उंदरांमध्ये मांजरीची दहशत होती. कारण, मांजर उंदरांना खायची. उंदरांच्या अनेक बैठका व्हायच्या. या त्रासापासून वाचण्याचा उपाय काय? आपल्या प्रजातीचं मांजरांपासून संरक्षण कसं करायचं?
उंदरांचा असला तरी समाजच होता तो. नाना प्रकारचे उंदीर होते. काही समन्वयवादी होते. ते म्हणाले, आपण मांजरीला वगळून या प्रश्नावर उत्तर शोधू शकणार नाही. तिलाही या प्रक्रियेत सामावून घेतलं पाहिजे. सामोपचाराने निर्णय केला पाहिजे.
सामोपचाराची रुजवात करण्यासाठी त्यांचीच रवानगी झाली. ते त्या दिवशी मांजरीच्या पोटात विसावले.
ही घटना कळताच काही सूडवादी पेटून उठले. मांजरीने एक मारला तर आपण दोन मांजरं मारली पाहिजेत, असं म्हणून ते एकदम शौर्याच्या गप्पा मारायला लागले. त्या कामगिरीवर त्यांची रवानगी झाली. चारपाच उंदरांनी मिळून मांजरीवर हल्ला चढवायचं ठरलं… मांजरीला चारपाच उंदरांची एकत्रित मेजवानी मिळाली.
मग काही उंदरांनी आत्मिक बळ विकसित करून त्याच्या साह्याने मांजरीचं कायमस्वरूपी हृदयपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला, त्यांचं मांजरीच्या अन्नात तात्काळ परिवर्तन झालं.
अखेर समाजातल्या विचारवंतांनी सांगितलं, मांजरीचा धोका हा क्लियर अँड प्रेझेंट डेंजर आहे. त्याच्यावर असे अनैसर्गिक स्वरूपाचे उपाय करणं अशक्यप्राय आहे. मांजरीचं आपण स्वाभाविक अन्न आहोत. ती आपल्याला खाणार. ती काही आपल्याशी मैत्री करणार नाही. आपली ताकद तिच्यापुढे काहीच नाही. त्यामुळे मांजर जेव्हा जेव्हा आपल्या जवळ येईल, तेव्हा तेव्हा तिच्या येण्याची, म्हणजे धोक्याची सूचना आपल्याला मिळावी, एवढीच व्यवस्था आपण करायला हवी. त्यासाठी मांजराच्या गळ्यात घंटा बांधायला हवी.
हा उपाय ऐकताच उंदरांनी विचारवंतांच्या जयघोषाचा जल्लोष केला. सर्वांनाच उपाय पटला. पण, घंटा बांधणार कोण? विचारवंत म्हणाले, आमचं काम समाजाला विचार देण्याचं आहे. त्याची अंमलबजावणी करण्याचं काम समाजाचं आहे. आम्ही फक्त थियरी सांगतो. प्रॅक्टिकल तुमचं तुम्ही बघायचं.
अनेकांनी अनेक प्रकारे विचार करून पाहिला, पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधण्याचा मार्ग कुणाला सुचेना. अखेर अशा उपयोजनाला कठीण ज्ञानाचं जे होतं तेच झालं… त्याचं पोथीत रूपांतर झालं. उंदरांच्या समाजाच्या नित्यपठणात ती पोथी आली. सगळ्यांना मांजरीपासून असलेला धोका माहिती होता, अनेकजण त्याला बळी पडत होते,
सगळ्यांनाच पोथीतून उपाय पाठ होता. पण, कोणीही कोणाला वाचवू शकत नव्हता. उपायाची अंमलबजावणीही करायची असते, हेच हळुहळू समाज विसरून गेला.
मात्र, नव्या युगात चमत्कार झाला. नव्या पिढीच्या उंदरांनी जुन्यांशी पंगा घेऊन साफ सांगितलं. तुमच्या ज्या पोथ्यांमधून आजच्या काळाशी सुसंगत शिकवण मिळत नाही, त्या आम्ही निव्वळ कुरतडण्यायोग्य कचरा मानतो. संधी मिळताच आम्ही त्यांचा भुगा बनवून टाकू. जे आज उपयोगात येईल, तेच ज्ञान. बाकीचं ब्रम्हज्ञान गेलं चुलीत.
सगळ्या पोथ्यांच्या चिकित्सेमध्ये नव्या पिढीनेही मांजराच्या गळ्यात घंटा बांधण्याचा उपाय वाचला. ते म्हणाले, हे प्रॅक्टिकल आहे. जुन्या पिढीचे उंदीर म्हणाले, अरे, हा उपाय जालिम आहे, पण तो करता येत नाही. मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? ते अशक्य आहे. त्यामुळेच मांजरीच्या गळ्यात घंटा का बांधता येत नाही, यावर तात्विक ऊहापोह करणारी एक ज्ञानशाखाच विकसित झाली आहे आपल्या समाजात. खूप मोठी ग्रंथसंपदा आहे या शाखेची.
नवे उंदीर म्हणाले, आग लावा तुमच्या त्या ग्रंथसंपदेला. आम्ही उद्या सकाळीच मांजरीच्या गळ्यात घंटा बांधलेली असेल.
जुन्या पिढीचे उंदीर प्रलयकाळ आल्याप्रमाणे चेहरे करून बसले. हे कदापिही शक्य नाही, कारण तशी ईश्वरेच्छाच नाही, असं त्यांचं ठाम मत होतं. दुसर्या दिवशी सकाळी मांजर उंदरांच्या वस्तीजवळ आल्याची वर्दी तिच्या गळ्यातल्या घंटेने दिली आणि सगळी उंदीरनगरी स्तंभित झाली.
अरे बापरे, हा चमत्कार घडला कसा?
जुन्या उंदरांनी नव्यांना विचारलं.
ते म्हणाले, अहो, आमचा वावर एका औषध दुकानात असतो. फार्मासिस्टइतकंच आम्हालाही औषधांचं ज्ञान झालंय. तिथून झोपेच्या गोळ्या आणल्या, मांजरीच्या दुधात टाकल्या आणि तिच्या अंगावर बागडत तिच्या गळ्यात घंटाही बांधली आणि तिच्या मिशाही कापून टाकल्या!!