□ मंत्रालयात दोन दिवसांपासून पाणीपुरवठाच बंद.
■ तेवढंच होऊन भागणार नाही. मंत्रालय, विधान भवन यांच्या सगळ्या बाजूंनी खोदून ठेवलं पाहिजे, सगळा सिमेंटचा धुरळा उडवला पाहिजे, म्हणजे कंत्राटबाजीच्या नादात सगळ्या मुंबईची, महाराष्ट्राच्या बहुतेक भागांची कशी चाळणी करून ठेवलेली आहे, ते कळेल हे राज्य चालवण्याची जबाबदारी न पेलणार्यांना!
□ नवी मुंबईतील दहा हजार अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा – हायकोर्टाचे पालिकेला आदेश.
■ एक तरी पालिका जुमानते का या आदेशांना? न जुमानणार्या पालिकांना न्यायालयं काय शिक्षा देऊ शकतात? काहीच नाही. मग नुसतेच कडाडले, धारेवर धरले, वाभाडे काढले, ताशेरे ओढले, याने सर्वसामान्य माणसांनी खोटं समाधान करून घ्यायचं.
□ ही माध्यमे नव्हेत, तर गिधाडे – सत्ताधार्यांच्या शाखा बनलेल्या मेनस्ट्रीम मीडियावर स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराचा फटकारा.
■ गिधाडं कुणाचा जीव घेत नाहीत, त्यांच्याशी तुलना करणं हा गिधाडांचा अपमान आहे. या माध्यमांनी लोकशाहीचा जीव घेतलेला आहे. कायम सत्ताधार्यांच्या सुरात सूर मिसळून आणि आता त्या मढ्याला टोचून टोचून खातात.
□ कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ- मिंधे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांची धमकी.
■ मंत्री आहात की नाक्यावरचे मवाली? पोलिसांची कायदा सुव्यवस्था, न्यायालयांची प्रक्रिया, लोकशाहीची, संविधानाची प्रक्रिया यांच्यावर विश्वासच नाही की काय? ही टगेगिरी करायची असेल, तर संविधानिक पदांच्या खुर्च्या खाली करा आणि आपापल्या टोळ्यांचे म्होरके बना! सत्य इतकं झोंबतं, विनोदाने इतक्या मिरच्या लागतात? लोकही याच पद्धतीने विचार करायला लागले तर कधीतरी तुमच्यावर बेतेल.
□ दोन तासांत मारहाणीमुळे संतोष देशमुखांचा मृत्यू – १५ व्हिडिओंमधून सत्य समोर आले.
■ त्या सत्याच्या मागे अनेक सत्ये दडलेली आहेत. तीही सगळ्यांना माहिती आहेत. पण ती बाहेर आलेली नाहीत. येणार नाहीत. खरा न्याय कधी होणार नाही.
□ क्षयरोग निर्मूलनात राज्य सरकार फेल; मुंबईत संसर्ग वाढण्याचा धोका.
■ आधीच वायूप्रदूषणाचा उच्चांक गाठला गेला आहे. या हवेत श्वास घेणार्या मुंबईकरांना भविष्यात फुप्फुसांचा कर्करोग गाठणार की क्षयरोग, असा चॉइस मिळाला, ते एक बरं झालं!
□ ठाण्याच्या ध्वनिप्रदूषणात प्रचंड वाढ; आवाजाच्या डेसिबलने ओलांडली एकाहत्तरी.
■ सगळे बहिरे झाले की आपोआपच जगात केवढी शांतता निर्माण होणार आहे, हा एक फायदा कोणी लक्षातच घेत नाही? डीजे लावला नाही, तर आपल्याला कमालीचा आनंद झाला आहे, हे सगळ्या जगाला आपोआप कसं कळेल? लाऊडस्पीकरवरून रेकलं नाही, तर आपली प्रार्थना परमेश्वरापर्यंत कशी पोहोचेल? तोही डीजेचा आवाज ऐकून बहिरा झाला असेलच ना एव्हाना!
□ लोकसभेत राहुल गांधींना बोलू न दिल्यामुळे विरोधक संतापले.
