संतोषजी, माझा एक मित्र दात घासताना एका पक्षात असतो, चुळा भरताना दुसर्या पक्षात असतो आणि तोंड धुवून होताच तिसर्या पक्षात प्रवेश करतो. तो स्थिरावायचा कधी?
– रामेश्वर गेडाम, गडचिरोली
आपण त्याच्या मागून फिरणं बंद केलं तर त्याला त्याची खरी किंमत कळेल आणि जे त्याला पक्षात घेतात त्यांनाही त्याची किंमत कळेल. आपोआप झक मारत तो स्थिरावेल. त्याला डब्यालाही कोणी विचारणार नाही… जेवणाच्या. (खरी किंमत ही पक्ष पक्ष फिरणार्यांची नसते, तर त्यांच्या मागून फिरणार्यांची असते… पण फिरणार्यांनाच हे कळत नसते.)
बायकांना मिशा का नसतात?
– तुषार पडघे, विक्रमगड
तुम्हाला मिशीवालीच आवडते का? निसर्गापुढे मी आणि बायकाही जाऊ शकत नाहीत. सो बायकांना मिशी येऊ शकत नाही, हे सत्य स्वीकारा आणि तुम्हाला मिशी आवडत असेल तर कोणीतरी ‘मिशीवाला’ बघा आणि डोळे भरून मिशा बघत बसा.
मी घरातून बाहेर पडताना कधीच आरसा पाहात नाही. माझ्या बायकोसह बहुतेक सगळ्या बायका आरसा पाहिल्याशिवाय घरातून बाहेरच पडत नाहीत, ते का?
– रोहन कवळे, सांगली
मुळात तुमच्या घरात इतक्या बायका तुमच्या बायकोला चालतात? (सासू.. नणंदा.. की बायकोच्या नकळत दुसर्या घरात इतक्या बायका ठेवल्यायत? त्यामुळे तुम्हाला घरातून बाहेर पडताना स्वतःच्या डोळ्यात बघायची हिंमत होत नसेल. म्हणून तुम्ही आरसा बघत नसाल. बायकांमध्ये ती हिंमत असते. म्हणून बायका आरसा बघतात… कर नाही त्याला आरसा बघायचा डर कशाला?
बायकांना कधीच टक्कल पडत नाही, पुरुषांना ते का पडते?
– दस्तगीर शेख, टिटवाळ
थोडे पैसे खर्च करा, केसांचा विग बनवून घ्या ना. का उगाच बायकांचा हेवा करता. बायका पुरुषांचा हेवा करतात का? सरळ गंगावण लावतात ना? (अशा नको त्या विचाराने पुरुष डोक्याला ताप करून घेतात, म्हणून पुरुषांच्या डोक्याला टक्कल पडतं.)
पैसा असूनही माणसाच्या एकाकीपणात का वाढ होत आहे?
– अशोक परब, सावरकर नगर, ठाणे.
सरळमार्गाने पैसा कमवत असाल, तर तो एकट्यालाही पुरत नाही. त्यामुळे तुम्हाला एकाकी वाटत असेल. वाकड्या मार्गाने कमवत असाल, तर बायकापोरं तुमचा वाल्या कोळी करत असतील. त्यामुळे तुम्हाला एकाकी वाटत असेल. नाहीतर पैसा असेल तर सगळेच एन्जॉय करतात… (वाल्याचा वाल्मिकी फक्त एक आणि एकमेव झाला.)
तुम्ही तुमच्या पुतण्याला घाबरता का? की तुमचे काका तुम्हाला घाबरतात?
– संजय क्षीरसागर, पिंपळे गुरव
माझ्या पुतण्याला मीच गमभन शिकवलंय. पण शिकवताना, मी माझ्या पत्नीला, म्हणजे पुतण्याच्या काकीला ध चा मा कसा करतात हे पुतण्यासमोरच शिकवलं आहे आणि मी बायकोचा शब्द पाळतो, हे पुतण्याला माहित आहे. त्यामुळे पुतण्या मला टरकून आहे. आणि माझ्या काकांचं म्हणाल, तर माझे काका बोलतात तसे अजिबात वागत नाहीत. हे मला माहित असल्याने मी त्यांना वचकून आहे. त्यामुळे आमचं छान चाललं आहे. (शिवाय मी माझ्या लेकीच्या नावाने आधीच सगळं करून ठेवले आहे. माझ्या काकांनी त्यांच्या लेकीच्या नावाने ऑलरेडी सगळं करून ठेवलं आहे. त्यामुळे वादावादी करून दावा करायला वावच राहिलेला नाही आहे.)
सोशल मीडियावर कायम एकच डीपी ठेवणार्या व्यक्तीचा स्वभाव कसा असतो? स्वत:च्या फोटोऐवजी पानं, फुलं, नट, नट्या यांचे फोटो लावणार्यांचे स्वभाव कसे असतात?
– सुनेत्रा रायरीकर, धनकवडी, पुणे
आपलं दाखवून जगाला काय फरक पडणार आहे (तोंड) असा स्वभाव एकच डीपी ठेवणार्यांचा असतो आणि जे दाखवायचं तेच लपवायचं आणि नको त्यांचं दाखवायचं, पण दुसर्यांचं मात्र ओपन करून बघायचं (तोंड) असा स्वभाव वेगवेगळे डीपी ठेवणार्यांचा असतो. आता तुम्ही कुठल्या स्वभावात मोडता हे तपासून बघा.
ज्याची ब्लड शुगर जास्त तो माणूस गोड स्वभावाचा असतो का?
– संदेश कुलकर्णी, सातारा
ज्याला मूळव्याध असतो त्याचा स्वभाव कसा असतो या प्रश्नाचं सध्या उत्तर शोधतोय. ते मिळालं की आजारावरून माणसाचा स्वभाव ओळखणे असं पुस्तकच मी लिहिणार आहे. त्यात तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळेल.
मित्राचे लग्न झालंय हे माहीत असूनही एखाद्या मैत्रिणीने त्याच्यावर प्रेम करत राहणं कितपत योग्य वाटतं तुम्हाला?
– तनुजा पेंढारकर, राहुरी
या गोष्टीची कल्पना ‘जितपत’ मित्राच्या बायकोला येत नाही ‘तितपत’ योग्य आहे. (काय तुमच्या प्रश्नात. आले माझ्या ध्यानात. तेव्हा ‘जितपत’ लोकांना शंका येत नाही, ‘तितपत’ मित्राच्या नावाने बिल फाडणं योग्य आहे.)