जशी माहिती मिळेल, जो कोणी एजंट आपल्याला अॅप्रोच होईल, त्याच्याकडे जो प्रॉडक्ट असेल तशी तुकड्या-तुकड्याने पद्धतीने गुंतवणूक केली जाते. शेअरमार्केट तेजीत असते तेव्हा इतरांचे बघून आपल्याला थोडा मोह सुटतो, काही शेअरब्रोकरही आग्रह करतात तेव्हा काहीवेळा त्यातही गुंतवणूक केली जाते. ज्या योजनेत गुंतवणूक करतो आहोत ती योजना काय आहे, त्याचे फायदे तोटे, त्यात जोखीम किती आहे, त्यातून किती परतावा मिळेल, जर त्यातून पैसे काढून घ्यायचे असतील तर काय सोय आहे म्हणजेच रोकडसुलभता आहे का या सगळ्याचा विचार करणे आवश्यक आहे.
– – –
रोजच्या वर्तमानपत्राची पाने बघितली तर पहिल्या पानावर मुख्य बातम्या, नंतर कमी महत्वाच्या बातम्या, नंतर संपादकीय असे करत शेवटी शेवटी कुठेतरी अर्थविषयक बातम्यांचे एक पान आणि अगदी शेवटी क्रीडाविषयक बातम्यांचे पान अशी मांडणी असते. काही वर्तमानपत्रात आठवड्यातून एक दिवस अर्थविषयक एक पुरवणीही असते. यापैकी ऑलिम्पिक आणि क्रिकेट विश्वचषकाच्या मॅचेस या वेळा सोडल्या तर क्रीडाविषयक पान त्यातील शौकीन लोकच वाचतात. तसंच अर्थविषयक बातम्यांचं पान किंवा पुरवणी ही कोण वाचतं चौकशी केली तर कळलं की हे वाचणारेही फारसे लोक नाहीत कारण त्यांना ते उपयुक्त किंवा इंटरेस्टिंग वाटत नाही किंवा किचकट वाटते, ते कळत नाही असे काही शेरे ऐकायला मिळाले. परंतु यातील माहिती तर खूपच महत्त्वाची असते. अर्थविषयक बातम्यांमध्येही काही प्रकार आहेत; इकॉनोमी म्हणजे देशाच्या व जगाच्या अर्थव्यवस्थेसंबंधीच्या बातम्या, उद्योगजगताविषयीच्या बातम्या आणि पर्सनल फायनान्स म्हणजे गुंतवणूक कशी करावी, कुठे करावी, त्याकरता उपलब्ध असलेल्या योजना, आयकर याविषयी माहिती देणारे लेख इत्यादी. हे तर आपल्या फारच कामाचे आहेत. असं असूनही हे लेख, बातम्या बारकाईने वाचल्या जात नाहीत. याचं एक कारण बहुधा असं असावं की दुसर्याच्या सल्ल्यानेच गुंतवणूक केली जाते, तर स्वत: कशाला वाचायचं असा समज असावा. म्हणूनच दुसर्यावर अवलंबून न राहता स्वत: समजून-उमजून गुंतवणूक करायला सुरवात करावी, दुसर्याच्या सल्ल्याने गुंतवणूक करतानाही काही माहिती तरी आपल्याला असावी, म्हणजे कोणी आपल्याला टोपी घालू शकणार नाही, हा या लेखमालेचा उद्देश आहे.
पुढचा प्रश्न येईल गुंतवणूकविषयक माहितीची ही लेखमाला कोणी वाचावी?
ज्याला नुकतीच नोकरी लागली आहे, त्याच्या हातात आता पैसा यायला सुरवात झाली आहे, तो कुठे गुंतवावा ते जाणण्यासाठी त्याने ही लेखमाला वाचणे आवश्यक आहे. तसेच ज्याला पैसे कमावायला लागून दहा-वीस अशी कितीही वर्षे झाली आहेत त्यानेही आपण योग्य प्रकारे गुंतवणूक करत आहोत का हे जाणून घेण्यासाठी ही लेखमाला वाचणे आवश्यक आहे. जे निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत त्यांनीही पुढच्या नियोजनासाठी आणि जे निवृत्त झालेले आहेत त्यांनी गुंतवणुकीचा आढावा घेण्यासाठी ही लेखमाला वाचणे आवश्यक आहे. थोडक्यात सर्वच लोकांनी ही लेखमाला वाचणे आवश्यक आहे, कारण जीवनावश्यक माहिती यातून मिळते.
