लाचखादाडी पोलीस स्टेशन. झोंबी पूर्व. निरीक्षक उलथे तोंडावर रुमाल टाकून कानात इअर बड लावून धनदेव बाबाचं ‘कर्मभोग ते धाडी’ विषयावरील प्रवचन ऐकत घोरत पडलेला. ठाणे अंमलदार ओरखडे नाकाभोवती घोंगावणार्या माशीच्या शिकारीसाठी सावध पावित्र्यात बसलेला. कोपर्यात खुर्चीवरील शिपाई मोबाईलवर रम्मीचा डाव लावून एकाग्रचित्त बसलेला. बाकी स्टेशनात नेहमीची गर्दी, अमुक हवालदार इकडे गेलेत, तिकडे गेलेत, ते येईपर्यंत थांबा तत्त्वावर बाहेर तिष्ठत बसलेले.
तोच कुठल्याशा एसयूव्हीतून पायचेपे त्याच्या तीनचार पंटरसह स्टेशनात येतो. त्याच्या अंगावर सव्वा मण सोनं, साखळ्या, अंगठ्या, बाजूबंद, जोडवी वगैरे प्रकार धरून. डोळ्यावर जांभळ्या रंगांचा चष्मा. मनगटात सोन्याच्या बेल्टचं घड्याळ. बाकी त्वचेच्या नैसर्गिक रंगाव्यतिरिक्त सफेद रंगाने डोळे दिपवणारं भारदस्त व्यक्तित्व म्हणजे पायचेपे. बाकीचे पंटर केसांना भुरके-लाल कोंबडी रंगात न्हालेले.
‘ऐऽऽऽ भाई आलाय. इस्पेक्टर आहे का बघ! ये टम्मण, गाडीतलं लेटर घे लवकर.’ काडी इतर पंटरांना भरभर आदेश देतो.
‘ते मरू दे! चोपड्याला फोन फिरवला का? उद्या पेप्रात फोटो आला पाहिजे. फ्रंट पेजवर! ते बघ, आधी!’ पायचेपे तोंडातला ऐवज कुंडीत दान करत काडीला सुक्या सूचना देतो.
‘भाई केलंय ते! तो चोपड्या आयबेण थुंकमतचं काम करतोय सध्या. तो अपुनला बोल्ला लाईव्ह दाखवू, तुम्ही आणखी चारदोनची गर्दी करा. मी लगेच बोल्लो भाई, तू ये! इथं भाई आले म्हंजे गर्दी होणार म्हंजे होणार! येईलच भाई तो एवढ्यात!’ काडी ताजी इन्फॉर्मेशन देतो.
‘भाई इस्पेक्टर उलथे आहे आत. घोरत पडलाय तो.’ फुगीर घाईनं येऊन सांगतो.
‘च्यायला, इथं साहेबांचा इन्सल्ट झालाय, पब्लिक गुस्सा झालीय. सोता भाई निवेदन द्यायला आलेय आणि उलथे उताणा पडलाय? भाई, तुम्ही याला खूप ढील दिलाय. हा तुमचा दरयेळी इन्सल्ट करतो. बोला, याच्याविरुद्धच इथं प्रोटेस्ट करू का?’ काडी अगदी अंगणभर नाचत भाईला सवाल घालतो.
‘अरे, झोपलाय तर उठव. नाईटला राउंडवर गेला असंल, त्याच्यामुळं लागली असंल झोप. त्याच्यावरून लगेच काय राडे करतो? इथं आज स्वर्गीय साहेबांचा विषय इम्पोर्टंट आहे ना?’ पायचेपे काडीच्या काड्या पिळतो.
तसे सारे घोळक्याने आत जातात. माशीच्या मागावर असलेला अंमळदार घाईनं उभा रहात ‘जय श्रीराम!’ घालतो. कोपर्यातला शिपाई ‘जय धंदेव!’ म्हणत हात जोडतो. पायचेपे दोघांना एकदम ‘जय गुढगेवार!’ ने उत्तर देतो.
तिघांच्या जयजयकाराने उलथेची तंद्री मोडते. तो किलकिल्या नजरेनं समोर बघतो, तर दहाएक जणांचा मॉब उभा दिसतो. तसा तो आळस झटकत चटकन उठतो. कानातले बड काढून खिश्यात कोंबतो. दाराजवळच्या पाण्याच्या जारमधून गिलास भरून घेतो. बाहेर जाऊन खस्खसून तोंड धुवून येतो. येताना रुमालानं तोंड पुसत पायचेपेकडं बघत ओशाळं हसतो आणि पुन्हा खुर्चीत बसतो.
