प्रबोधनच्या दुसर्या वर्षाची दमदार सुरवात `ब्राह्मण ब्राह्मणेतर वादाची चिकित्सा` या लेखमालेने झाली. दोन्ही बाजूंचे दोष दाखवून देत केलेला हा जातिभेदाचा पंचनामा आजही मोलाचा आहे.
– – –
`महाराष्ट्रातील ब्राह्मण ब्राह्मणेतरांच्या तंट्यांतील मूलतत्त्वांचे कोणाची भाडभीड न धरता स्पष्ट पृथक्करण केल्याशिवाय गत्यंतरच उरलेले नाही. हे काम होमिओपथिक पद्धतीने करण्याइतकी वस्तुस्थिती उरलेली नसून, आता त्यावर सर्जनची तीक्ष्ण धारेची नस्तरेच चालविली पाहिजेत, असं करताना कोणत्याही पक्षातल्या आरडाओरडीकडे, शिव्याश्रापांकडे, खुनाच्या धमक्यांकडे किंवा प्रत्यक्ष खुनाच्या शक्यतेकडे दुर्लक्ष करून, हिंदू समाजाच्या भावी उत्कर्षासाठी सत्य निरूपणांत प्रबोधनाचे कलम केव्हाही डगमगणार नाही.`
एखादा वाद टोकाला पोचलेला असताना परस्पर द्वेषाच्या आधारे ध्रुवीकरण झालेलं असतं, तेव्हा कोणाचीही बाजू न घेता उलट दोन्ही बाजूंचे दोष दाखवणं ही फारच धाडसाची गोष्ट असते. ते करताना कोणते धोके असू शकतात याची शक्यता वरच्या परिच्छेदात प्रबोधनकारांनी सांगितलेली आहे. १९२०च्या दशकात ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर वादाने संघर्षाची परिसीमा गाठली होती. तेव्हा `ब्राह्मण ब्राह्मणेतर वादाची चिकित्सा` ही अग्रलेखमाला लिहिण्याने जिवाला धोका होण्याची याची कल्पना असूनही प्रबोधनकारांची लेखणी निस्पृहपणे चाललेली आहे.
प्रबोधनच्या दुसर्या वर्षाच्या दुसर्या अंकात `ब्राह्मण ब्राह्मणेतर वादाची चिकित्सा`या शीर्षकाचा पहिला अग्रलेख दिसतो. पुढे या मालिकेत आणखी तीन लेख प्रकाशित झाले. त्यातली मांडणी आजही महत्त्वाची आहे. प्रबोधनकारांच्या एकूणच विचारधारेत याचं स्थान मोक्याचं आहे. प्रबोधनकार भिक्षुकशाहीच्या विरोधात आक्रमक मांडणी करत होतेच. पण महाराष्ट्रात त्या घडीला जोमात असणार्या ब्राह्मणी आणि ब्राह्मणेतर चळवळीच्या दोन्ही पक्षांपासून त्यांनी सुरक्षित अंतर ठेवलं होतं. ते वैचारिकदृष्ट्या अर्थातच ब्राह्मणेतर विचारसरणीच्या जवळ होते. पण त्यांना ब्राह्मणेतर पक्षाच्या चौकटीत बसवणं शक्य नाही. त्यांनी कोणत्याही पुढार्याचं अंधानुकरण केलं नव्हतं. त्यामुळे ते स्वतःची स्वतंत्र मांडणी करू शकले. त्यातले सर्वच मुद्दे ब्राह्मणेतर पक्षाच्याही सोयीचे नव्हते. उलट त्यांनी त्यावर टीका केली आहे. `माझी जीवनगाथा`मधे त्या काळाकडे पाहतानाही त्यांचा स्वतंत्र दृष्टिकोन स्पष्ट होतो. ते लिहितात, `करवीरकर