• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

नव्या व्यावसायिकांसाठी भरारी!

- राहुल कुलकर्णी (मार्ग माझा वेगळा)

Nitin Phanse by Nitin Phanse
June 1, 2022
in मार्ग माझा वेगळा
0

लॉकडाऊननंतर ‘घे भरारी’चा वारू जोरात आहे. दर महिन्याला एक याप्रमाणे आतापर्यंत १२ पेक्षा अधिक प्रदर्शने राज्याच्या विविध भागांमध्ये केली आहेत. त्याला उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे. आतापर्यंत पुण्याच्या वेशीपर्यंत सीमित असणारे हे प्रदर्शन आता बेळगाव, मुंबई, नाशिक इथपर्यंत जाऊन पोहचले आहे. यामध्ये सहभागी होणार्‍या मंडळींचा सहभाग दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे भविष्यात राज्यातल्या प्रत्येक शहरापर्यंत ते पोहचवण्याचे ध्येय ठेवले आहे. या माध्यमातून नव्या व्यावसायिकांना एक व्यासपीठ मिळत आहे, तीच खरी याची जमेची बाजू आहे.
– – –

दुपारची वेळ होती. हॉटेलमध्ये बसलो होतो. एका मित्राचा मोबाईलवर फोन आला, इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि त्याने एक प्रश्न विचारला, मी एक हॅन्डमेड प्रॉडक्ट तयार केले आहे, त्याचे मार्केटिंग करायचे आहे, कशा प्रकारे करता येईल, तू काही मार्गदर्शन करू शकशील का? त्याच्या त्या प्रश्नाचे उत्तर मी लगेच देऊ शकत नव्हतो. त्यामुळे थोडा विचार करतो आणि सांगतो, असे त्याला सांगितले. त्याने विचारलेल्या प्रश्नामुळे नव्या, छोट्या उद्योजकांसाठी आपल्याला काही करता येईल का, त्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी, ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय करता येईल, या प्रश्नाने डोक्यात घर केले होते, त्यादृष्टीने माझा विचार सुरु झाला… नवउद्योजकांना एका प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी एक प्रदर्शन आयोजित केले तर त्यांना चांगला मार्ग सापडू शकतो, असा विचार करून २०१५मध्ये पहिल्यांदा मेहेंदळे गॅरेजच्या जागेमध्ये एका प्रदर्शनाचे आयोजन केले. मला वाटले होते की आपले स्टॉल फटाफट बुक होतील, पण तेव्हा त्या ४० स्टॉलला बुकिंग मिळवण्यासाठी भरपूर कष्ट पडले. चांगला प्रतिसाद मिळाला, पण पैसे काही मिळाले नाहीत. पहिलाच प्रयत्न आहे म्हणून पुढे जात राहिलो… हा प्लॅटफॉर्म आता ‘घे भरारी’ म्हणून नावारूपाला आला आहे. फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या विविध भागांत त्याची ख्याती पोहचली आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्यातून नव्या आणि छोट्या व्यावसायिकांना ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी एक हक्काची जागा उपलब्ध झाली आहे.