‘काय पायचेपे शेठ? आज सवड मिळाली वाटतं? आपली पार्टी बाकीच राहिली, नव्या क्रशरची! तुम्ही एवढ्यात काही दिसंनाच! होता कुठं??’ उलथे प्रश्नांची लड लावतो.
‘आपोन इथेच संपर्क कार्यालयात असतो. कायम.’ पायचेपे कॅज्युअली उत्तर देतो.
‘मग आज काय काम काढलं? अगदी कार्यकर्त्यांबरोबर आला ते?’ उलथे गांधील माशीच्या पोळ्याला दगड मारतो.
‘बास का? सायेब? तुम्ही हे भाईच्या रीलाबिला पाहिल्या नाही का? निदान चारदोन न्यूज?’ काडी मधीच पडतो.
‘सायेब चौकात इतक्यावेळ पाह्यजेल होता. आपल्या पोरांनी पार पुतळे-बितळे…’ फुगीर मधीच तोंड मारतो.
‘काय फोडलेत का? कोणते आणि कुठले?’ उलथे सावध होत विचारतो.
‘फोडले नाही हो! जाळले. त्या हुटूंबरचे! तो नाही का? कोमेडीच्या नावाखाली नेत्यांची…’ टम्मण माहिती पुरवतो.
‘नेत्यांची काय? नेत्यांची? बदनामी करतो म्हण.’ पायचेपे आवाज वाढवतो.
‘कोणत्या नेत्याची? बदनामी केली म्हणजे?’ उलथे विचारू लागतो.
‘थेट नाही. पण आडून-आडून शिव्याच घातल्या म्हणा,’ अंमलदार तेल ओततो.
‘तुम्ही खरंच बघितलं नाही?’ शिपाई थेट आग लावतो.
‘बघू बरं! कोण काय म्हणालं ते!’ उलथेची उत्सुकता चाळवली जाते.
‘बघण्यासारखं काय आहे त्याच्यात? त्याने आमच्या भावना दुखावल्या, तुम्ही एफआयआर लिहा डायरेक. देशद्रोह, हुंडाबळी, विनयभंग असले कलमं लावा!’ पायचेपे तावातावाने बोलू लागतो.
‘बरोब्बरे! तुम्ही एफआयआर लिहा आधी,’ सगळे पंटर एक सुरात मागणी करतात.
‘पण विनयभंग? हुंडा..?’ अंमलदाराला प्रश्न पडतो.
‘मग त्यानं पब्लिकली साहेबांच्या अब्रूला हात घातला, म्हंजे विनयभंगच झाला ना? आणि निधीच्या हुंड्या ढापल्याचा ब्लेम केला म्हंजे हुंड्यापायी सायेबांचा बळीच घेऊ राहिला ना तो?’ काडी बिनतोड बाजू मांडतो.
‘भारी रे! मला हे असले पॉईंट सुचलेच नसते. हा इन्स्पेक्टर, हा म्हणतो तसा एफआयआर लिहा. आणि टाका त्याला आत!’ पायचेपे काडीची पाठ थोपटत उलथेला सांगतो.
‘अहो, पण तो कोण आहे तो? तो काय बोलला? कुणासंदर्भात बोलला? प्रत्यक्ष त्यानं थेट नाव घेतलं की आणखी काही? हे पहायला नको? मला ते बघू द्या! तुमच्याकडं आहे का तो व्हिडीओ?’ उलथे सावधपणे बाजू मांडतो.
‘हां, सायेबांच्या बदनामीचं भाईकडं काही राहील का? भाई म्हंजे अस्सल निष्ठावान डावा हाते, सायेबांचा! हात! सायेबांवरली घाण भाईला अशी सहनच होत नाही. दिसली का धुतली!’ काडी पायचेपेला हवा भरत फुगवतो.
‘मग आता? तुम्ही फक्त आरोप करताय, त्यासंदर्भात काही तर पुरावे द्या. निदान कुणाकडे किमान लिंक वगैरे?’ उलथे विचारणा करतो.
‘पुरावे? माझ्याकडे आहे ना! हा बघा, अख्खा व्हिडीओच डाउनलोड करून ठेवलाय मी!’ काडी मोबाईल काढून दाखवू लागतो. तसे बाकीचे पंटर त्याकडे शंकेने पाहू लागतात. ‘ओन्ली पुराव्यासाठी डाउनलोड केलाय मी, बाकी काही नाही.’ काडी लटकं समर्थन करतो.
‘कर प्ले कर!’ उलथे आदेश देतो.
