काही गोष्टींचं गारूड असतं. काहींचं कमी होतं तर काही वयानुसार जास्त गुरफटवतात.
वय वाढतं तसं बर्याचशा गोष्टींना आपण कल्पना किंवा आपल्या झेपेच्या पल्याड असलेल्या गोष्टी म्हणून सोडून देतो. एक दिवस असा येतो की, बकेट लिस्टमध्ये ठेवलेल्या, विसरून गेलेल्या आणि आता तर कधीच शक्य नाही अशा इच्छा, गोष्टी अवघ्या चार-पाच तासांत हाताशी येतात. माझं तसंच झालं. एका आघाडीच्या वर्तमानपत्राच्या दिवाळी अंकात, एक तप किंवा त्याही पूर्वी असेल, संपादकांनी लिहिलेल्या विशेष लेखात ‘फँटम ऑफ द ऑपेरा’ या महानाट्याबद्दल वाचलेलं. तो काळ काही माहितीच्या महाविस्फोटाचा नव्हता. तरीही त्या लेखाने उत्सुकता आणि तीव्र इच्छा यांची बरीच आंदोलनं पार केली..
तो लेख हा एकच धागा.
इतरत्र त्याबद्दल कोणी बोलणंलिहिणं नाही, काही म्हणजे काही बातमी नाही.
१९१० साली लिहिल्या गेलेल्या, बरेच सिनेमे आणि नाटक फॉर्म घेऊन जगभराच्या रसिकांना भुरळ घालणार्या या महानाट्याबद्दल फारसं कोणाला माहिती नसावं किंवा उत्सुकता नसावी हे टोचत होतंच. इंटरनेट आल्यानंतर बरेचदा याबद्दल सर्च केलं; तर ब्रॉडवेवर चालणार्या, दहा हजारहून अधिक खेळ झालेल्या ह्या अद्भुत मिथकाबद्दल असलेलं गूढ वलय अधिकच वाढत गेलं. २०१२मध्ये याचे तिथले शोज बंद झाल्याचं अलीकडेच वाचलं, तेव्हा आता काही आपल्याला बघायला मिळत नाही याचं वैषम्य वाटून गेलं, पण ते तेवढंच.
मग एक दिवस उजाडला. अचानक मिळालेली सुट्टी, अचानक ठरलेले प्लॅन्स. भराभर सगळं जमून येत गेलं. अतिमहाग तिकीट काढून झाल्यावर अनेकजणांच्या सरबत्तीला तोंड द्यायला लागलं. वेडा आहेस निव्वळ वगैरे वगैरे. अगदी नाटकाच्या दिवशीही जमतं की नाही याची शाश्वती होईना. पण मुंबईच्या बीकेसीमधल्या अत्याधुनिक नीता अंबानी कलासंकुलातल्या राजेशाही थिएटरमध्ये हे महानाट्य पाहण्याचा योग जुळून आलाच.
सर्व ६४ (अधिकही आहेत म्हणतात) कलांमध्ये निःसंशय राज्ञीपद कमवून असलेली कला किंवा (कलासमुच्चय) म्हणजे सिनेमा. त्या आधी हे पद नाटकाकडे होतं. आजही मोबाईलवर छोट्या क्लिप्स पाहणार्या जगात हवा तो सिनेमा एका क्लिकवर उपलब्ध असणार्या सोयीसुविधायुक्त व्यवस्थेत लोक नाटक पाहायला का जातात? १९८६पासून एकाच थिएटरमध्ये तळ ठोकून आणि तरीही आजही हाऊसफुल असणं… दहा हजारपेक्षा जास्त वेळेस सांगितलं गेलेली ही कहाणी… फँटम ऑफ द ऑपेरा.
ही गोष्ट आहे थिएटरची. नाटकात घडणारं नाटक!
ब्रॉडवे नावाच्या थिएटरमध्ये नाटक बसतं आहे. त्यातल्या मुख्य अभिनेत्री कम गायिकेला काही कारणाने काम सोडावं लागतं. सहाय्यक नर्तिकावजा गायिका आयत्या वेळेस उभी राहते, तेव्हा तिला कल्पना नसते की हे फक्त नाटकाबद्दल नाही. आणि आपल्यालाही…
ब्रॉडवेच्या आत कुठेतरी राहणारा एरिक. कोणी म्हणतं तो नाही, कोणी म्हणतं तो आहे. पण त्याच्या नाटकातल्या योगदानाबद्दल कोणालाच शंका नाही. त्याच्या गूढ व्यक्तिमत्वाचा पगडा पूर्ण नाटकभर वावरत राहतो. त्याचा अर्धा मुखवटा असलेला चेहरा, त्याचा घनगंभीर पण सुरेल आवाज त्याला एक प्रभावी अस्तित्व देतो. नव्या मुलीच्या, क्रिस्टीनच्या प्रेमात पडतो तो. तीही भुलते, पण काही काळच. तिला एकेक हरकती, गाण्याचे बारकावे आणि अभिनयाचे धडे देतो. न कळत त्यांचं प्रेम फुलतं पण एकतर्फी..
तिच्यावर जीव असलेला राऊल हा या त्रिकोणाचा तिसरा कोन. प्रेमाच्या गूढगर्भाला तळापासून ढवळून काढणारं एरिकचं प्रेम स्थावर-जंगम, स्थिर-अस्थिर, जीवन-अस्तित्व यांच्या कोणत्याच सीमा मानत नाही. तिला मिळवण्यासाठी तो नवीन नाटक बसवायला लावतो. ती नसेल त्या नाटकात काही काही अतर्क्य गोष्टी घडवतो. दहशत बसवतो. अपघात होतात. प्रेमाची ही बाजू आपल्यालाही संभ्रमात टाकत जाते. यामुळे प्रेम मिळेल, अशी धारणा असते त्याची!
