गेल्या आठवड्यात विनोदवीर कुणाल कामरा याचं गद्दार गीत गाजल्यानंतर गद्दार पक्षांच्या गंजीला लागलेली आग अजून धुमसतेय. माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या याने कडक उन्हाळ्यातही या आगीत हात शेकून घेतले तेव्हा त्याचं डोकं शांत झालं. तरीही त्याला एकूण गंभीर परिस्थितीची चिंता वाटू लागली तेव्हा मी त्याला धीर देत म्हणालो, पोक्या, कुठेतरी कशाचा तरी बंदोबस्त व्हायला पाहिजे, नाहीतर हे प्रकरण हाताबाहेर जाईल आणि नको नको ते घडेल. सत्ताधारी नेत्यांना याबाबत जास्त काळजी आहे. त्यामुळे तू त्यांच्यापैकी काहींच्या मुलाखती घेऊन त्यांना उपाययोजना सुचविण्यास सांग. असं सांगितल्यावर उत्साहाने मुलाखतीची कामगिरी फत्ते करून दुसर्या दिवशी माझ्या घरी आला. त्याच या मुलाखती वजा प्रतिक्रिया.
एकनाथ शिंदे : हा कोण कामरा? मला माहीत नाही. असलं काही पाहण्याचा आणि वाचण्याचा मला छंद नाही. पण तो जर आम्हाला गद्दार म्हणत असेल तर त्याचा बंदोबस्त करण्यास आम्ही समर्थ आहोत. आनि म्हनून राज्यात यापुढे कुनी कुनाला गद्दार म्हनू नये म्हनून गद्दार हा शब्द त्या शब्दकोष का कसल्या कोशातून काढून टाकन्याची मागनी आम्ही केंद्र सरकारकडे करनार आहोत. ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळांच्या माथी हाणू काठी’ या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाला अनुसरून आम्ही केंद्र सरकारकडे दशलक्ष कोटी काठ्यांची मागनी करनार आहोत. त्यानंतर राज्यात असे लोक शिल्लक राहणार नाहीत.
देवेंद्र फडणवीस : लाडक्या बहिणींच्या पोशिंद्याला, शिंदेंसारख्या अनाथांचा नाथ असलेल्या महापराक्रमी पुरुषास गद्दार म्हणण्याची या कामराची हिंमत तरी कशी होते? हे सहन केलं जाणार नाही. आम्ही त्यांना सत्तेत घेतलं ते गद्दार म्हणून नव्हे, तर ठाण्याला अधिकाधिक उंचीवर नेण्याची त्यांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी. त्यांना खुर्चीची हाव नाही. नाहीतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास मान्यता दिलीच नसती. या कामराचे काय करायचे याचा विचार मी एका वर्तमानपत्रातला अग्रलेख वाचून करीत आहे. अशा विनोदी प्रवृत्ती समाजातून लवकरात लवकर नष्ट झाल्याच पाहिजेत. कोणी उठतो आणि कुणाबद्दल काहीही बोलतो. याबाबतीत माझा आदर्श तुम्ही डोळ्यांसमोर ठेवा, असं बोलण्याचा अधिकार आमच्याशिवाय समाजात कोणालाही नाही. ते रेटून खोटं बोलतात आणि आमच्यावरच उलट आरोप करतात? वेळ आल्यास कामराला तडीपार करण्यासाठी मी केंद्रीय गृहमंत्र्याचाही सल्ला घेईन, पण कामराला असा तसा सोडणार नाही.
अजित पवार : या कामराच्या प्रश्नाला दोन बाजू आहेत हे आपण मान्य करायला हवं, पण त्याला तिसरी किंवा चौथी बाजूही असू शकते याचा विचार करून योग्य निर्णय संविधानाला स्मरून घ्यायला हवा. गद्दारांची टिंगल करणं हा मनुष्यस्वभाव आहे. मीही अशी टिंगल यापूर्वी केली होती, पण ज्यावेळी सत्तेत आल्यावर लोक माझी टिंगल करू लागले तेव्हा माझीही पंचाईत झाली. पण सत्ताधारी नेत्यांची कातडी गेंड्यासारखी असायला हवी, तरच त्यांचा निभाव लागू शकतो. हेच अंतिम सत्य आहे.