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा पटतो का बघा; कोणत्या अभिनेत्याने कोणत्या अभिनेत्रीशी लग्न केले, त्यांच्या मुलांची नावे काय, ही सगळी माहिती चवीने वाचली जाते, जिचा आपल्याला काडीचा उपयोग नाही. तर मग जिच्यामुळे आपला फायदा होऊ शकतो ती गुंतवणुकीसंबंधी माहिती का वाचू नये? ती तर वाचायलाच हवी आणि वाचून सोडून दिली असंही उपयोगाचं नाही तर ती समजून घ्यावी, जिथे योग्य वाटेल त्यानुसार शक्य असेल तसा त्याचा उपयोग करावा किंवा स्मरणात ठेवावे.
सर्वसामान्य माणसाची गुंतवणूक करायला कशी सुरुवात होते? साधारण मध्यमवर्गीय घरात मुलगा किंवा मुलगी पदवी मिळेपर्यंत पालकांवरच अवलंबून असतात. परिस्थितीमुळे ज्यांना स्वतः कमावणे भाग असते असे काही अपवाद वगळले तर इतर मुलामुलींचा सगळा खर्च पालकच करत असतात. असा हा मुलगा किंवा मुलगी नोकरीला लागल्यानंतर त्याला साधारण वीस-तीस-पन्नास हजार रुपये महिना पगार सुरू होतो. आधीच्या महिन्यापर्यंत बघितलं तर त्याचं उत्पन्न शून्य असतं, आता एकदम समजा तीस हजार रुपये रक्कम हातात आली तर ती सगळीच बचत व्हायला पाहिजे; परंतु तसे होत नाही, कारण जो खर्च पालक करत होते त्याचा काही भाग आता कमावत्या मुलांना उचलावा लागतो. तसंच नोकरीला लागल्यावर बाहेर खाणे, कपडे असे काही खर्चही सुरू होतात, वाढतात. तरीही पगारातील काही पैसा शिल्लक राहतो. मग बँकेतील मुदत ठेवी (फिक्स्ड डिपॉझिट) हा सर्वात सोपा व सुरक्षित मार्ग, तिथून गुंतवणुकीला हळूहळू सुरुवात होते. नात्यातील काही व्यक्ती किंवा मित्र हे वेगवेगळ्या योजना (स्कीम) विकणारे एजंट असतात, तेही त्यांच्याकडची योजना घ्यायला लावतात. विमा एजंट विमायोजनेत गुंतवणूक करायला सांगतो, कोणी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायला सांगतो. पूर्वी पोस्ट ऑफिसच्या योजना विकणारे अनेक एजंट होते, ते आता कमी झालेले दिसतात. त्याचप्रमाणे घरातील ज्येष्ठ, ऑफिसातील सहकारी, मित्र हेही काही सल्ला देतात. त्यानुसारही सार्वजनिक भविष्य निर्वाहनिधी, इत्यादी विविध योजनांमध्ये गुंतवणूक केली जाते. आर्थिक वर्षाच्या शेवटी आयकर-पात्र होण्याचा ‘सन्मान’ आपल्याला मिळालेला आहे, आयकर द्यावा लागेल लक्षात आल्यावर आयकर वाचवण्यासाठी कोणत्या योजना आहेत याची शोधाशोध सुरू होते आणि तिथे गुंतवणूक केली जाते. ज्या बँकांमध्ये खाते आहे त्या बँकांचे प्रतिनिधी काही योजना सुचवतात. यामुळे जशी माहिती मिळेल, जो कोणी एजंट आपल्याला अॅप्रोच होईल, त्याच्याकडे जो प्रॉडक्ट असेल तशी तुकड्या-तुकड्याने (पीसमील) पद्धतीने गुंतवणूक केली जाते. शेअर मार्केट तेजीत असते तेव्हा इतरांचे बघून आपल्याला थोडा मोह सुटतो, काही शेअर ब्रोकरही आग्रह करतात तेव्हा काहीवेळा त्यातही गुंतवणूक केली जाते.