■ राहुल गांधींची मुस्कटदाबी करण्यासाठीच आपली नेमणूक आहे, असा सभापती ओम बिर्ला यांचा समज झालेला दिसतो… आता हा आपला समज असू शकतो, कदाचित त्यांच्या आकांनी त्यांना हेच काम दिलं असेल. सभापती सगळ्या सदनाचा असतो, एका पक्षाचा नसतो, हे सुभाषित, जिथे निवडणूक आयोग, ईडी, सीबीआय याच सत्ताधारी पक्षाच्या शाखा असल्यासारख्या वागतात, तिथे सांगणं योग्य आहे काय?
□ विरोधी मत, व्यंग हा गुन्हा नाही – गुजरातमधील भाजप सरकारच्या मनमानीवर सर्वोच्च न्यायालयाचा आसूड.
■ तिकडे दिल्लीतून गुजरातवर असूड पडला, इकडे मिंध्यांच्या पाठीवर वळ उठले… पण त्यातून काही डोक्यात प्रकाश पडलेला असेल अशी शक्यता दिसत नाही. पूर्ण हसं करून घेतल्याशिवाय थांबायचंच नाही, असं गद्दारांनी ठरवून टाकलंय त्याला कोण काय करणार?
□ फडणवीसांच्या कार्यालयातील कर्मचार्याच्या गाडीतून कोरटकर तेलंगणात पळाला होता – काँग्रेसने पुरावेच दिले.
■ ज्याने शिवरायांचा, शंभूराजांचा घनघोर अपमान वाक्यावाक्याला केला, त्याला राज्य सरकारने सगळ्यात आधी पोलीस संरक्षण पुरवलं आणि त्या संरक्षणातूनच तो बेपत्ताही झाला, तेव्हा तो कोणाचा माणूस आहे, त्याचा बाप कोणत्या बंगल्यावर बसलेला आहे, हे स्पष्ट झालं होतं.
□ एका पराभवाने खचून जाणारे आम्ही नाही – शरद पवार यांची गर्जना.
■ पवार साहेब, लोकांना शब्द नकोत, कृती हवी आहे, कार्यक्रम हवा आहे. त्याचा काही पत्ता दिसत नाही विरोधकांच्या गोटात. मग दुसरा पराभवही होणार, त्यानंतर काय करणार?
□ शेतकर्यांना यंदा आणि पुढच्या वर्षी पीक कर्जमाफी मिळणार नाही – अजित पवार यांनी पलटी मारली.
■ निवडणूक संपली, रेवड्या खतम!
□ स्वातंत्र्याला ७८ वर्षे झालीत, आता तरी भडकाऊ भाषणे बंद करा – हायकोर्टाचे गंभीर निरीक्षण.
■ अमृतकाळ आणण्यात ज्यांचा काहीच वाटा नाही, ते तेव्हाही विषच कालवत होते, आताही विषच कालवत आहेत आणि पुढेही विषच कालवत राहणार. भडकाऊ भाषणं केली, तर यांचे द्वेषाचे दुकान चालणार कुठे आणि कसे? दुसरा मालच नाही यांच्याकडे.
□ अंबरनाथमध्ये उपोषणकर्त्या शेतकर्याची प्रकृती ढासळली; ना खासदार फिरकले, ना आमदाराने दखल घेतली.
■ व्यापार्यांच्या आणि कंत्राटदारांच्या कमिशन-राज्यात मुळात तो शेतकरी आहे म्हटल्यावर यापेक्षा वेगळी काय अपेक्षा करायची?
□ कॅशकांड प्रकरणी न्यायमूर्ती वर्मा यांच्यावर एफआयआर नाही.
■ आधी यांचे, राजकारणी पुढार्यांचे, तथाकथित लोकप्रतिनिधींचे विशेषाधिकार काढून घेतले पाहिजेत, यांचे रथ जमिनीवरून चार बोटं वरून चालतात. रस्त्यातले आपल्याला भोगावे लागणारे खाचखळगे यांना भोगावे लागतच नाहीत.