छत्रपती शाहू महाराज जोवर हयात होते, तोवर ब्राह्मणेतर चळवळ म्हणजे यच्चयावत बहुजन समाजाची एकमेव उद्धारकर्ती चैतन्यदेवता वाटत होती. त्यांचा मृत्यू होताच सारीच बजबजपुरी माजली… सत्यशोधक चळवळ आणि ब्राह्मणेतर चळवळ यांच्या व्याख्या नि मर्यादा ठरल्या गेल्या नाहीत. याचा परिणाम खुद्द शाहू महाराजांच्या हयातीतच त्यांना भोगावा लागला. सत्यशोधक तत्त्वांचा विचका उडाला.`
या पार्श्वभूमीवर प्रबोधनकारांनी केलेली ब्राह्मण ब्राह्मणेतर वादाची चिकित्सा महत्त्वाची ठरते. फक्त ब्राह्मणच लुच्चे ठरवायचे तर ब्राह्मण नसलेले सगळे जण साधुसंत असल्याचं सिद्ध करता येणार नाही, असा इशारा देत प्रबोधनकारांनी सर्वात आधी ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर या ढोबळ विभागणीचा फोलपणा दाखवून दिलाय. स्वतःला ब्राह्मण म्हणवून घेणार्या चित्पावन, देशस्थ, कर्हाडे, सारस्वत, दैवज्ञ, शुक्ल यजुर्वेदी या पोटजाती तेव्हा ब्राह्मण पक्षात सक्रिय नव्हत्या. उलट चित्पावन वगळता इतर पोटजातींना ब्राह्मणेतर चळवळीविषयी सहानुभूती होती. फार टोकाचा वाद झाला तर त्या उदासीन राहत. तसंच अस्पृश्यता निर्मूलनासारख्या सामाजिक चळवळीत आघाडीवर असत. दुसरीकडे भिक्षुकशाहीने लादलेल्या मानसिक गुलामगिरीची बंधनं अधिक घट्ट करणारे `भटांचे गुलाम` ब्राह्मणेतरांमधेही शेकडा ९५ तरी नक्कीच सापडतात. अशी मांडणी करून प्रबोधनकार ब्राह्मण म्हणून सगळ्याच पोटजातींना झोडपणं योग्य नसल्याचं सांगतात.
हाच धागा धरून प्रबोधनकार मांडणी करतात, `ज्या स्मृति पुराणोक्त मानसिक गुलामगिरीने अखिल हिंदू समाजाचे सामाजिक व धार्मिक जीवन नासून सडके बनले आहे, त्या गुलामगिरीचे पुरस्कर्ते जेथे जेथे आढळतील, मग ते ब्राह्मणेब्रुव समाजांत असोत, क्षत्रिय म्हणविणार्या जातीत असोत, अगर कोठेही असोत, त्या सर्वांची अभेदभावाने एकजात ससेहोलपट करताना एकाही सत्यशोधकाची, एकाही नवमतवाद्याची, एकाही ब्राह्मणेतराची निस्पृहता लवमात्र बाचकता कामा नये… भिक्षुकशाहीला जमीनदोस्त करताना, पुरोहितांच्या परंपरेला गचांडी मारताना व देव मानवांमधली धार्मिक अडत्येगिरीची सट्टेबाजी निर्मूलन करताना ब्राह्मणेतरांतल्या सर्रास `भटांच्या गुलामांना` अस्सल भिक्षुकांबरोबरच जात्यांत भरडून का काढू नये?` विचारांमध्ये स्पष्टता नसल्यामुळे ब्राह्मणेतर चळवळीत यादवी माजली आहे, असंही ते सांगतात. तेव्हाच ब्राह्मण संघातही सवतासुभा उभा राहिल्याचं नमूद करतात.