दीपक केसरकर : कामरा नेमकं काय बोलला याचा विचार सर्व बाजूंनी व्हायला हवा. त्यासाठी गद्दार या शब्दाची उत्पत्ती नेमकी कशापासून झाली यावर सखोल संशोधन व्हायला हवं. त्याच्या अनुभवाची पातळी कदाचित विस्तारली असल्यास तो दृष्टीपलीकडील काही गोष्टींचं आकलन करू शकतो. तसंही झालं असेल. मी मंत्रिमंडळात असतो तर फडणवीसांना प्रत्यक्ष भेटून योग्य तो सल्ला दिला असता, पण मलाच काही प्रकरणात त्यांनी संशयाच्या भोवर्यात ठेवल्यापासून मी त्यांच्याशी मोबाईलवरून बोलणंही टाळतो. पण कामरालाही न्याय मिळाला पाहिजे अशी माझी भूमिका आहे. तो क्षमा मागणार नाही असं का म्हणाला यामागची त्याची मानसिकता जाणून घेतली तर ते मनोवैज्ञानिकदृष्ट्या योग्य होईल आणि त्यामुळे अधिक सूक्ष्मात जावं न लागता वास्तव पातळीवर कामराला व शिंदे गटाला न्याय मिळेल अशी माझी भावना आहे.
आशिष शेलार : या कामराचा सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे. त्याशिवाय असली फालतू गाणी आणि विडंबनं करण्याची कोणाची हिंमत होणार नाही. त्यासाठी वेगवेगळ्या कल्पना माझ्याकडे आहेत. त्या मी रवींद्र नाट्यमंदिरात जाहीर कार्यक्रमात जनतेपुढे ठेवणार आहे. स्टँडअप कॉमेडियन्सवर कायमची बंदी घातली पाहिजे. सत्ताधारी नेत्यांची टिंगलटवाळी करणारी राजकीय गाणी आणि विडंबनं करण्यावर कायद्याने बंदी कशी आणता येईल यावर मी अॅड. उज्ज्वल निकम यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार आहे. कोणी असा प्रकार केल्यास त्याला विना जामीन तुरुंगात डांबण्याची तरतूद कशी करता येईल याचाही विचार केला जाईल. केंद्रीय मंत्रिमंडळातील देशाच्या दोन महत्त्वाच्या पदांवर असणार्या थोर पुरुषांची गौरवगीतं लिहिणार्या कवींना लाडके कवी म्हणून सन्माननिधी देण्यासाठी वार्षिक साडेदहा कोटी रकमेची तरतूद केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून करून घेतली जाईल.
किरीट सोमय्या : नाय ना या कामराच्या पाठी ईडीची साडेसाती लावली तर नाव सांगणार नाय. अरे, कोणाची बदनामी करतोस तू? शिंदेसारख्या देवमाणसाची? त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं, ते काही अंड्यातून कोंबडी निर्माण करण्याइतकं सोपं नव्हतं. मागे माझ्या नकळत कॅमेर्याने माझे नको तसले व्हिडीओ काढून ते व्हायरल करण्यामध्ये कामरासारख्या दुष्ट प्रवृत्तींचा हात होता, हे मी सांगण्याची गरज नाही, पण त्यामुळे माझं काहीही वाकडं झालं नाही. करता येणार नाही. माझ्याविषयी कसल्या नको त्या अफवा पसरवता? मी त्याला चॅलेंज देतो की माझ्यावर तू तुझ्या पद्धतीचं गाणं लिहूनच दाखव, मग बघतो मी तुझं काय करायचं ते!