रशियाने युक्रेनमध्ये सैन्य घुसवल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आज व्यंगचित्रकार म्हणून कार्यरत असते, तर त्यांनी या घडामोडींची दखल कशी घेतली असती? भारताचे एक थोर व्यंगचित्रकार म्हणून बाळासाहेबांच्या फटकार्यांवर प्रेम असलेल्या आणि त्यांच्या रेषेचा अभ्यास करू पाहणार्यांच्या मनात हा प्रश्न उमटून गेला असेल… त्यांनी ‘मार्मिक’च्या जन्माच्याही आधी फ्री प्रेस जर्नलमध्ये रेखाटलेले हे अप्रतिम व्यंगचित्र पाहिल्यावर काहीशी कल्पना येऊ शकेल… या व्यंगचित्राची आणखी महत्त्वाची खासियत म्हणजे ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान, बेडर लढवय्ये, मुत्सद्दी नेते विन्स्टन चर्चिल यांच्यावरील कार्टून बायोग्राफीमध्ये जगातल्या निवडक व्यंगचित्रकारांच्या फटकार्यांतून चर्चिल यांचं चरित्र रेखाटलं होतं. त्यात भारतातून एकमेवाद्वितीय ‘ठाकरे’ (ही त्यांची तेव्हाची स्वाक्षरी) यांच्या तीन व्यंगचित्रांची निवड झाली होती… हे त्यापैकीच एक व्यंगचित्र… संदर्भ आहे मॉस्कोमध्ये झालेल्या शांतता बैठकीचा… या बैठकीला जाण्यास चर्चिल अनुत्सुक होते. सतत अळम् टळम् करत होते. त्यासंदर्भातल्या या व्यंगचित्रात चर्चिल यांना घेऊन जाण्यासाठी सज्ज झालेले शांततेचे प्रतीक असलेल्या पांढर्या कबुतराचे यान, पायलटप्रमाणे त्याने कानावर लावलेले हेडफोन्स हे पाहून हसू येतं… चर्चिल ही साहेबांची आवडती व्यक्तिरेखा… ते चर्चिलचे बोक्यासारखे व्यक्तिमत्त्व फार ‘प्रेमा’ने रेखाटत… आज युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी ज्या नाटो सदस्य देशांनी पुढाकार घेऊन युक्रेनच्या साह्याला धावावे, अशी सगळ्या जगाची इच्छा आहे; त्यांची भूराजकीय आणि आर्थिक अडचणींमुळे इकडे आड, तिकडे विहीर अशी स्थिती झाली आहे… ती दुविधा या चित्रातल्या चर्चिल यांच्या टाळाटाळीतून प्रतिबिंबित होते…