तुम्ही एखाद्या ऐतिहासिक नाटकात मावळा साकारला आहे का? त्या नाटकात मुघलांची भूमिका साकारणार्यांशी तुम्ही विंगेत, मेकअपरूममध्ये बोलायचात का?
– विमल सहस्रबुद्धे, जिंतूर
आमचं नाव संतोष आहे म्हणून असा प्रश्न विचारायचा असतो का? समजा आम्ही नाटकात मुघलांची भूमिका साकारणार्याशी मेकअप रूममध्ये बोललो असू आणि त्याचे फोटो किंवा व्हिडिओ जर काही लोकांना, काही वर्षांनी मिळाले, आणि तेव्हा आम्ही आणि मोगलांची भूमिका करणारा कलाकारही या जगात नसेल तर आम्हाला फरक पडणार नाही. पण बिचारा त्या मोगलांची भूमिका करणार्याची नसलेली कबर ते काही लोक शोधायला लागतील… कारण तेव्हा त्यांना उकरण्यासाठी कुठलीच कबर शिल्लक नसेल… का उगाच नको त्या गोष्टी उकरून काढायला बघताय? सहस्रबुद्धे, काही लोकांना एकच बुद्धी असते… ती त्यांनी गहाण टाकलेली असते… त्यांच्या बुद्धीचा विचार करा.
आपला मुलगा कर्तबगार निघाला, असा आनंद तुमच्या वडिलांनी कधी व्यक्त केला आहे का?
– परेश तल्हार, अमरावती
हो… आम्ही बाबा झालो तेव्हा त्यांना विशेष आनंद झालेला दिसला.. तो आनंद आमच्या ‘त्या’ कर्तबगारीबद्दल होता, की आता याला कळेल ‘असं’ कर्तबगार होणं म्हणजे काय असतं या उद्देशाने होता, हे तुम्हाला सांगायला नको. कारण तुमचे बाबा सुद्धा तुमच्या ‘अशा’ कर्तबगारीमुळे आनंदी झाले असतीलच.
काल माझ्या स्वप्नात एक पाटी पाहिली… येथे न्यायाधीश विकत मिळतात… कोणती जागा असेल ही?
– शेखर रिसबुड, परतवाडा
तुम्ही ‘वर्मा’वरं बोट ठेवून बुडाला ‘सूर्यचूड’ लावून घ्यायची आहे का मिस्टर रिसबुड? तुम्हाला कशाला हवी अशी जागा? जास्त झालेला पैसा जाळायचा आहे? रिटायरमेंट घेऊन खासदार बनायचंय? की स्वत:वरच्या केसमध्ये स्वत:च स्वत:ला निर्दोष शाबित करायचं आहे? की कोणा नेत्याला घरी बोलावून त्याची आरती ओवाळायची आहे? की नक्की काय केलं म्हणजे रेप होतो हे समजून घ्यायचं आहे? की जनतेचा पैसा फुकट जाईल म्हणून आमदाराला शिक्षा करता येत नाही अशी कारणं शोधायची आहेत? आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधा, म्हणजे न्याय कुठे विकत मिळतो त्या जागा तुम्हाला सापडतील. (एक गोष्ट कबूल करतो. ही जागा आम्हालाही माहीत नव्हती. एका शेंबड्या पोराने शेंबूड ओढत ओढत हे उत्तर दिलं. पण तुमच्या-आमच्यासारख्या मेंदूची पूर्ण वाढ झालेल्या लोकांना ही जागा माहित नाही, याचं आम्हालाच आश्चर्य वाटतंय.)
तुमच्या घरात कधी सीमा प्रश्न उद्भवतो का? मग तुमच्याकडे कोण कोणाला लाल डोळे करून दाखवतं? तुमची बायको तुम्हाला की तुम्ही तिला?
– जयश्री वेल्हाळ, पुणे
खरं सांगू का? बायकोच आम्हाला लाल डोळे करून दाखवते… पण आम्ही तिच्याकडे काना डोळा करतो. तिला स्वत:च्या हाताने चहा करून पाजतो. झोपाळ्यावर झुलवतो… कोणी किती आव्हान दिलं तरी आम्ही बायकोचं नाव घेत नाही… बायकोकडे काण्या डोळ्यांनीही बघत नाही… पण बाहेर सांगताना मात्र आम्ही बायकोला लाल डोळे दाखवतो असं आमच्या छातीची लांबी रुंदी न सांगता सांगतो (प्रत्येक पुरुषाचे दु:ख आहे हे… मग तो लग्न झालेला असो, लग्न न झालेला असो किंवा लग्न करूनही आपलं लग्न झालं नाही असं सांगणारा असो…) तुमचा प्रश्न पॉलिटिकल नसेल तर उत्तर नॉन पॉलिटिकल आहे असं समजा. पण तुमचा प्रश्न पॉलिटिकल असेल तर तुम्हाला अभिप्रेत होतं तसंच उत्तर दिलंय असं समजा.
पवारसाहेब, आपल्याला गुढीपाडव्याची सौगात कधी मिळणार हो माननीय मोदी साहेबांकडून?
– रसिका सावंत, गुहागर
लाडकी बहीण म्हणून तुम्हाला सौगात मिळाली तेव्हा आम्हाला विचारलंत का आम्हाला सौगात कधी मिळणार म्हणून? त्यावरून तरी ओळखा, सौगात मिळण्यासाठी निवडणुका जवळ याव्या लागतात… सर्वे आपल्या बाजूने नसावा लागतो… आणि ज्यांना सौगात द्यायची ते त्या निवडणूक विभागात बहुसंख्याक असावे लागतात (भले देशात अल्पसंख्याक असले तरी). सौगात मिळणार्यांवर जास्त जळू नका. निवडणुका झाल्या की हे लाड संपतात. तेव्हा नको त्यांच्याबद्दल प्रश्न विचारू नका. तुम्हाला लाडकी बहीण म्हणून मिळालेली सौगात परत काढून घेतली गेली ना तर बँकेत झिरो बॅलन्स म्हणून तुम्हाला दंड बसायचा. बोलण्याची उबाळ येत असेल तर ही सौगात किती चांगली आहे त्याबद्दल बोला. मग बघा, सौगातीबरोबर तुम्हाला खैरात पण कशी मिळते ती!