भारत हा वेगवेगळ्या संस्कृतीच्या लोकसमूहानं गजबजलेलं फक्त राष्ट्रच नाही, तर युरोप अमेरिकेसारखा खंडच आहे. त्यामुळे या विविधतेचा विचार न करता, एकच चळवळ लादल्याने ती दीर्घकाळ टिकत नाही, असं निरीक्षण प्रबोधनकारांनी नोंदवलं आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातली सामाजिक विविधता त्यांनी मांडली आहे. या विविध समाजघटकांमधे समन्वय घडला तेव्हा विजयनगरचं साम्राज्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभं राहिलं. त्यामुळे देशाच्या स्वातंत्र्यासाठी जातींचे सगळे भेद विसरून एकत्र येण्याचं आवाहनही त्यांनी केलंय. ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद हा फक्त धार्मिक कर्मकांडांसाठीच्या वेदोक्त पुराणोक्त वादापुरता मर्यादित नसल्याचंही स्पष्ट करताना ते लिहितात, `धर्माची किंमतच इतकी स्वस्त उतरल्यावर धार्मिक स्वातंत्र्याच्या हाका आरोळ्यांना काय महत्व द्यायचे, ते उघडच होते. सध्याच्या धर्मलंड युगात अमुक विधी माझ्याच हातून झाला पाहिजे, अशी दमदाटी करायला भिक्षुकाला तोंडच उरलेले नाही. त्याला बोलावणे वा न बोलावणे ज्याच्या त्याच्या खुशीचा सौदा होऊन बसला आहे.`
पहिल्या दोन लेखांकात अशी मांडणी करून झाल्यावर प्रबोधनकार तिसर्या लेखात ब्राह्मण ब्राह्मणेतर विभागणीचं सत्य स्वरूप स्पष्ट करतात, `आपण सामान्यतः जिला ब्राह्मण ब्राह्मणेतर चळवळ म्हणतो ती वास्तविक ब्राह्मण तेवढे एकीकडे व ब्राह्मणेतर तेवढे दुसरीकडे अशा स्वरूपाची चळवळ नसून, उघड उघड चित्पावन विरुद्ध चित्पावनेतर अशी आहे.` पेशवाईतल्या चित्पावनांच्या दोषांवर नेमकं बोट ठेवून ते आजही रोजच्या व्यवहारात चित्पावन दुफळी माजवत असल्याचे अनुभव मांडतात. त्यावर लिहितात, `रोजच्या सामाजिक व्यवहारापासून तो थेट राजकारणार्या कांग्रेसी धडपडीपर्यंत ही चित्पावनी मनाची तेढ महाराष्ट्राच्या ऐक्यवर्धनात वरचेवर संकटं उत्पन्न करीत असल्यामुळे पूर्वजांच्या कृतपापांवर पडदा सोडू म्हटलं तरी सोडता येत नाही. आमच्या स्पष्टोक्तीचा पुष्कळांना राग येईल. येवो बापडा! आता किती दिवस ही चिघळणारी खरूज दडवून ठेवणार?` वेदोक्त पुराणोक्त वाद, शाहू महाराजांवर अभद्र टीका, कायस्थ आणि इतर जातींचा अपमान अशा समाज दुभंगणार्या गोष्टी चित्पावनांनी घडवल्याची तेव्हा ताजी असणारी उदाहरणं त्यांनी या संदर्भात दिली आहेत. इतरांशी तुसडेपणाने वागण्याची पद्धत चित्पावनांनी सोडली तर हा वाद थोडा शमू शकेल, असं त्यांना वाटतं.