हॉटेलच्या व्यवसायाने सुरुवात

मला लहानपणापासून खाण्यापिण्याची आवडे. त्यामुळे पोटोबाशी जवळीक असणाराच व्यवसाय करायचा हे ठरवले होते. मॉडर्न कॉलेजमधून बी.कॉम पूर्ण केल्यानंतर काही काळ गुंतवणूक सल्लागार म्हणून काम करत होतो. २००७ मध्ये हिंजवडीचे आयटी पार्क नावारूपाला येत होते. तिथल्या एका छोट्या कंपनीत कँटीन चालवायला घ्यायचे ठरवले. सुरुवात चांगली झाली. मला वाटले, आता हा व्यवसाय चांगला सेट होईल. पण नियतीला बहुधा ते मान्य नसावे. माझ्याकडचे आचारी, नोकर यांची पळवापळवी सुरु झाली. काही जण निघून गेले, त्यामुळे अवघ्या एक वर्षात ते बंद पडले. आता हॉटेलच्या व्यवसायात पडलो आहोत, तिथून मागे कसे फिरायचे असा विचार डोक्यात सुरु होता. दरम्यान, पुण्यात मिलिंद होळणकर एक हॉटेल चालवत होता. त्याच्या मदतीने मी लक्ष्मी रोडवर हॉटेल सुरु करायचे ठरवले. त्याच्याकडे जे मसाले वापरले जायचे, मेनू असायचा तोच माझ्याकडे द्यायचो, पण डिशच्या बेसवर. वेगळ्या चवीचे हॉटेल म्हणून ते नावारूपाला आले. ते उभे करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यामुळे नव्याने व्यवसाय करणार्‍यांना काय अडचणी येतात त्याची माहिती होती. त्यातच मित्राच्या फोनने या मार्गावर आणून सोडले…
२०१५मध्ये पहिल्यांदा छोटे व्यावसायिक, हॅन्डमेड वस्तू तयार करणारी मंडळी यांच्यासाठी पहिले प्रदर्शन भरवलं. त्यात खिशाला चाट बसली. स्टॉल घेतलेल्यांपैकी काही जणांनी पूर्ण पैसे दिले नाहीत. तोटा झाला म्हणून आपण पुन्हा असे प्रदर्शन आयोजित करायचे नाही, असा विचार मात्र कधीच केला नाही. व्यवसाय म्हटलं की थोडे उन्नीस बीस होणार हे मी डोक्यात ठेवले होते. त्या प्रदर्शनाची मी जाहिरात देखील केली होती, पण त्यातून हातात काही आले नव्हते. दरवर्षी असे प्रदर्शन करायचे हे तेव्हाच पक्के केले. दुसर्‍या वर्षीचे प्रदर्शनही सो सो च झाले… २०१७-१८पासून मात्र या प्रदर्शनाची एक ओळख निर्माण होण्यास सुरवात झाली. २०१९मध्ये शुभारंभ मंगल कार्यालयात २५० स्टॉलचे मोठे प्रदर्शन भरवले. त्यात अनेक मंडळी उस्फूर्तपणे सहभागी झाली. प्रदर्शनाला गर्दी पण चांगली झाली, त्यामुळे हुरूप वाढला. नव्या उद्योजक मंडळींना देखील चांगला फायदा झाला.

प्रदर्शन, लॉकडाऊन आणि टेन्शन

२०२०च्या एप्रिलमध्ये पुन्हा शुभारंभ मंगल कार्यालयाच्या मैदानावर प्रदर्शन आयोजित करण्याचे निश्चित केले होते. त्यात जयपूर, इंदोर, राजस्थानातील मंडळींनी सहभागी होण्याचे निश्चित केले होते. पण कोरोनामुळे मार्च महिन्यात लॉकडाऊन लागला आणि प्रदर्शन रद्द करावे लागले. लोकांनीही प्रदर्शनासाठी मोठी तयारी केली होती. मोठ्या प्रमाणात वस्तू तयार केल्या होत्या. बाहेरून काही वस्तू मागवल्या होत्या. पण प्रदर्शन रद्द झाल्यामुळे सगळ्यांची मोठी अडचण झाली. त्यांना मोठा तोटा सहन करावा लागणार होता. आता काय करायचे, याचा विचार सुरु असताना फेसबुकच्या माध्यमातून त्यांच्या वस्तूंना बाजारपेठ निर्माण करून द्यायची हे ठरवले आणि १ मे २०२० रोजी ‘घे भरारी’च्या फेसबुक पेजची सुरुवात झाली.
लॉकडाऊनच्या काळात लोक घरीच होते, फेसबुकवर सुरु झालेल्या या पेजची बातमी वार्‍यासारखी पसरली. अगदी अल्पावधीत ते पेज प्रसिद्ध झाले. प्रदर्शनातील मंडळींची उत्पादने विकली गेली, पैसे मिळाले. लॉकडाऊनमुळे या व्यावसायिकांना आलेले टेन्शन फेसबुक पेजमुळे दूर झाले होते. बाहेरच्या देशातील लोकही फेसबुकच्या या पेजला जोडले गेलेले आहेत.