तो गुरफटतो, फरफटतो. सोबत तीही आणि तिचा तोही…
या नाटकात काय नाही?
एका ओळीत बसेल एवढीच साधी सोपी गोष्ट. ३६पेक्षा जास्त पात्रांचा गोतावळा. मोठा ऑर्वेâस्ट्रा लाइव्ह संगीत, लाइव्ह गायन. खणखणीत कलादिग्दर्शन आणि एकाहून एक जबरदस्त अभिनयाचे मासले. उंच आवाजातली काच तडकेल अशा लकेरींची गाणी. मागचे पुढचे नेपथ्य बघता बघता बदलत जाण्याची तरकीब. सत्तर फुटांवरून पडलेला जबरदस्त प्रकाशझोत. रंगीबेरंगी प्रकाश लहरींनी उजळलेला आसमंत. खर्याखुर्या हत्तीएवढा नाटकातला हत्ती. देशोदेशीच्या कलांचं नावीन्यपूर्ण सादरीकरण. आरशातल्या जगताची अद्भुत सैर; प्रत्येक प्रवेशाला नवीन, अधिक चकित करणारी प्रॉप्स आणि त्यांच्या अगम्य, चित्तचक्षुचमत्कारिक उपयोजनाची खेळी. ते सुप्रसिद्ध, अतिभव्य शॅन्डेलिअर (त्याला झुंबर म्हणणं त्याच्या भव्य आकाराचा अपमान आहे!) आरशाच्या आत आणि थिएटरच्या खाली कुठेतरी असणारं एरिकचं जग, वेगवेगळ्या लेव्हलवर असणारी घरं आणि त्यांच्या उच्चभ्रू गच्च्या. आणि ती पाण्यात फिरल्यासारख्या सहजपणाने धुक्यात वावरणारी, कशी कुणाला माहिती पण ३६० अंशात गर्रकन वळून नाहीशी होणारी छोटीशी बोट!
फँटम ऑफ द ऑपेरा हे नाटक ब्रॉडवेवर सर्वात जास्त काळ चालणारे संगीतमय नाटक म्हणून ओळखले जाते. टोनी, लॉरेन्स ऑलिव्हिए आणि ड्रामा डेस्क यांसारख्या अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलेले आहे. फँटम ऑफ द ऑपेरा हे पाश्चिमात्य नाटकजगताची ओळख म्हणून जगभर मिरवतं, भव्य अतिभव्य नेपथ्य पाहून दिपून जायला होतं. वेगवान हालचाली, क्षणाक्षणाला बदलणारे पार्श्वभूमीचे देखावे आणि विलक्षण प्रभावी रचत नेलेल्या घटना. प्रत्येक गाणं ऐकताना आपणही त्या ऑपेरा हाऊसच्या स्टेजवर उभे असल्यासारखं वाटतं हे या सादरीकरणाचं यश. २०२३पर्यंत ते ३५ वर्षांहून अधिक काळ चालले आणि १३,००० हून अधिक खेळ करून ऐतिहासिक विक्रम नोंदवला.
मला सर्वात जास्त आवडलेली ही दृश्यं; फँटम क्रिस्टिनाला आरशात घेऊन जातो त्या वेळी काहीही संगीत नसताना सहाय्यक नृत्यांगनांनी केलेले सुंदर एकजिनसी नृत्य! एका नृत्यांगानेने मर्कटसदृश चाळे करण्याचं घेतलेलं बेअरिंग शेवटपर्यंत सुटत नाही. फँटमच्या शेवटच्या प्रवेशात त्याचे कळत न कळत अचानक नाहीसे होणे.. केवळ भव्यता हेच परिमाण असू नये पण. कथानकाचा गाभा न सुटणे हेच या १४३ मिनिटं अव्याहत चालेल्या प्रयोगाचं मर्म. आयुष्यात पहिल्यांदाच ऑपेरा पाहणार्या प्रेक्षकाची कधी कधी कसोटी लागते हे खरं, पण संगीत छाप सोडून जातं नाटक संपल्यावरही. आणि काय हवं?
राज्याच्या आर्थिक राजधानीत, सुसज्ज आंतरराष्ट्रीय थिएटरची कमतरता असावी हे काही भूषणावह नव्हतं. (एनसीपीए असलं तरी तिथे सरकारी खाक्या दिसतोच दिसतो. पुन्हा ते अगदीच एका टोकाला आहे.) ती उणीव आता नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र भरून काढली आहे. सप्ततारांकित हॉटेलच्या तोंडात मारेल असं भव्यदिव्य केंद्र आहे हे. अर्थात तिकीटही तेवढंच प्रचंड महाग. पण अक्षरशः वसूल!
एकापेक्षा एक उत्तुंग उंचीची (लाक्षणिक आणि पार्थिव दोन्ही अर्थाने), टाचणीचाही आवाज वरच्या, सहाव्या मजल्यापर्यंत पोचेल अशी तयार साऊंड सिस्टिम, विविध पद्धतीने सजवलेली नाट्यगृहातली स्टँड्स आणि कुठूनही स्पष्ट दिसेल असा मोठा, राजेशाही स्टेज. फँटम ऑफ द ऑपेरा सारख्या हिमालयाने इथे एन्ट्री घेतली नसती तरच नवल. (आता आणखी आठदहा वर्षे राबून पैसे साठवून दुसरा असाच अनुभव घ्यावा असं माझ्या मध्यमवर्गीय मनाला वाटत राहिलं.)
एकूणात, फँटम ऑफ द ऑपेरा पाहणे हा अत्यंत आनंददायक अनुभव होता. माझा एक मित्र म्हणतो त्याप्रमाणे नाटक घडत राहो!
– डॉ. अमर पोवार