देवेंद्र फडणवीस
शिंदे तुम्ही घाबरू नका
गद्दारांना मिळेल न्याय
तोपर्यंत सहन करा
कितीही गेला खोलात पाय
गद्दारीच्या बदल्यात तुम्हा
दिली आम्ही सीएम खुर्ची
त्यांनी गद्दार म्हणताच तुमच्या
नाकाला का झोंबे मिरची
तुमचे हसे झाले मला
आनंदाच्या फुटल्या उकळ्या
टवकारून का बघतात अशा
कमळाच्या त्या हसर्या पाकळ्या
—————
एकनाथ शिंदे
तुम्ही नका सल्ले देऊ
माझे मीच पाहून घेईन
धर्मवीर पिक्चरसारखा
गद्दारीवर पिक्चर काढीन
माझी बाजू समजून घ्या ना
जेव्हा मला दिली ऑफर
आता नका फोडून पाहू
आमच्याच डोक्यावरती खापर
फक्त तुम्ही बघत रहा
एक दिवस माझा येईल
माझ्यासकट तुमची सत्ता
पुरामध्ये वाहून जाईल
—————
अजित पवार
बोलणार्याने बोलत जावे
ऐकणार्याने ऐकत जावे
अगदीच गाडे अडले तर
माफी मागून मोकळे व्हावे
घटनाभंग केला तर तो
नक्कीच गुन्हा मानला जाईल
न्यायालयही न्याय देईल
कामरासुद्धा जेलात जाईल
नक्की काय झाले याचे
मलाच कोडे सुटत नाही
हसावे की संतापावे
अजून पान्हा फुटत नाही
—————
जनता
गद्दारांचा जमवून मेळा
देवेंद्रानी स्थापिली सत्ता
वॉशिंग मशीनमध्ये बुडवून
मंत्रीपदाचा दिला भत्ता
सीएम झाले एकनाथ शिंदे
आभाळाला टेकले हात
एकेक लाडके निर्णय घेऊन
देवेंद्रांवर केली मात
पाहून पक्ष्यासारखे उडणे
हादरून गेले फडणवीस
स्वत: सीएम झाल्यावरती
कापले पंख नि एकेक पीस
—————
कुणाल कामरा
शिवकाळापासून लागली
गद्दारीची मोठी कीड
गद्दारीचे आजही वारस
नाही त्यांना कसली भीड
लालुच दाखवल्यावर करती
धन्याशीही बेईमानी
ज्यांनी दिले दाणा-पाणी
त्यांच्याशीच महादुष्मनी
नाही घरका नाही घाटका
अशी होते त्यांची स्थिती
लोक पाहती संशयाने
त्यांची गुंग होते मती