असाही एक अनुभव

‘घे भरारी’च्या माध्यमातून ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध झाल्यामुळे अनेकजण जोडले गेले. गणपती उत्सवामध्ये गणेशमूर्तीचा व्यवसाय करण्यासाठी काहीजणांनी याचा वापर करण्याचे ठरवले. तेव्हा लॉकडाऊन सुरु होता, म्हणून सगळे ऑनलाईन ऑर्डर करत होते. अनेक जणांनी गणेशमूर्तीचे बुकिंग केले. एक दिवस एक पोलीस माझ्या हॉटेलच्या दारात आला. ऑनलाईन गणपतीचे बुकिंग केलेले आहे, आणि त्याची अजून डिलिव्हरी झालेली नाही अशी तक्रार पोलिसांकडे आली होती. ही काय भानगड आहे, म्हणून मी मूर्ती पुरवणार्‍या गृहस्थांना फोन केला तर ते उचलत नव्हते. ते एका व्यक्तीच्या माध्यमातून आमच्याकडे आले होते, त्यांना ही सारी हकीकत सांगितली. त्यांनी त्यांना फोन करून बोलावून घेतले. ते म्हणाले, माझ्याकडे १५० गणेश मूर्ती आहेत. प्रत्यक्षात त्यापेक्षा अधिकजणांनी नाव नोंदणी करून पैसे भरले होते. त्यांना १५०जणांना मूर्ती देऊन उरलेल्या लोकांचे पैसे देण्याचे काम मी माझ्या देखरेखेखाली पूर्ण करून घेतले. त्यांना देखील वाटले नव्हते आपल्याला एवढा प्रतिसाद मिळेल असे.

घरातून विरोध

मी व्यवसायात पडायचा निर्णय घेतला तेव्हा मला घरातून प्रचंड विरोध झाला. माझे वडील मर्चन्ट नेव्हीमध्ये कार्यरत होते. त्यांच्याप्रमाणे मीही मर्चंट नेव्हीमध्ये जावे, अशी त्यांची इच्छा होती. तिथे चांगला पगार मिळेल, असे ते मला सांगत असत. पण मी त्याकडे दुर्लक्ष केले आणि व्यवसायात जाण्याचा निर्णय घेतला होता. या भूमिकेमुळे त्यांनी माझ्याशी अबोला धरला होता.
लॉकडाऊननंतर ‘घे भरारी’चा वारू जोरात आहे. दर महिन्याला एक याप्रमाणे आतापर्यंत १२पेक्षा अधिक प्रदर्शने राज्याच्या विविध भागांमध्ये केली आहेत. त्यांना उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे. आतापर्यंत पुण्याच्या वेशीपर्यंत सीमित असणारे हे प्रदर्शन आता बेळगाव, मुंबई, नाशिक इथपर्यंत जाऊन पोहोचले आहे. यामध्ये सहभाग दिवसेंदिवस वाढत आहे.भविष्यात राज्यातल्या प्रत्येक शहरापर्यंत ते पोहोचवण्याचे ध्येय ठेवले आहे. या माध्यमातून नव्या व्यावसायिकांना एक व्यासपीठ मिळत आहे, तीच खरी याची जमेची बाजू आहे.

शब्दांकन – सुधीर साबळे

Previous Post

शंभर नंबरी सराफ – अशोक सराफ

Next Post

नियोजनपूर्वक गुंतवणुकीची सुरुवात

Next Post

नियोजनपूर्वक गुंतवणुकीची सुरुवात

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.