ लागली. हिंदी चित्रपटसृष्टीला बॉलीवुड हे नाव चिटकण्याच्या आधीचा हा काळ होता. त्यातही एकोणीसशे पंचाहत्तरचे वर्ष खूप महत्वाचे होते. काही माईलस्टोन या वर्षी आले जे पुढे जाऊन ट्रेंडसेटर ठरले. यातली काही महत्वाची नावं ही गोष्ट ठळक करतील. हिंदी सिनेमाचा मुकुटमणी ठरलेला शोले याच सालचा. अमिताभचं बस्तान बसवणारा ‘दिवार’, राजकीय भाष्ये करणारा ‘आंधी’, उत्तमकुमार व शर्मिला टागोरचा हळुवार सॉफ्ट लव्ह असलेला ‘अमानुष’, ऋषी कपूरचा ‘रफूचक्कर’, अमिताभचा ‘जमीर’, राजेश खन्नाचा ‘प्रेम कहानी’, रंगील्या फिरोज खानचा ‘धर्मात्मा’, नासिरुद्दीन शाहचा ‘निशांत’, हलकी फुलकी कॉमेडी असलेला ‘चुपके चुपके’, जया भादुरीचा क्लासिक ‘मिली’, लक्ष्मीचा हॉट यंग ‘ज्युली’, अमोल पालेकरांचा ‘छोटी सी बात’, मनोजकुमारचा ‘संन्यासी’, धर्मेंद्रचा ‘प्रतिज्ञा’, शशी कपूरचा ‘चोरी मेरा काम’, संजीवकुमारचा ‘उलझन’, जितेंद्रचा ‘खुशबू’, सचिनचा ‘गीत गाता चल’ यांनी हे वर्ष गाजवले.
या सर्व चित्रपटांच्या जातकुळीशी भिन्नत्व असणारा पौराणिक कथेवर आधारित ‘जय संतोषी माँ’ याच वर्षी रिलीज झाला. खरं तर रिलीज होईपर्यंत कुणी याला गणलं देखील नव्हतं. मात्र विजय शर्मा दिग्दर्शित हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर जे घडलं तो चमत्कारच होता जणू! बॉक्स ऑफिसवर त्या साली ‘शोले’नंतर सर्वाधिक कमाई या सिनेमाने केली आणि चित्रपट तज्ज्ञांनी तोंडात बोटे घातली.
प्रभातमध्ये ‘जय संतोषी माँ’ लागला तेव्हा त्याचा फारसा बोलबाला झालेला नव्हता. मात्र पहिल्या आठवड्यानंतर चित्रपटाने वेगळाच रंग दाखवला. मुळात सोलापूर हे गिरणगाव. इथे निम्नवर्गीय, कनिष्ठवर्गीय कर्मचारी उपजीविका असणारे लोक अधिक. फुरसतीचा वेळ, बिनकामाची मुबलक माणसं यामुळे शहरात उत्सवप्रियता पूर्वीपासून सुखनैव नांदते. सगळेच उत्सव, जयंत्या मयंत्या, सणवार, इव्हेंट्स इथे दणक्यात साजरं होण्याचे हेच कारण आहे. त्यातही लोकांचा कल गणेशोत्सवापेक्षा नवरात्रोत्सवाकडे जास्त. अवघ्या काही किमी अंतरावरील तुळजाभवानी आणि शहराची ग्रामदेवता असलेली रूपाभवानी यांचा प्रभाव यामागे असावा. तर हा हा म्हणता जय संतोषी माँची ख्याती या देवीभक्तांत वार्याच्या वेगाने पसरत गेली आणि बघता बघता प्रभात टॉकीजचं रूपांतर देवीभक्तांच्या समूहात, एका भक्तिरसाने ओथंबलेल्या पब्लिकच्या लाटेत झालं. या भक्तीत नानाविध प्रकार होते.