या सगळ्याच योजना चुकीच्या असतात असे नाही, परंतु नियोजनपूर्वक, योजनांची माहिती घेऊन, विचार करून, समजून घेऊन गुंतवणूक होत नाही. ज्या योजनेत (स्कीममध्ये) गुंतवणूक करतो आहोत ती योजना काय आहे, त्याचे फायदे तोटे, त्यात जोखीम किती आहे, त्यातून किती परतावा (रिटर्न) मिळेल, जर त्यातून पैसे काढून घ्यायचे असतील तर काय सोय आहे म्हणजेच रोकडसुलभता (लिक्विडिटी) आहे का, या सगळ्याचा विचार करणे आवश्यक आहे. मला त्यातलं कळतं नाही असं अजिबात उपयोगाचं नाही, तो आपला पैसा आहे आणि ऑफिसमध्ये एसीत बसून काम करत असाल तरी तो निढळाच्या घामाचाच पैसा आहे.
दुसरे म्हणजे न कळण्याइतपत काही त्यात कठीण सुद्धा नाही. एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, कितीही जवळचा नातेवाईक किंवा मित्र असो; त्यांनी गुंतवणुकीसाठी योजना सुचवल्यावर ती आपल्यासाठी योग्य आहे की नाही, काय फायदा-तोटा आहे, जोखीम किती आहे त्याचा विचार करूनच ती घ्यायची की नाही ते ठरवलं पाहिजे, भिडेखातर अजिबात हो म्हणू नये. एका परिचिताचा किस्सा सांगतो, त्याने मला सांगितलं, त्याच्याकडे सात-आठ विमा पॉलिसीज आहेत, कारण त्याचा एक जवळचा मित्र भेटला की त्याला पॉलिसी घ्यायला लावतो. माझा परिचित त्रस्त झालेला दिसत होता. काय करायचं, त्याने विचारलं. त्याला म्हटलं तुझा हा कोणी जवळचा मित्र आहे तो खरोखर मित्र असेल तर तो अशा सात-आठ पॉलिसी विकणारच नाही. पुन्हा जर त्याने तुला पॉलिसी घेण्याचा आग्रह केला, तर तू त्याला सांग की आपण मित्र आहोत, तू माझ्याकडे जेवायला ये, परंतु मी तुझ्याकडून पॉलिसी घेणार नाही.
हे अत्यंत महत्वाचे सूत्र लक्षात ठेवा तुमचा फायदा असल्याशिवाय कुठेही गुंतवणूक करू नका, भिडेखातर तर अजिबात करू नका. कुणी फार आग्रह करत असेल तर तुम्ही त्याला जेवायला बोलवा. जेवताना तो एखाद्या योजनेत गुंतवणूक करायचा आग्रह करू लागला तर त्याला चपाती-भात-लोणचं घेण्याचा आग्रह करा. लक्षात घ्या, सर्वच एजंट चुकीच्या योजनांमध्ये गुंतवणूक करायला सांगतात असं नाही, सगळ्याच योजना चुकीच्या असतात असेही नाही; पण, स्वत:चे तारतम्य वापरणे, माहिती काढणे आवश्यक आहे.
आणखी एक मुद्दा; काही अपवाद वगळता नवीन नोकरीला लागल्यावर बहुतेक व्यक्तींच्या पगारातून सहसा बचत होते. मात्र काहीजण पैसा हातात यायला लागल्यावर अनावश्यक खर्च सुरू करतात, काही मध्यमवयीन लोकही अनावश्यक खर्च करत असतात. त्यांनी सावधगिरी बाळगून, भविष्याचा विचार करून खर्च कमी करून बचत करणे आवश्यक आहे. मी असे मानतो की उधळणे ही वृत्ती कॉमन नाही, तर बचत करणे ही वृत्ती कॉमन आहे. त्यामुळे पैसे साठत जातात. अशी बचत केल्यावर मगच पुढे गुंतवणूक कुठे करायची हा प्रश्न येतो. गुंतवणुकीसंबंधी इतकी प्रस्तावना केली, आता सावध, सुरक्षित आणि आपल्याला हवा तो लाभ देणारी गुंतवणूक कुठे आणि कशी करायची, ते पुढील लेखात बघू.
(क्रमश:)