‘मी? अहो त्याच्यात पहिल्या वाक्यापासून सायेबांची बदनामी केलीय. ते ऐकवत नाही. मी तर रात्री एक बाटली घेऊन बसलो, तेव्हा कुठं… भाई तर ते ऐकूच शकत नाही,’ काडी उत्तर देतो.
‘पण त्यात काय बोललं गेलंय? ते ऐकल्याशिवाय मी काय कलमं लावणार ना? दे इकडं. मी ऐकतो,’ उलथे काडीचा मोबाईल हातात घेतो.
‘लाऊडस्पीकरवर टाका.’ काडी पुन्हा काडी लावतो.
‘का? तुला त्रास नाही होणार का? हे सगळं ऐकून?’ उलथे उलट प्रश्न करतो.
‘नाही, भाईने ऐकलं म्हणजे एखादं कलम आणखी सुचवतील,’ काडी सुचवतो.
‘अय, भाईला ते ऐकवणार नाही. गप्प हेडफोन लावून तू आणि साहेब ऐक. आणि आवर लवकर,’ टम्मण पायचेपेचे कान झाकत बोलतो. काडी कानात हेडफोन घालतो. एक बोन्ड उलथेच्या कानात खोवतो आणि व्हिडिओ प्ले करतो. बाकीचे त्यांच्याकडे एकटक बघू लागतात.
‘हे बघा, इथं तो सायेबांना बोललाय,’ काडी उलथेला सांगतो.
‘यात कुठं कुणाचा उल्लेख आहे?’ उलथे न कळून त्याला प्रश्न विचारतो.
‘हे काय साल्या म्हटलंय…’ काडी त्यातल्या एका शब्दावर जोर देऊन सांगतो.
‘साल्या?’ उलथेला प्रश्न पडतो.
‘हो, सायेबांना गावची सगळी गाबडं साल्याच म्हणतात,’ फुगीर समर्थन देतो. बाकीचे पण मान डोलावतात.
‘बरं, पुढं ऐकव,’ उलथे सुचवतो.
‘हे बघा, इथं चोर म्हंटलंय,’ पुढच्याच वाक्यावर काडी आक्षेप घेतो.
‘अरे पण त्यात चोरावर विनोद केलाय…’ उलथे त्याची शंका बोलतो.
‘हो, मग? तुम्ही काय साहेबांना कमी चोर समजला का? त्यांना आता चित्तचोर म्हणतात, पूर्वी ते मंगळसूत्रच चोरायचे. मोबाईल चोरायचे. चोरीत त्यांच्याऐवढा मास्टर अख्ख्या जिल्ह्यात कुणी नव्हता. पण तो इतिहास उकरायची गरज होती का?’ पायचेपे पेटून उठतो.
‘ओ पायचेपे बसा. पुढलं ऐकू द्या. आणि बाळा आता पूर्ण ऐकव. मग सांग, तुझ्या सायेबांचा उल्लेख कुठं आला ते! काय?’ उलथे काडीला सांगतो. काडी फक्त मान डोलवतो.
पूर्ण पंधरा-वीस मिनिटं ऐकल्यावर आधी उलथे हेडफोन काढून फेकतो. त्यानंतर जवळ जवळ मोबाईल टेबलवर आपटतो. सगळ्या पायचेपेच्या टोळक्याकडे जळजळीत नजरेनं बघत खुर्चीत सावरून बसतो.
‘काय आहे यात? एकही आणि एकदाही नाव घेतलं नाहीय त्याने कुणाचं. मी गुन्हा दाखल करू कसा?’ उलथे तणफणत बोलतो.
‘काडी काय बोलताय साहेब?’ पायचेपेचा आवाज वाढतो.
‘असं काय करता साहेब? त्याच्यात थेट सायेबांचा उल्लेख आहे की! पुन्हा ऐकता का?’ काडी कळवळून विचारतो.
‘कुठे? आणि काय म्हणून?’ उलथे जरा निवांत बसत पुन्हा विचारतो.
‘हे काय? बाप चोर. दरोडेखोर. गद्दार. बैलबुद्धी. मूर्ख. हे शब्द.’ काडी यादी वाचतो.
‘पण यात साहेबांचं नाव कुठेय?’ उलथे खोदून विचारतो.
‘हां…. त्याला काय म्हणत्या?’ काडी डोकं खाजवत बाकीच्यांवर नजर फेकतो. ‘विशेषण! ही एवढी सगळी विशेषणं एकत्र सायेबांसाठीच वापरतात लोकं. मग हा साहेबांचा अपमान आहे ना?’ काडी पॉईंट शोधतोच.
तसे सगळे पंटर गलका करतात. पायचेपे काडीची पाठ थोपटत घोषणा देऊ लागतो.