सत्यवती नावाच्या देवीभक्त महिलेची कथा या चित्रपटात होती. नारद मुनी तिच्या भक्तीची परीक्षा घेतात. देवी संतोषी माँ अखेरीस तिच्या मदतीला धावून येते आणि तिला त्रास देणार्या दुर्जनांचा नाश होतो, असं साधंसोपं कथानक होतं. कानन कौशल हा चेहरा या सिनेमामुळे घरोघरी प्रसिद्ध झाला. अनिता गुहाने संतोषी मातेची भूमिका केली होती, तिला हा जॅकपॉट ठरला. सत्यवतीचा पती बिरजू मरण पावल्याची आवई उठवली जाते. सत्यवतीच्या सासरची मंडळी तिचा छळ मांडतात. मात्र डोळे उघडताच बिरजू परततो, तो श्रीमंत होऊनच! यासाठी सत्यवतीचे संतोषी मातेचे शुक्रवारचे व्रत कामी येते. सत्यवतीच्या व्रत उद्यापन सोहळ्याच्या दिवशी तिचे वैरी अखेरचा प्रयत्न करून पाहतात, मात्र त्यात त्यांना तोंडघशी पडावे लागते. कारण साक्षात देवी संतोषीच तिच्या बाजूने उभी राहते. नारद सत्यवतीला आशीर्वाद देतात आणि संतोषी मातेची महती मान्य करतात. पुराणकथा वाटावी ही कथा होती. पुराणातील वांगी लोकांना आजही आवडत असल्याने आणि श्रद्धा-अंधश्रद्धा यातली रेषा धूसर असल्याने अशा घटना घडू शकतात यावर आपली मंडळी चटकन विश्वास ठेवतात. अगदी लो बजेट चित्रपट असल्याने सेट अत्यंत किरकोळ आणि तकलादू होते, वेशभूषेपासून ते सर्वच तांत्रिक बाजूत अत्यंत सामान्य दर्जाचं काम होतं. मात्र एक बाजू कमालीची उजवी होती. ती म्हणजे याचं कर्णमधुर संगीत आणि अवीट गोडीची गाणी! कवी प्रदीप यांनी ही गीतं लिहिली होती आणि सी. अर्जुन या दुर्लक्षित संगीतकाराने ती संगीतबद्ध केली होती. उषा मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांच्या प्रमुख स्वरांमधील अपनी संतोषी माँ, मदद करो संतोषी माता, करती हूँ व्रत तुम्हारा, स्वीकार करो माँ, मैं तो आरती उतारू रे ही गाणी आजही धार्मिक सोहळ्यांमध्ये सुपरहिट आहेत. पडद्यावर ही गाणी सुरू झाली की थिएटरमध्ये महिलावर्ग ढसाढसा रडू लागे.
चित्रपटाचा गवगवा झाला नव्हता तोवर काही विशेष बाब नव्हती, मात्र संतोषीमातेची ख्याती वाढल्यानंतर दृश्य बदलले. महिला वर्ग शेकडोंच्या संख्येने येऊ लागला. स्टॉल, फर्स्ट क्लास, ड्रेस सर्कल, बाल्कनी सगळीकडे महिलांचं वर्चस्व. तुलनेने पुरुष अगदी कमी. स्त्रियांसोबत पोरांचं लेंढार असणं क्रमप्राप्त होतं. देवीची महती सांगणारी ती मधुर गाणी सुरु झाली की इकडे पब्लिकमध्ये कुणाच्या तरी अंगात देवी ‘आलेली’ असे. सुरुवातीला हा प्रकार तुरळक व्हायचा, नंतर याला घाऊक स्वरूप आलं. साथ पसरावी तसं एकी पाठोपाठ एकेकीच्या अंगी कथितरित्या देवी संचारू लागली. आपल्या लाईनमधील अमुक एक सीट नंबरवरील बाईच्या ‘अंगात आलं’ म्हटल्याबरोबर बायका तिच्या भवती गोळा होऊ लागल्या, तिथेच तिच्या पाया पडू लागल्या. थियेटरमध्ये परड्या, जळते कोटंबे, पोत, दिवटी, लंगर, रुद्राक्ष माळा आणि कवड्याच्या माळा सारं काही दिसू लागलं. कुंकवाचा सडा पडू लागला. जोगते येऊ लागले आणि हुंकार भरू लागले. हे सगळं सुरू झालं की सिनेमा राहायचा बाजूला आणि हाच ‘शो’ जारी राहायचा. डोअरकीपर मंडळींसाठी हे एक टार्गेट होऊन बसलं. संतोषी माँ सुपरहिट झाला, त्याची सिल्व्हर ज्युबिली साजरी झाली. पोस्टरवरच्या देवीला हारांचा गराडा पडला!
अजूनही नवरात्र येताच राज्यातल्या कुठल्याही शहरातल्या देवी उत्सवाच्या मंडपात ‘जय संतोषी माँ’ची गाणी लागली नाहीत असं होत नाही. अश्विन महिन्याच्या गारठ्यात भल्या पहाटे उठून देवीच्या दर्शनासाठी पायी निघालेले भक्तगण आणि अंधारल्या भवतालाच्या नीरव शांततेत मंद आवाजात ऐकू येणारी ‘जय संतोषी माँ’ची गाणी हे चित्र अनेकांच्या स्मृतीत कैद असेल! साडेचार दशके झाली तरी त्यात तसूभर बदल झाला नाही. गाण्यांवर आणि फिल्मी प्रतिमेवर इतकं प्रेम क्वचित पाहायला मिळतं.