चित्पावनांनी केलेली कारस्थानं बहुजन समाजाच्या लक्षात न आल्याने महाराष्ट्राचा अध:पात झाला. पण गोपाळ संप्रदायाचा चित्पावनांच्या कारस्थानांना अपवाद होता, असं सांगत प्रबोधनकार लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, गोपाळ गणेश आगरकर आणि गोपाळ कृष्ण गोखले या चित्पावन पुढार्यांचं मोठेपण सांगतात. राजारामशास्त्री भागवतांचे पुरोगामी विचार दाखला म्हणून देतात. बहुजन समाजात स्वत:च्या समाजाचे दोष दाखवून देणारा लोकहितवादी झाला नसल्याची खंतही ते व्यक्त करतात. ते लिहितात, `ज्या कोणास या हिंदुस्थान देशाची उन्नती व्हावी, अशी इच्छा असेल, त्यांनी या चित्पावनांस प्रथम देशाच्या बाहेर पार हुसकून लावले पाहिजे` या लोकहितवादींच्या शेर्याचा अर्थ लाक्षणिक घ्या, नाहीतर अक्षरशः घ्या, चालू वादांत या अर्थाला सार्थ करण्याइतका त्वेष ब्राह्मणेतरांत भडकविण्याइतकी दुष्ट कृत्ये करण्याची चित्पावनांची खोड लवमात्र कमी झालेली नाही. याचा पुरावा म्हणजे टिळकांचा राष्ट्रीय पक्ष होय.`
अमेरिकेतल्या बुकर टी. वॉशिंग्टन यांनी निग्रोंच्या चळवळीत आत्मविकास घडवला, तसं ब्राह्मणेतरांनी करून दाखवायला हवं, अशी अपेक्षा प्रबोधनकारांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर चित्पावनांची तुलना इंग्रजांशी केली आहे. धोरणीपणा, कुशाग्र बुद्धिबळ आणि धडाडीच्या जोरावर ब्रिटिशांनी भारत जिंकला, त्याचप्रमाणे चित्पावन कोकणातून देशावर येऊन अवघ्या पन्नास वर्षांत महाराष्ट्रात शिरजोर झाले. त्यांच्या कुटिल डावपेचांचे दुष्परिणाम महाराष्ट्र भोगत असल्याने त्यांनी त्यांच्या वर्तनात सुधारणा घडवायला हवी, असा स्पष्ट सल्ला त्यांनी दिला आहे.
ते लिहितात, `मराठे क्षत्रियांची तडफदार एकमार्गी मुसंडी, देशस्थ सारस्वतांची बुद्धिमान सात्त्विक वृत्ती किंवा कायस्थांची दिवाणी लष्करी इमानदारी यांची हिंदूसमाजाच्या व महाराष्ट्राच्या पुनरुज्जीवनार्थ जेवढी जरूर आहे, तेवढीच चित्पावनांच्या उत्तम गुणांबरोबरच त्यांच्या कुटील प्रवृत्तीचीही आहे… हिंदू समाजाच्या पंचपक्वान्नांच्या ताटांत निरनिराळ्या पक्वान्नांच्या वाढणीचे प्रमाण आज अज्जिबात बिघडले आहे, ते यथाप्रमाण मांडले पाहिजे. जेथे केशरी भाताची मूद असायची, तेथे चित्पावनी चिटणीची मूद पडून केशरी भाताची चिमूट कोपर्यांत पडली आहे. हे चटणीचे प्रमाण चिमटीवर आणण्याची चित्पावनांनी अत:पर शिकस्त केली नाही, तर मात्र त्यांना फार जड जाईल.`
अशी काव्यात्म पण थेट मांडणी करत प्रबोधनकार महाराष्ट्रहिताचा खुंटा करत लेखमालेचा शेवट करतात. तो असा, `ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर सर्व जातींनी दोन विभागांत एकवटून खुशाल आपापल्या विशिष्ट संस्कृतीच्या आत्मविकसनाच्या भगिरथ खटपटी कराव्या. परंतु या खटपटींच्या धोरणाची दृष्टी हिंदू समाजाच्या व हिंदूराष्ट्राच्या एकमुखी व एकजिनसी पुनरुज्जीवनाकडे रोखली जाईल, परस्परांच्या भिन्नभिन्न प्रवृत्तींचा योग्य प्रमाणात विनिमय केला जाईल, तर पुण्यस्मरण शिवरायांच्या महाराष्ट्राच्या तंबोर्याच्या विविध तारा आज ज्या भेसुर तान झाल्या आहेत, त्या एकतान होतील आणि ब्राह्मण ब्राह्मणेतर या भेदाच्या निर्मूलनातून महाराष्ट्राच्या भाग्योदयाची किरणं फाकतील.`