जमाना बदलला संपर्काची साधने बदलली, पत्रे अंतर्देशीय तार सगळं इतिहासजमा झालं. संतोषी मातेची ती एकवीस जणांना फॉरवर्ड करायची पत्रेही काळाच्या ओघात लुप्त झाली. मात्र व्हॉट्सअपवर कधी कधी याच अर्थाचा मजकूर असणारा मेसेज येतो, तेव्हा आधी त्या सुवर्णकाळातील ऐतिहासिक सिनेमाचीच आठवण होते. असले मेसेज डिलिट होतातच कारण ही एक अंधश्रद्धाच असते!
लोक भलेही कितीही अंधश्रद्धेने असे उद्योग करत असोत, पण त्यास भावनिक आवाहनाचा भागच अधिक होता. पत्रे पाठवून वा मेसेज पाठवून कोणत्याही वेदनेचे शमन होतं नसते, समस्यांचे उत्तर मिळत नसते, तोडगे हाती येत नसतात. उलट अशा गोष्टींवर विसंबून राहिल्याने कार्यभाग बुडतो! इमोशनली बनवाबनवीचे हे टोटके खरे असते तर काहीसा वेगळा इतिहास या सिनेमाच्या अनुषंगाने घडला असता. ‘शोले‘ हा जसा बॉक्स ऑफिसचा बादशहा आहे तसेच ‘जय संतोषी माँ’ ही बॉक्स ऑफसची देवी आहे. ‘शोले’ने त्यातल्या हरेक घटकाला मालामाल केले, नवी ओळख निर्माण केली, शोहरत दिली, रसिकांचे अफाट प्रेम दिले, छप्परफाड दौलत दिली. अगदी काही मिनिटांचे खेळ खेळलेल्या मॅकमोहन (सांभा), कालिया (विजू खोटे), मौसी (लीला मिश्रा), रहिम चाचा (ए. के. हंगल) या मंडळींना रसिकांनी आपल्या मनात कायमचे स्थान दिले. मुख्य स्टारकास्टसह, निर्माते, संगीतकार, गीतकार, गायक, कथालेखक, संवाद पटकथा लेखक यांच्यासह तांत्रिक अंगे सांभाळणार्या सर्व मंडळींना ही आयुष्यभराची कमाई ठरली.
मात्र ‘शोले’ला फाईट देणार्या ‘जय संतोषी माँ’चे तसे घडले नाही, बिलकुल विपरीत उलटे घडले. अपवाद वगळता या सिनेमाशी संबंधित बहुतेक सारेजण विपन्नावस्थेत गेले, काही भिकेला लागले, काही देशोधडीला लागले! ज्यांनी हा सिनेमा बनवला ते कंगाल झाले. ज्यांनी मुख्य भूमिका केल्या त्यांच्या नशिबी विजनवास आला, दैन्य आले. इतकेच नव्हे तर ज्या अनिता गुहाने देवी संतोषी माँ ही भूमिका केली होती तिच्या वाट्यालाही अत्यंत दुःख आले. तिचे पती अकाली गेले. तिला विनापत्य आयुष्य जगताना कामास मुकावे लागले, कारण तिला ल्युकोडर्मा या त्वचेच्या पिग्मेंटेशन डिफिशियन्सीचा सामना करावा लागला. तिचा अंत हेलावून गेला. तेरा वा एकवीस पत्रे पाठवल्याने भले झाले असते तर त्याच धर्तीवर या सिनेमात योगदान देणार्यांचेही भले झाले असते, पण तसे झाले नाही! म्हणूनच अशा गोष्टींना आधार लाभत नाही. या अंधश्रद्धा असतात हे एकीकडे मान्य केले तरी दुसरीकडे भल्याभल्यांना टक्कर देऊन आपलं नाव सुवर्णाक्षरात गोंदवण्यास भाग पाडणार्या संतोषी मातेला बॉक्स ऑफिसची ‘ऑल टाइम हिट देवी’ ही उपाधी लाभली हेही एक वास्तवच होतं. खरं तर ते एक अद्भुत कोडंच होतं ज्याचा नेमका अर्थ अजूनही कुणाला सापडला नाही.
बॉलिवुड अशा चमत्कारिक गोष्टींनीही भरलेले आहे, त्यातले चांगले निवडता आले पाहिजे नि श्रद्धा अंधश्रद्धा यातले अंतरही ओळखता आले पाहिजे!